आपण सारे भाऊ 28
‘तुला झोप नाही का येत?’
‘उद्या मी सुखाने झोपेन. घोरत पडेन.’
‘का बर? उद्या काय होणार आहे?’
‘वाटेतला काटा दूर होणार आहे. कृष्णसर्प नाहीसा होणार आहे. उद्याच ना तो मॅनेजरसाहेब येणार?’
‘रमा, राहून राहून मला वाईट वाटत आहे. आपण पाप करीत आहोत.’
‘जगात निष्पाप कोण आहे? सारा संसार पापावर चालला आहे. टोलेजंग इमारती पापाशिवाय उठत नाहीत. तुमच्या वडिलांनी ही सारी इस्टेट का पुण्याने मिळविली?’
‘रमा, आईबाबा काय म्हणतील?’
‘मेलेली माणसे उठत नसतात. त्यांची वाचा बंद असते.’
‘तुलाच ना एकदा आई व बाबा यांच्या आकृत्या दिसल्या?’
‘परंतु तो भ्रम होता असे तुम्हीच ना म्हणालात?’
‘रमा, आईने कृष्णनाथाला तुझ्या ओटीत घातले होते.’
‘त्या वेळेस माझ्या पोटी संतान नव्हते. तुम्ही असे दुबळे कसे? पुरुषासारखे पुरुष नि असे मेंगुळगाडे कसे? उद्या त्या पोरटयाला या घरांतून जाऊ दे. आपण सुखात राहू. नको पुढे भाऊबंदकी, नको वाटे-हिस्से.’
‘सर्कशीत त्याला मारतील.’
‘उद्या काम शिकला म्हणजे पदकेही बक्षीस मिळतील. पाठीवर काठी बसल्याशिवाय छातीवर बिल्ले झळकत नाहीत.’
‘उद्या कृष्णनाथ जाणार. काही गोड तरी कर.’
‘उद्या सांगाल ते करीन.’