Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण १२

....त्या पहारेकऱ्यांना  एका कोपऱ्यात बांधून अभिजीत, अॅंड्र्यू आणि प्रोफेसर तिघांनीही त्यांचा वेश परिधान केला आणि त्या चेम्बर मधून बाहेर पडले. आता ते सैनिकी वेशात होते, तसेच आता त्यांना प्राचीन ईजिप्शियन भाषा सुध्दा बोलता येत होती. त्यामूळे आता त्यांना घाबरायची गरज नव्हती. त्या तिघांना शोधण्यासाठी अजुनही काही पहारेकरी इकडे तिकडे पळत होते. अचानक एक पहारेकरी एकदम त्या तिघांच्या समोर येऊन उभा राहिला. 



पहारेकरी: तुम्ही इथे काय करताय? ते तिघे कैदी सापडले का तुम्हाला?



पहारेकऱ्याच्या वेशातील अॅंड्र्यू: नाही अजुन तरी नाही. त्यांनाच शोधतोय आम्ही. 



पहारेकरी: लवकर शोधा त्यांना. नाहीतर महान फैरो आपल्याला सोडणार नाहीत. 



अॅंड्र्यू: हो.



तो पहारेकरी तिथून निघून गेला.



अभिजीत: महान फैरो?



अॅंड्र्यू: त्यांचा राजा जो इजिप्त वर राज्य करतो. हे त्याचेच सैनिक असावेत. त्याने यांना हुकूम दिला असेल आपल्याला पकडायचा. कारण आपण अवैधरित्या त्यांच्या राज्यात घुसलो आहोत.



प्रोफेसर: इजिप्त वर अनेक फैरो राज्य करून गेले. मग आपण नेमके कोणत्या फैरोच्या काळात आहोत?



अॅंड्र्यू: आपण १३२७ BC मध्ये आहोत. माझ्या माहितीप्रमाणे या काळात जो फैरो इजिप्त वर राज्य करत होता, त्याच नाव होतं तुतनखामेन.



अभिजीत: मी याच्याबद्दल ऐकलंय. हा इजिप्तचा आतापर्यंतचा सगळ्यात कमी वयाचा राजा होता. बरोबर?



अॅंड्र्यू: हो.



प्रोफेसर: पण मग आता तुझा काय प्लान आहे.



अॅंड्र्यूने ते गोल डिव्हाईस काढलं ज्यावर या संपूर्ण पिरामिडचा नकाशा होता.



अॅंड्र्यू: माझ्या मागे या.



असं म्हणून तो पुढे चालू लागला, अभिजीत आणि प्रोफेसर त्याच्या मागे आले. आता पहारेकऱ्यांची धावपळही कमी झाली होती. कदाचित त्यांना त्या कैद्यांना शोधण्याचा नाद त्यांनी सोडून दिला होता. काही वेळ चालल्यावर अचानक अॅंड्र्यू थांबला. 



अभिजीत: काय झालं? असा एकदम का थांबलास?



अॅंड्र्यू: समोर बघा.



अभिजीत आणि प्रोफेसर दोघांनी समोर बघितलं. त्यांच्या पासून काही अंतरावर एक भलं मोठं चेम्बर होत. पण हे चेम्बर पिरामिड मधील बाकीच्या चेम्बर सारखं अजिबात नव्हतं. ते खूप मोठं होतं, त्याच्या आत असंख्य मेणबत्त्या जळत होत्या, त्याच्या प्रवेशद्वारावर दोन पहारेकरी हातात भाला घेऊन पहारा देत होते.



अभिजीत: हे काय आहे?



अॅंड्र्यू: किंग्ज चेंबर. हे चेंबर खास राजासाठी म्हणजेच फैरोसाठी बनवलेलं आहे. 



अभिजीत: तरीच म्हटलं कि हे चेंबर इतर चेंबर पेक्षा वेगळे का वाटत आहे.



ते तिघेही किंग्ज चेंबर जवळ आले. तिथे उभ्या असलेल्या दोन पहारेकऱ्यांनी त्या अभिजीत, अॅंड्र्यू आणि प्रोफेसरांवर  नजर टाकली. पण त्यांना कोणीच आत जाण्यापासून रोखले नाही. कारण त्या तिघांचा पोशाख प्राचीन ईजिप्शियन सारखाच होता. दोन्ही पहारेकऱ्यांनी त्यांना आत जाण्यासाठी रस्ता करून दिला. तिघेही आत शिरले. आत शिरल्या बरोबर तिघांचेही डोळे आश्चर्याने विस्फारले गेले. ते चेंबर इतर चेंबर पेक्षा चौपट मोठं होतं, हजारो मेणबत्त्या तिथे जळत होत्या, चेंबरच्या दोन्ही बाजूला आसन होती, त्या आसनांवर काही लोक बसले होते, आणि त्यांच्या पासून काही अंतरावर एक सोन्याच सिंहासन होत, त्या सिंहासनावर एक १७-१८ वर्षांचा पोरगा बसला होता, त्याच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट होता, अंगावर सोन्या-चांदीचे दागिने होते. त्याच्याकडे इशारा करून अभिजीत बोलला,



"हाच तो फैरो आहे का?"



अॅंड्र्यू: हो.



असं म्हणून अॅंड्र्यूने त्यांना आपल्या मागे येण्यास सांगितले. ते जाऊन एका कोपऱ्यात उभे राहिले. तिथे त्यांच्या सारखेच काही पहारेकरी उभे होते. एवढ्यात त्या चेंबर मध्ये काही इतर पहारेकरी येऊन ठेपले. त्यातून एक जण फैरोच्या सिंहासनाजवळ आला. त्याने खाली गुडघे टेकले आणि एक हात छातीवर ठेऊन तो म्हणाला,



"महान फैरो तुतनखामेन यांचा विजय असो. क्षमा असावी महान फैरो, आम्ही खूप शोधल. पण ते तीन कैदी आम्हाला नाही सापडले. अचानक कुठे अदृश्य झाले माहीत नाही."



तुतनखामेन काही बोलणार इतक्यात खूप मोठा आवाज झाला, जमीन हादरायला लागली, जसं कि भुकंपच येत होता. फैरो तुतनखामेन तडक सिंहासनावरून उठला. त्याला उठलेलं पाहून इतर लोक सुध्दा उठून उभे राहिले. तुतनखामेन किंग्ज चेंबर मधून बाहेर पडला. त्याच्यामागे त्या चेंबर मधील सगळे लोक  बाहेर पडले. 



                            तुतनखामेन झपाझप पावले टाकत चालत होता. त्याच्या मागे इतर लोक चुपचाप चालत होते. सर्वात मागे अभिजीत, अॅंड्र्यू आणि प्रोफेसर होते. अॅंड्र्यू सगळ्यांच्या नकळत पिरामिडचा नकाशा असलेल्या त्या गोल डिव्हाईस मध्ये लक्ष ठेवून होता. काही वेळ चालल्यावर तुतनखामेन एका दरवाज्यासमोर येऊन थांबला. त्याने तिथल्या पहारेकऱ्यांना इशारा केला. त्या पहारेकऱ्यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर सगळ्यांना बाहेरच दृश्य दिसलं. म्हणजेच तो दरवाजा म्हणजे पिरामिडची एक्झिट होती. तुतनखामेन सोबत सगळेजण पिरामिडच्या बाहेर पडले. त्या पिरामिडच्या आजुबाजुला अनेक छोटे मोठे पिरामिड्स, मंदिरांसारख्या वास्तु होत्या. अखेरीस इतके प्रयत्न केल्यावर अभिजीत, अॅंड्र्यू आणि प्रोफेसर पिरामिड मधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. कधीपासून ते त्या  पिरामिड मध्ये फिरत होते. आता कुठे जाऊन त्यांना मोकळ्या हवेत श्वास घेण्यास मिळाला होता. पण त्यांनी जेव्हा समोरचे दृश्य पाहीले, तेव्हा त्यांचा हा आनंद आश्चर्या मध्ये बदलला. त्यांच्या अगदी समोर काही फूट अंतरावर एक भलंमोठं यू.एफ.ओ आकाशातून उतरलं होतं. त्या यू.एफ.ओ. चा दरवाजा उघडला गेला. त्यातून काही शस्त्रधारी सैनिक बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग एक उंचपुरा, धिप्पाड अंगावर विचित्र कपडे घातलेला एक माणूस बाहेर आला. तो विचित्र माणूस तुतनखामेन जवळ येऊन उभा राहिला आणि एक हात छातीवर ठेवून आणि अदबीने खाली वाकून म्हणाला,



"महान फैरो तुतनखामेन यांना कॅप्टन गिनयूचा प्रणाम"



तुतनखामेनने त्याचा प्रणाम स्वीकार केला आणि म्हणाला,



"वजीर होरेमहेब"



तुतनखामेनचा वजीर होरेमहेब त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.



"आज्ञा महान फैरो"



तुतनखामेन: वजीर होरेमहेब, हे आमचे नवीन अतिथी आहेत. त्यांना अतिथिकक्षात घेऊन जाऊन त्यांचा योग्य तो सन्मान करावा. आम्हाला आता राजवाड्यावर जावे लागेल. लक्षात ठेवा. यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये.



होरेमहेब: जशी आपली आज्ञा महान फैरो. (कॅप्टन गिनयू कडे बघून) आपण यावे.



होरेमहेब पुढे गेला. त्याच्या मागे कॅप्टन गिनयू आणि त्यांचे सहकारी निघाले. तुतनखामेन आपल्या एका सैनिकाकडे बघून म्हणाला, 



"आमची राजवाड्यावर जाण्याची व्यवस्था करण्यात यावी."



सैनिक: जशी आपली आज्ञा महान फैरो.



काही वेळातच तुतनखामेन आपल्या राजवाड्याच्या दिशेने चालता झाला होता. आता फक्त तिथे अभिजीत, प्रोफेसर, अॅंड्र्यू आणि त्यांच्यासोबत काही पहरेकरी राहीले होते.



अभिजीत: हेच ते दुसऱ्या ब्रम्हांडातून आलेले लोक आहेत?



अॅंड्र्यू: हेच आहेत ते. जे भविष्यात पृथ्वीवर राज्य करण्याची स्वप्न बघत आहेत. आता तर आपली खरी लढाई सुरू झाली आहे....



                                                                 क्रमशः