Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - ऑक्टोबर ९

‘ मी नाही, तू आहेस ’ हे जाणणे हीच खरी भक्ती होय. भक्तीचा विषय एक भगवंत ठेवला, की बाकी सर्वांचा विसर पडतो. भक्ती केली की चित्त निर्विषय होते, हे सांगावेच लागत नाही. स्वतःचे विस्मरण आणि भगवंताचे स्मरण हेच भक्तीचे रहस्य. भगवंताची प्राप्ती पाहिजे असेल तर भक्ती करावी. भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तर्‍हा आहेत. त्यामध्ये आपण कुठे तरी खासच बसू ! भगवंताने त्या सर्वांना समाधान दिले, मग ते आपल्याला का मिळणार नाही? जग प्रगतिपर आहे हे खरे; पण पैसा, मुले, मान्यता, वगैरे ऐहिक सुखांची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. भगवंतावाचून यश हे अपयशच समजावे. कित्येक वेळा अपयश हेच यश बनते; म्हणून अपयश आले तरी, ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे. ‘ भगवंत आहे ’ असे म्हणणे किंवा मानणे याचा अर्थ असा की, ही सर्व सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे. त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचेसुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहांपैकी आपण एक जीव आहोत, आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे.
खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो. अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत, म्हणजे सगुण परमात्मा, असा आहे की तो वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखाच करुन घेतो. आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते. मुलाचा आवाज आईला नेहमी गोडच लागतो, त्याप्रमाणे भक्ताचा आवाज भगवंताला गोड लागतो. शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात, तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेताचे रक्षण करायला उपयोगी पडते, त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी परमात्म्याची आठवण करुन देण्यासाठी सगुण हे उपयोगी पडते. डोंगराच्या माथ्यावर चढल्याशिवाय आपले पलीकडे असलेले गाव जसे आपल्याला दिसत नाही, तसे सगुणरुपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही.
जो भगवंतावर अवलंबून आहे तोच खरा स्वतंत्र होय. भगवंताचा ध्यास लागणे म्हणजे तद्रूपच होणे होय. भगवंताची प्रीती याचेच नाव भक्ती. ‘ माझा त्राता, माझी काळजी घेणारा, माझे रक्षण करणारा आणि पालन करणारा तो भगवंत आहे ’ असे मानणे आणि तस वागणे हीच भगवंताबद्दलची खरी अस्तित्वबुद्धी होय. आपले स्वतःवर जितके प्रेम आहे, त्याच्यापेक्षा जास्त प्रेम भगवंतावर करणे हीच खरी उपासना, आणि हेच जीवनाचे सर्वस्व होय.

ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - ऑक्टोबर १ भगवंत - ऑक्टोबर २ भगवंत - ऑक्टोबर ३ भगवंत - ऑक्टोबर ४ भगवंत - ऑक्टोबर ५ भगवंत - ऑक्टोबर ६ भगवंत - ऑक्टोबर ७ भगवंत - ऑक्टोबर ८ भगवंत - ऑक्टोबर ९ भगवंत - ऑक्टोबर १० भगवंत - ऑक्टोबर ११ भगवंत - ऑक्टोबर १२ भगवंत - ऑक्टोबर १३ भगवंत - ऑक्टोबर १४ भगवंत - ऑक्टोबर १५ भगवंत - ऑक्टोबर १६ भगवंत - ऑक्टोबर १७ भगवंत - ऑक्टोबर १८ भगवंत - ऑक्टोबर १९ भगवंत - ऑक्टोबर २० भगवंत - ऑक्टोबर २१ भगवंत - ऑक्टोबर २२ भगवंत - ऑक्टोबर २३ भगवंत - ऑक्टोबर २४ भगवंत - ऑक्टोबर २५ भगवंत - ऑक्टोबर २६ भगवंत - ऑक्टोबर २७ भगवंत - ऑक्टोबर २८ भगवंत - ऑक्टोबर २९ भगवंत - ऑक्टोबर ३० भगवंत - ऑक्टोबर ३१