मे १३ - साधन
वास्तविक , काही न करणे , आपण काही करतो आहोत किंवा आपल्याला काही करायचे आहे असे न वाटणे , हाच परमार्थ . देहाने , मनाने , एकसारखी चळवळ करायची आपल्याला सवय लागली आहे . देहाला स्वस्थ बसायला लावणे कठीण , मनाला स्वस्थ बसायला लावणे हे त्यापेक्षा कठीण , आणि देहाने कर्म करीत असताना मनाला स्वस्थ बसविणे हे अत्यंत कठीण . मनाला खरे म्हणजे स्वास्थ्य हवे ; पण ते मिळविण्याकरता साधन , म्हणजे प्रयत्न , करणे जरुर आहे . मनाचे स्वास्थ्य बिघडायला कारणे तीन ; एक , आपल्या इच्छेविरुध्द गोष्ट होणे ; दोन , मागच्या आपल्या बर्यावाईट कर्मांची आठवण होणे ; आणि तीन , उद्याची काळजी लागणे . आता , जो तो आपल्या इच्छेप्रमाणे व्हावे असे म्हणणार , मग सर्व तुमच्या इच्छेप्रमाणे कसे चालतील ? तुमच्या इच्छेविरुध्द गोष्टी होणारच . तेव्हा स्वास्थ्य बिघडू न देण्यासाठी , आपली इच्छाच नाहीशी करावी ; अमुक गोष्ट मिळावी ही बुध्दीच नाही ठेवू ; हाव सोडावी , लोकांची आस सोडावी ; जे काही होते ते ‘ रामाच्या इच्छेने झाले ’ म्हणावे , प्रत्येक गोष्ट ‘ रामाने केली ’ म्हणणे , म्हणजे अखंड भगवंताच्या अनुसंधानात राहणे .
आपला अहंपणा खरोखर किती खोल गेला आहे पाहा ! समोर दिसत असलेल्या गोष्टीकडे बेमालूम डोळेझाक करुन , आपण आपल्या दोषांचे खापर बिनदिक्कत दुसर्यावर फोडायला तयार होतो . अमक्यातमक्याच्या नादाने आपला मुलगा बिघडला असे आपण म्हणतो , कारण आपलाच मुलगा खराब हे म्हणवत नाही ! ते म्हणण्याची लाज वाटते , म्हणून दुसर्याच्या मुलाला आपण वाईट म्हणतो . आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत संगतीच्या योगाने एवढा बिघडतो , तर मग संगतीचा परिणाम केवढा असला पाहिजे ! संगतीचा परिणाम जर एवढा मोठा आहे , तर संतसंगतीत असताना आपल्यात सुधारणा का दिसू नये ? संतसंगतीने मग आपण निश्चित सुधारायला पाहिजे ! पण तसे तर दिसत नाही ; मग नडते कुठे ? याचे मुख्य कारण म्हणजे , आपण स्वत :ला सुधारण्याचा प्रयत्नच करीत नाही . आपल्याला सर्व समजते , परंतु प्रयत्न करायला नको ! वासनेच्या जाळ्यातून बाहेर पडण्याचा आपण प्रयत्न करीत नाही . त्यामुळे वासनेतच आपण जन्माला येतो , आणि वासनेतच आपला अंत होतो . याकरिता एकच खात्रीचा उपाय आहे , आणि तो म्हणजे भगवंताला अनन्यभावाने शरण जाणे . " रामा , तुझ्यावाचून माझी यातून सुटका नाही . तू ठेवशील त्यात मी आनंद मानीन . तुझे प्रेम मला लागू दे , " असे कळकळीने रामाला सांगावे , आणि सदैव त्याचे नाम ह्रदयात ठेवावे . तो उदार परमात्मा तुमच्यावर कृपा केल्याशिवाय रहाणार नाही , याची खात्री बाळगा .