संग्रह ९
१६
पडतो पाऊस नका करू गाजावाजा
आला धरनीबाई पती तुझा.
१७
पडतो पाऊस नका करु गलबला
जिमिनीबाईचा पती आला.
१८
पाऊस पडतो मोती पवळ्याच्या धारा
सुगी आली घरा.
१९
पाऊस पडतो मोत्याचा शिरवा
मळा सख्याचा हिरवा
२०
पावसान फळी मांडली अनिवार
माझा भिजला तालेवार.
२१
वळीव पाऊसान फळी मांडली दुरुनी
माझ्या राघुबाची शेती निघाली पेरुनी.
२२
वळीव पावसान फळी मांडली कवाची
माझ्या राघुवाची शेती पाभर गव्हाची.
२३
पावसान फळी , मांडली वरच्यावर
माझ्या राघुच्या मिरच्यावर.
२४
पावसान फळी मांडली कोसावर
माझ्या भाऊच्या उसावर
२५
पावसान फळी मांडली सर्व्या तळी
ताईत बंधुजी रास मधुनी गोळा करी.
२६
पावसान फळी मांडली कोकनात
बाळ भिजला दुकानात.
२७
पावसाची फळी उठली काळीकूच
सोडा नांगर कुरीयेच.
२८
वळवाच्या पाऊसान जिमीन भरदार
ऊठ कुणब्या ओटी भर.
२९
वळीव पाऊस पडून गेला राती
ताईत बंधुजीला धान्य पेराया दिली घाती.
३०
वळीव पाऊसान मोठा माऊलपणा केला
बंधुजीचा बैल तासाला पानी प्याला.