Get it on Google Play
Download on the App Store

भाग-४

'ब्रॅटिस्लाव्हा' हि स्लोव्हाकिया देशाची राजधानी. पूर्वी झेकोस्लोव्हाकिया नावाचा प्रांत किंवा देश सोव्हियेत युनियन चाच एक भाग होता. सोव्हियेत युनियनच्या विघटनानंतर हा झेकोस्लोव्हाकिया बाहेर पडला पण त्याचेही दोन वेगळे देश झाले. झेक रिपब्लिक आणि स्लोव्हाकिया. खरेतर स्लोव्हाकिया हा देश आमच्या टूर प्रोग्रॅम मध्ये असला तरी, इथे मुक्काम वगैरे काही नव्हता. पोलंड वरून हंगेरीला जाताने हा स्लोव्हाकिया पार करून जावे लागते. म्हणून नुसताच प्रवास करण्याऐवजी या देशाच्या राजधानीला अर्थात 'ब्रॅटिस्लाव्हा' या शहराला भेट ठरलेली होती. प्रवास लांबचा असल्याने मध्ये मध्ये टॉयलेट साठी थांबावे लागत होते. इथे कुठेही उरकण्याची पद्धत नाही, त्यामुळे एखादा पेट्रोल पंप आला कि गाडी थांबवली जायची. बरेचसे पेट्रोल पम्प हे स्वयंचलित असतात. आपणच योग्य ठिकाणी गाडी लावायची, कार्ड स्वाईप करून हवे तेवढे पेट्रोल भरून घ्यायचे, आणि चालू पडायचे. प्रत्येक पेट्रोल पंपावर एक ग्रोसरी शॉप आणि टॉयलेट असायचे. चलनाचा मात्र खूप ठिकाणी प्रॉब्लेम आला, बरोबर नेलेले युरो किंवा डॉलर फारसे कुठे चालत नव्हते. त्यामुळे पोलंड मध्ये 'झॉलटी'( १७ रुपयांना एक) आणि हंगेरीत 'फ्लोरिंट्स' (२३ पैशाला एक) हेच पैसे द्यायला लागायचे.

'ब्रॅटिस्लाव्हा' हे नेहमीप्रमाणेच युरोपातील छान टुमदार ऐतेहासिक शहर. या शहरालाही युद्धाची फार झळ बसलेली नाही, त्यामुळे जुन्या इमारती त्यांच्या मूळच्याच दिमाखात टिकून आहेत. छोट्या छोट्या गल्ल्या असलेले जुने शहर पायी फिरत बघायला उत्तम. अनेक ठिकाणी स्लोव्हाकियन संस्कृतीचे दर्शन घडते. इथला कॅसल अर्थात राजवाडा बघण्यासारखा आहे. मला राहून राहून सारखे आश्चर्य वाटत होते कि या इमारती एवढ्या सुव्यवस्थित कशा राहू शकतात? कुठेही पडझड, भेगा, उडून गेलेला रंग, पावसाचे/ धुळीचे ओघळ, काही नाही. चित्रात बघितल्यासारख्या इमारती. अभ्यासानंतर कळलं कि इथे रेस्टोरेशन फार प्रभावी पद्धतीने केले जाते. एखादी विट जरी निखळला तरी ती लगेच बदलली जाते आणि त्याच पेन्टमध्ये रंगवली जाते. एखादी इमारत खरंच जुनी झाली तर ती मोडकळीला येण्याच्या आत एकेक पार्ट उतरवून घेत पुन्हा आहे तशी बांधून घेतली जाते. त्यामुळे सर्व इमारती एकसारख्या आणि नवीन दिसतात. या ब्रॅटिस्लाव्हा मधील आश्चर्य वाटणारी अजून एक गोष्ट म्हणजे इथल्या बस सुद्धा इलेकट्रीक वर चालत होत्या. म्हणजे बॅटरीवर नव्हे तर रेल्वे सारखी ओव्हरहेड लाईन होती, आणि खाली ट्रॅक नव्हता, बस चा मार्गही आखलेला नव्हता, नेहमीच्याच रहदारीतून हि बस ओव्हरहेड केबल शी जुळवून घेत धावत होती. तसे ट्राफिक कमी, आणि रस्ते ऐसपैस होते. शहराची छोटी टूर करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.

'बुडापेस्ट'...... ही हंगेरीची राजधानी. दिवस भराचा प्रवास करून आम्ही बुडापेस्ट ला पोहोचलो तेंव्हा रात्र झाली होती. नेट वर तापमान ० च्या जवळपास दाखवत होते. पण खाली उतरल्यावर हेही तापमान त्रासदायकच आहे हे लगेच कळले. उशीर झाल्यामुळे जेवण करूनच हॉटेल वर जायचे असा प्रोग्रॅम होता. झाकोपेनच्या जेवणाचा वाईट अनुभव गाठीशी होता. म्हणून भीत भीतच आपलेच भारतीय संजय शर्मांच्या ' मिस्टर मसाला' या रेस्टॉरंट मध्ये प्रवेश केला. हे हॉटेल बेसमेंटला होते. ओघाने आले म्हणून सांगतो, युरोपातील जवळ जवळ सर्वच इमारतींना बेसमेंट असते. आणि हे बेसमेंट पूर्ण जमिनीच्या खाली असते, आपल्यासारखे जमिनीपासून थोडेसे वर, साईडने व्हेंटिलेटर असे नसते. प्रत्यक्ष बघितल्याशिवाय बेसमेंट आहे हे कळणारही नाही. कदाचित दोन महायुद्धाच्या झळा सहन केल्यानंतर सुरक्षितता म्हणून सर्वानीच बेसमेंटची सोय करून ठेवली असेल.

संजय शर्मांचे रेस्टॉरंट अगदी मस्त. प्युअर इंडियन. समोरच त्यांच्याकडे आलेल्या भारतीय पाहुण्यांचे फोटो होते. त्यात सलमान खान, सोनाक्षी सिन्हा, सोनू सूद आणि अजूनही बरेच होते. बुडापेस्ट मध्ये आपले भारतीय निर्माते शूटिंग साठी बऱ्याचदा जातात. आता अलीकडचा सलमानचा 'सुलतान' चा परदेशातील भाग बुडापेस्ट मध्ये शूट केलाय. त्यात सलमान रेस्टॉरंट मध्ये बसून जो पनीर मसाला खातोय, तो आमच्या संजय भाईंनी बनवलेला होता. त्या सर्व युनिटची केटरिंग यांनीच केली. छान जेवण करून 'हॉटेल नोव्होटेल सेंट्रम' ला चेक इन केले. हॉटेल एकदम मेनरोडवर आणि मध्यवर्ती भागात होते. युरोपातील सर्व हॉटेल्स, ऑफिसेस, इमारती, मॉल्स हे हीटेड असतात. त्यामुळे बाहेरच्या कडाक्याच्या थंडीतून आत पाऊल टाकलं कि खूप समाधान मिळतं.

बाकी बुडापेस्टची सफर अंतिम भागात..............

अनिल दातीर (सातारा)
(९४२०४८७४१०.)