पॅरिसमधील बंडाचा मोड व विवाह
अशा वेळीं कन्व्हेन्शन सरकारला नेपोलियनची गरज लागली. पॅरिसमध्यें कन्व्हेन्शनविरूद्ध दुस-या पक्षानें लढाईची बरीच तयारी केली. तें बंड मोडण्याकरितां बारसच्या सूचनेवरून नेपोलियनची नेमणूक झाली. त्यानें पॅरिस शहरांत नाक्यानाक्यांवर तोफा गाडून ५ आक्टोबर १६९५ च्या बंडाळींतील ३०००० लोकांनां २०० हून अधिक प्राणहानि होऊं न देतां थोडक्या वेळांत उधळून लावलें, व सर्व शहरांत चांगला वचक बसविला. या विजयामुळें नेपोलियनला चांगला अधिकार प्राप्त झाला, पैसा मिळूं लागला, व त्याच्या भावांनांहि सरकारी नोक-या मिळाल्या व कुटुंबाचें दैन्य कायमचें नाहीसें झालें. कन्व्हेन्शननें ठरविलेल्या नव्या राज्यघटनेप्रमाणें नेमलेलया बारस, रूबेल, कार्नो वगैरे डायरेक्टरांत नेपोलियनचें वजन फार वाढलें. मुलकी सत्तेवर लष्करी सत्तेचा पगडा बसण्यास सुरवात झाली. याच संधीस बारसच्या मध्यस्थीनें नेपोलियनचा विवाह जोसेफाईन नांवाच्या विधवेशीं १७९६ मार्च ता. ९ रोजीं झाला. तिला पहिल्या संबंधाचा मुलगा व मुलगी अशीं दोन मुलें होतीं. पॅरिसमध्यें चैनी लोकांचे क्लब होते त्यांपैकीं बारसच्या क्लबांत विधवा जोसेफाईनचें जाणेंयेणें असे. नेपोलियन त्या क्लबांत जाऊं लागून विवाहाच्या गोष्टी निघाल्या तेव्हां प्रथम गरीब नेपोलियनला वरण्यास ती तयार नव्हती, पण पुढें इटलीच्या मोहिमेवर नेपोलियनची नेमणूक झाल्यावर तिनें विवाहास रूकार दिला.