नलदमयंतीकथा भाग ५
स्वयंवर मंडपात सर्व राजे, राजपुत्र जमले. नलहीं त्यांत होताच. चारी देवांनी त्याच्या शेजारचींच आसने पकडलीं एवढेच नव्हे तर चारी देवांनी नलाचेच रूप धारण केले! मंडपांत एका ओळीत पांच नल बसलेले दिसत होते. दमयंती स्वयंवर मंडपांत आली. तिला नलालाच माळ घालावयची असल्याने इतर राजांकडे न पाहतां ती सरळ नल बसला होता तेथेच आली. पाहते तों पांच नल! तिला काही सुचेना. तिला अर्थातच कळले कीं चारी देवांनी नलाचें रूप घेतले आहे. खरा नल ओळखल्याशिवाय माळ घालतां येईना. मग तिने मनांतल्या मनांत देवांची प्रार्थना केली कीं मी मनाने नलालाच वरले आहे तेव्हां आतां दुसर्या कोणाला माळ घातली तर ती प्रतारण होईल तेव्हां देवांनो तुम्हीच मला खरा नल कसा ओळखावा तें सांगा. देवांना तिच्या शुद्ध प्रेमाची खात्री पटली व मग नलाचें रूप त्यानी टाकलें नाहीं पण अशीं लक्षणे प्रगट केलीं कीं त्यायोगें नलरूपी देव ओळखूं यावे आणि तिलाच तीं लक्षणे ओळखण्याचीहि प्रेरणा दिली. तीं लक्षणे अशीं कीं न्यांचे नेत्र स्थिर होते म्हणजे पापण्या व बुबुळे हलत नव्हतीं, त्यांच्या गळ्यांतील हारांचीं फुले एकजात सारखीच टवटवीत व धुळीचा कणहि न उडालेलीं होतीं, एकहि किंचितहि सुकलेले नव्हतें, त्यांचे पाय जमिनीला न टेकतां अधांतरी होते. त्यांचे चेहेर्यावर किंचितहि घाम नव्हता. खर्या नलराजाचे ठायीं अशीं लक्षणे अर्थातच नव्हतीं. सूक्ष्म निरीक्षणाने दमयंतीला खरा नल ओळखता आला व तिने त्याच्या गळ्यात माळ घातली. लगेचच देवांनीहि नलाचें रूप टाकून ते स्वत:च्या नित्य रूपांत दिसूं लागले. सर्व उपस्थितांनाहि हा सर्व प्रकार पाहून आश्चर्य व आनंद वाटला. देवांनी नलाचे अभिनंदन केले व त्याला अनेक वर दिले. त्यांत मुख्य म्हणजे अग्नीने ’तुला पाहिजे तेव्हा व तेथे मी लगेच प्रगट होईन’ असा वर दिला व वरुणाने ’पाहिजे तेव्हां तुला जल प्राप्त होईल’ असा वर दिला. स्वयंवर संपून नल-दमयंतीचा यथासांग विवाह झाला.