Get it on Google Play
Download on the App Store

भगवंत - ऑक्टोबर २८

सरकारी नोकर वरिष्ठाच्या हुकुमाप्रमाणे चालत असल्यामुळे त्याच्यावर वैयक्तिक जबाबदारी कसलीही येत नाही आणि कर्तेपणाही त्याला शिवत नाही; त्याप्रमाणे गुरुवर श्रद्धा ठेवून त्याच्या आज्ञेत राहावे. लाभ-हानी देव जाणे, जबाबदारी गुरुवर; आणि तोच हे साधन करवीत असल्याने कर्तेपणाही त्याच्यावरच असणार. त्याच्याही पुढे म्हणजे, जे जे काही हातून घडते ते ते सर्व त्याच्याच इच्छेने आणि सत्तेने घडते, अशी दृढ भावना असली, म्हणजे कर्तेपण सोडून अजिबात मोकळे होता येते. असे झाले म्हणजे जे जे आपल्या हातून घडते, ती त्याचीच सेवा होते. मुख्य गोष्ट ही की, परमात्मा आपल्या ह्रदयात आहे, आपण त्याच्यात आहोत, आपण तोच आहो, अशी दृढ भावना पाहिजे. याच्या मधली पायरी म्हणजे परमात्म्याच्या नजरेखाली, तो पाहात असताना, आपण सर्व कर्मे करीत आहोत अशी जाणीव असणे आवश्यक आहे. यामुळे अभिमान सर्वस्वी जरी न गळाला, तरी आपल्या हातून वाईट कृत्ये तरी घडायची नाहीत.
क्षेत्राला क्षेत्रत्व आपण आपल्या भावनेने जर दिले नाही तर तिथे पाणी आणि दगडच आहेत ! ‘ काशी ’ ‘ गंगा ’ असे म्हटले म्हणजे पवित्रतेचे संस्कार मनात उभे राहतात, पण तिथल्या राहणार्‍या पुष्कळ लोकांचा तसा भाव नसल्यामुळे ते वर्षावर्षात स्नानासही जात नाहीत. यावरुन, त्यांना ते क्षेत्र असे वाटतच नाही असे दिसते. क्षेत्र हे आपल्या भावनेनेच नाही का निर्माण होत? मग ते घरच्या घरीच नाही का निर्माण करता येणार? याला अर्थातच दृढभाव असायला पाहिजे. तितका तो दृढ होत नसेल, तर क्षेत्रात जावे; आणि आर्थिकदृष्ट्या तेही शक्य नसेल, तर ‘ काशीस जावे नित्य वदावे; ’ म्हणजे काशीचे स्मरण तरी करावे, म्हणजे त्याने पवित्रतेचे संस्कार उदभूत होऊन मन पवित्र होईल. देव सर्वत्र भरलेला आहे, पण तो भावाने प्रकट केला पाहिजे. प्रह्लाद, द्रौपदी, यांना अगदी खात्री होती की देव आपल्या साह्यकारी आहे, तेव्हा देवाला प्रकट होणेच भाग पडले. सदगुरु मला साहाय्य करतील अशी तुमची खात्री पाहिजे, म्हणजे त्यांना साहाय्य करावेच लागते. याचा अनुभव घेणे हे तुमच्याच हाती नाही का?
स्वार्थाने कर्मे करणे याचे नाव प्रपंच, आणि निःस्वार्थपणाने करणे याचे नाव परमार्थ. जो आसक्तीमध्ये नाही तो निःस्वार्थी समजावा. आसक्ती निघण्याची पहिली पायरी असेल तर ती उदासीनता होय. देव आहे असे निःशंकपणे वाटणे हे ज्ञान होय. हे ज्ञान भगवंताच्या अनुसंधानात राहिल्याने सहज प्राप्त होते.

ब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास

स्तोत्रे
Chapters
भगवंत - ऑक्टोबर १ भगवंत - ऑक्टोबर २ भगवंत - ऑक्टोबर ३ भगवंत - ऑक्टोबर ४ भगवंत - ऑक्टोबर ५ भगवंत - ऑक्टोबर ६ भगवंत - ऑक्टोबर ७ भगवंत - ऑक्टोबर ८ भगवंत - ऑक्टोबर ९ भगवंत - ऑक्टोबर १० भगवंत - ऑक्टोबर ११ भगवंत - ऑक्टोबर १२ भगवंत - ऑक्टोबर १३ भगवंत - ऑक्टोबर १४ भगवंत - ऑक्टोबर १५ भगवंत - ऑक्टोबर १६ भगवंत - ऑक्टोबर १७ भगवंत - ऑक्टोबर १८ भगवंत - ऑक्टोबर १९ भगवंत - ऑक्टोबर २० भगवंत - ऑक्टोबर २१ भगवंत - ऑक्टोबर २२ भगवंत - ऑक्टोबर २३ भगवंत - ऑक्टोबर २४ भगवंत - ऑक्टोबर २५ भगवंत - ऑक्टोबर २६ भगवंत - ऑक्टोबर २७ भगवंत - ऑक्टोबर २८ भगवंत - ऑक्टोबर २९ भगवंत - ऑक्टोबर ३० भगवंत - ऑक्टोबर ३१