मे २९ - साधन
ज्याला जे आवडते ते आपण केले तर त्याला गोड लागते . भगवंताला प्रेमाशिवाय दुसर्या कशाचीच गरज नसते . भगवंताचे प्रेम यायला त्याच्याशी आपलेपणा लावून ठेवावा . भगवंत जोडल्याशिवाय नाहीच राहणार , असे ठरवावे . भगवंत जोडावा हे ठरल्यावर , मला लोक नावे ठेवतील याचा कशाला विचार करावा ? निश्चय आहे तिथे सर्व काही सुचते . तळमळ लागली म्हणजे मार्ग दिसतो . साधुसंत मार्ग दाखवायला सतत तयार असतात ; मात्र आपण आपली देहबुध्दी बाजूला ठेवून त्यांना शरण जावे .
सर्व जग जर भगवंताचे आहे तर मग काळजीचे कारण काय ? उपाधी कोणी लावून घेतली ? माझी मीच ! मी निर्दोष होईन तेव्हाच लोक मला तसे दिसतील . आपल्या सर्व अवगुणांना कारण म्हणजे ‘ मी रामाला विसरलो ’ हेच आहे . परमात्म्याचा विसर पडतो हेच खरे पाप . कोणी पाहात नसेल तिथे वाईट कर्म आपण करतो ; पण भगवंत चोहोकडे पाहतो अशी जाणीव ठेवली , म्हणजे असे पाप घडणार नाही . कोणतेही कर्म करताना फळाची आशा धरली तर ते घातुक होते . ज्याने भगवंत जवळ आणला जातो तेच चांगले कृत्य . स्नानसंध्या केली , आणि व्यवहार खोटा केला , तर त्या संध्येचा काय उपयोग ? मनात कोणताही हेतू न धरता परमेश्वरावर श्रध्दा ठेवून वागावे . मन परमेश्वराला अर्पण करावे , ते दुसरीकडे गुंतवू नये . एकदा अर्पण केलेल्या मनाला जर पुन : विषयाचा आनंद झाला , तर ते अर्पण झाले नाही असे समजावे . माझा प्रपंच व्हायचा असेल तसा होवो , पण तुझा विसर पडू देऊ नको , असे अनन्य भावाने भगवंताला म्हणावे . प्रत्येक कृतीत , ‘ मी भगवंताचा आहे ’ ही जाणीव ठेवावी . पडत्या काळातही जो भगवंताचा होऊन राहतो त्याला कशाचीच भीती नाही वाटत . पांडवांच्याजवळ प्रत्यक्ष भगवंत असताना त्यांना किती संकटे सोसावी लागली ! संकटे येऊ देऊन मग त्यातून बाहेर काढण्यापेक्षा भगवंताने संकटे टाळलीच का नाहीत , याचे उत्तर देणे सोपे आहे . पुष्कळ वेळा , आपल्यावर येणारे संकट कुणी टाळले , तर ते संकट येणारच नव्हते असे आपण समजतो . खरे सांगायचे म्हणजे संकटे ही आपल्या कर्माचीच फळे असतात . संकटांमध्ये भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव राहिली तर ती आपल्याला समाधान देते . ज्यांना सर्व अनुकूल आहे त्यांनादेखील समाधान हे नसतेच ; म्हणून , ज्यांना तितकी अनुकूलता नाही त्यांनी त्याबद्दल असमाधान ठेवण्याचे कारण नाही , कारण समाधान हे त्यामध्ये नाहीच नाही . असमाधान हा रोग सर्वांचा एकच आहे , आणि भगवंताचे स्मरण हे औषधही सर्वांना एकच आहे .