प्रकरण पाचवे
१० जानेवारीला एंटरप्राईझ आणि इन्व्हेस्टीगेटर यांनी इंग्लंडचा किनारा सोडला. मोहीमेत एकूण ६६ माणसांचा समावेश होता. एंटरप्राईझचा कॅप्टन होता कॉलीन्सन तर एन्व्हेस्टीगेटर मॅक्क्युलरच्या अधिपत्याखाली होतं. विषुववृत्त ओलांडून रिओ-द-जानेरोच्या परिसरात ५ मार्चच्या सुमाराला त्यांना आफ्रीकन गुलामांनी भरलेली जहाजं दृष्टीस पडली. १५ मार्चच्या सुमाराला इव्हेस्टीगेटर मॅजेलन सामुद्रधुनीत शिरलं. मात्रं मॅजेलन सामुद्रधुनीतून बाहेर पडल्यावर इन्व्हेस्टीगेटर आणि एंटरप्राईझ यांच्यातील संपर्क तुटला!
मॅक्क्युलरने उत्तरेची वाट धरली. इन्व्हेस्टीगेटरवरील सुमारे हजार पौंड डबाबंद अन्नपदार्थ त्यात पाणी शिरल्यामुळे खराब झाले, परंतु सुदैवाने सँडविच बेटांवर त्यांना अन्नपदार्थ उपलब्धं झाल्यामुळे हा प्रश्न निकालात निघाला. १ जुलैला हवाईतील होनोलुलु बेट गाठून त्यांनी जास्तीची अन्नसामग्री भरुन घेतली. इन्व्हेस्टीगेटर होनोलुलुला पोहोचण्याच्या आदल्या दिवशीच एंटरप्राईझ तिथून पुढे निघालं होतं! ६ जुलैला इन्व्हेस्टीगेटरने हवाई सोडून पुढच्या प्रवासाला सुरवात केली.
ब्रिटीश नौदलाबरोबरच फ्रँकलीनच्या शोधार्थ प्रयत्नं करण्यासाठी अमेरीकन सरकारनेही मदत करावी अशी विनंती जेन फ्रँकलीनने अमेरीकेचे अध्यक्ष झॅकरी टेलर याना पत्राद्वारे केली होती! अमेरीकन सरकारचा निर्णय होण्यापूर्वीच उद्योगपती हेनरी ग्रिनेल याने दोन जहाजे विकत घेऊन ती सरकारला शोधमोहीमेसाठी देण्याची तयारी दर्शवली. ग्रिनेलने रेस्क्यू आणि अॅडव्हान्स ही दोन जहाजे विकत घेतल्यावर नौदलाने या मोहीमेसाठी अनेक अधिकारी आणि खलाशांची नेमणूक केली.
लेफ्टनंट एडवीन डी हेवनच्या अधिपत्याखाली रेस्क्यू आणि अॅडव्हान्स यानी २२ मेला न्यूयॉर्क बंदर सोडलं. या मोहीमेत डॉ. एलीशा केनचाही समावेश होता.
२० जूनला डी हेवन डिस्को उपसागरातील क्राऊन प्रिन्स बेटावर पोहोचला. तिथे गाठ पडलेल्या एका बिटीश जहाजाकडून इतर अनेक जहाजंही त्याच मार्गाने फ्रँकलीनच्या शोधात येत असल्याचं त्याला कळून आलं. २९ जूनला क्राऊन प्रिन्स बेट सोडून डि हेवनने अपरनाव्हीक बेटाची वाट पकडली, परंतु आता हिमनगांशी मुकाबला होण्यास सुरवात झाली होती!
७ जुलैला आडव्या येणार्या हिमनगांमुळे ताटातूट होऊ नये म्हणून अॅडव्हान्सने रेस्क्यूला ओढत नेण्यास सुरवात केली! पुढचे तीन आठवडे ते बर्फात अडकून पडले होते! २८ जुलैला अखेर त्यांची बर्फातून सुटका झाली!
पश्चिमेला २८ जुलैला इन्व्हेस्टीगेटरने आर्क्टीक सर्कलमध्ये प्रवेश केला. २० जुलैलाच परतणार्या हेराल्ड या जहाजावरुन मॅक्क्युलरने कॉलीन्सनच्या इंटरप्राईझ जहाजाशी आपली चुकामुक झाल्याचं आणि स्वतंत्रपणे नॉर्थवेस्ट पॅसेज ओलांडण्याचा प्रयत्न करत असल्याचं नौदलाला कळवलं!
२ ऑगस्टला ७२ अंश उत्तर अक्षवृत्तावर मॅक्क्युलरला हिमनगांचं प्रथम दर्शन झालं. पॉईंट बॅरोकडे जाण्याचा मार्ग या हिमनगांनी रोखून धरला होता. थेट पॉईंट बॅरोला न जाता उत्तरेकडील सागरातून वळसा घालून मॅक्क्युलरने अखेर ६ ऑगस्टला पॉईंट बॅरो गाठलं.
८ ऑगस्टला मॅक्क्युलरने स्थानिक एस्कीमोंची गाठ घेतली. त्यांच्याकडून फ्रँकलीनच्या मोहीमेची कोणतीही माहीती त्याला मिळाली नाही. त्याच दिवशी पॉईंट बॅरो सोडून त्याने पूर्वेची वाट धरली.
अद्यापही आर्क्टीकमध्ये असलेल्या जेम्स क्लार्क रॉसने वेलींग्टन खाडी गाठली. परंतु खाडीतील गोठेलेल्या बर्फापुढे त्याला हार पत्करावी लागली. त्याने परतीची वाट धरली.
पूर्वेला बर्फातून सुटका झाल्यावर डी हेवनने मेल्व्हील उपसागरातून पुढे वाटचालीस सुरवात केली. सतत आडव्या येणार्या हिमनगातून मार्ग काढत आणि बदलत्या हवामानाला तोंड देत लँकेस्टर खाडीच्या किनार्याने त्यांची आगेकूच सुरु होती. १४ ऑगस्टला ७६ अंश उत्तर अक्षवृत्तावरील केप यॉर्क इथे त्यांची एस्कीमोंशी गाठ पडली, परंतु फ्रँकलीनबद्दल कोणतीही माहीती त्यांच्या हाती आली नाही.
२१ ऑगस्टला कॉलीन्सनचं एंटरप्राईझ पॉईंट बॅरोला पोहोचलं. इन्व्हेस्टीगेटरच्या आधी हवाईहून निघूनही बेरींगच्या सामुद्रधुनीजवळ हेराल्डची भेट घेण्यासाठी आठवडाभर थांबून राहील्याने एंटरप्राईझ मागे पडलं होतं. पॉईंट बॅरोला मॅक्क्युलर दोन आठवड्यांपूर्वीच पूर्वेला गेल्याचं कळल्यावर कॉलीन्सनने मागे फिरुन बेरींगची सामुद्रधुनी गाठली आणि थेट हॉ़गकाँगची वाट धरली!
कॉलीन्सनचा हा निर्णय अनाकलनीय होता. त्याच्या मोहीमेला एक संपूर्ण वर्ष उशीर होणार होता!
मॅक्क्युलरने अलास्काच्या उत्तर किनार्याच्या काठाने मॅकेंझी नदीच्या मुखाची वाट धरली होती. प्रत्येक मुक्कामावर आपल्या आगमनाची नोंद करणारे संदेश त्याने ठेवले होते. वाटेत भेटलेल्या एस्कीमोंच्या प्रत्येक तुकडीकडे मॅक्क्युलरने फ्रँकलीनची चौकशी करण्याचं सत्रं आरंभलं होतं, पण कोणाकडूनही त्याला काहीच माहीती मिळत नव्हती.
गोठलेल्या बर्फातून जिकीरीने मार्ग काढत उत्तर-पूर्वेच्या दिशेने इन्व्हेस्टीगेटरची आगेकूच सुरुच होती. एकदा तर जहाज बर्फात पूर्ण अडकल्यावर सर्व सामग्री छोट्या बोटींतही उतरवण्यात आली. दुर्दैवाने यापैकी एक बोट उलटल्याने सुमारे ३३०० पौंड सुकवलेलं मांस आर्क्टीकच्या तळाशी गेलं! १९ ऑगस्टला गोठलेल्या बर्फामुळे जहाज पुढे जाणं अशक्यं असल्याचं मॅक्क्युलरच्या ध्यानात आलं.
१८ ऑगस्टला डी हेवनची दुसर्या एका जहाजाशी गाठ पडली.
लेडी फ्रँकलीन!
जेन फ्रँकलीनच्या विनंतीवरुन कॅप्टन विल्यम पेनी लेडी फ्रँकलीन या जहाजातून फ्रँकलीन मोहीमेच्या शोधासाठी आर्क्टीकमध्ये आला होता.
२१ ऑगस्टला फेलीक्स या दुसर्या जहाजाशी डी हेवनची गाठ पडली. या जहाजाचा प्रमुख होता कॅप्टन जॉन रॉस! पाठोपाठ २२ ऑगस्टला प्रिन्स अल्बर्ट या जहाजाच कॅप्टन चार्ल्स फोर्से याच्याशी त्यांची गाठ पडली. फोर्सेथच्या मोहीमेला जेन फ्रँकलीनने अर्थसहाय्य केलेलं होतं.
यांच्याव्यतिरीकत आणखीन एक महत्वाची मोहीम त्या परिसरात होती. ब्रिटीश नौदलाची रिझोल्युट आणि असिस्टंस ही दोन जहाज आणि त्यांच्या मदतीला असलेली पायोनियर आणि इंटरपीड! कॅप्टन हॉर्शो ऑस्टीनच्या या मोहीमेत इरॅस्मस ओमनीचाही समावेश होता. ब्रिटीश नौदलाची ही मोहीम २४ ऑगस्टला बीची बेटावर पोहोचली होती. यांच्या जोडीला डी हेवनच्या मोहीमेतील कॅप्टन ग्रिफीनचं रेस्क्यू हे जहाजही होतं.
बर्फातून जहाज मोकळं झाल्यावर मॅक्क्युलरने मॅकेंझी नदीच्या मुखाशी असलेलं पॉईंट वॉरेन गाठलं. तिथे अनेक एस्कीमोंच्या टोळ्यांशी त्यांची गाठ पडली. त्यांच्यापैकी एका टोळीकडून त्याला एक महत्वाची बातमी कळली.
दोन वर्षांपूर्वी एक युरोपियन माणूस आर्क्टीक सर्कलमध्ये मरण पावला होता!
या बातमीबरोबर मॅक्क्युलरची आशा पल्लवीत झाली. मरण पावलेला या युरोपियन माणूस फ्रँकलीनच्या मोहीमेतील तर नव्हता ना?
हा माणूस फ्रँकलीनच्या तुकडीतील नसल्याचं लवकरच मॅक्क्युलरच्या ध्यानात आलं. जॉन रिचर्डसन आणि जॉन रे यांच्या मोहीमेत मरण पावलेला तो अधिकारी असल्याचं लवकरच स्पष्टं झालं.
सर्व जहाजांनी एकेकट्याने शोध घेण्यापेक्षा सर्वांनी मिळून एकत्र शोधमोहीम राबवावी अशी प्रिन्स अल्बर्टचा कॅप्टन फोर्से याने सूचना केली. बुथिया आखाताच्या परिसरात आणि कॉकबर्न लँडच्या परिसरात स्लेजच्या सहाय्याने शोध घेण्याची त्याची योजना होती.
बीची बेटावर शोध घेत असताना कॅप्टन ओमनीला एक अभूतपूर्व गोष्ट आढळली...
कँपचे अवशेष!
अनेक तंबूंचे मागे राहीलेले अवशेष त्याला आढळून आले. त्याचबरोबर कापडाचे काही तुकडे आणि जहाजावरील सामग्री उतरवल्याच्या खुणाही!
जॉन फ्रँकलीनच्या मोहीमेची ही आढळलेली पहिली खूण!
२५ ऑगस्ट १८५०!
बीची बेटाचा आणखीन शोध घेतल्यावर त्यांना बर्फाचा मोठा मानवनिर्मीत ढिगारा (केर्न) आढळला. त्याच्या आसपासही अनेक अवशेष आढळून आले. ओमनीच्या मोहीमेतील स्लेजवरुन शोध घेणार्या तुकडीला डेव्हन बेट आणि केप रेली इथेही फ्रँकलीनच्या वास्तव्याच्या खुणा आढळल्या. परंतु कोणताही संदेश अथवा फ्रँकलीनच्या मोहीमेचा पुढचा मार्ग दर्शवणारी एकही गोष्ट त्यांना आढळली नाही.
२७ ऑगस्टला डी हेवन आणि इतरांनी केप रेली गाठलं. ओमनीने इथे उभारलेल्या केर्नमध्ये महत्वाचा संदेश ठेवला होता.
बीची बेटावर त्याला फ्रँकलीनच्या मोहीमेचा माग सापडला होता. त्याच बरोबर डेव्हन बेट आणि केप रेली इथेही त्यांच्या वास्तव्याच्या खुणा आढळल्या होत्या!
बीची बेट
त्याच दिवशी त्यांनी बीची बेट गाठलं. इथे पेनीच्या लेडी फ्रँकलीन आणि सोफीया या जहाजांशी त्यांची पुन्हा गाठ पडली. बीची बेटाच्या अंतर्भागात शोध घेतल्यावर त्यांना अनेक लंडनमध्ये निर्मीती झालेले अनेक खाद्यपदार्थाचे कंटेनर्स आढळून आले. त्याच्या जोडीला १८४४ ची वर्तमानपत्रं, फ्रँकलीनच्या अधिकार्यांनी सह्या केलेले अनेक कागदपत्रं सापडले.
जेम्स रॉसचं फेलीक्स हे जहाजही बीची बेटावर येऊन पोहोचलं. डी हेवनची अॅडव्हान्स आणि रेस्क्यू, पेनीची लेडी फ्रँकलीन आणि सोफीया, रॉसचं फेलीक्स, फोर्सेचं प्रिन्स अल्बर्ट अशा सहा जहाजावरील खलाशांनी आता एकत्र शोधमोहीमेला सुरवात केली.
बीची बेटावर शोध घेण्यार्या एका स्लेजच्या तुकडीला एका ठिकाणी अनपेक्षीत गोष्ट आढळली..
बर्फात बांधलेल्या तीन कबरी!
या तीन्ही कबरींवर परंपरागत लाकडी मार्कर बसवण्यात आलेले होते. या कबरींना संरक्षणासाठी बाजूने दगडांची रास रचलेली आढळून आली. तिथे असलेल्या नोंदींवरुन त्या कबरी कोणाच्या आहेत हे त्यांना कळून चुकलं.
जॉन हार्टनेल आणि जॉन टॉरींग्टन - मृत्यू १ जानेवारी १८४६
विल ब्रेनी - मृत्यू ३ एप्रिल १८४६
जॉन टॉरींग्टनच्या कबरीवर तो टेरर जहाजावर मरण पावल्याचा स्पष्ट उल्लेख होता. बेटाच्या किनार्याजवळ सुतारकामाचे अवशेष आढळून आले. तसेच ऑब्झर्वेटरी आणि भटारखान्याचे अवशेषही आढळले. अन्नपदार्थांचे सुमारे ६०० रिकामे कॅन्स व्यवस्थीत रचून ठेवलेले आढळले. या सर्वाचा विचार केल्यावर तिघा खलाशांच्या मृत्यूनंतरही फ्रँकलीनची जहाज सुस्थितीत असून पुढील मोहीमेसाठी तयारीत असल्याचा सर्वांनी निष्कर्ष काढला. मात्रं फ्रँकलीनच्या मोहीमेची पुढील योजना काय असावी याबद्दल एकही संदेश त्यांना आढळला नाही.
बीची बेटावरील कबरी
२८ ऑगस्टला हॉर्शो ऑस्टीनचं रिझोल्यूट आणि त्याचं सहाय्यक इंटरपीड ही दोन जहाजंही बीची बेटावर येऊन पोहोचली. आता एकूण आठ जहाज बीची बेटावर होती.
३ सप्टेंबरला डी हेवनच्या अॅडव्हान्स जहाजाने केप स्पेन्सरच्या दिशेने बर्फातून वाट काढण्यास सुरवात केली. वाटेत लागणार्या बेटांवर स्लेजनी भटकंती करुन शोध घेण्याचं त्यांचं सत्रं सुरुच होतं.
७ सप्टेंबरला वार्याने उग्र रुप धारण केलं! वादळाला सुरवात झाली!
अॅडव्हान्स आणि रेस्क्यू एकमेकांपासून वेगळी होऊ नयेत म्हणून दोरखंडाने एकमेकांना बांधलेली होती. मात्रं हॉर्शो ऑस्टीनचं रिझोल्यूट आणि इंटरपीड ही जहाजं हिमखंडांमुळे पश्चिमेला ढकलली गेली होती. इतर जहाजांचीही वादळातून आणि बर्फातून मार्ग काढत पश्चिमेला आगेकूच सुरुच होती. ग्रिफीथ बेट गाठून सर्वांनी नांगर टाकला. रिझोल्यूट, इंटरपीड, असिस्टंस, पायोनियर ही ऑस्टीन आणि ओमनीची जहाजं, लेडी फ्रँकलीन आणि सोफीया ही विल्यम पेनीची जहाजं आणि अमेरीकन मोहीमेतील अॅडव्हान्स आणि रेस्क्यू अशी एकूण आठ जहाजं ग्रिफीन बेटाच्या आश्रयाला होती.
ग्रिफीन बेटाच्या आश्रयाला असताना जोरदार वादळामुळे रेस्क्यू इतरांपासून वेगळं झालं आणि दक्षिणेच्या दिशेला ढकललं गेलं! हा प्रकार पाहील्यावर डी हेवनने शोधमोहीम आवरती घेऊन परतीचा निर्णय घेतला! ग्रिफीन बेटाचा आश्रय सोडून रेस्क्यूच्या मागोमाग तो दक्षिणेला निघाला, परंतु सप्टेंबर अखेरीला वेलींग्टन सामुद्रधुनीत ७५'२४'' अंश उत्तर अक्षवृत्तावर अॅडव्हान्स आणि रेस्क्यू दोन्ही जहाजं बर्फात अडकली!
आर्क्टीकमधला हिवाळा त्यांच्यासमोर उभा ठाकला!
सप्टेंबरमध्येच मॅक्क्युलरने मॅकेंझी खाडी सोडून पूर्वेला कूच केलं. पूर्वेला मॅक्क्युलरला एका सामुद्रधुनीचा शोध लागला. प्रिन्स ऑफ वेल्स सामुद्रधुनी!
१० सप्टेंबरच्या सुमाराला हवामानात अचानक बदल झाला. उत्तरेकडून अनेक मोठे हिमखंड चाल करुन जहाजाच्या दिशेने येऊ लागले! १६ सप्टेंबरला त्यांनी ७३ अंश उत्तर अक्षवृत्त ११७ अंश पश्चिम रेखावृत्त गाठलं. २३ सप्टेंबरला अखेर गोठलेल्या बर्फामुळे पुढे जाणं त्याना अशक्य झालं. पुढचे चार दिवस सतत घोंघावणारा वारा आणि बर्फाच्या सतत होणार्या हालचालींमुळे आणि आवाजामुळे सर्वजण जीव मुठीत धरुन होते.
२१ ऑक्टोबरला सात सहकार्यांसह मॅक्क्युलर नॉर्थवेस्ट पॅसेजच्या शोधात स्लेजवरुन निघाला. चार दिवस प्रवास केल्यावर त्याने बँक बेट गाठलं. बँक बेटावरील एका टेकडीवरुन त्याला दूर मेल्व्हील बेट दृष्टीस पडलं. बेटाच्या दिशेने जाणारी सामुद्रधुनी बर्फामुळे पूर्ण गोठल्याचं त्याच्या ध्यानात आलं!
मेल्व्हील बेट दृष्टीस पडताच नॉर्थवेस्ट पॅसेज प्रत्यक्षात अस्तित्वात असल्याची मॅक्क्युलरची खात्री पटली!
बेरींग सामुद्रधुनीच्या मार्गाने ऑक्टोबरमध्ये विल्यम पुलेन इंग्लंडला परतला.
ऑक्टोबरच्या अखेरीला अॅडव्हान्स आणि रेस्क्यू यांवरील अनेक खलाशांमध्ये स्कर्व्हीची लक्षणं दिसू लागली होती. यावर उपाय म्हणून डॉ. केनने सीलची शिकार करुन त्याचं मांस सर्वांना खाण्यास दिलं. सीलचं मांस खाल्ल्यावर स्कर्व्हीचा प्रादुर्भाव कमी झाल्याचं त्याला आढळून आलं!
जीवघेण्या स्कर्व्हीवर उपाय सापडला होता!
११ नोव्हेंबरला आर्क्टीकमध्ये सूर्यास्त झाला!
आता पुढचे तीन महीने अंधाराचं साम्राज्यं राहणार होतं!
७ डिसेंबरला रेस्क्यू जहाजाची अवस्था इतकी बिकट झाली होती, की ते सोडून देण्याचा निर्णय घेण्यात आला. रेस्क्यू वरील खलाशांनी अॅडव्हान्सवर आश्रय घेतला. खबरदारीचा उपाय म्हणून रेस्क्यूवरील अन्नसामग्रीचा अॅडव्हान्सपासून काही अंतरावर असलेल्या हिमखंडावर साठा करुन ठेवण्यात आला.
१८५१
१३ जानेवारी १८५१ ला जोरदार हिमवादळ प्रगटलं! या वादळामुळे अनेक हिमखंड जागेवरुन भरकटण्यास सुरवात झाली. डी हेवनच्या दुर्दैवाने ज्या हिमखंडावर त्यांनी अन्नसामग्रीचा साठा केला होता, तो हिमखंड सुटा होऊन दक्षिणेच्या दिशेने वाहत गेला!
३ फेब्रुवारीला सूर्योदय झाला!
आर्क्टीकमधील अंधारी रात्रं अखेर संपुष्टात आली होती!
मार्चच्या सुरवातीला डी हेवन आणि रेस्क्यूचा कॅप्टन सॅम्युएल ग्रिफीन यांनी रेस्क्यूची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करुन पाहण्याचा निर्णय घेतला. एप्रिलपर्यंत हे दुरुस्तीचं काम सुरु राहीलं. अखेर २२ एप्रिलला रेस्क्यूवरील सर्व खलाशांनी पुन्हा आपल्या जहाजावर स्थलांतर केलं! संपूर्ण हिवाळाभर बर्फाचा मारा खाऊनही रेस्क्यू तगलं होतं! वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर ताजी शिकार उपलब्ध झाली आणि स्कर्व्हीचा प्रादुर्भाव कमी होत गेला. मात्रं अद्यापही बर्फातून सुटका झालीच नव्हती!
२५ एप्रिलला जॉन रे ने फोर्ट कॉन्फीडन्स सोडलं आणि उत्तरेची वाट धरली. गोठलेल्या बर्फावरुन स्लेजचा वापर करत त्याने व्हिक्टोरीया लँडचं दक्षिणेचं टोक गाठलं. पूर्वेच्या दिशेला जात त्याने सिम्प्सनने १८३९ मध्ये पश्चिमेला गाठलेला भाग ओलांडला. वाटेत आढळलेल्या द्वीपसमुहाला त्याने रिचर्डसनचं नाव दिलं! ६८'३६'' अंश उत्तर अक्षवृत्त आनि ११०' अंश पश्चिम रेखावृत्तवरुन त्याने परतीची वाट धरली.
पश्चिमेच्या दिशेने मार्गक्रमणा करत रे ने व्हिक्टोरीया लँडचा पश्चिम किनारा गाठला आणि उत्तरेकडे कूच केलं. उत्तर-पश्चिमेकडे आढळलेल्या उपसागराला त्याने सिम्प्सनचं नाव दिलं. सिम्प्सनच्या उपसागारानंतर किनारा पुन्हा उत्तरेकडे आणि पुढे पूर्वेकडे वळल्याचं त्याला आढळून आलं. त्याच्याजवळची सामग्री संपत आली होती. तसंच व्हिक्टोरीया लँड आणि कॅनडाचा उत्तर किनारा यांना विभागणारी डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनी वितळण्यापूर्वी त्याला दक्षिणेला येणं आवश्यक होतं, अन्यथा व्हिक्टोरीया लँडवर अडकून पडण्याची भीती होती.
मॅक्युलरच्या तुकडीने वसंत ऋतूच्या आगमनाबरोबर स्लेजच्या सहाय्याने एकापाठोपाठ एक मोहीमा करण्यास सुरवात केली. आर्क्टीकमध्ये असलेल्या इतर मोहीमांतील कोणाशीही संपर्क साधण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. मॅक्युलरच्या तुकडीव्यतिरीक्त ऑस्टीन-ओमनी, डी हेवन, जॉन रॉस, विल्यम पेनी, चार्ल्स फोर्से तसेच जमिनीवरुन शोध घेणारा जॉन रे यांच्या तुकड्या आर्क्टीकमध्ये हजर होत्या!
मे च्या सुरवातीला मॅक्क्युलरच्या एका तुकडीची सीलची शिकार करणार्या एस्कीमोंशी गाठ पडली होती. एका तुकडीने बँक्स बेटाला प्रदक्षिणा घातली होती. १४ मे ला एका तुकडीने व्हिक्टोरीया लँडवरील प्रिन्स अल्बर्ट खाडी गाठली होती. परंतु फ्रँकलीनच्या मोहीमेचा काहीही मागमूस लागला नव्हता.
बँक्स बेट
२४ मे ला ७०'११० अंश उत्तर अक्षवृत्त - ११६'५०'' पश्चिम रेखावृत्तावरुन रे परत फिरला. मागे फिरण्यापूर्वी उत्तरेला त्याला प्रिस्न्स अल्बर्ट खाडी दृष्टीस पडली होती. मागे फिरुन त्याने डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनी ओलांडली आणि कॅनडाचा उत्तर किनारा गाठला. मात्रं वितळत असलेल्या बर्फातून केंडल नदी गाठेपर्यंतची वाटचाल अत्यंत खडतर ठरली.
रे ने प्रिन्स अल्बर्ट खाडीचं निरीक्षण करण्यापूर्वी दहाच दिवस रॉबर्ट मॅक्क्युलरच्या मोहीमेने प्रिन्स अल्बर्ट खाडी गाठली होती, परंतु रे ला याचा पत्ताच नव्हता.
८ जूनला अॅडव्हान्स आणि रेस्क्यूची बर्फातून मुक्तता झाली! जहाजाभोवतीचा बराचसा बर्फ खलाशांनी चक्कं करवतीने कापून काढला होता! १६ जूनला व्हेल फिश बेट गाठून त्यांनी एस्कीमोंसोबत पाच दिवस विश्रांती घेतली. २४ जूनला अपरनाव्हीकच्या वाटेवर असताना पुन्हा एकदा हिमखंड वाटेत आडवे आले, परंतु त्यातून वाट काढून त्यांनी अपरनाव्हीक गाठलं!
१५ जूनला रे ने फोर्ट कॉन्फीडन्स सोडलं आणि १० माणसांसह केंडल नदीवरुन कॉपरमाईन नदीकडे कूच केलं. गोठलेल्या बर्फातून वाट मिळण्यासाठी अनेकदा त्याला वाटेत थांबावं लागत होतं. जुलैच्या सुरवातीला तो कॉरोनेशन आखाताच्या दक्षिण किनार्यावर पोहोचला. पूर्वेचा मार्ग धरुन त्याने बाथहर्स्ट खाडी ओलांडली आणि केंट आखाताच्या पश्चिमेला असलेलं केप फिंडलर्स गाठलं. केंट आखात पार करुन त्याने पूर्वेला केप अलेक्झांडर गाठलं आणि मधली खाडी ओलांडून तो व्हिक्टोरीया बेटावर पोहोचला.
कॉपरमाईन नदी
जुलैच्या पहिल्या आठवड्यात अॅडव्हान्स आणि रेस्क्यूची पुन्हा एकदा चार्ल्स फोर्सेच्या प्रिन्स अल्बर्टशी गाठ पडली. फोर्से अद्यापही फ्रँकलीनचा शोध घेत होता! तिन्ही जहाजांनी उत्तरेच्या दिशेने काही काळ शोध घेण्याचा प्रयत्नं सुरु केला
१४ जुलैला अखेर इन्व्हेस्टीगेटरची बर्फातून सुटका झाली. मॅक्क्युलरने उत्तरेची वाट पकडली. मेल्व्हील बेटावर पोहोचल्यास नॉर्थवेस्ट पॅसेज यशस्वीपणे पार करण्याची त्याला खात्री होती. मात्रं सतत आडव्या येणार्या हिमनगांपुढे त्याची काही मात्रा चालत नव्हती.
वर्षभर हाँगकाँग बंदरात वास्तव्यं करुन राहीलेला रिचर्ड कॉलीन्सन १६ जुलैला बेरींगच्या सामुद्रधुनीत परतला!
२७ जुलैला रे ने केंब्रिजचा उपसागर गाठला. पूर्वेच्या अज्ञात प्रदेशातून मार्ग काढत असतानाच किनारपट्टी उत्तरेच्या दिशेने वळल्याचं त्याच्या ध्यानात आलं. मात्रं खराब हवामानामुळे पुढची वाटचाल कठीण झाली होती. ऑगस्टच्या सुरवातीला बर्फाने मार्ग रोखल्यावर रे ने पदयात्रेला सुरवात केली. १३ ऑगस्टला तो ७०'०३'' अंश उत्तर अक्षवृत्त आणि १००'५०'' पश्चिम रेखावृत्त गाठलं, परंतु पुढे जाणं अशक्यं झाल्याने त्याने परतीचा मार्ग स्वीकारला. परत येताना वाटेत त्याने बर्फाच्या एका उंचवट्यावर एक ध्वज लावला. त्या ध्वजाच्या तळाशी कागदावर संदेश लिहून तो बाटलीत घालून पुरण्यास रे विसरला नाही!
केंब्रिजचा उपसागर
१४ ऑगस्टला इन्व्हेस्टीगेटरने प्रिन्स ऑफ वेल्स सामुद्रधुनीत ७३'१४'' अंश उत्तर अक्षवृत्त ११५'३२'' अंश पश्चिम रेखावृत्तापर्यंत मजल मारली, परंतु आणखीन पुढे जाणं गोठलेल्या बर्फामुळे अशक्यं झालं होतं.
मॅक्क्युलरने प्रिन्स ऑफ वेल्स सामुद्रधुनीतून माघार घेतली आणि बँक्स बेटाच्या दक्षिणेकडून पूर्वेची वाट धरली. मात्रं आता पुढे मार्ग काढणं जिकीरीचं झालं होतं. एका किनार्यावर त्यांना एस्कीमोंच्या रिकाम्या वसाहतींच्या खुणा आढळून आल्या. काही दिवसांनी त्यांना एक विस्मयकारक गोष्ट आढळली..
जंगल!
७४'२७'' अंश उत्तर अक्षवृत्तावर चक्क वनराजी होती!
दक्षिणेला परतल्यावर पूर्वेच्या दिशेने किंग विल्यम बेटावर पोहोचण्यासाठी रे ने व्हिक्टोरीया सामुद्रधुनी ओलांडण्याची योजना आखली, परंतु तीन वेळा प्रयत्न करुनही गोठलेल्या बर्फापुढे त्याला हार पत्करावी लागली.
२१ ऑगस्टला रे ला एक अनपेक्षीत गोष्ट आढळली.
लाकडाचे दोन तुकडे!
नीट तपासणी केल्यावर हे लाकडाचे तुकडे कोणत्या तरी युरोपियन जहाजाचे असल्याची रे ची खात्री पटली.
हे तुकडे फ्रँकलीनच्या जहाजाचे तर नव्हते?
किंग विल्यम बेट
५ ऑगस्टला कॅप्टन फोर्सेने फ्रँकलीनच्या शोधातून माघार घेतली. रेस्क्यू आणि अॅडव्हान्सने आणखीन शोध घेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु आर्क्टीकमध्ये आणखीन एक हिवाळा घालवावा लागण्यापेक्षा डी हेवनने परतीचा मार्ग पत्करला. दक्षिणेची वाट धरुन त्यांनी २३ ऑगस्टला अपरनाव्हीक गाठलं आणि न्यूयॉर्कची वाट धरली.
२९ ऑगस्टला डॉल्फीन - युनियन सामुद्रधुनी ओलांडून रे ने कॉपरमाईन नदी गाठली आणि १० सप्टेंबरला फोर्ट कॉन्फीडन्स गाठलं. त्याने तब्बल २४८० मैलांचा प्रवास करुन ६३० मैलाच्या अज्ञात प्रदेशाचं सर्वेक्षण केलं होतं!
रे च्या या मोहीमेतून एक महत्वाची गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे व्हिक्टोरीया लँड हे एक बेट असून पूर्वी कल्पना असल्याने वॉल्स्टन बेट वेगळं बेट नसून तो व्हिक्टोरीया बेटाचाच एक भाग आहे!
व्हिक्टोरीया बेट
पॉईंट बॅरोमार्गे कॉलीन्सनने पूर्वेची वाट पकडली. २९ ऑगस्टला तो बँक्स बेटाच्या दक्षिणेला पोहोचला. तिथे पोहोचल्यावर त्याला एक सामुद्रधुनी दृष्टीस पडली. प्रिन्स ऑफ वेल्स सामुद्रधुनी! हाच नॉर्थवेस्ट पॅसेज असावा या कल्पनेने कॉलीन्सन त्या सामुद्रधुनीतून पुढे निघाला, परंतु काही अंतरावरच त्याला एका केर्नपाशी मॅक्युलरचा संदेश मिळाला. आदल्या वर्षीचा हिवाळ्यात मॅक्युलरने याच ठिकाणी मुक्काम केला होता!
पूर्वेकडे जाण्याचा मॅक्क्युलरचा प्रयत्न अद्यापही सुरु होता. परंतु हिवाळ्यासाठी मात्रं हिमनगावर अडकून भरकटण्याची त्याची इच्छा नव्हती. त्यापेक्षा एखाद्या लहानशा खाडीत किंवा उपसागराच्या अंतर्भागात आश्रय घेणं जास्तं संयुक्तीक ठरणार होतं. २१ सप्टेंबरला त्यांनी एका लहानशा उपसागरात प्रवेश केला. पण २३ सप्टेंबरला बर्फामध्ये जहाज पक्कं अडकून बसलं.
उपसागरात शिरण्याचा निर्णय चुकीचा असल्याचं अनेक खलाशांचं मत होतं. मुख्य मार्गावरील हिमनगांच्या हालचालीमुळे मेल्व्हील बेटावर पोहोचण्याची शक्यता जास्त होती. तसंच बर्फातून बाहेर पडण्याचा मार्गही प्रवाही असलेल्या सामुद्रधुनीत लवकर मिळण्याची शक्यता होती.
इन्व्हेस्टीगेटरचा डॉक्टर आर्मस्ट्राँग म्हणतो,
"या उपसागरात शिरणं ही आमची सर्वात मोठी चूक ठरली! एकदा इथे बर्फात अडकल्यावर बाहेर पडण्याची शक्यता फारच कमी होती!"
७४ अंश उत्तर अक्षवृत्त आणि ११७ अंश पश्चिम रेखावृत्तावरील या उपसागराला आर्मस्ट्राँगने सार्थ नाव दिलं...
मर्सी बे! दयेचा उपसागर!
मॅक्क्युलरच्या तुकडीला आता अन्नाची कमतरता भासू लागली होती. ताजं मांस मिळवण्यासाठी त्याने आसपासच्या प्रदेशात शिकारमोहीमा काढण्याचा निर्णय घेतला. त्याच्या अनुमानानुसार त्यांना शिकार मिळालीही, परंतु एक अस्वस्थं करणारी वस्तुस्थिती त्यांच्या ध्यानात आली..
मर्सी उपसागराच्या उत्तरेला अवघ्या ८ मैलांवर त्यांना जहाज नेण्याइतपत मोकळं पाणी आढळून आलं होतं! या पाण्यातून पूर्वेच्या दिशेने मजल मारणं सहज शक्यं झालं असतं!
कॉलीन्सनने पुढची वाट धरली. परंतु काही अंतर पुढे गेल्यावर हिमखंडांनी त्याची वाट रोखून धरली. मागे परतून येताना त्याला मॅक्युलरचा आणखीन एक संदेश मिळाला. अवघ्या १८ दिवसांपूर्वीच मॅक्क्युल्रर तिथून पुढे गेला होता. मात्रं बँक्स बेटाची प्रदक्षिणा करण्याच्या मॅक्युलरच्या योजनेचा त्यात उल्लेख केलेला नव्हता. बँक्स बेटाच्या दक्षिण-पूर्वेला मिंटो खाडीत त्याने हिवाळ्यासाठी मुक्काम केला.
सप्टेंबर महिन्यात फ्रँकलीनच्या शोधात आणखीन एका मोहीमेने इंग्लंडहून प्रस्थान ठेवलं!
कॅप्टन विल्यम केनेडी आणि जोसेफ बॅलॉट प्रिन्स अल्बर्ट या जहाजावरुन आर्क्टीकमध्ये निघाले. प्रिन्स अल्बर्ट हे जहाज नुकतंच आर्क्टीकमधून परतलं होतं! या मोहीमेला जेन फ्रँकलीनने आर्थिक पाठबळ पुरवलं होतं!
३० सप्टेंबरला अॅडव्हान्स आणि रेस्क्यू न्यूयॉर्कला परतली तेव्हा हेनरी ग्रिनेल त्यांच्या स्वागताला हजर होता!
हॉर्शो ऑस्टीन आणि इरॅस्मस ओमनी यांनीही आपली मोहीम आवरती घेतली आणि रिझोल्यूट, असिस्टंस, पायोनियर आणि इंटरपीड या आपल्या जहाजांसह ऑक्टोबरमध्ये इंग्लंड गाठलं.
विल्यम पेनीची लेडी फ्रँकलीन आणि सोफीया, तसेच जॉन रॉसचं फेलीक्स यांनीही परतीची वाट पकडली होती. नोव्हेंबरमध्ये या सर्वांनी इंग्लंड गाठलं होतं.
१७ नोव्हेंबरला जॉन रे ने फोर्ट चिपेव्यॅन सोडलं आणि फोर्ट गॅरीची वाट धरली!
विल्यम केनेडीने नोव्हेंबरच्या सुरवातीला बॅफीनचा उपसागर गाठला, मात्रं पुढे जाणं गोठलेल्या बर्फामुळे त्याला अशक्यं झालं होतं!
जॉन फ्रँकलीनच्या मोहीमेचं नक्की काय झालं होतं याचा अद्यापही पत्ता लागला नव्हता.
तीन खलाशांच्या कबरी तेवढ्या आढळल्या होत्या.