सुंदर पत्रे 14
चौदा मार्चला तुझा वाढदिवस. मी चुकून १८ फेब्रुवारीलाच समजलो वाढदिवसाची भेट म्हणून सुंदरशी झरणी तुला आम्ही पाठवली आहे. ती मिळालीच असेल. वाढदिवशी आनंद करा. काही गोडधोड करा. आमची आठवण करून खा.
येथे हल्ली कुंदाच्या फुलांना बहर आला आहे. येथे असतीस तर कुंदाच्या फुलांची वेणी करून केसांत घालतीस. कुंदाचे फूल साधे; परंतु किती स्वच्छ! पांढरे पांढरे ते फूल! वेली बहरल्या आहेत, मी तुला मागील पत्रात शेवरीच्या झाडांबद्दल लिहिले होते. नुसती लाल झाली आहेत. वर पान नाही एक. या लाल फुलांची केळ्याच्या आकाराची बोंडे होतात आणि पुढे बोंडे फुटून त्यातला तो नाजूक कापूस वा-यावर सर्वत्र जातो. लहानपणी आम्ही हा कापूस गोळा करीत असू. ज्याच्या डोक्यात फार उष्णता असते त्याला शेवरीच्या कापसाची उशी देतात.
शिरीषाच्या झाडांवरही थोडी थोडी फुले दिसतात. त्यांना नवीन पालवी फुटत आहे. अनेक झाडांना कोवळी कोवळी नवी नवी पालवी फुटत आहे. सृष्टिमाता नवीन वर्षाची नवी वस्त्रे सर्वांना देत आहे. ही कोवळी पाने लवलवीत किती सुकुमार दिसतात! करंजांच्या झाडांवर नुसत्या वाळलेल्या करंज्याच आहेत. तुमच्या बोर्डी- घोलवड स्टेशन रस्त्याच्या दोन्ही बाजूंना करंजांची झाडे आहेत. त्यांच्यावरील करंज्या फुकट जातात. लहानपणी आम्ही या करंज्या फोडून आतील बिया काढीत असू. वडील तेल्याकडून त्यांचे तेल काढून आणीत. कडू-करंजेल तेल दिव्यांनाही वापरीत. हे तेल औषधी आहे. खरजेवर, गुरांच्या किवणावर लावतात. मी लहानपणी या तेलाच्या दिव्यावर अभ्यास केला आणि पुण्याला मामांकडे गेलो तर रॉकेलच्या दिव्याने डोळे दिपायचे!
वसंतॠतू येत आहे. झाडे नववस्त्रे धारण करीत आहेत. फुलाफळांना बहर येत आहे. आम्ही ४१ साली धुळे तुरुंगात होतो. पिंपळाचा दीड दोन पुरुष उंच माडा तेथे होता. त्याच्यावर एक पान नव्हते; परंतु हळूहळू कोवळी पाने आली नि सुंदर दिसू लागले झाड! पिंपळाचे टोकदार पान नेहमी हालत असते. जणू घाणीला दूर रहा, दूर रहा म्हणत असते.
आता करंवदे पिकू लागतील. रानात चुरचुर असा फोडणीचा आवाज येईल. तो एक प्रकारच्या पाखरांचा आवाज असतो. आम्ही मुले म्हणत असून, करंवदांना फोडणी देण्यात येत आहे, तिचा हा आवाज!
तुम्ही यंदा तरी उन्हाळ्यात सुट्टीत कोकणात या. फणस, आंबे, काजू, करवंदे, अळू, कोकंब, जांभळे, सारे रसाळ मेवे आस्वादायला या. आता उन्हाळा होऊ लागला. मी दुपारच्या वेळेस करंदीकरांच्या विहिरीत या गार जागी जाऊन बसतो. किती गार वाटते नाही तेथे? आपले काका, दत्तोपंत, पांडूतात्या वगैरे फार पूर्वी तेथे दुपारी पत्ते खेळायचे. मला त्या आठवणी येतात. नाना आठवणी हीच माझी संपत्ती. चि. प्रिय अरुणाला स. आ. अप्पा, सौ. ताई यांस स. प्र. व आनंदास व इतरांसही स. आ.
अण्णा
साधना, ११ मार्च १९५०