सुंदर पत्रे 55
निंदा, उपहास, टीका सहन करून ६३ वर्षांच्या श्री. भागीरथीबाई ही संस्था चालवीत आहेत. त्यांचा दत्तक मुलगाही सेवा करतो. संस्थेने अनाथ मुलींची पुन्हा लग्ने लावून दिली. भागीरथीबाई एका लहान खोलीत राहतात. त्या म्हणाल्या, ''देवाचं बोलावणं येईपर्यंत इथं मी असेन.'' त्या एकदाच जेवतात. प्रणाम त्यांच्या ध्येयोत्कट निस्सीम जीवनाला! सेवापरायणतेला! त्यांची मातृभाषा कन्नड; परंतु मराठीही बोलतात; इंग्रजीतूनही परवा कोणाचे त्यांनी आभार मानले. साधे पांढरे पातळ नेसलेली ती सोवळी सेवापरायण अनाथ मुलींची प्रेमस्नेहमयी माता! सुधा, समाजाचे हे आधार! मी तेथे म्हटले, ''धारवाडात परमेश्वर कुठं असला तर तो इथं आहे. आईला उपेक्षितांची चिंता असते. परमेश्वर अशांजवळ असतो. जग ज्याला दूर लोटतं तो देवाच्या दारात पोचतो. अशा देवानं जवळ घेतलेल्यांची येथे सेवा होत आहे.''
मी इकडे आहे. परंतु काल मुंबईस आमच्या खोलीत जमशेदपूरहून श्री आला असेल. जयप्रकाशांनी त्याला तिकडे तीन महिन्यांसाठी नेले आणि दोन वर्षे तो तिकडे राहिला. तिकडे कामगारांत तो सुंदर काम करतो. तिकडे संप झाले. श्रीवर खुनाचेही आरोप. त्यांच्यावर खटले चालू आहेत. अशोक मेहतांनी लिहिले, 'काडीलाही न दुखवणारा बगाराम, तो का खून करील?' जेलमध्ये चेंडू-लगो-यांचा खेळ असायचा. बग्याचा खेळ मुरारजीभाई बघत राहायचे. बगारामला त्याच्या बहिणी श्री म्हणतात. त्याचे नाव श्रीनिवास. परंतु कोणी बगाराम म्हणतात. जयप्रकाश म्हणाले, ''आमच्याकडे 'व्याघ्रराम' नाव असते.'' मी म्हटले, ''वचा ब होतो. व्याघ्राचं वाघ, वाघ, असं होता होता बगाराम झालं असेल.''
सुधा, श्री खेळण्यात, पोहण्यात पटाईत. मागे औदुंबरला कृष्णेच्या डोहात उडी घेतली. पोहत पलीकडे गेला. बाहेर आला तो सुसरी दिसल्या. कृष्णेच्या डोहात मगरी आहेत, सुसरी आहेत, त्याला माहीत नव्हते! देवाने वाचवले. श्रीला काही येत नाही असे नाही. इंजिनीअरिंगच्या शेवटच्या परीक्षेत तो पहिला आला होता. सायन्स, गणित त्याला येतेच. तो इंग्रजीही छान लिहितो. तुरुंगात मार्क्सच सारे 'कॅपिटल' त्याने वाचले. विरोधविकासावरचे अनेक ग्रंथ वाचले. मी त्याला म्हणायचा, ''तुला सारं येतं. मला काही येत नाही.'' सुधा, खरेच कधी कधी वाटते, आपल्याजवळ काय आहे? परंतु मी मनाचे समाधान करतो. तुझ्याजवळ थोडे उदार हृदय आहे. ते का तुच्छ? जोवर आपल्या जगण्याने एखाद्या तरी माणसाच्या जीवनात आनंद निर्मिता येत असेल तोवर आपल्या जीवनात अर्थ आहे असे समजावे.
श्री तिकडे दोन वर्षांनी आला असेल. खोलीतील मित्र आनंदले असतील. मुंबईचे बापूराव, सोहनी, बबन, काळे, केळुस्कर, राजा वगैरे म्हणतील, ''बगाराम आता जाऊ नकोस. आम्ही जयप्रकाशांना सांगू.'' परंतु जयप्रकाश का त्याला आता सोडतील? सारा देश आपला. जेथे काम असेल, अडचण असेल तेथे गेले पाहिजे.
मी बगाराम आला असता दूर आहे तोच बरा. सुधा, मित्रांना सर्वस्व द्यावे असे मला वाटते, परंतु आज मजजवळ काय आहे? आणि त्यांच्या कार्यातही मी मदत करू शकत नाही. माझा पिंड राजकीय नाही. मला संघटना करता येत नाही. चर्चा करता येत नाही. मित्र माझ्यापासून या अपेक्षा करतात. मला त्या पु-या करता येत नाहीत. आपणाला मित्रांच्या अपेक्षा पु-या करता येऊ नयेत यासारखे दु:ख नाही. म्हणून सर्वांपासून दूर जावे असे मला कधी वाटते. मला शेकडो प्रेमळ सखे असूनही मनात एकटे वाटते व माझे डोळे भरून येतात. हे लिहितानाही अश्रू येत आहेत बघ! किती वेळ मी तुला लिहीत आहे. बाहेर वारा सूं सूं करीत आहे. झिमझिम पाऊस आहे. मलाही थोडे गारगार वाटत आहे. पांघरूण घेऊन पडू का? किती वाजले असतील? पहाट झाली असावी. परंतु कोंबडा आरवलेला ऐकला नाही! कोंबडयाचे घडयाळ हजारो वर्षांचे आहे. पाणिनीनेही या घडयाळाचा उल्लेख केला आहे.
तुम्ही सुखी असा. सुट्टी थोडी राहिली. खेळून घ्या. सुट्टीच्या महिन्या- दीड महिन्यात भरपूर आनंद जीवनात साठवून घ्यावा; जो पुढच्या सुटीपर्यंत पुरेल. खरे ना? अप्पा, ताई, बरी आहेत? ताईचे दिवस भरत आले आहेत. सुखरूप पार पडो. जपा हं सारी. अरुणाला गोड पापा की धम्मक लाडू? तिला हवे असेल ते द्या. तुझ्या मैत्रिणींस स. आ.
अण्णा
साधना, ३ जून १९५०.