Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ४

बेंदराच्या दिशी, घाटया घुंगुर वाजत्यात

बंधुजीचं बेंदराचं बैल सजत्यात

बेंदराच्या दिशी, नंदी झाल्याती नवरं

हौशा बांधावी चवरं

सनामंदी सन बेंदूर गजबजे

बंधु बैलाला तेल पाहिजे

बेंदराच्या दिशी बाळ येळाचा उपाशी

लागे बैलाच्या सायासी

बेंदरापासूनी पंचमी उरली ईस रोज

नेनंत्या बंधुजीची वाट पहाते नित रोज

आला पंचमीचा सन आयाबायांना गेली मुळं

माझी बाळाबाई वाट बघतीया सारा येळ

पंचमीचा सन आयाबायांची न्हानीधुनी

माझी बाळाई, वाट बघतीया येडवानी

पंचमीच्या दिशी गहुं घातिलं दळाया

नाग निघाल खेळाया

पंचमीच्या दिशी नागाला दूध लाह्या

औख मागूंया भाऊराया

१०

पंचमीच्या दिशी नागोबाला पऊत

सोड कुनब्या आऊत

११

पंचमीच्या दिशी नाग काढिला भिंतीशी

बहीण भावाची उपाशी

१२

दिवाळीचा सन माझा बंधुजी पुन्यांत

खडीच्या चोळीसाठी खेप टाकीतो उन्हांत

१३

दसर्‍यापास्न दिवाळी विसा दिशी

सख्या बंधुराया , मला माघारा कधी येशी ?

१४

दिवाळीच्या दिशी हंडा तापून झाला लाल

बंधुजी लाव केसाला मोगरेल

१५

भावाला भाऊबीज, करते भाच्याला दिवाळी

दोन्ही मानिकं ओवाळी

१६

भावाला भाऊबीज भावासंगट आईला

बहिणीच्या पातळाला बंधु जातुया वाईला

१७

भावाला भाऊबीज भावासंगट वडिलाला

पैका मोजतो, कडीलाला

१८

भावाला भाऊबीज, भावासंगट भाच्यायाला

मोती मागते कापायाला

१९

सांगत्ये रे बंधुजी, बारा सणाला नेऊं नको

आली वर्साची दिवाळी, वाट बघाया लावुं नको

२०

दिवाळीबाईनं, दिवाळं काढियेलं

माझ्या बंधुजीनं उंच खनाळं फाडियेलं

२१

दिवाळीचा सन, होतो वान्याचा विकरा

भावाला भाऊबीज, बहिनी घेत्यात साकरा

२२

दसरा दिवाळी एका महिन्यांत दोन सन

वाट बघती तुझी भन

२३

दिवाळीचा सन, ताटी ठेवित्ये म्यां केळं

बयाला किती सांगुं , वोवाळीन तुझी बाळं

२४

भाऊबीजेदिशी भाऊ अजून आला न्हाई

जोडा कापाचा झाला न्हाई

२५

दिवाळीच्या दिशी दिवा केला कनकीचा

माझ्या मायबाईचा हिरा ओवाळीन जानकीचा