एप्रिल २६ - संत
सर्वांत अर्पणभक्ती श्रेष्ठ आहे . पूजा करताना ‘ मी तुझा दास आहे ’ असे म्हणावे , म्हणजे प्रेम येते . यात लाज वाटायचे काहीच कारण नाही . आधी भगवंताचे दास व्हावे आणि मग पूजा करावी . आम्ही इतर कित्येकांचे दास होतो , आणि इतक्यांतून उरेल तेव्हा भगवंताचे दास होणार ; मग पूजेत अर्पणभक्ती कशी येणार ? आपल्याला जे जे आवडते ते ते मनाने भगवंताला अर्पण करावे . इथे सर्व काही मनानेच करायचे असते . नुसते शरीराने काबाडकष्ट केले म्हणजे प्रेम येतेच असे नाही . चित्त विषयाकडे ठेवून भगवंताची सेवा करणे म्हणजे अंगचोरपणा आला . असा अंगचोरपणा करु नये . भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय . सर्व लोक या ना त्या रुपाने सगुणाचीच उपासना करणारे असतात . ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे , म्हणजे त्यामध्ये प्रेम येते . आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना ? म्हणून त्यालासुध्दा मग ती सवय लागते . आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते . ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते , आणि ते पुष्कळ काळ टिकते . शिवाय ते इतरांनाही उपयोगी पडते . जगाचे खरे स्वरुप कळण्यासाठी सगुण उपासनाच कारणीभूत आहे . सर्व भोग भोगून काळजी नसणे हे उपासनेचे खरे मर्म आहे . उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे ? हे तेज फार विलक्षण असते . पैशाचे किंवा विद्वत्तेचे तेज तितके नसते . ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच तोच जगात खरे काम करतो .
एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे . त्या बाईशी देवी बोलत असे , आणि प्रपंचातल्या वगैरे गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे . परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले . तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे . कसे वागावे , काय करावे , वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे . परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले , आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला . या गोष्टींचा अर्थ असा की , आपल्याला सांभाळणार्या शक्ती आपल्या मागे असतात , त्यांची उपासना आपण सोडू नये . भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे . संतांनी आपल्याला सांगितले की , ‘ ही दृश्य मूर्ती तुझी आहे , तुला हव्या असणार्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे . ’ ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे ‘ भगवंत दाता आहे ’ ही जाणीव उत्पन्न होईल . ‘ भगवंत दाता आहे , तो माझ्या मागे आहे , तो माझ्या सुखाचा आधार आहे , तो माझे कल्याण करणारा आहे , ’ ही जाणीव झाली की , जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन , आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल .