Get it on Google Play
Download on the App Store

चहाच पातेल.

                           एके दिवशी, रहाणे नावाचा एक श्रीमंत मराठी माणूस इटलीमधील जुन्या वस्तूंच्या विक्रीच्या दुकानात कुतूहलापायी गेला. रहाणे एक चहाच्या जुनाट पातेल्याचा शोध घेत होता ज्यामध्ये तो चहा बनवून त्याच्या जवळील खास व्यक्तीला तो प्यायला देऊ शकेल. त्याला काही केल्या लवकरात ती वस्तू मिळाली नाही परंतु त्याने शोध चालू ठेवला आणि अखेरीस, त्याला आवडेल असं एक जर्मनच्या बनावटीचं पातेलं सापडलं. त्याने ते पातेलं घेतलं आणि संध्याकाळी वापरण्यासाठी घरी नेलं. ती आवडती व्यक्ती अर्थात त्याची पत्नी "शोभा" होती. शोभा काही दिवसांकरता माहेरी भारतात परत आलेली. परंतु ती लवकरच इटलीत परतणार होती आणि आपल्या पत्नीला चहा किती प्रिय आहे हे अर्थातचं रहाणेंशिवाय इतर कोणाला ठाऊक असणार होतं म्हणा. त्या दिवशी, त्या पातेल्याला अगदी चंद्राच्या शितलतेसारखा चमकेपर्यंत रहाणेंनी स्वच्छ केले. आणि आपली पत्नी येईपर्यंत या पातेल्याचा वापर करायला नको असा निश्चय करत घरातल्या एका छोटेखानी भिंतीतल्या कपाटात ते व्यवस्थित ठेवून दिले. काही दिवस अंदाजा १५-२० उलटून गेले, चार आठ दिवसांनी येते म्हटलेल्या रहाणेंच्या मिसेस काही कारणाने जरा अधिकच भारतात राहिल्या, इकडे रहाणे रोज बैचेन होत होते; एकेक दिवस त्यांच्याकरता असा एकेका वर्षासारखा जाऊ लागला होता. आधीच त्यांची असलेली मुलबाळं ही तर अमेरिकेत आरामात राहत होती, सुखात नांदत होती. रहाणेंच्या बाबतीतली खास वाईट गोष्ट म्हणावी तर ते म्हणजे ज्या क्षणी ते त्यांच्या मुलाबाळांपासून दूर राहणार होते. 
                अर्थात मुलबाळांपासून विभक्त झाल्यानंतर रहाणेंच्या उरात आतून प्रचंड खंत होती आणि स्वत:वर थोडासा पश्चातापही होता. त्या पश्चातापाच कारण रहाणेंना उमगायला ऊशीर झाला होता त्याची किंमत म्हणून त्यांची आपली पोटची मुलं त्याच्यापासून विभक्त रहात होती, रहाणे त्यांच्या मुलांसोबत जरा अतितटीच्या टोकानेच चुकीच वागतं आले होते, घरात तंटा, नेहमी मुलांवर भितीची टांगती तलवार त्यांनी सोडली होती, मुलांसाठी ते थोडक्यात तिरसटपणाचा कळस ओलांडून गेलेले व्यक्तिमत्त्व होते. त्या भावंडांपैकी छोट्या मुलामधे आणि रहाणेंभधे अनेकदा खटके उडत राहिली. छोट्याच्या नजरेत वडिलांच्या चुका इतक्या प्रखरतेने जाणवायच्या की जणू त्याने वडिलांकडे पाहत्या क्षणी डोळ्यातून आता आग बाहेर येते की काय? घरात आणि आसपासच्या परिसरात अनेकांना वाटायचं रहाणेंचा मुलगा खरं बोलतो पण वडिलांशी असं थेट त्याने बोलू नये, चुका असतील तरीही त्या एकतर मुग गिळून टाकल्याप्रमाणे करावे किंवा आईकडे सांगावे. अर्थात समाजाच्या दृष्टीने मोठ्या लोकांशी आदराने बोलण्याची रीत आहे म्हणे! पण छोट्याचं म्हणणं असायचं जो प्रत्येक सजीव जन्मत: स्वतंत्र आहे हे लोकांना कळायला काय हरकत आहे? आणि जो चुकतो तो चुकीचा आहे तर आहे. त्यासाठी तो घरात लहान आहे, मोठा आहे, अमुकतमुक गोष्टीसाठी आदर केला जावा या गोष्टीचं न पटणाऱ्या आहेत. शेवटी शेवटी छोट्याच्या गोष्टी इतर भावंडांना पटल्या आणि बाकीचा इतिहास घडला. आणि तो दिवस उजाडला रहाणेची पत्नी अर्थात शोभा ही घरी इटलीमधे परतली. ती परतली त्या रात्री एका रूममधे रहाणे व शोभा गप्पा मारू लागले. रहाणेंनी तिला भारतातल्या गोष्टींबद्दलची चौकशी केली. पुढे रहाणेंनी आपल्या स्पेशल चहाच्या पातेल्यात चहा करून शोभाला दिला. दोघेही चहा पिता पिता अचानक शोभा रहाणेंनी केलेल्या पुर्वीच्या आयुष्यातील चुकांबद्दल बोलून गेली आणि त्याक्षणी क्षणार्धात रहाणेंचा राग अनावर झाला. पण स्वत:ला आवरत त्यांनी तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर रहाणेंना कळलं आपण उभं आयुष्य असं एखाद्यावर विनाकारण स्वत:च वर्चस्व सिद्ध करण्याच्या भावनेत कितीतरी चुका करून गेलो. त्या दोघांमधील संवादानंतर रहाणे एकांतात जाऊन स्वत:च्या पश्चातापावर धाय मोकलून रडले. आणि रडता रडता जेव्हा त्यांची एक नजर त्या शोभासाठी घेतलेल्या चहाच्या खास पातेल्यावर पडली नकळत त्यांच्या चेहर्‍यावर हसू तरळलं. ते कदाचित त्यांच्या छोट्याशा समाधानाचं प्रतिक होतं.