एप्रिल २७ - संत
आपले विचार स्वार्थाचे नसावेत . स्वार्थामध्ये अभिमान नेहमी जागृत असतो . स्वार्थी मनुष्याला जगात सुख मिळणे कधीही शक्य नाही . नीतीची बंधने पाळा . परस्त्री मातेसमान माना . प्रपंचात एकपत्नीव्रताने राहणारे गृहस्थ लोक ब्रह्मचारीच होत . परद्रव्याची अभिलाषा धरु नका . त्याला विष्ठेसमान माना . दुसर्याच्या पैक्याचा अभिलाष धरण्यात आपला किती घात आहे याची नुसती कल्पनाच केलेली बरी . परस्त्री , परद्रव्य , यांच्याप्रमाणेच परनिंदा हीही अत्यंत त्याज्य गोष्ट आहे . परनिंदेने न कळत आपण आपलाच घात करीत असतो . परनिंदेमध्ये दुसर्यांच्या दोषांचे चिंतन होत असल्याकारणाने , ते दोष आपल्याकडे येत असतात . या सर्व गोष्टी सांभाळून तुम्ही नाम घ्या , नामाचे प्रेम तुम्हाला अगदी खात्रीने येईल . हे सर्व करीत असताना तुमचे आईवडील , बायकोमुले , यांच्या बाबतीत असलेले कर्तव्य करायला चुकू नका आणि त्या कर्तव्यात आसक्ती राहू देऊ नका . कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता केलेले कर्म हे कर्तव्यच होय . ते कर्तव्य सांभाळून नीतिधर्माने वागून आपला प्रपंच करा , आणि भगवंताचे स्मरण ठेवा . मग तुमचा प्रपंचच परमार्थरुप बनून भगवंताचे प्रेम तुम्हाला मिळेल हा माझा भरवसा तुम्ही बाळगा .
प्रपंच हा मिठासारखा आहे . भाकरीत मीठ किती घालायचे असते ? तर अगदी थोडे -फक्त चवीपुरते ! परंतु आपण मिठाची भाकरी करतो आणि त्यात परमार्थाचे चिमूटभर पीठ टाकतो ; मग ती भाकरी खाता येईल का ? खरे समाधान मिळाल्यावर मनुष्य खेळासारखा प्रपंच करतो . त्यामध्ये तो वर चढला किंवा खाली पडला तरी सारखाच राहील ; दुसर्याने डाव टाकल्यावर तो आपणही डाव टाकील ! पण डाव हरला किंवा जिंकला तरी त्याची त्याला पर्वा राहणार नाही .
प्रपंचात अनेक वस्तू आहेत , पण भगवंताजवळ एकच वस्तू आहे . प्रपंचात कितीही वस्तू आणल्या तरी त्या पुर्या पडत नाहीत , कारण एका वस्तूच्या आणण्यामध्येच दुसर्या वस्तूच्या आणण्याचे बीज आहे . पण भगवंताचे तसे नाही ; भगवंताची वस्तू एकदा आणली की पुन्हा ती आणायला नको . समजा , एका दुकानात पुष्कळ माल भरलेला आहे ; पण आपल्याला पाहिजे ती वस्तू तिथे नाही , म्हणजे आपल्या दृष्टीने तिथे काहीच नाही ! त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या मानसिक शक्ती असून तिथे भगवंत नसेल , तर त्या असून नसून सारख्याच समजाव्यात . परमात्म्याला प्रपंचरुप बनविण्याऐवजी आपण प्रपंचाला परमात्मरुप बनवावा . यातच जन्माचे सार्थक आहे .