आस्तिक 55
"तुम्हांला घोडयांबद्दल प्रेम वाटतें एकूण ?' आस्तिकांनी प्रश्न केला.
"भगवान् श्रीकृष्णाचे घोडयावर किती प्रेम ! ते आपल्या पीतांबरांतून घोडयांना चंदी देत, घोडयांना स्वत: खरारा करीत, त्यांच्या अंगांतील शल्यें काढीत ! तें सारें ऐकुणच माझे मनं उचंबळतें. ' परीक्षिति म्हणाला.
"श्रीकृष्णाचे जीवन म्हणज अगाध सिंधु ! त्यांत बुडया माराव्या तितक्या थोडयाच !' आस्तिक म्हणाले.
"तुमच्या आश्रमांतील मुलें नाहींत का येत ? त्यांनाहि येऊं दे आमच्या-बरोबर पोहायला. आज मी राजेपण विसरून आलों आहें. सामान्य मनुष्य या नात्यानें मी आलों आहें. आज मुलांत हंसूं दे; नाचूं दे; कुदूं दे; खेळूं दे; मला लहान होऊं दे.' परीक्षिति म्हणाला.
"मी बोलावूं का सर्वांना ?' एका मुलानें विचारलें.
"भोजनाची व्यवस्था ठेवणारे वगळून बाकीच्यांना बोलाव.' आस्तिकांनी सांगितलें.
उडया मारीत मुलें आली. लंगोट नेसून तीं तयार झाली. त्यांनी दंड थोपटले. त्यांचे शत प्रतिध्वनि उमटले. एकानें शिंग वाजवलें. गंमत वाटली. नदींत भरपूर पाणी होतें. नागांची काळीं मुलें व आर्यांची गोरी मुलें - श्वेत व नील कमळेंच फुललीं आहेत कीं काय, असें वाटत होतें.
"धरा रे मला कोणी.' राजा म्हणाला.
"मी पकडतों, मी.' एकजण म्हणाला.
राजाने बुडी मारली. त्यानेंहि मारली. मध्येंच वर येत. पुन्हां पुन्हां गुप्त होत. राजा सांपडेना.
"हरलास ना ?' राजानें हंसून विचारिलें.
"मी लहान आहें.' तो मुलगा म्हणाला.
"लहानांनी तर म्हाता-यांच्या पुढें गेलें पाहिजे.' परीक्षिति म्हणाला.
"पुरें आतां. अति तेथें माती ! 'राजा म्हणाला.