सिने जन्नत चित्रपट गृह
आणखीन एका वाचकाने पाठवलेला स्वानुभव :
सिने जन्नत चित्रपट गृहाच्या रात्रीच्या शो वरून आम्ही परतत होतो. रात्रीचे २ वाजले होते. चित्रपट संपून गर्दी अचानक पांगली. रिक्षा, बाईक्स वरून लोक अचानक घरी गेले. मी आणि अब्दुल मात्र चालत घरी जाणार होतो. आमचा फ्लॅट काही मिनिटेच दूर होता. चित्रपट गृहाच्या मागील बाजूने एक कचरा पेटी होती. तेथून आम्ही चालत जात होतो आणि अचानक कुणाचा तरी हुंदका ऐकू आला. आम्ही निरखून पहिले तर दूर एका बंद दुकानाच्या शटरजवळ एक ५-६ वर्षांचा मुलगा बसून रडत होता. त्याच्या अंगावर चांगले स्वछ कपडे होते. चांगल्या घरातील वाटत होता.
"अरे रडायला काय झाले ? कुछ मदत चाहिये है क्या ? " अब्दुल ने त्याला विचारले. मुलगा भांबावून आमच्या कडे पाहत होता.
"औषध पाहिजे. मला नाही ठाऊक कसे आणायचे." असे म्हणून त्याने कागदाचा तुकडा पुढे केला.
आम्ही कागद हातांत घेऊन पहिला त्यावर काही औषधांची नावे लिहिली होती. सुमारे ३०० रुपयांचे बिल होते. आम्ही काही वेळ गोंधळून एकमेका कडे पहिले. मुलाला मदत करावी असे वाटते.
"औषध कुणासाठी पाहिजे बाळा ?" मी विचारले. "आईसाठी" त्याने सांगितले आणि चित्रपटगृहाच्या दिशेने बोट केले. तिथे जवळच्या एखाद्या हॉस्पिटल मध्ये त्याची आई असेल असा आम्ही विचार केला.
"चल ये बरोबर आम्ही घेऊन दितो औषधें" मी कागद खिश्यांत टाकत त्याला सांगितले. अब्दुल ने माझ्याकडे पहिले.
"मी नाही येऊ शकत, मला राहायला पाहिजेल" असे त्याने सांगितले. त्याची कळी थोडी खुलली होती.
ठीक आहे आमच्या घराच्या बाजूला निशा फार्मसी होती ती रात्रभर खुली असायची. तिथून आम्ही औषधें आणून देऊ असा विचार केला आणि झपाझप पावले टाकत आम्ही फार्मसी जवळ पोचलो.
पण तिथे पोचताच खिसा पहिला तर ते औषदांचे कागद गायब. मला घाबरायला झाले. आधीच त्या मुलाची आई अत्यवस्थ आहे आणि आम्ही ते औषधांचे कागद हरवले तर त्याला बिचार्याला आम्ही औषधे कशी आणून देऊ असा प्रश्न निर्माण झाला.
आमचे गोंधळले चेहरे पाहून फार्मसी वाल्याने "तुम्ही जन्नत सिने च्या रात्रीच्या शो वरून तर येत नाही ना ? " असा प्रश्न केला.
"तुम्हाला कसे ठाऊक ?" अब्दुल ने विचारले.
"दररोज ची गोष्ट आहे साहेब. एक लहान मुलगा दिसतो, औषधें पाहिजे म्हणून लोकांना सांगतो. काही भले मानूस मदत करण्याचा प्रयत्न करतात पण परत गेलात तर तिथे कुणीही नसतो. खरे तर हि फार्मसी आम्ही १९७५ साली बांधली होती कारण आज जिथे सिने जन्नत आहे तिथे त्या काळी फार मोठे हॉस्पिटल होते. तिथे ह्या मुलाची आई विना औषधाने दगावली होती. मुलाकडे आईचे मृत शरीर नेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते आणि त्यामुलाने प्रचंड अकांड तांडव करून लोकांचे लक्ष वेधून शेवटी आईचा अंत्यसंस्कार केला होता." असे म्हणून फार्मसी वाल्याने आपल्या ड्रावर मधून एक लॅमिनेट केलेले बातमीचे कात्रण काढले. त्यावर १९९३ मधील तसे वृत्त होते.
आम्ही आश्चर्याने चकित झालो होतो. घाबरलो असलो तरी आम्ही पुन्हा त्या चित्रपटगृहाकडे गेलो. कारण कुणाची तरी कथा ऐकून एका लहान मुलाला संकटात सोडण्याची आमची मानसिक तयारी नव्हती. आम्ही फार दुरूनच त्या बंद दुकानाच्या शटर कडे नजर टाकली. तिथे तो लहानगा अजून उकिडवा बसला होता. पण ....
पण त्याच्या पुढेच जे आम्ही पहिले ते पाहून आम्ही मागच्या मागे पोबारा केला. त्या मुलाच्या पुढे पांढऱ्या कफनात गुंडाळलेले एक शरीर ठेवले होते.