रात्र दुसरी अक्काचे लग्न
आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली. सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळी जात. आश्रम होता त्या गावी नदी होती. नदीचे नाव बहुळा! नदीतीरावर एक लहानसे महादेवाचे देऊळ होते. देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते. त्याला पार बांधलेला होता. त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत.
गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते. ते टेकडीवर जाऊन बसले होते. लहानगा गोविंदा पावा गोड वाजवीत असे. त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती व तो वाजवीत होता. कविहृदयाचा श्याम ऐकत होता. एकाएकी गोविंदा थांबला व त्याने श्यामकडे पाहिले. श्यामचे डोळे मिटलेले होते. तोंडावर गोड व मधुर असे तेज होते.
"चलता ना आश्रमात, प्रार्थनेची वेळ होईल.'
श्यामने डोळे उघडले. श्याम म्हणाला 'गोविंदा! बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे. कृष्णाच्या मुरलीने पशुपक्षी, दगड-धोंडे विरघळून जात. ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन:
'यमुनाबाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे । हालविना तरूवर पुष्प फळ पान रे ।
गोपीनाथा आल्ये आल्ये सारूनीया काम रे । वृंदावनी वाजविशी वेणू, जरा थांब रे'
"गोविंदा! लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळयात मी गोवा-यांबरोबर रानात जात असे. गाईगुरे चरत व गोवारी अलगुजे वाजवीत. माझे चुलते छान अलगुजे करीत. लहानशी बांबूची नळी; पण तिच्यात केवढी शक्ती! हल्ली ती ब्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात. दोन रूपये त्यांना पडतात. परंतु खेडयापाडयांतील गोरगरिबांना ही बासरी आहे. मधुर, सुलभ व सुंदर! बासरी हे आपले राष्ट्रीय वाद्य आहे. श्रीकृष्णाने ते रूढ केले आहे व सात लाख खेडयांत ते वाजविले जात आहे! वाजव, आळव ते गीत.'
'परंतु ती पहा घंटा वाजत आहे! प्रार्थनेस चला.' गोविंदा म्हणाला.
'हो चला. काय रे गोविंदा ! काल मी बराच वेळ सांगत बसलो का? परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती. आज लौकर आटपीन.' श्याम म्हणाला.
'काल दहाबारा मिनिटेच तुम्ही सांगत होता. उगीच आखडते नका घेऊ. मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात, त्यात आमचा फायदा असतो. तो वेळ व्यर्थ का जातो?' गोविंदा म्हणाला.
बोलत बोलत दोघे आश्रमात आले. गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाली. सारे जमले. गावातील काही मंडळी आली होती. घंटा वाजली. प्रार्थना सुरू झाली.
स्थिरावला समाधीत ! स्थितप्रज्ञ कसा असे.
वगैरे गीताईतील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली. ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थनाच जणू झाली आहे.
प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली. श्यामने गोष्टीस सुरूवात केली.
'माझ्या आईचे प्रेम आम्हा सर्व भावंडांत आमच्या बहिणीवर जरा जास्त होते. माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती. आम्ही तिला अक्का म्हणतो. माझी अक्का दया व क्षमा, कष्ट व सोशिकता, यांची मूर्ती आहे. तिला सासरी प्रथम सासुरवास झाला; परंतु माहेरी तिने कधी सांगितले नाही. तिने स्वत:च्या मुलास एक चापटही मारली नाही. मुलांचा राग आलाच तर दूर उठून जाते व राग शांत करून येते.
माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची गोष्ट आहे. अक्काचे कितीतरी दिवस लग्नच जमत नव्हते! तिला मंगळ होता. त्यामुळे अडचणी येत. शिवाय हुंडयाची अडचण होतीच. आमचे नाव होते मोठे. बडे घर पोकळ वासा, अशातली गत झाली होती. पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असे काही मंडळीस घरात वाटे व कर्ज वाढत होते. माझ्या अक्काला सतरा ठिकाणी नाचविली, कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा आड येई. हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडाच तो! या हुंडयाच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही. त्यांना आतून चिंता जाळीत असते. 'मुलगी वाढत चालली, एकदा लवकर उरकलेच पाहिजे, कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत!' असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात. त्यांना जीवन नकोसे होते. आपल्या देशातील तरूणच नादान!
या हुंडयाची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलतेने बंगालमध्ये स्वत:ला जाळून घेतले. त्या वेळेस क्षणभर तरूणांनी हुल्लड केली. सभा भरविल्या, ठराव केले; परंतु पुन्हा सारे थंड! हुंडे पाहिजेत, शिक्षणाचा खर्च पाहिजे, आंगठी पाहिजे, दुचाकी पाहिजे, घडयाळ पाहिजे. मुलीचे पैसे घेणे वा मुलाचे घेणे, दोन्ही गोष्टी सारख्याच निंद्य. गाईसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म; परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुलांमुलींसही विकतात यापरता अधर्म कोणता? तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात; पण कृतीने धर्माची सारी थट्टाच आहे. उदार हृदये ज्यांची असावीत ते तरूणही मेलेलेच! निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही. आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणा-या रुढी व चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्य प्रिय आहे, हे मी कसे म्हणू? असे जगाने कसे म्हणावे? परंतु जाऊ दे. मी भावनाभरात कोठे तरी वहात चाललो.'
"तुम्ही भलतीकडे वाहवत चाललेत तरी आम्हाला मधच मिळणार ! आडरानात शिरलात तरी फुलेच दाखविणार; तुम्ही बोलत राहिलेत म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्मा डोलू लागतो.' नामदेव म्हणाला.
"तुमचे काहीही असो ते गोड लागते. तुम्हीच ना ती शाहूनगरवासी नाटकमंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती? हॅम्लेटचे नाटक जाहीर केलेले असावे; परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत! प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे. गणपतरावांचे सारेच छान. तसेच तुमचे. तुम्ही गोष्ट सांगा वा प्रवचन द्या. आम्हाला आनंदच आहे.' गोविंदा म्हणाला.
"मग अक्काच्या लग्नाचे काय झाले?' रामने विचारले.
श्याम म्हणाला, 'रामची आपली मुद्दयाशी गाठ. बरे तर ऐका, पुष्कळसे हिंडल्याफिरल्यावर जमले एकदाचे लग्न. लग्न रत्नागिरीस व्हावयाचे होते. आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीस जावयाचे होते. मी तेव्हा सहा-सात वर्षांचा असेन. मला फारसे आठवत नाही; परंतु आईच तो प्रसंग सांगत असे. मला तो खवळलेला समुद्र, त्या बैलगाडया, ते सारे आठवत आहे. गावातील व घरची पन्नास-पाऊणशे मंडळी निघाली. बरोबर गडी-माणसे होती. बैलगाडया हर्णेबंदराला लागल्या. त्या वेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती. हर्णेला धक्का नव्हता. पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत. तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचे. नंतर ते पडाव बोटीजवळ जावयाचे!
हर्णेबंदर जरा त्रासाचे होते. तरी तेथील देखाचा फार सुंदर आहे. हर्णेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग. हर्णेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकांत रूढ आहेत.
हर्णेच्या किल्ल्यावरी । तोफा मारिल्या दुहेरी । चंद्र काढिला बाहेरी । इंग्रजांनी
चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला, असे ही ओवी सांगते. हर्णेच्या समुद्रतीरावर नारळीची घनदाट वने आहेत. समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माडाची झाडे आपल्या माना सारख्या नाचवीत असतात. समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा कोस ऐकू जाते. हर्णेला दीपगृह आहे. उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे. येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो. संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात. संत हे भवसागरातील दीपस्तंभच.
'संत कृपेचे हे दीप । करिती साधका निष्पाप ॥ '
अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळीपैकी एकाने म्हटला. खेडेगावातील वारकरी वगैरेंच्या तोंडी कितीतरी अभंग, ओव्या वगैरे असतात. त्यांना जितके पाठान्तर असते तेवढे आम्हा सुशिक्षितांस नसते. सुशिक्षितांस इंग्रजी कवी माहीत असतात. त्यांची वचने त्यांना पाठ; परंतु ज्ञानोबा-तुकाराम यांची त्यांना आठवण नसते.
श्याम म्हणाला, 'तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो! रात्री आकाशात चंद्र असावा, समुद्राला प्रेमाची भरती येत असावी, त्या वेळेस समुद्राच्या वक्ष:स्थळावर शेकडो चांद नाचताना दिसतात. आपल्या गोजिरवाण्या गो-यागोमटया मुलाचे शेकडो फोटोच समुद्र काढून घेत आहे, असे वाटते!'
'समुद्राचा का चंद्र मुलगा?' एका लहान मुलाने विचारले.
'हो समुद्रमंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबर बाहेर पडला अशी कथा आहे.' परभारे नामदेवनेच उत्तर दिले.
श्याम वर्णनाच्या भरात होता. 'आपल्या मुलाच्या अंगाखांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येते. किंवा चंद्रच शेकडो रूपे घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे, असे वाटते. सारी मौज असते. वारे वहात असतात. नारळी डोलत असतात, लाटा उसळत असतात, दीप चमकत असतो, चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरत असतो. तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते. कोणाचे सामान राहून जाते, कोणाचे बदलते, कोणाचे हरवते! कोणाला पडाव लागतो, कोणाला उलटी येते, ती एखाद्याच्या अंगावर होते व मग तो उसळतो. हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था, सारा गोंधळ, सारा उदासीनपणा, सारी सहानुभूतिशून्यता तेथे दिसून येते.
आम्ही पडावात बसलो; पडाव चालू झाले. वल्हवणारे वल्ही मारू लागले. चुबुक चुबुक पाणी वाजत होते. वा-यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते. 'शाबास, जोरसे' असे वल्हवणारे म्हणत होते, पडावात खेचाखेच होती. माझी आई अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती. माझी एक आत्याही तेथे बसली होती. आत्याचेही अंगावर पिणारे मूल होते. आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध नव्हते. वरचे दूध मुलाला पाजीत; परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसे समाधान होत नाही. आईच्या दुधाची चव न्यारीच असते. ते नुसते दूध नसते. त्यात प्रेम व वात्सल्य असते. म्हणून ते दूध बाळाला बाळसे देते. तजेला देते. ज्या देण्यात प्रेम आहे त्या देण्याने देणारा व घेणारा दोघांस परमसुख होते.
किना-यावरील बैलगाडयांच्या बैलांच्या गळयातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता. बंदरावरचे दिवे अंधुक दिसत होते. बोट दूर दिसावयास लागली होती. तिचा वरचा दिवा दिसू लागला होता. तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला असता.
'अरे चावतोस काय असा? काय आहे प्यायला त्यात?' असे आत्या आपल्या मुलावर ओरडली. तो मुलगा अधिकच रडू लागला. काही केल्या राहीना. पडावातही गर्दी होती. इकडचे तिकडे व्हावयास जागा नव्हती. आजूबाजूला जेव्हा पुष्कळ लोक असतात, तेव्हा जर मूल रडावयास लागले तर आयांना मेल्यासारखे होते. आपल्या मुलाने हसावे व खेळावे, सर्वांनी त्याचे कौतुक करावे, त्याला घ्यावे, नाचवावे, मुके घ्यावे, यात आयांना परमानंद असतो. ते पाहून कृतार्थ वाटते; परंतु मूल जर रडू लागले तर मात्र फजिती! हस-या मुलाला सारे घेतात, रडणा-याला कोण घेणार? वास्तविक रडणा-याला घेण्याची जास्त जरूरी असते; परंतु त्याचाच सारी तिटकारा करतात. जगात सारे सुखाचे सोबती, दु:खाला कोणी नाही. दीनाला जगात कोणी नाही, पतिताला कोणी नाही. ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरूरी त्यालाच त्याची अत्यंत वाण.
'दीनको दयालू दानी दूसरा न कोई'
मूल रडू लागले तर ती कटकट होते. 'झालं काय काटर्याला रडायला' अहो, 'असाच रोज रडतो' वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात व तिला वाटते की, मुलासकट पृथ्वीच्या पोटात गडप व्हावे! च्यावच्याव करणारी तमासगीर मंडळीच जगाच्या बाजारात फार.
माझ्या आत्याला त्या वेळेस तसेच झाले. मूल तर राहीना. माझी आई जवळच होती. माझ्या आईने आपल्या मुलास गडयाजवळ दिले व ती आत्याला म्हणाली, 'वन्सं, माझ्याजवळ द्या त्याला. मी त्याला घेत्ये हो.' आईने प्रेमाने आत्याच्या मुलाला घेतले व त्याला पाजले. तो बाळ पोटभर माझ्या आईच्या अंगावर प्याला; हसू खेळू लागला.
आई त्या लग्नात स्वत:च्या मुलासही रडवी परंतु वन्संच्या मुलाला अगोदर शांत करी. मुलांना काय गोड दूध आईचे मिळाले की, राजेच ते! आत्याचे मूल रडू लागताच आईने घ्यावे, पाजावे. आईने कधी कुरकुर केली नाही; उलट तिला परमधन्यता वाटे, परमसुख व समाधान वाटे.
माझी आई ती गोष्ट एकादे वेळेस सांगे व म्हणे, 'श्याम, अरे जवळ असेल ते दुस-यास द्यावे. दुस-याचे अश्रू थांबवावे, त्याला हसवावे, सुखवावे. या आनंदासारखा आनंद नाही. स्वत:च्या मुलाचे, श्याम कोणीही कोडकौतुक करील; परंतु दुस-याच्या मुलाचेही करील, तितक्याच प्रेमाने करील तोच थोर.'