A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: fopen(/tmp/ci_sessionlca5nsmv4q8roqc0r358haujogvs1t21): failed to open stream: No such file or directory

Filename: drivers/Session_files_driver.php

Line Number: 172

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

A PHP Error was encountered

Severity: Warning

Message: session_start(): Failed to read session data: user (path: /tmp)

Filename: Session/Session.php

Line Number: 143

Backtrace:

File: /var/www/bookstruck/application/controllers/Book.php
Line: 14
Function: __construct

File: /var/www/bookstruck/index.php
Line: 317
Function: require_once

श्यामची आई | रात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे| Marathi stories | Hindi Stories | Gujarati Stories

Android app on Google Play

 

रात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे

त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला; परंतु मागून पडेना. लावणी झाली होती; परंतु पुढे शेतातील चिखल वाळून गेला. खाचरातील पाणी नाहीसे झाले. माळावरील गवत सुकून जाऊ लागले. लोकांना काळजी वाटू लागली. शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता. कोठे काळा डाग दिसतो का, पाहत होता. पाऊस हा आधार आहे. पावसामुळे जग चालले आहे. पाऊस नाही तर काही नाही. जीवनाला पाणी पाहिजे. पाण्याला शब्दच मुळी 'जीवन' हा आम्ही योजला आहे. मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो. पृथ्वीला, पाण्याला वगैरे जे शब्द आहेत, त्यांत केवढे काव्य आहे. पृथ्वीला 'क्षमा' हा शब्द ज्याने योजला, तो केवढा थोर कवी असेल! तसेच पाण्याला 'जीवन' हा शब्द ज्याने लावला, त्याचेही हृदय किती मोठे असेल! पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत! पाण्याला अमृत, पय, जीवन, अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते. पाण्याला अमृत नाही म्हणावयाचे तर कशाला? कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंडा, वाळलेल्या झाडाला पाणी घाला, सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू देत. म्हणजे पाहा कशी जीवनाला टवटवी तेथे येते ती. मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय. थोडे पाणी प्या, लगेच थकवा दूर होतो, हुशारी येते. पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे. आई मुलाला दूध देते. परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे. पाणी नेहमी पाहिजे. पाण्याचा रस जन्मल्यापासून मरेपावेतो पाहिजे. प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी आहे, असे ऋषी म्हणतो. पाण्यात जीवनशक्ती आहे, तशी कशात आहे? पाण्याचा महिमा कोण वर्णन करील? पुन्हा निरुपाधी! ज्याला रंग नाही, गंध नाही, आकार नाही. जो रंग द्याल, जो आकार द्याल, तसे ते पाणी आहे. पाणी म्हणजे भगवंताचे रूप आहे.
त्या वर्षी पाणी पडेना, पीक वाढेना. अवर्षणाची चिन्हे दिसू लागली. अवर्षण जावे व वर्षाव व्हावा, म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे. गावात शंकराचे देऊळ आहे. पाण्यात शंकराच्या पिंडीस बुडवावयाचे. सारा गाभारा पाण्याने भरून टाकावयाचा. भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हांडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात. सात दिवस अहोरात्र अभिषेक करावयाचा. सात दिवसच नाही, तर पाऊस पडेपर्यंत. गावात पाळ्या ठरतात. रुद्र कोणाकोणास म्हणता येतो, त्याची यादी होत असे व त्यांना वेळ वाटून ते देत. तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावीत.
शंकराच्या देवळात गर्दी होती. रुद्राचा गंभीर आवाज येत होता. रुद्रसूक्त फार गंभीर, तेजस्वी व उदात्त आहे. कवीच्या-त्या ऋषीच्या-डोळ्यांसमोर सर्व ब्रम्हांड आहे, असे वाटते. भराभरा सारी सृष्टी त्याच्या डोळ्यांसमोरून जात आहे, असे वाटते. सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यांसमोर आलेल्या आहेत. तो विश्वाशी जणू एकरूप झालेला आहे, असे वाटते. माझ्या वडिलांना रुद्र येत असे. त्यांची रात्री बारानंतर पाळी येत असे.
आई मला म्हणाली, "जा ना रे देवळात. तू पाणी आणावयास नाही का लागत, जा."
"मला नाही उचलणार हे हंडे. केवढाले हंडे व घागरी!" मी म्हटले.
"अरे, आपली लहान कळशी घेऊन जा. नाही तर तांब्या नेलास, तरी चालेल. विहिरीतून एकेक तांब्या बुडवून आणावा व देवावर ओतावा. गणपतीच्या विहिरीत उतरावयाचेही सोपे आहे. सरळ पायठण्या आहेत. जा, तो तांब्या घेऊन जा." आई म्हणाली.
"एवढासा तांब्या ग काय घेऊन जायचे? तू म्हणशील की, झारी नाही तर पंचपात्रीच घेऊन जा. लोक हसतील तेथे!" मी नाखुशीने म्हटले.
"श्याम! कोणी हसणार नाही. उलट, तू मोठी घागर उचलू लागलास, तर मात्र लोक हसतील. आपल्या शक्तीबाहेर काम करू पाहणे तेही वाईट; परंतु आपल्याला जेवढे करता येईल, तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट. हे साऱ्या गावाचे काम आहे. तुला रुद्र म्हणता येत नाही, तर नुसते पाणी घाल. या कामात तुझा भाग तू उचल. प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे. कामचुकारपणा वाईट. गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला, तर सगळ्या गोपालांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या. या साऱ्यांची शक्ती सारखी का होती? तू उगीच वाचतोस मात्र. असले नुसते वाचून काय करायचे? सारी अक्कल शेणात जायची. त्या रामाच्या सेतूच्या वेळेचीही नाही का गोष्ट? मारुती, सुग्रीव, अंगद सारे मोठेमोठे वानर पर्वत आणीत होते. परंतु ती लहानशी खार. तिला वाटले, आपणही रामाच्या सेतूस मदत करावी. हा सेतू बांधणे पवित्र आहे. रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी होते. त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य होते. ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिकटत, तिच्या केसांत अडकत, ते सेतूजवळ आणून ती टाकी. तेथे जाऊन ती अंग झाडी व ते कण पडत. तिला शक्ती होती, त्याप्रमाणे ती काम करीत होती. तुला हंडा उचलत नसेल, तर कळशी घे. कळशीने दमलास, तर तांब्या आण. त्यानेही दमलास, तर फुलपात्र ने. जा श्याम? किती रे सांगायचे?" आई मला समजावून सांगत होती.
शेवटी मी उठलो. लहानशी कळशी घेऊन देवळात गेलो. कितीतरी मुले पाणी नेत होती, शंकराला कोंडीत होती, पाण्यात बुडवीत होती. देवळात मंत्र चालले होते. पाणी ओतले जात होते. गंभीर देखावा होता. माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती. मी त्यांच्यांत मिळालो. मला प्रथम लाज वाटत होती. एक भटजी मला म्हणाले, "श्याम, आज आलास वाटते? तू इंग्रजी शिकतोस, म्हणून लाज वाटत होती वाटते?" मी काही बोललो नाही. लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती. वेदातील मंत्र नव्हेत, हो, संस्कृत नव्हेत, हो. त्यांचे मंत्र मराठीत होते.


"सांब सदाशिव पाऊस दे
शेते भाते पिकू दे
पैशाने पायली विकू दे"


हे त्यांचे मंत्र होते. पाऊस पडो, शेतभाते पिकोत, स्वस्ताई होवो, असे देवाजवळ ती मुले मागत होती. मला प्रथम लाज वाटत होती. संस्कृत रुद्र येत नव्हता व हे बालमंत्रही म्हणावयास लाज वाटत होती. परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली. मीही मोठमोठ्याने 'सांब सदाशिव पाऊस दे' म्हणू लागलो; मीही त्या मुलांत मिसळून गेलो. त्यांच्याबरोबर नाचू लागलो.
सामुदायिक कामात आपणांसही जे करता येईल, ते आपण निरलसपणे केले पाहिजे, त्यात लाज कशाची? मुंगीने मुंगीप्रमाणे काम करावे. हत्तीने हत्तीप्रमाणे.

श्यामची आई

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
प्रारंभ
रात्र पहिली सावित्री-व्रत
रात्र दुसरी अक्काचे लग्न
रात्र तिसरी मुकी फुले
रात्र चवथी पुण्यात्मा यशवंत
रात्र सहावी थोर अश्रू
रात्र सातवी पत्रावळ
रात्र आठवी क्षमेविषयी प्रार्थना
रात्र नववी मोरी गाय
रात्र दहावी पर्णकुटी
रात्र अकरावी भूतदया
रात्र बारावी श्यामचे पोहणे
रात्र तेरावी स्वाभिमान- रक्षण
रात्र चौदावी श्रीखंडाच्या वड्या
रात्र पंधरावी रघुपती राघव राजाराम
रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन
रात्र सतरावी स्वावलंबनाची शिकवण
रात्र अठरावी अळणी भाजी
रात्र एकोणिसावी पुनर्जन्म
रात्र एकविसावी दूर्वांची आजी
रात्र बाविसावी आनंदाची दिवाळी
रात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर
रात्र चोविसावी सोमवती अवस
रात्र पंचविसावी देवाला सारी प्रिय
रात्र सव्विसावी बंधुप्रेमाची शिकवण
रात्र सत्ताविसावी उदार पितृहृदय
रात्र अठ्ठाविसावी सांब सदाशिव पाऊस दे
रात्र एकोणतिसावी मोठा होण्यासाठी चोरी
रात्र तिसावी तू वयाने मोठा नाहीस... मनाने
रात्र एकतिसावी लाडघरचे तामस्तीर्थ
रात्र बत्तिसावी कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
रात्र तेहतिसावी गरिबांचे मनोरथ
रात्र चौतिसावी वित्तहीनाची हेटाळणी
रात्र पस्तिसावी आईचे चिंतामय जीवन
रात्र छत्तिसावी : तेल आहे, तर मीठ नाही!
रात्र सदतिसावी अब्रूचे धिंडवडे
रात्र अडतिसावी आईचा शेवटचा आजार
रात्र एकोणचाळिसावी सारी प्रेमाने नांदा
रात्र चाळिसावी शेवटची निरवानिरव
रात्र एकेचाळिसावी भस्ममय मूर्ती
रात्र बेचाळिसावी आईचे स्मृतिश्राद्ध
रात्र पाचवी मथुरी