Get it on Google Play
Download on the App Store

राज्यत्याग, एल्बानिवास, पुन: राज्यप्राप्ति व वाटर्लूस पराजय

सैन्याच्या अभावामुळें लढाई न करतां नेपोलियन फान्टेनब्लू येथें राहिला. पॅरिसमध्यें टालेरांडनें  सीनेट सभा भरवून ' नेपोलियनला सिंहासनावरून दूर केलें आहे ' असा ठराव केला. नेपोलियनचे बहुतेक सरदार आतां संयुक्तांना मिळाले होते. त्यांपैकी ने, बरथियर, लेफेरे, उदीनो व कालिनकूर यांनीं नेपोलियनची गांठ घेऊन राज्याचा राजीनामा देण्यास त्याचें मन वळविलें. राजीनामा दिल्यावर संयुक्तांशीं फान्टेनब्लूचा तह कालिनकूरनें जुळवून आणून (१) नेपोलियनला एल्बाबेट द्यावें, (२) त्याला तेथील बादशहा व पूर्ण स्वतंत्र मालक समजावा, (३) त्यानें तेथें सैन्य ठेवावें, (४) फ्रेंच खजिन्यांतून वीस लक्ष फ्रँक त्याला मिळावे, (५) व त्याची आई, मुलगा वगैरेंनां अशाच रकमा मिळत जाव्या वगैरे अटी ठरल्या. तदनुसार ३ मे १८१४ रोजीं तो एल्बांत दाखल झाला, व राजा या नात्यानें सर्व कारभार त्यानें सुरू केला. मुलकी व लष्करी अधिकारी नेमले; सडका, कालवे, शेतकीसुधारणा, खाणी, तसेंच सैन्य, आरमार, तटबंदी वगैरे गोष्टी त्यानें सुरू करून त्या बेटाला लवकरच नवें रूप दिलें. पण या सुधारणांकरितां त्याला लवकरच पैशाची अडचण भासूं लागली.

त्याच्या स्त्रीपुत्राला मेटरनिकनें एल्बास धाडण्याचें नाकारलें. तिकडे फ्रन्समध्यें लुई राजानें अनियंत्रित राज्यकारभार सुरू केल्यामुळें लवकरच तो अप्रिय बनला. हे सर्व जाणून नेपोलियननें पुन्हां फ्रान्समध्ये परत येण्याचें अगदी गुप्तपणें ठरवून दहा महिन्यांनीं ता. १ मार्च १८१५ रोजीं १२१९ लोकांसह तो फ्रान्सच्या किनार्‍यावर उतरला व अत्यंत युक्तीनें त्यानें फ्रेंच लोकांस व लुई बादशहाच्या लष्करास आपल्या बाजूस वळवून घेऊन एकहि बंदूक न झाडतां पॅरिस शहर हस्तगत केलें. लुई राजा सैन्य फितल्यामुळें पळून पुन्हां संयुक्तांच्या आश्रयास गेला. पॅरिसला येतांच नेपोलियननें राज्यकारभार सुरू केला. मुलकी व लष्करी अधिकारी नेमले व बेंजामिन कान्स्टंट यानें तयार केलेली इंग्लंडच्या सारखी नियंत्रित राज्यपद्धति (लिमिटेड मॉनर्की) मान्य केली, आणि कालिनकूर, फूशे, सावारी, दाव्हू, सौल्ट, वगैरे जुन्या इसमांस अधिकारी नेमलें.

नेपोलियन परत आल्याचें कळतांच संयुक्तांनीं पुन्हां प्रत्येकी दीड लाख सैन्य घेऊन फ्रान्सवर स्वारी केली. ' मी यापुढें फ्रान्सच्या बाहेर ढुंकूनहि पाहणार नाही ' असे अनेक वार जाहीर  केलें. पण संयुक्तांनीं तिकडे लक्ष न देतां चाल केली. तेव्हां नेपोलियन नवें सैन्य घेऊन ता. ११ जून, १८१५ रोजीं लढाईवर निघाला. संयुक्तांचे सेनापती ब्लूचर व वेलिंग्टन यांना प्रथम लढाई देण्याचे ठरवून ने, सौल्ट, रिय्या, एरला वगैरे सरदारांस हुकूम दिले. लिग्नी येथें ब्लूचरच्या सैन्याचा फ्रेंचांनीं पराभवहि केला. क्वाटरब्रासच्या लढाईत इंग्रज व फ्रेंच यांची बरोबरी झाली. पण पुढें वाटर्लू येथें एकट्या वेलिंग्टनला गांठण्याचा डाव , नेपोलियनच्या ग्राऊची सरदारास ब्लूचरचें प्रशियन सैन्य अडवून धरण्याचें न साधल्यामुळें, अखेर फसला; आणि वाटर्लूच्या लढाईत (ता. १८ जून, १८१५) फ्रेचांनां वेलिंग्टनच्या सैन्यावर जय मिळणार अशा संधीस ब्लूचरची कुमक येऊन पोहोंचल्यामुळें फ्रेचांचा पूर्ण मोड झाला.