भाग-३
आमचे या दिवसाचे टार्गेट होते 'झाकोपेने'हे छोटे हिलस्टेशन. ''झाकोपेन''..........हे युरोपातील थंड हवेचे ठिकाण. सगळं युरोप अगोदरच भरपूर थंड, सगळीकडेच बर्फ पडतोय, आणि तरीही झाकोपेन हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे म्हणजे तिथे किती बर्फ पडत असेल आणि किती थंडी वाजत असेल याची कल्पना करा. इथे येण्याच्या अगोदर क्रॅकोव ते झाकोपेन रस्त्यावरील एक छान आठवण म्हणजे रस्त्याकडेला बसून आम्ही घेतलेले दुपारचे जेवण. रस्त्यात कुठे सोय नसल्याने आमच्या टूर मॅनेजरने लंच पॅक करून बरोबर घेतले होते. त्या प्रवासातच रस्त्याकडेला एक छान जागा बघून त्या सर्वदूर पसरलेल्या बर्फाच्या रजईवर बसून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला. युरोपात अनेक जण गेले असतील, पण हा आनंद घेणारे आमच्यासारखे आम्हीच. असो.
सुदैवाने आम्ही पोहोचलो तेंव्हा झाकोपेनचे वातावरण अतिशय छान होते, बर्फ पडत नव्हते, कोवळे ऊन पडलेले होते, थंडी मात्र मरणाची होतीच. गेल्याबरोबर लोकल टूर गाईडच्या साथीत आमची सिटी टूर झाली. छोटेसे पण खूप टुमदार शहर, आपले सिमला किंवा महाबळेश्वर आहे तसे. फक्त इथे लक्ष्मीचा वरदहस्त अधिक प्रेमाने फिरलाय हे जाणवत होते. एक सोळाव्या शतकातील लाकडामध्ये बांधलेले तीन मजली चर्च बघितले. इथल्याच काय पण युरोपातल्या इतरही इमारती जुन्या असल्या तरी अतिशय व्यवस्थित होत्या, कुठेही पडझड झालेली नव्हती, इव्हन कुठे पडक्या इमारतीही दिसल्या नाहीत. तिथल्या थंड वातावरणामुळे कदाचित निसर्गतःच त्यांना संरक्षण प्राप्त झाले असावे. सिटी टूर नंतर सगळेजण मार्केट मध्ये खरेदी साठी उधळले. आमच्यातील चार-पाच जणांनी एक कार भाड्याने घेऊन युरोपातील त्या सुंदर परिसरात, लॉन्ग ड्राईव्हचा आनंद लुटला. आम्ही मार्केट मध्ये फिरलो.
आतापर्यंत सगळीकडे माणसांची वानवा जाणवत होती, पण झाकोपेनचे हे मार्केट मात्र माणसांनी गजबजलेले होते. अनेक सुंदर चेहरे निवांत फिरत खरेदीचा आनंद घेत होते. मुळात गोरा रंग हा आपल्या दृष्टीने सौंदर्याचे लक्षण, आणि इथे तर त्या सौंदर्याच्या राशीच पसरलेल्या होत्या. आम्ही सगळे कपड्यांमध्ये गुंडाळलेले असले तरी त्या लोकांना सवय असल्याने बहुतांशी लोकांचे चेहरे आणि हात उघडेच होते. तिथली ती गोरी गोमटी गोंडस छोटी मुलं-मुली इतकी मोहक दिसत होती कि काही विचारूच नका. कितीही वेळ त्या मार्केटमध्ये टाईमपास झाला असता पण थंडीमुळे जास्तवेळ थांबणे शक्य नव्हते. मार्केट फिरून उंच टेकडीवर दिसत असलेल्या हॉटेलकडे पायी पायीच चालत गेलो. हॉटेल 'मर्क्युर कॉस्प्रोव्ही' अतिशय सुंदर आणि भव्य होते. रूमच्या फुल्ल ग्लास विंडो मधून समोरच्याच टेकडीवरील स्नो गेमचा (बर्फातील घसरण्याचे खेळ) नजारा अतिशय सुंदर वाटत होता.
त्यानंतर आम्ही जेवणासाठी बाहेर पडलॊ. ट्रीपच्या अगोदर मीच म्हणालो होतो कि, ज्या देशात जाऊ तिथलेच पदार्थ खाऊ. 'व्हेन यु आर इन रोम, बिहेव लाईक रोमन्स'. पण झाकोपेन ने माझा हा आग्रह चुकीचा ठरवला. झाकोपेन हे छोटेसे हिलस्टेशन असल्याने तिथे काही इंडियन रेस्टोरेंट नव्हते. म्हणून मग आमच्या जेवणाची सोय तिथल्याच एका स्थानिक टिपिकल पोलिश रेस्टोरेंट मध्ये केली होती. तिथे आमच्या टेबलावर चारपाच पितळी घंटा अडकवलेल्या होत्या. वेटर पदार्थ घेऊन येताने सूचना म्हणून जोरात त्या बेल वाजवायचा. पहिल्यांदा हातभर लांब पावाचे त्याच्या लांबीप्रमाणे केलेले तुकडे आले. त्यांची चव विचित्रच होती. सोबत वाईन होतीच. नंतर पुन्हा एकदा खाडकन बेल वाजल्या आणि स्थानिक भाज्या वापरून केलेले सूप आले. ते सूप अक्षरश प्रत्येकाच्या समोर एक पातेले भरून आले असेल. सुरुवातीला दोन तीन चमचे गरम गरम छान लागले पण नंतर मात्र ते काही जाईना. जवळजवळ सर्वांनीच ते सूपचे वाडगे अर्धे सुद्धा संपवले नाही. नंतर पुन्हा एकदा त्या बेल वाजल्यानंतर ब्रेड बरोबर फ्राय केलेल्या काही स्थानिक भाज्या आणि मासे असलेली डिश मेनकोर्स म्हणून आली. त्यातले जमेल ते, आणि त्यातल्यात्यात ओळखीचे वाटलेले उकडलेले बटाटे खाल्ले. युरोपियन पदार्थ हे विना मसाल्याचे शिजवलेले असतात. ते अनेक प्रकारच्या सॉसेजेस बरोबर खायचे असतात. पण कशात काय टाकायचे हे ओळखता आलं पाहिजे. त्यामुळे इथले जेवण काही फार कोणाला भावले नाही. हो पण तिथे लोकल फोक म्युझिक प्रोग्रॅम होता. तीन वादक फ्लूट, गिटार, आणि व्हायोलिन छान वाजवत होते. तिथे छोटी छोटी मुले डान्स करत होती, मीही त्यात भाग घेत खूप नाचलो आणि त्या मुलांच्या आणि इतर पोलिश प्रेक्षकांच्या टाळ्याही मिळवल्या. जेवण करून पुन्हा हॉटेलवर परतलो. हॉटेलमधून खाली उतारावर दिसणारे मार्केट खूप छान दिसत होते.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात स्नो गेम्स ने झाली. झाकोपेन पासून १२ किलोमीटर वर एक ठिकाण होते. बर्फाने आच्छदलेल्या डोंगर रांगांमधून केलेला हा प्रवास अतिशय नयनरम्य होता. तिथेही स्कीईंग करणारे खूप पर्यटक होते, केबल कार होती. काहीजण सफाईदारपणे बर्फातून स्कीईंग करत होते. शिकलेले नसेल तर स्कीईंग हे तसे धोकादायक ठरू शकते. हा सर्व सवयीने बॅलन्स सांभाळत खेळला जाणारा खेळ. त्यामुळे आम्ही काय त्याच्या नादाला लागलो नाही. पण आमच्यासाठी खास एक अडव्हेंचर्स राईड ठेवली होती. स्नो मोबाईल किंवा स्नो बाइकिंग. बर्फाच्या डोंगरावर हे धूड घेऊन स्वतःच चालवत जायचे होते. सुरुवातीला घाबरत घाबरत सुरुवात केली, पण नंतर सरावलो. पण तरीही थरारक प्रकार होता. चांगली अर्धा पाऊण तास हि गाडी चालवायची होती, येताने पाठीमागे बसलेला असेल त्याने घ्यायची. वर पोहोचल्यानंतर सपाट भागात बर्फाच्या सानिध्यात फोटो सेशन. सिनेमात दाखवतात तसे एकमेकांच्या अंगावर बर्फ नाही फेकले कुणी, कारण आता मजा वाटेल आणि नंतर मात्र फाटेल हे सगळ्यांना कळत होते, एवढी थंडी होती. येताने आमच्यातल्या दोघांची गाडी घसरली आणि दोघांनीही बर्फ स्नानाचा आनंद घेतला, सुदैवाने फार लागले नाही म्हणून बरे.
नंतर केबल कार मधून प्रवास. त्यात थरार नसला तरीही आजूबाजूचे नजारे खूप सुंदर दिसत होते. स्नो गेम्स संपवून शहरात परत आलो. तिथे थर्मल बाथ ची व्यवस्था केली होती. गरम पाण्याचे वॉटर पार्क. मायनस सात आणि आत मात्र प्लस ३४ टेम्परेचर. उबदार पाण्याच्या स्विमिंग पूल मध्ये पोहायला आणि सगळ्या राइड्स करायला मजा आली. हे सर्व संपवून, पुन्हा एकदा त्याच झाकोपेनी जेवणाची चव जिभेवर खेळवत, इथल्या शेवटच्या मुक्कामासाठी हॉटेलच्या उबदार रूम कडे प्रयाण केले. आणि निद्रा देवीच्या स्वाधीन झालो...............
अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)