Get it on Google Play
Download on the App Store

अयोध्याकांड - भाग ५

सर्व रात्र कैकेयीच्या विनवण्या करण्यात गेली पण कैकेयीने आपल्या मागण्या मागे घेतल्या नाहीत. संपूर्ण नाइलाज झाल्यामुळे रात्र संपल्यावर दशरथाने रामाला बोलावण्याचे ठरवले. सुमंत्र आल्यावर कैकेयीनेच त्याला पाठवून रामाला बोलावून घेतले. तो आल्यावर दशरथाला काहीच बोलवेना तेव्हां कैकेयीनेच रामाला सांगितले कीं ’ते तुला स्वत: सांगणार नाहीत पण तू ताबडतोब १४ वर्षांसाठी वनात जायचे आहेस व राज्य भरताला मिळायचे आहे.’ रामाने ताबडतोब मान्य केले व म्हटले ’मी तुझ्या आज्ञेनेच सर्वस्व त्यागीन मग राजाला कशाला त्रास दिलास?’ कैकेयीने त्यावर म्हटले कीं ’तूं खुषीने राज्य सोडून वनात गेल्याशिवाय महाराज स्नान वा भोजन करणार नाहीत.’
यापुढील प्रसंग आपणाला परिचित आहेत. सीता व लक्ष्मण रामाबरोबर वनात जाण्याचा आग्रह धरतात व राम तें मान्य करतो. कौसल्या व सुमित्रा विलाप करतात. उर्मिळेचा अजिबात उल्लेख कोठेच नाही! कौसल्येच्या तोंडी येथे एक उल्लेख येतो ’रामा तुझे उपनयन होऊन सतरा वर्षे झालीं’ यावरून यावेळी रामाचे वय २५ वर्षे व सीतेचे २०-२१ वाटते. उर्मिळा बहुधा सीतेपेक्षा थोडी लहान असावी तरी १८-१९ वर्षांची असणार, म्हणजे अजाण नव्हे. मात्र लक्ष्मणासकट कोणीच तिला काही महत्व दिले नाही. सासवांची सेवा करण्यासाठी तिला मागेच ठेवले! भरत-शत्रुघ्नांच्या बायका यावेळी नवर्‍यांबरोबर कैकय देशालाच असणार.
सुमंत्राने कैकेयीला समजावले कीं ’भरत राजा झाला तर आम्ही सर्व रामाकडे वनात जाऊं’ कैकेयीवर परिणाम शून्य. (सुमंत्र खरेतर राजाचा व राज्याचा सेवक, त्याला नवीन राजा भरत याची सेवा करणे हेच उचित!) दशरथाने सुमंत्राला म्हटले ’रामाबरोबर मोठी सेना व धनवैभव पाठवा.’ कैकेयीने ठाम विरोध केला. सुने सुने वैभवहीन राज्य तिला भरतासाठी नको होते. तिने आग्रह धरला कीं ’पूर्वी इक्ष्वाकु घराण्यातील असमंज नावाच्या राजपुत्राला दुर्गुणी निघाल्यामुळे राज्याबाहेर घालवून दिले होते तसे रामाला घालवा.’
’ही तुझी मूळची अट नव्हती’ असे दशरथ म्हणाला पण कैकेयीने तेहि मानले नाही. तिने राम व असमंज यांना एकाच पायरीला बसवले याचा वसिष्ठासकट सर्वांनाच फार राग आला. सीतेने वल्कले नेसण्याची वेळ आली तेव्हा मात्र वसिष्ठाने व दशरथाने ठाम विरोध केला. दशरथ म्हणाला कीं ’सीता माझ्या आज्ञेमुळे नव्हे तर स्वखुषीने वनात जाते आहे. तेव्हां ती सर्व वस्त्रालंकारांसकटच वनात जाईल’. (सीतेला रामाने वल्कले नेसावयास शिकविले अशी एक थाप आपले हरदास-पुराणिक मारतात, त्यांत तथ्य नाहीं!) लक्ष्मणाने वल्कले नेसल्य़ाचा उल्लेख नाही. आपल्या आईला संभाळण्याची पित्याला विनंति करून राम वनांत जाण्यास निघाला. दशरथाने सुमंत्राला त्या तिघांना वनांत सोडून येण्यास सांगितले.
या सर्व प्रसंगांत, एकदां मंथरेचा सल्ला पटल्यावर, कैकेयीने दाखवलेला मनाचा खंबीरपणा लक्षणीय आहे.