Get it on Google Play
Download on the App Store

जाणिवा - असलेल्या, नसलेल्या आणि बधिर झालेल्या

काही वर्षांपूर्वी एनएफएआयच्या ऑडिटोरियम मध्ये अतुल पेठे दिग्दर्शित कचराकोंडी नावाची फिल्म पाहायचा योग आला होता. हि साधारण दहा ते बारा वर्षांपूर्वीची थोडी जास्तच आधीची गोष्ट असेल. त्यावेळी मला ती फिल्म सकाळी बघून दुपारी जेवायला कुठेतरी जायचे होते. फिल्म बघून झाली. बाहेर पडल्यावर मी माझ्या त्या दिवशीच्या होस्टना फोन करून मी जेवायला येत नाही असे कळवले. मला जेवायची इच्छाच उरली नव्हती ती डॉक्युमेंटरी बघून.

कचराकोंडी ही कचरा आणि सफाई कामगारांवर केलेली फिल्म आहे. सफाई कामगार संघटनेच्या अध्यक्ष मुक्ता मनोहर आणि अतुल पेठे असे प्रॉडक्शन आहे बहुतेक. मुद्दा तो नाहीये किंवा मला ती फिल्म बघून काय वाटले ते सांगायचं नाहीये. ती फिल्म उत्तम आहेच. प्रत्येकाने एकदा तरी नक्की बघावी अशी आहे. इतकी वर्षे मध्ये जाऊनसुद्धा ती फिल्म माझ्या डोक्यात फ्रेम बाय फ्रेम फिट आहे. रोज येताजाता त्या फिल्मची आठवण व्हावी असे आजूबाजूला सातत्याने घडतही असते. त्यासाठीच आजची पोस्ट. फेसबुक वर परत यायचे कारणही तेच.

अक्षयकुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचा प्रमुख उद्देश स्त्रीचे जे नैसर्गिक चक्र आहे त्याची लाज न वाटू देता, त्या काळात तिला स्वच्छ आणि स्वस्त पॅड उपलब्ध व्हावेत, जेणेकरून तिचे आयुष्य आणि त्रास सुकर होईल या जाणिवेने पॅड निर्मिती करणाऱ्या मध्यमवर्गीय माणसाची कथा आहे. उद्देश शंभर टक्के स्तुत्य आहे. माझ्या पिढीतल्या मुली ज्या मध्यमवर्गीय शहरी घरातून आहेत त्यांनाही जिथे लहानपणी पॅड वापरणे याचे अप्रूप होते तिथे आजही ज्या मुलींना या चक्राबद्दल कसलेही शिक्षण न देता त्यांच्यावर लाज आणि शरम वाटणे जणू काही बंधनकारक आहे असे ठसवले जाते अशी परिस्थिती आहे तिथे हा चित्रपट उत्तम सहज दृष्टिकोन देतो हे नक्कीच खूप मोठे काम आहे. देव करो आणि घराघरात पाळी आणि पॅड या दोन नैसर्गिक गोष्टी आहेत हे स्वीकारले जावो.

याबरोबरच एक कळीचा मुद्दा असा येतो कि हे पॅड डिस्पोज कसे करायचे हे आपण शिकवतोय का हा आहे. गावागावात शाळांमध्ये जाऊन पॅड वाटणे म्हणजे जाणीव निर्माण करणे नाही. ज्याला एन्ड टू एन्ड म्हणतात तसे ते वापरण्यापासून त्याची योग्य विल्हेवाट कशी लावायची हे शिकवणे हे खरे शिक्षण आहे. त्याची विल्हेवाट लावण्याची सिस्टीम तयार करणे हे आहे. आजही मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बिनदिक्कत टॉयलेट मधून पॅड फ्लश केले जातात. प्रत्येक पॅडच्या पाकिटावर टॉयलेटमध्ये फ्लश करू नका असे स्पष्ट लिहिलेले असते. आपण सुशिक्षित असतो त्यामुळे आपण ते वाचत नाही. ही समस्या अतोनात गंभीर आहे. मोठ्या मोठ्या सोसायटीतल्या सफाई कामगारांना (ज्या बव्हंशी बायका असतात) जर तुम्ही विचारलेत तर त्या पॅड किती प्रकारे डिस्पोज केले जातात ते तुम्हाला सांगतील. कचऱ्याच्या श्यूट मधून कागदात न गुंडाळता टाकून देणे, ओल्या कचऱ्याच्या पिशव्यांमध्ये टाकणे, शोषखड्ड्यांमध्ये टाकणे, जाता जाता कचऱ्याच्या कुंडीवर फेकून देणे आणि ते बाहेर पडल्यास दुर्लक्ष करणे, बेडरूमच्या खिडकीतून खाली टाकून देणे, रस्त्याच्या कडेला कागदात गुंडाळून टाकून देणे, इत्यादी अनेक गोष्टी त्या तुम्हाला सांगतील. ह्या सगळ्या घटना तुमच्या आमच्या सारख्यांच्या मध्यमवर्गीय घरात होतात. असे होत असेल तर ते थांबले पाहिजे.

व्यक्तिशः मला पॅडमॅनच्या पूर्ण टीम बद्दल कमालीचे कौतुक आहे की त्यांनी इतक्या टॅबू विषयावर चित्रपट काढायचे धाडस केले. पण जिथे सुशिक्षित आणि उच्च शिक्षित म्हणवणाऱ्या घरांमधून अशा पद्धतीत पॅड डिस्पोज केले जातात तिथे ज्या बायकांनी कधीही पॅड वापरलेले नाहीत त्यांना जर ते डिस्पोज कसे करायचे हे शिकवले नाही तर होणारे दुष्परिणाम किती भयंकर आहेत या कल्पनेनेच मला प्रचंड भीती वाटत राहते.

प्रत्येक सोसायटीला सेप्टिक टॅंक बसवलेला असतो. त्याचा प्रमुख उद्देश घन स्वरूपातली घाण अडवून मैला पाणी ड्रेनेज सिस्टिममध्ये सोडणे हा असतो. कारण जर सगळा कचरा तसाच्या तसा नदीमध्ये गेला तर संपूर्ण इकोसिस्टिम प्रदूषित होते. ही पोस्ट वाचणाऱ्या प्रत्येकाला ही नम्र विनंती आहे की तुमच्या सोसायटीचा सेप्टिक टॅंक साफ करत असताना तिथे एकदा चक्कर टाका. त्या सेप्टिक टॅंक मधून जे निघते ते आपली लाज, शहाणपण, सामाजिक जाणीव इत्यादींच्या ठिकऱ्या उडवणारे असते. साफ करणारी माणसे त्या टॅंक मध्ये उघड्या अंगाने उतरतात. त्यांना बूट घालता येत नाहीत कारण बूट घसरतात इतके निसरडे असते. त्या वासाने ते  आजारी पडतात. त्यांना हॉस्पिटलमध्ये विषारी वायूच्या संसर्गाच्या उपचारांसाठी न्यावे लागते. कित्येकदा त्यांच्याकडे घमेली, कुदळ फावडी पण नसतात. त्यांना तो सगळं कचरा हाताने उचलावा लागतो. क्वार्टर मारल्याशिवाय त्यांना काम करता येत नाही. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नसते, जेवायचे तर लांबच राहिले. कचरा उचलणाऱ्या बायका या तुमच्या आमच्या सारख्या माणूस असतात. घरी लवकर उठून त्या मुलाबाळांचे डबे, स्वयंपाक, कपडे, भांडी करून कामावर येतात. कित्येक जणी सकाळी जेऊन येतात कारण कचरा उचलला की त्यांना जेवायची इच्छा राहातच नाही. त्यातही त्या प्रामाणिकपणे काम करत असतात.

आता यावर कुणी असेही म्हणेल की रोजगार आहे तो. तुम्ही कराल? तुम्हाला महिना पाच हजार दिले आणि सांगितले कचरा उचला तर? नाही ना? तुम्ही शिकलेले आहात मग तुम्ही कचरा उचलणार नाही. त्या शिकलेल्या नसतात पण त्या तुमच्या आमच्या वेड्यावाकड्या टाकलेल्या कचऱ्याचे त्यांच्या विना ग्लोव्हस हातांनी वर्गीकरण करतात. सॅनिटरी नॅपकिन्स, डायपर्स, काँडोम्स पासून काचा, खिळे, ब्लेड्स, गंजलेल्या वस्तू असे सगळे वेगळे करतात.

तुमच्यात आणि त्यांच्यात जर शिक्षणाचा फरक आहे तर तो कचरा टाकताना कुठे जातो? वाट्टेल तिथे कचरा फेकताना तो फरक स्पष्ट दिसतो आणि त्याहूनही म्हणजे कचरा माझ्या उंबऱ्याबाहेर गेला किंवा ठेवला म्हणजे त्याचा माझा संबंध संपला या वृत्तीत दिसतो. खरंच संबंध संपतो आपला त्या कचऱ्याशी? विचार करा एका दीडशे ते दोनशे घरांच्या सोसायटीमध्ये प्रत्येक घरात सरासरी किमान दहा ते बारा किलो रोजचा कचरा होतो. तो तुमचा आणि आमचा कचरा आहे. तो कुठल्याही कचरा डेपो मध्ये नेऊन टाकला तरी तो तुम्ही आम्ही केलेला कचरा आहे. त्याचा संबंध तुम्ही आम्ही करत असलेल्या प्रदूषणाशी, घेत असलेल्या श्वासाशी आणि स्वच्छ राहणीमान या अपेक्षेशी आहे. सरकारला कर भरून आपली जबाबदारी संपत नाही. प्रत्येक चौकात कचरा टाकू नका नाहीतर कायदेशीर कारवाई केली जाईल असे फलक असताना बरोबर त्या फलकाखालीच आपण कचरा टाकतो. इथे कचरा टाकू नये असे लिहिलेले असले तिथेच आपण पिशव्यांचा ढीग बघतो. रिकाम्या प्लॉटवर गाडीवरून जाता जाता पिशव्या प्रोजेक्टाईल फेकून त्या प्लॉटची कचराकुंडी करण्याची आपली किमया तर अवर्णनीय आहे. हे कुठले झापड ओढून बसलोय आपण?

परदेशवारी हा कुणासाठीही सध्या कौतुकाचा विषय नाही. पुण्याहून कोल्हापूरला महालक्ष्मीला जाऊन यावे तसे लोक सध्या परदेशी जाऊन येतात. परत आले की घरी चार पाहुणे बोलावून खरेदी दाखवणे, फोटो इत्यादी कार्यक्रम होतो.

"मग कसे वाटले तुम्हाला लंडन/पॅरिस/ न्यूयॉर्क/ सिंगापुर?"
"खूपच सुंदर आहे हो. आणि मुख्य म्हणजे एकदम स्वच्छ. कचरा नाही कुठेही की कागदाचा कपटा नाही. घाण आपल्याकडेच"

खरंच आहे. घाण आपल्याकडेच. कारण आपणच करतो ना ती. मी नाही बॉ म्हणून तुम्ही हात झटकाल पण मग हा "मी नाही त्यातली कडी लावा आतली" प्रकार झाला. कुणीच घाण करत नाही कुणीच कचरा करत नाही मग कचरा करतं कोण? पीएचडीचा विषय आहे नाही?

मी तुम्हाला तीन जागा सुचवेन. नक्की बघून या वेळ काढून. आज रविवार आहे तसेही.
१. खडकवासला हा वीकएंड स्पॉट आहे. धायरी मार्गे खडकवासल्याला जाताना नांदेड पुलावर दोन्ही बाजूंनी जाळ्या लावल्या आहेत. आणि त्यावर महानगरपालिकेची पाटी आहे "इथे कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल". तो कॅनॉल वरचा पूल आहे. तुमची हिम्मत झाली तर प्लीज गाडीतून खाली उतरा आणि कॅनॉलमध्ये बघा. संपूर्ण कॅनॉल हा प्लॅस्टिकच्या पिशव्यांनी आणि कचऱ्याने भरलेला आहे. त्यातच निसरडे आहे. तिथेच डुक्कर नावाचं अति सुखी जनावर कळपाने राहते.
२. नदीकाठच्या रस्त्याने नळ स्टॉप वरून गावात जाताना डावीकडे गाडी लावा. रस्ता क्रॉस करा आणि नदीच्या पाण्यात बघा. ज्या मुळामुठेला आपण गटार करून गटार म्हणून हिणवतो त्या गटारात वाकून बघा. कमालीची घाण आणि प्लास्टिक साठलेले आहे.
३. कुठल्याही सार्वजनिक कचराकुंडी शेजारी एक मिनिट गाडी थांबवा. कितीदा तुमच्या असेही लक्षात येईल की कुंडी रिकामी आहे आणि बाहेर कुंडीला टेकण लावावे तसा कचऱ्याचा ढीग आहे.

हे दृश्य दुर्दैवाने पुण्यापुरते मर्यादित नाहीये. ही गोष्ट थोड्याफार फरकाने प्रत्येक गावाची, शहराची आहे. त्यामुळे इथे लगेच पुण्याला नावे ठेवायला येऊ नये. हे ढीग मी स्वतः प्रत्येक शहरात पहिले आहेत. फार कशाला ज्या मुंबईत नाले साफ केले जात नाहीत म्हणून आरडाओरडा होतो त्या नाल्यांमधून प्लास्टिकचा कचरा बाटल्या अडकून पाणी तुंबते हे ही सिद्ध झालाय आता. त्यामुळे कुठल्याच शहरातल्या माणसाने बाह्या सरसावून वाद घालायला येऊ नये.  

एक घटना सांगितलीच पाहिजे. गेल्या नोव्हेंबर मध्ये मी पुणे रनिंगची पाच किलोमीटरची रेस पूर्ण केली. अडीच तीन किलोमीटर झाल्यावर त्यांचे कार्यकर्ते पाण्याच्या छोट्या बाटल्या घेऊन उभे होते. गरज असो वा नसो प्रत्येक पळणाऱ्या व्यक्तीने ती पाण्याची बाटली घेतली. फोडली. अर्धे पाणी प्यायले. उरलेल्या अर्ध्या बाटलीचे काय काय केले?
१. रस्त्याच्या कडेला फेकून दिल्या.
२. रस्त्याच्या कडेला ज्या गाडया पार्क केलेल्या होत्या त्यांच्या टपावर ठेवून दिल्या. जसे काही तुम्ही पाणी प्यायले तर त्या गाडी मालकाने बाटली उचलणे अपेक्षित आहे, नव्हे ती त्याची जबाबदारी आहे.
३. पळता पळता खाली रस्त्यावर फेकून दिल्या.
४. बालेवाडी स्टेडियम मध्ये इतस्ततः फेकून दिल्या. संपूर्ण स्टेडियम मध्ये त्या दिवशी बाटल्यांचे आणि ज्या प्लास्टिक ट्रे मधून खायला दिले त्या ट्रेचे ढीग होते.

आता एक थोडा वेगळा मुद्दा. तुम्ही आम्ही कॉर्पोरेशन टॅक्स भरतो. त्यात गांडूळ खताची प्रोव्हिजन सोसायटीने केली असेल तर त्या टॅक्स मध्ये पाच टक्के सूट मिळते असा एक क्लॉज असतो. आपण नेमाने टॅक्स भरतो आणि पावती सोसायटीच्या ऑफिसमध्ये नेऊन देतो. मग पुढच्या बिलात आपल्याला पाच टक्के सूट मिळते इत्यादी. हे गांडूळ खताचे खड्डे अनिर्वाय आहेत. या खड्ड्यांमधून खरंच गांडूळ खताची निर्मिती होते का? सावध उत्तर द्यायचे तर नाही. कारण या खड्ड्यांचा शोषखड्डे म्हणून वापरच होत नाही. या खड्ड्यांमधून फाटक्या उशा, गाद्या, कपडे, फुटक्या काचेच्या वस्तू, तुटलेल्या बॅगा इत्यादी काय काय निघते. त्याचा वास येतो अशी एक तक्रार केली जाते. मूळ मुद्दा असा आहे की जर संपूर्ण बायोडिग्रेडेबल कचराच त्यात गेला आणि त्यात कल्चर मिसळले तर त्याचा अजिबात वास येत नाही. पण त्याचा आपण वापर करतो का? का त्याचा संबंध फक्त पाच टक्के सूट घेण्यापुरता आहे? हा प्रश्न प्रत्येकाने जरूर विचारावा.

मी कर भरतो, मी सरकार निवडून दिले आहे मग माझी जबादारी घोटाळे, परराष्ट्रीय धोरण, मोदी विरुद्ध काँग्रेस अशी फेसबुकवर भांडणे इतपतच आहे. पण दारी आलेल्या कचरा उचलणाऱ्या बाईसाठी मी माझ्या घरातला कचरा नीट वेगळा करून ठेवणे ही नाही. मी इथे हिरीरीने वाद घालतो, माझी मते सिद्ध करतो, एखाद्याला नाही पटली तर मी त्याला ब्लॉक करतो, पण ज्या गोष्टी वापरून झाल्या की मला लाज वाटते त्या गोष्टी मी नीट कागदात गुंडाळून सुद्धा टाकत नाही. परदेशात जाऊन आपण न विसरता वाईन, जॅक डॅनियल पासून ब्रँडेड लॉंजिरी पर्यंत सगळी खरेदी करतो आणि मुंबई एयरपोर्टच्या बाहेर पडलो की खिडकीची काच खाली करून पाण्याची बाटली बाहेर फेकून देतो. माझ्या एअर इंडिया मध्ये एअर होस्टेस म्हणून काम करणाऱ्या एका मैत्रिणीने सांगितले होते की सगळ्यात जास्त कचरा करणारे, वाट्टेल तसे टॉयलेट वापरणारे, कुठलाही नियम न पाळणारे असे प्रवासी फक्त भारतीय आहेत आणि ही कीर्ती बऱ्याच एअरलाईन्स मध्ये आहे. यावरून समजा काय समजायचे ते.

अतुल पेठेंची फिल्म आजही अजून भीषण स्वरूपात लागू पडते हे दुर्दैवी सत्य आहे.

आपण मला वाटते सगळे जाणिवेत फार अडकलेलो आहोत. माझे शिक्षण, माझे हक्क, माझे अधिकार ही जाणीव तीव्र आहे. मी सामान्य नागरिक म्हणून माझे काय कर्तव्य आहे ही जाणीव नाही आणि दुसऱ्या माणसाप्रती माणूस म्हणून माझी जाणीव बधीर झालेली आहे.

अवघड आहे खरंच.

© प्राजक्ता काणेगावकर

* तुम्हाला असे मनापासून वाटले की हा लेख जाणीव निर्माण करण्यासाठी शेयर केला
 गेला पाहिजे तर जरूर शेयर करा.
कचरा ही फार मोठी गंभीर समस्या आहे आणि ती आपणा सर्वांची आहे.