आपण सारे भाऊ 67
रघुनाथ आता निश्चिंत झाला होता. सारी इस्टेट आता आपली असे त्याला वाटे. तो ऐषारामांत राहू लागला. सुखोपभोगाला सीमा नव्हती. रमाही रमली. नाना रंगांची पातळे, नाना प्रकारची. आज रेशमी नेसावे, तर उद्या जरीचे. आज मोतिया रंगाचे तर उद्या अस्मानी. कधी गुलाबी तर कधी पोपटी. हौसेला मोल नसते!
एकच दु:ख त्या जोडप्याला होते. मुले वाचत नसत! नवीन बाळ पोटात वाढू लागले की पहिले बाळ आजारी पडे व देवाघरी जाई: परंतु नवीन बाळ जन्मले की पुन्हा काही दिवस रमा व रघुनाथ आनंदी असत.
परंतु रघुनाथाला आता नाना प्रकारचे नवीन नाद लागले आणि त्यांतच घोडयाच्या शर्यतीचा त्याला नाद लागला. तो पुणे-मुंबईस जाऊ लागला आणि हजारो रुपये खर्च होऊ लागले. रमा सचिंत झाली.
‘तुम्ही हा नाद सोडा, दरिद्री व्हाल!’ ती एकदा म्हणाली.
‘इस्टेट ठेवायचीतरी कोणासाठी? तुझी मुले तर वाचत नाहीतच. आपणा दोघांना खायला कमी पडले नाही म्हणजे झाले!’
‘ते तरी मिळेल का?
‘रमा, मनुष्याचे जीवन म्हणजे सोडत आहे. सारा किस्मतचा खेळ. नशीब म्हणजे परमेश्वर. या जगात कशाचीही निश्चिती नाही!’
‘जुगार हे पाप आहे!’
‘आणि लहान दिराला घालवणे हे पाप नाही का? तू सारी पापे पचवणारी आहेस. माझीही पापे पचव. सा-या पापांचा मी अंत पाहणार आहे. मी करुन दमतो की तू पचवून दमतेस, ते पाहू दे. रमा, मी याच्यापुढे स्वच्छंदपणे वागायचे ठरविले आहे. जातो दिवस तो आपला. उद्याची फिकीर करायची नाही. जगात फक्त हा मनुष्यप्राणीच दिसतो, जो उद्याची फिकीर आज करीत बसतो. रमा, मी दारु प्यायला शिकणार आहे. वेश्यांच्या माडया चढणार आहे. जुगार खेळणार आहे. चो-या करणार आहे. आणि एक दिवस खुनी म्हणून फाशी जाणार आहे.’
‘कोणाचा करणार खून?’
‘तुझाही कदाचित् करीन, बाळाचा करीन किंवा स्वत:चा करीन!’
‘आज दारु पिऊन आला आहात. काय वाटेल ते बोलता!’
‘दारु तू पाजलीस! मी प्यायला तयार नव्हतो. तोंडे वेडीवाकडी करीत होतो. परंतु तू लावलीस सवय!’