Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५

२६

भावाला भाऊबीज एवढया लौकर कुनी केली

शिवंशेजारी बहिन दिली

२७

दिवाळीची चोळी, भाऊबीजेचं लुगडं

पित्या धनवंताचं दार सदाच उघडं

२८

दिवाळीबाईनं, कां ग दिरंग लाविला

हौशा बंधुजीनं, चिरा घेऊनी ठेविला

२९

भावाला भाऊबीज, करत्ये भाच्याला दिवाळी

पुतळ्याची माळ, ताटी घालीतो पिवळी

३०

दिवाळीचा सन, मी ओवाळीन गाईम्हशी

बंधुजी मला आंदन काय देशी ?

३१

दिवाळीचा सन, माझ्या कामाचा पसारा

बंधु हौशाला ओवाळाया सन न्हाई दुसरा

३२

दिवाळीची चोळी भाऊबीजेचं लुगडं

हौशा बंधुजी बाकी राहीली तुम्हांकडं

३३

दिवाळीचा सन सोजी काढीत्ये नखुल्याला

भाऊबीज, बंधुजी धाकल्याला

३४

दिवाळीची चोळी सकरातीला मला आली

किती सांगु शेजी, बंधु माझ्याची ओढ झाली

३५

दिवाळीची चोळी, भाऊबीजेची चंदरकळा

झाला बंधुचा उपराळा

३६

माझ्या अंगनात अबदागिरीची झाली दाटी

बंधु आल्याती बीजेसाठी

३७

सोनसळे गहू रवापिठीला ओलविले

बंधु भाऊबीजेला बोलावले

३८

दिवाळीचा सन, मला धारजिना झाला

कडेवरी पुत्र, बंधु अंगुळीला आला

३९

दिवाळीची चोळी, भाऊबीजेच्या कुयर्‍या

बाकी राहिली सोयर्‍या !

४०

दिवळीचा सन, नको बंधुजी नाट लावूं

शेला पैठणीवर ठेवुं

४१

दिवाळीचा सन, डाळीडोरलं कुनी केलं ?

माझ्या बंधुजीला चंदरहाराला ओवाळीलं !

४२

दिवाळीच्या दिशीं, आरती मला आली जड

ओवाळीन माझा शाहीघड

४३

चोळ्यावरी चोळ्या घालून झाल्या जुन्या

बंधुजी किती सांगु, दोन्ही दिवाळ्या गेल्या सुन्या

४४

दिवाळीच्या दिशी ताटांत मोतीहार

ओवाळीतो बंधुजी सावकार

४५

सकरातीचा सन आलाया एकाएकी

आवा लुटाया जाऊं मायलेकी

४६

सकरातीचा सन कुंभारा दिली गाई

आवा लुटुंया बयाबाई

४७

सकरातीचा सन भोगी येतीया कुन्यावरी

जोडिली मायबहीण, येवं न्हायाला माझ्या घरी

४८

सनाच्या दिशीं होळीबाईला पांच पांन

माझ्या खेळ्याचा आधीं मान

४९

शिमग्यादिशी होळीबाईला पाच पोळ्या

माझा नवसाचा हाय खेळ्या

५०

पाटील पाटील हाका मारीत आला कोळी

बंधुजीची जाते, होळीला पहिली पोळी

५१

शिमग्यादिशी होळीबाई बाळंतीण

राघुच्या डफाखाली नाचते कळवंतीण

५२

शिमग्याची राधा बारा बईत्यान केली

माझ्या राघुबाला सोंगाड्या दृष्ट झाली !