Get it on Google Play
Download on the App Store

भाग ७

समीरच्या डोळ्यांत मांत्रिकाला जे काही दिसलं त्याने मांत्रिकाच्या डोळ्यांतील बुब्बुळेच पार दिसेनाशी करून टाकली होती.. अचानक हळू-हळू मांत्रिकाचं साधारण रूप बदलायला लागलं.. अन सर्वांची नजर मांत्रिकावर जावून खिळली.. अर्धा टक्कल पडलेल्या त्याच्या डोक्यावर आता अर्धवट जळालेली केसं उगवायला लागली होती.. ती केसं वाढत जावून गुडघ्यापर्यंत रेंगाळायला लागली.. घरातील इतर मंडळींचा ह्यावर विश्वासंच बसत नव्हता.. प्रत्यक्ष डोळ्यांदेखत घडत असूनदेखील ते मानायला त्यांचं मन धजत नव्हतं.. पण, सर्व परिस्थिती समोर होती आणि जे घडत होतं ते सत्य होतं.! अर्धवट जळालेल्या केसांआडून दिसणारा मांत्रिकाचा चेहरासुद्धा आता स्त्रीरूपात बदलला होता.. त्या जळालेल्या चेह-यामधून ठिकठिकाणांतून रक्ताने माखलेली कातडी लटकत होती.. चमकदार मोत्यांच्या दातांऐवजी आता जळून काळेठिक्कर पडलेले दात दिसायला लागले होते.. जी पाहताच छातीत धडकी भरत होती.. असा तो विद्रुप चेहरा बघितल्यावर सा-यांनी एकसाथ भितीने जोर-जोरात किंकाळ्या फोडल्या.. बदलत्या क्षणासोबत त्या मांत्रिकाचं रूपही बदलत चाललं होतं.. एव्हाना घराबाहेरचं वातावरणसुद्धा बदललं होतं.. शुभ्र पांढ-या ढगांची जागा आता काळ्याकुट्टं ढगांसोबतंच कडाडणा-या विजांनी घेतली होती.. मंदं वाहणारी हवासुद्धा घराच्याभोवती आता जोरात वाहू लागली होती.. दारे खिडक्या एकमेकांना धडाधड आपटत होते.. घराबाहेर अचानकंच जमलेले कुत्रे वर काळ्याकुट्टं ढगांकडे बघत एका विचित्र सूरात ईवळायला लागले होते.. पूर्ण वातावरणंच झटक्यात बदललं होतं..!!

बाहेरचं वातावरण जेवढं भयंकर होतं त्यापेक्षा कितीतरी पटीने घराच्या आतलं वातावरण झालं होतं.. कारण, मांत्रिकाचं शरीर आता पूर्णपणे एका विद्रुप दिसणा-या स्त्रीच्या रूपात बदललेलं होतं.. ती विद्रुप बाई बुब्बुळे नसल्याने पांढरे पडलेल्या डोळ्यांनी सर्वांकडे चेहरा वेडा वाकडा करून बघत होती.. अचानक बाजूलाच खाटेवर बेशुद्धावस्थेत पडलेल्या समीरकडे तिची मान वळली आणि त्याच्या दुस-याच क्षणाला लगेचंच समीर शुद्धीवर आला.. समीर शुद्धीवर आला ह्याचा आनंद साजरा करायचा की पुढ्यात उभी असलेली ही विद्रुप दिसणारी बाई बघून दुखवटा करायचा.? अशी दुहेरी मनस्थिती घरातल्या मंडळींची त्यावेळेस झाली होती.. समीरला इथे कसा आलो हे समजत नव्हतं.. तो डोळे चोळत समोर बघतो तेव्हा त्याला प्रसाद आणि त्याच्या घरातील इतर मंडळी दिसतात..विजा कडाडण्याचा, दारे खिडक्या हवेमुळे धडाधड आपटण्याचा आणि कुत्रे ईवळण्याच्या आवाजाकडे त्याचं जराही लक्ष जात नाही.. कारण, घरातील सर्वांना बघून समीरला हायसं वाटत होतं.. गावात आल्यापासून त्याला फक्त आणि फक्त अतृप्त आत्मेच दिसले होते.. त्यामुळे साहजिकंच जिवंतं माणसं बघून त्याच्या भेदरलेल्या मनाला एक विलक्षण शांती मिळाली होती.. पण, ती शांती काही क्षणातंच त्याच्या चेह-यावरून मावळते.. कारण, प्रसादसोबतंच त्याचा पूर्ण परिवार घराच्या कोप-यात उभे राहून भितीने नुसते थरथर कापत होते.. त्या सर्वांना भितीने थरथर कापताना पाहून तो थोडा गोंधळतो.. त्याच गोंधळलेल्या अवस्थेत तो सर्वजण भितीने ज्या खाटेशेजारी बघत असतात तिथे हळूच नजर वळवतो.. त्याची नजर आधी जमिनीवर जाते.. आणि सर्वांत आधी त्याला दिसतात जळालेले मानवी पाय.. ते पाय बघून त्याला वर बघण्याची हिंम्मतंच होत नाही.. तश्याच अवस्थेत तो खाटेच्या दुस-या बाजूने उडी मारून तडक प्रसादला खेटून उभा रहातो.. चेहरा तळहातामध्ये लपवून तो थरथरायला लागतो.. तेव्हा ऐवढा वेळ नुसतं वेडी वाकडी मान फिरवून उभी असलेली ती बाई घोग-या भसाड्या आवाजात विक्षिप्त हसत बोलते, " समीर.. घाबरलास काय रे मला.. अशी नजर का लपवतोयस.. बघ माझ्याकडे.. मी सावित्री.. हाहाहाहाऽऽ.." सावित्री नाव ऐकताच समीरचे डोळे चमकतात.. आपोआपच त्याची नजर तिच्या दिशेने वळते.. आणि मग तिचं ते विद्रुप रूप पाहून तोंडातून पटकन शब्द बाहेर पडतात.. " हाच तो जळालेला चेहरा आहे जो मला मोबाईलमध्ये दिसला होता.. हो हिच आहे ती सावित्री जिला काल रात्री मी स्डँडजवळ पाहिली होती.." सगळे समीरकडे आ वासून बघायला लागतात.. समीर असा बहेकल्यावाणी का बोलतोय हे त्यांना कळत नव्हतं.. साहजिकंच त्यांना त्यामागचं खरं कारण अजूनंही कळलं नव्हतं.. हा गुंता आता जास्तंच वाढत जात होता.. शेवटी आजीने पुढाकार घेवून तिचे सुरकुतलेले हात सावित्रीपुढे पसरले.. थकलेले गुडघे जमिनीवर कसेबसे टेकवले आणि थरथरत्या आवाजात तिला साकडं घालू लागली. " आम्हच्या जीवाला ह्यो असा घोर कशापायी लावून ठेवलंसा.. ह्या गरीब पोराच्या मागं का ऐवढी पडलीस.? काय पाईजिल तुला..?? " आजी होता नव्हता सर्व जोर काढून बोलली.. थोडावेळ घरात शुकशुकाट पसरला.. बाहेरचा आवाजसुद्धा अचानक शांत झाला..ऐवढ्या शांततेत एकमेकांच्या श्वासोच्छवासाचा आवाजसुद्धा पुर्ण घरभर पसरत होता.. ह्यादरम्यान कोणीच एकही शब्द तोंडातून काढला नाही.. ती विद्रुप बाईसुद्धा शरीर थंड पडल्यागत शांत उभी होती..पण ही शांतता बरंच काही राहून गेलेलं सांगण्यासाठी स्वतःला कदाचित सज्ज करत होती.. आणि झालंही अगदी तसंच.. ऐवढावेळ शांत उभी असलेली ती तिच्या भसाड्या घोग-या आवाजात अंगाला शहारे आणणारा एक शब्द उच्चारते.."सूऽऽऽड.." तिने हा शब्द उच्चारला आणि अचानक तिच्या शरीरातून मांस जळलेला उग्र वास यायला लागला.. सर्वांचेच हात आपोआपंच आपआपल्या नाकांवर गेले.. पण, तिच्या भितीने ते लगेचंच खाली आले... आगीच्या एका छोट्याश्या ठिणगीने तिच्या पायाचं मांस जाळायला सुरूवात केली होती.. त्यामुळे तो उग्र वास येत होता आणि हळूहळू घरभर पसरत होता..!!

बाहेरचा थांबलेला आवाज आता पुन्हा यायला लागला.. विजांचं कडाडणं.., दारा खिडक्यांचं आपटणं.. कुत्र्यांचं ईवळनंही परत एकदा सुरू झालं होतं.. आवाजांच्या ऐवढ्या कलकलाटातही तिचा तो घोगरा भसाडा आवाज परत सर्वांच्या कानावर येवून आदळला.. " समीरऽऽ.. तुझ्यासोबत आणि तुझ्यासमोर रात्री जे काही घडलं होतं त्यामागचं खरं कारण आता मी तुझ्याबरोबरंच ह्या खोलीत असलेल्या ह्या सर्वांनाही सांगणार आहे.. पण एक गोष्ट लक्षात ठेवाऽऽ.. कोणीही ह्यादरम्यान तोंडातून एकही शब्द बाहेर काढता कामा नयेऽऽ.. कोणी चुकूनंही तसा प्रयत्न जरी केला तरी त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी स्वतःचा आवाज कायमस्वरूपी हरवून बसावा लागेलऽऽऽ हाहाहाहाऽऽऽ" ... तिच्या ह्या चेतावणीने सारेच स्तब्ध झाले... तिच्या आवाजामध्ये चिड होती, वेदना होत्या, एक अनामिक भिती होती आणि राक्षसी हास्यसुद्धा होतं... ती परत तिच्या घोग-या भसाड्या आवाजात बोलू लागली.. तिची काळाच्या पडद्याआड लपलेली कहाणी सांगू लागली..!!!

माझं पूर्ण नाव सावित्री खाशाबा टिके.. ह्याच गावची.. ही गोष्ट आहे सत्तर- ऐंशी वर्षांपूर्वीची.. मी जवळपास चार वर्षांची असेल त्यावळेस जेव्हा माझ्या वडिलांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती.. वडील आम्हाला सोडून गेले पण त्यांच्या अश्या अचानक जाण्याचं दुःखं आई सहन करू शकली नाही.. तिला मानसिक धक्का बसला आणि ती वेडी झाली.. त्या वेड्याच्या भरात ती पूर्ण गावभर फिरत रहायची.. येणा-या जाणा-यांकडे मळकट फाटलेला पदर पसरून पैसे मागायची अन मिळालेले पैसे कर्जदारांच्या दारात जावून फेकायची.. असंच एकदा ती गावात भटकत असताना जी चूकून गावाबाहेर गेली ती परत कधी माघारी आलीच नाही.. त्या दिवसापासून तिला गावात फिरताना कोणीच पाहिलं नाही.. काही देव माणसांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला.. पण.. सारंच व्यर्थ.. ती सापडली नाही आणि माझ्या नशिबात चौथ्या वर्षीच अनाथाचं आयुष्य जगण्याची वेळ आली.. कर्जबाजारामुळे घरदारासोबत जे काही होतं नव्हतं ते सगळं कर्जदारांनी ताब्यात घेतलं.. त्यामुळे मीसुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी दारोदार फिरू लागली.. गरीब अनाथ मुलगी म्हणून रोज कोणी ना कोणी घरातलं उरलं सुरलं मला खायला देत होते.. त्याने पोट भरत नसलं तरी जगण्यासाठी तेवढं पूरेसं होतं.. दिवसांमागून दिवस गेले.. माझा दिनक्रम तसाच चालू होता.. मग एकेदिवशी गावात मुंबईला राहणारा माझा लांबचा काका आला.. त्याने मला त्याच्यासोबत मुंबईला नेलं.. ब्रम्हचारी असल्यामुळे काकांनी लग्न केलं नव्हतं.. सांगायला असं त्याचे सगेसोयरे कोणीच नव्हतं.. त्यामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं.. काकांनी माझा मुलीगत सांभाळ केला.. मला चांगलं शिक्षण दिलं.. मी पदवीधर झाले अन एका चांगल्या हुद्दयावर कामाला लागले.. तोपर्यंत काका आजारपणामुळे पार खंगून गेले होते.. शेवटी काही महिन्यांनी त्यांना मरण आलं.. आणि मी परत एकदा अनाथ झाले..!!

काकांच्या मृत्युनंतर मी एकटी पडली होती.. सकाळ कामानिमित्त बाहेरंच जात असल्यामुळे काही वाटायचं नाही.. पण, रात्रीचं मात्र घर खायला उठायचं.. रोजचा तोच तो एकटेपणा आता नकोसा वाटत होता.. अश्याच एका रात्री मी एकटेपणाला कंटाळून बिछाण्यावर सारखी कूस बदलत झोपण्याचा प्रयत्न करत होती.. तेव्हा काय माहीत पण अचानक गावाकडचं आयुष्य डोळ्यांसमोर घर करू लागलं.. मला आई दिसायला लागली.. तिला मानसिक धक्क्यानं आलेलं वेडेपण दिसू लागलं आणि त्याच भरात ती गाव सोडून गेल्याचंही आठवू लागलं.. जुन्या आठवणी डोळ्यांपुढे आल्या आणि त्याच आठवणींत मी बैचेन मनाने झोपी गेले.. पण, रात्री अचानक भितीने दचकून जागी झाली.. घड्याळाकडे बघितलं तर एक वाजून गेले होते.. अंगाला दरदरून घाम फुटला होता.. छाती भितीने जोरात धडधडत होती.. तोच चेहरा इतक्या वर्षांनी आज एवढा स्पष्टपणे दिसला होता.. कपाळभर विस्कटलेलं कुंकू होतं..काळेभोर टपोरे डोळे सैरावैरा भिरभिरंत होते.. गळ्यात तुटून लटकत असलेलं मंगळसूत्र.. अंगावर मळकट साडी आणि हातात तुटलेल्या बांगड्यांचं अवशेष.. होय..ती माझी आई होती.. असाच काहीसा अवतार होता तिचा बाबांच्या मृत्युनंतर.. ती पहिल्यांदाच माझ्या स्वप्नात आली होती.. मला परत गावाला बोलवत होती.." पोरी.. मला एकटीला टाकून तू मंबईला गेलीस..म्या तुजी आजपतूर गावाकडं वाट बघतीय.. ये.." तिचं काळजाला पिळून टाकणारे शब्द त्या रात्री सतत कानात घुमत होते.. आई खरंच असेल का..?? ती अजूनंही माझी वाट बघत असेल का..?? त्यावेळी प्रश्न तर डोक्यात खुप सारे होते आणि त्याचं उत्तर मला फक्त गावाकडेच मिळणार होतं.. म्हणून मी ठरवून टाकलं.. सकाळी मिळेल त्या एसटी ने गावाला जायचं.. आणि आईला शोधायचं...

(क्रमशः)

लेखक- सतीश रमेश कांबळे