संग्रह १
१.
नवस करुं गेले इहिरीबाई तूं सुंदरी
जतन कर माझं चार बैल मोटकरी
२.
हात मी जोडिते इहिरीबाईच्या काठाला
गनीस माझा बाळ नवा लागला मोटेला
३.
पहाटेच्या पारामंदी ,चाक वाजत भिरभिरी
माझ द्येव अर्जुन मोटेवरी
४.
वनीच पाकरु करित पानीपानी
बंधुच्या मळामंदी चावर्या मोटा दोन्ही
५.
नवस मी केल, इहीरीवरच्या म्हसूबाला
जतन कर माझ्या मोट हानत्या जासूदाला
६.
हाक किती मारु गावाभाईर मोटक्याला
रंग नारंगी पटक्याला
७.
शिवंच्या शेतावरी कुनी पपई लावली
झाली मोटकर्या सावली
८.
आली गेली पुशित्यात कुठं गेलाया मोटकरी
बंघुजीचा माझ्या जरीपटका धावेवरी
९.
भरली तिनसांज दिवा लावावा चटकरी
धनी आल्याती मोटकरी
१०.
जेवनाची पाटी मानेला झाली जड
बंधु मोटेच बैल सोड
११.
मोट चालयेते , एका वानाच चारी बैल
दृष्ट मोटकर्या व्हईल
१२.
बारव इहिरिवर पारवं घुमत्यात
नंदी मोटेच झुलत्यात.
१३.
शेताला नेली कुरी , तिफ्णीबाईला तीन नळ
माझा रासन्या , चंवरी ढाळ
१४.
तिफणाबाईच तास जुमिनीच्य शिगी
बंधुजीच्या पाठी लक्ष्मी उभी.
१५.
शिवच्या शेतामंदी गेली तिफणीमावली
बंधुजीला धन मोत्याची गावली
१६.
शेताला सेली कुरी गेलीया गव्हाची
मागे रास माझ्या भिवाची
१७.
शेताला जाते कुरी सव्वा मनाचा पेरा झाला
बैल वेशीत डरकला धनी मनात हरखला.
१८.
शेताला नेली कुरी गहू हरबर्याच पेरा
बंधुजीच्या हलगीला बैल बारा.
१९.
पेरायाची कुरी रुप्याची चाडनळी
ताईत बंधुजी पेरक्या चवरी ढाळी.
२०
शेताला गेली कुरी दाट पेरणी अर्जुनाची
ओटी बांधली रुमालाची.
२१.
शेताला नेली कुरी राम पेरीतो सीतामोघी
हाणी रासन्या बिगिबिगी.
२२.
शेताला नेली कुरी आधी मोगरा तुरीचा
नंदी आवरा कुरीचा.
२३.
पेरनीच्या दिसामंदी बी घालीतो घोड्यावरी
बंधुजीच्या हात तोड्याचा चाडावरी
२४.
शेताला गेली कुरी दाट पेरणी अर्जुनाची
ओटी बांधली रुमालाची
२५.
शेताला गेली कुरी बैलाला म्हन काशी
सोन लाल पहिल्या ताशी.