वामन भटजी
गावांत देवळे खूप पण चांगले चारित्र्य असलेले आणि शुचिर्भूतपणा सांभाळून असणारे भटजी कमी अशी स्थिती झाली आणि दुष्काळांत तेरावा महिना प्रमाणे गावांतील अत्यंत आदरणीय आणि गुरुतुल्य भटजी श्री जोशी बुवा ह्यांचे निधन झाले. जोशीबुआंचे सुपुत्र अतिशय धार्मिक असले तरी विश्व हिंदू परिषदेची मोठी जबाबदारी घेऊन ते उत्तर भारतांत फिरत असत त्यामुळे देवळांतील पुढचा भटजी कोण असा प्रसंग निर्माण झाला. देवळाच्या कमिटीने भरपूर विचार करून शेवटी काही नावे शॉर्टलिस्ट केली आणि मग एका भटजीला नियुक्त केले. ह्या भटजींचे नाव वामन भटजी आणि नावाप्रमाणेच मूर्ती खूपच लहान होती. ह्यांची पत्नी आणि दोन मुली गावांत आल्या. नियमाप्रमाणे ह्यांना एक घर, लहानशी बाग देवालयाच्या खर्चाने देण्यात आली. पगार नसला तरी देवालयात भटजीला मिळणाऱ्या दक्षिणेवर त्यांचाच हक्क होता आणि जोशीबुवाची श्राद्ध वगैरे कंत्राटे ह्यांनाच करावी लागणार असल्याने तसा आर्थिक फायदा बऱ्यापैकी झाला असता. भटजी साधारण कर्नाटक मधील असावेत, कोकणीवरून कारवार पेक्षा खूपच खालच्या भागांतून (उडुपी वगैरे असावेत) आले होते असे वाटते. ग्रामीण भाग असल्याने चांगले भटजी मिळणे मुश्किल असते आणि त्यामुळे गरज पडले कि काही मठांशी संबंध साधला जातो आणि मठाधिपती कुणा गरजू ब्राह्मणाला मग पाठवतात. गरजू म्हणून पाठवला असेल किंवा जड झाला म्हणून पाठवलं असेल काय ठाऊक ?
वामन भटजी पण वेगळेच निघाले. अत्यंत सुमधुर आवाज आणि विनम्रता ह्यांच्या बोलण्यातून वाहत असे. पण त्याच वेळी हि व्यक्ती आतल्या बुद्धीची होती. लोकं फंडपेटीत पैसे टाकायची ह्यावर ह्यांचा बारीक डोळा. मग ह्यांची एक पट्टी होती, तिच्या टोकाला हे गोंद लावत आणि पट्टी पेटीत घालून मासे पकडल्याप्रमाणे पेटीतील पैसे काढायचा प्रयत्न करत. पण ह्यांचा स्वभाव इतका विनम्र होता कि कुणाला ऐकूनही खरे वाटत नसे. मग ह्यांनी काही परंपरा बदलल्या. हे खूप उदबत्य्या लावू लागले. मग अगरबत्ती वापरली जातेय म्हटल्यावर अनेक लोक येऊन अगरबत्त्या ह्यांना देऊन जात. मग ह्याच अगरबत्त्या घेऊन वामन भटजी वेंकू च्या दुकानावर जाऊन विकत असत आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा लोक विकत घेऊन देवालयात देत असत. वेंकू आणि वामन भटजींच्या हा रिसायकलिंग चा धंदा बराच चांगला बसला होता.
गाव कितीही मागास असला तरी गांवातील लोकांना शिक्षणाचे भारी प्रेम. त्यामुळे काळाच्या ओघांत गांवातील मंडळी मुंबई, पुणे, पणजी, बेळगांव सर्वत्र विखुरली होती आणि सधन होती. वर्षातून एकदा गावांत येऊन हि मंडळी मग देवदर्शन घ्यायची आणि त्या निमित्ताने वामन भटजी विनम्र पणे सर्वांची ओळख करून घ्यायचे. काही व्हिसीटींग कार्ड वगैरे घेऊन व्यवस्थित ठेवायचे. मग एक दिवस पणजी किंवा बेळगावांत ह्यांची फॅमिली सकट वारी. मग मुद्दामहून ते ह्या लोकांना फोन करून वगैरे आपण आपल्या शहरांत आलो आहोत वगैरे सांगायचे. आता गावांतून इतका विनम्र स्वभावाचा पुरोहित आला आहे म्हटल्यावर ह्याची सोय चांगली केली जायची. हॉटेल मध्ये व्हेज जेवण, चांगली दक्षिणा वगैरे होऊन भटजी तृप्त होणार तर वामन कसले ? ह्यांना तिसरे पाऊल टाकायला डोके पाहिजेच. मग ज्याचे पेंटाचे दुकान त्याच्याकडून पेंटाचा एक मोठा डबा. त्याकाळी ऑइल पेंट महाग होता आणि डिस्टम्पर हा प्रकार जास्त कॉमन. डिस्टंपर पाण्यात मिक्स करून रंगारी मारायचे, ऑइल पेंट जपून वापरला जायचा. ट्रॅक्टर इमल्शन किंवा रॉयल सारखे पेंट फक्त ऐकून ठाऊक होते. "देवालयाची भोजनशाळा आहे त्याला रंग मारावा म्हणतोय, देवयालाचे विश्वस्त ऐकत नाहीत" अशी कथा सांगितली कि यजमान बिचारे दया येऊन एक डबा देत आणि वरून बस वर ह्यांना चढवून ह्यांचे तिकिटाचे पैसे सुद्धा देत. इलेक्ट्रिक च्या दुकानवाल्याकडून विनाकारण एक दोन विजेर्या, कुणाकडून मुलीच्या युनिफॉर्म साठी कपडे तर एकदा चक्क सायकल घेऊन ते येत असत. त्याकाळी मोबाईल वगैरे नसल्याने माहिती तशी पोचत नसे आणि आपलाच भटजी असल्याने कुणी चहाड्या वगैरे करत नसत.
वामन भटजींची मुलगी हरिप्रिया होती माझ्यापेक्षा काही वर्षांनी मोठी. आमची घरे जवळ नसली तरी मी देवालय गेले तर भेट व्हायची. जास्त बोलणे नाही झाले पण वरवर ओळख झाली. माझ्यापेक्षा हिने बरीच दुनिया पहिली आहे असा अंदाज येत होता. भटजींना देवाल्याने दिलेले घर फार जुने होते. त्याच्या मागे एक ओहोळ होता आणि तिथे ओहोळाच्या बाजूने एक पायवाट जात असे. सुंदर भाग असल्याने आम्ही अनेकदा तिथून मुद्दाम चालत जात असू. विशेष म्हणजे आमचे दुरून कधी नातलग आले तर, चला तुम्हाला गाव दाखवू म्हणून मग काही जे ठराविक भाग असायचे, त्यांत भाबड्या महादेवाचे मंदिर आणि त्याच्या मागचे सुप्रसिद्ध ऐतिहासिक जांभळीचे झाड, नागीण शेत, कोटणीसांचा झपाटलेला वाडा, वीषेंत (म्हणजे खरे नाव विन्सन्ट) चे पडके घर जिथे कोणीही राहत नसला तरी टायिपरायटरचा आवाज येत असतो, अस्वल्या समुद्र किनारा असे जे भाग असायचे त्यातील हि एक पायवाट होती. इथून गेले असता वामन भटजींची बायको जिला सर्व जण गावांत भटजीबाई म्हणून संबोधित करायचे आणि हरिप्रिया त्यांच्या घराबाहेर बाहेर बसलेली असायची. ह्यांनी इथे वास्तव्य करण्याच्या आधी घर बंद होते. पण आता घर चालू झाल्याने वर्दळ वाढली असावी त्यामुळे शाळेचे निवृत्त मुख्याद्यापक सदानंद मास्तर, आपले पंच कामत, इत्यादी मंडळी आता दर संध्याकाळी वगैरे "चालायला" म्हणून ह्या भागांतून जाऊ लागले.
मग एक दिवस हरिप्रियाच्या घरी टीव्ही आला. मी आणि मातोश्री ओहोळाच्या बाजूने चालत जात असताना भटजीबाईनी आवाज दिला आणि आम्हाला बोलावले. इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलताना विषय निघाला कि TV आणलाय पण लावून द्यायला कुणीच नाही, मग मी पुढे सरसावले. मी लावून देते ना. आताच्या भाषेंत सांगायचे तर मी त्याकाळचे टॉमबॉय किंवा नर्ड असावे. वडिलांची बंदूक पासून शाळेंतील तंबाखू विरोधी चळवळ पर्यंत काहीही चालवून दाखवणे माझी खासियत होती. त्या काळी CCTV वगैरेची गरज नव्हती. घराबहेरून कुणीही जात असेल तर मंडळी खिडकीतून डोके बाहेर काढून निरीक्षण करत. काही आगाऊ मंडळी मग कुठे चाललात वगैरे प्रश्न विचारत. चहाची वेळ असली आणि बाहेरील माणसाकडे घरोबा असला तर चहासाठी आंत सुद्धा बोलवत. पण बहुतेक वेळा संभाषण हे बाहेरच्या बाहेर व्हायचे, वाटेवरच राहून लोक "smalltalk" करत. काही काम असेल तरच आंत बोलवत.
आता टीव्हीच्या निमिताने भटजींच्या घरांत सर्वप्रथम पाऊल पडले. आमच्या मोतोश्रींनी प्रचंड मेहनत करून विषय बदलणे, डोळे मोठे करणे वगैरे प्रकार करून मला आंत जाण्यापासून परावृत्त करण्याचा खूपच प्रयत्न केला पण मी बधले नाही. आता भटजी म्हणजे गांवातील मोठी आदरणीय व्यक्ती त्याशिवाय उच्च जात, आणि तरुण मुलगा नाही वगैरे त्यामुळे ह्यांच्या घरांत का बरे जाऊ नये हे मला समजले नाही. घराबाहेर त्यांचा एक कुत्रा होता ज्याला त्यांनी नाव ठेवले होते काळू. हा प्रचंड भुंकू लागला पण हरिप्रियाने त्याला दुसऱ्या बाजूला नेले. "काय आहे, आम्ही दोघी स्त्रियाच घरी असतो ना ? आणि शेजारी असे कुणीच नाहीत त्यामुळे काळूला ठेवलाय" भटजीबाईनी माहिती दिली. मी मग आंत जाऊन टीव्ही पहिला.
जुन्या टीवींत फक्त एक अनालॉग वायर असायची, हि लावली कि विषय संपला. पण नंतर डिजिटल टीव्ही आले आणि मग एकूण २ वायर्स असायच्या एक पिवळी आणि एक तांबडी. एक व्हिडीओ साठी आणि एक ऑडिओसाठी. पण एकूण भोके असायची सहा. तर कधी कधी तीन वायर्स असायच्या एक व्हिडीओ, एक लेफ्ट साऊंड आणि एक राईत साऊंड. ह्या योग्य पद्धतीने लावण्यात अनेकांची तारांबळ उडायची. "बॉक्स कुठे आहे ?" मी विचारले आणि हरिप्रियाने आतून एक पिशवी आणली. प्रभू इलेक्ट्रॉनिकस ची. म्हणजे टीव्ही आमच्याच एका काका कडून घेतला होता. मी तसे म्हणताच "हो ना, आमच्या ह्यांनी शेवटी हरिप्रियाचा हट्ट पुरे केला. आम्हा भटांना का बरे हा टीव्ही बीवी?" असे भटजीबाई म्हटल्या. मला ते थोडे खटकले.
माझी आई तर खाटीकखान्यांत एका देवभीरू चित्पावनाला उभे करून गोहत्या पाहायला लावावे अश्या प्रकारे उभी होती. आटप लवकर आणि निघ. तिच्या डोळ्यांतून हेच शब्द मी ऐकत होते.
मग पिशवीतून मी मॅन्युअल काढले. त्यावर टीव्ही विकत घेतल्याची रिसीट. एकूण ८००० रुपये. विकत घेणार्यांचे नाव श्री सदानंद फिरोटे. म्हणजे आपले सदानंद मास्तर. मी थोडे चक्रावले पण टीव्ही सुरु करून दिला.
"अग ह्या बाजूने कधी जात असशील तर भेट दे" हरिप्रियाने म्हटले.
"हिला कुठे वेळ असतो हल्ली? अभ्यास करायचाय ना" म्हणून आईने माझा हात दाबून मला बळेच ओढले. आम्ही बाहेर आलो आणि पुन्हा काळू कुत्र्याने आमच्यावर भुंकणे सुरु केले.
आम्ही काढता पाय घेणारच, इतक्यांत समोरून सदानंद मास्तर आपल्या थोड्या बायकी चालीने येताना दिसले. आमच्या मातोश्रींनी आपला चालण्याचा वेग वाढवला आणि विरुद्ध दिशेने चालायला सुरुवात केली. आम्हाला मास्तरांनी पहिले आणि त्यांनी स्मित हास्य दिले. "नमस्कार मास्तर" मी म्हटले. आईने पुन्हा डोळे वटारले. आम्ही काहीही विचारले नसले तरी "काही नाही हल्ली थोड्या व्यायाम पाहिजे म्हणून इथून थोडा सैरसपाटा करतो, तुम्ही काय भटजी कडे गेला होता काय? आहेत का ते घरी ? एक श्राद्ध होते, ह्यांना फावते का म्हणून विचारायचे होते" असा त्यांनीच विषय काढला.
"नाही हो, ते घरी आहेत असे वाटत नाही" मातोश्रीनी उत्तर दिले. "मी हरिप्रियाला टीव्ही बसवून द्यायला गेले होते" मी आगाऊपणे त्यांना म्हटले.
"हो का? छान आहे. भटजींनी टीव्ही घेतलाय म्हणायचा...." असे म्हणून सदानंद मास्तर चालायला लागले.
त्याकाळी गांवातील कुठलीही पायवाट असली कि त्याला काही प्रतीकात्मक मैलाचे दगड असायचे. बाजारातून चालत जायचे तर आधी कोस्तानीचे घर, मग पांडूची चिंच, सरदेसाईंची विहीर असे पाडाव असल्यचे. त्यामुळे बोलताना वगैरे "अहो बाजारात जाताना वाटेत सरदेसाईंच्या विहिरीकडे राम भाऊ भेटले, लता वहिनींना म्हणे पोटांत दुखते म्हणून मुलगा शहरांत चेकअप साठी घेऊन गेलाय" अश्या गोष्टी व्हायच्या. भटजींच्या घरापासूनचा महत्वाचा पाडाव म्हणजे कोकमचे झाड.
इथे पोचल्यानंतर मागे पुढे कोणीच नाही पाहून मातोश्रींनी मला बरेच दटावले. उगाच आगाऊ पणा कशाला केला ? आम्ही कशाला जायचे भटजींच्या घरांत वगैरे. "तू पाहिलेस का तिथे ? काही पेंटचे डबे, २-३ टाईल्स ची बॉक्सेस, अनेक ट्यूब्स, ब्लब, डझन भर चटई आणि काहीही संबंध नसलेला प्रचंड माल पडून होता तो ?" मातोश्रीनी मला विचारले. "हो मग ?" माझा प्रश्न. "वामन भटजी हावरट माणूस आहे. सगळी कडे जाऊन ह्यांच्या त्यांच्याकडून खूप काही मागून आणतो. तुझ्या वडिलांकडून सुद्धा काही कागदपत्रे करून घेतली आहेत आणि पैसा देण्याचे नाव काढले नाही. ह्यांच्याकडे संबंध कमी ठेवणेच जास्त."
"मी तुला एक गम्मत सांगू ? ह्या पेक्षा मोठी." आई काही लपवत वगैरे आहे असे वाटून मी तिला कोड्यांत पकडले.
"काय ती ?"
"ते बघ, सदानंद मास्तर श्राद्ध घालायला गेले आहेत ना भटजींच्या घरी ? "
"त्याचे काय ? भटजी नाहीत त्यांना नंतर यावे लागेल" मातोश्री.
"ते नाही ग, काळू कुत्रा बघ कसा एक आवाज सुद्धा काढत नाही" मी म्हटले आणि मातोश्रींच्या चेहऱ्याकडे काळजीपूर्वक पहिले.
वोल्टेज कमी असताना कशी ट्यूब लपक लकप करून चमकते आणि मग चॉक वगैरे थोडा फिरवूं एकदम लक्ख करून प्रकाशमान होते तसे काही तरी आमच्या मातोश्रींचा चेहरा सांगून गेला.
मग त्यांनी आणि मी चकार शब्द न काढता घराची वाट धरली.
पुढील काही वर्षांत वामन भटजींनी मोठे घर बांधले. घरी ऍक्टिवा आली आणि बेडरूम मध्ये AC.
वामन भटजींचा गैरकारभार वाढला तरी त्यांना काढून टाकण्याच्या ठरावाला बऱ्याच विश्वस्त मंडळींनी विरोध केला आहे असे वडिलांनी नंतर घरी आम्हाला सांगितले. "सेक्रेटरी सदानंद मास्तरांना उगाच लोकांच्या बायका मुलांचा पुळका असे वडील म्हणाले. त्याशिवाय प्रेसिडेंट विनायक भाऊ सुद्धा दुसरा भटजी कुठे मिळेल म्हणून उगाच चिंता काढत होते इत्यादी".
मी मातोश्रीकडे पहिले. "तू काय पाहतेस, भाजी खा आधी" त्या खेकसल्या. मी सुद्धा गुमान खाली मुंडी करून भाजी खात बसले.
संपूर्ण कथा वाचली तर प्रतिक्रिया द्या. टीका सुद्धा केली तरी चालेल. त्याशिवाय आपले काही अनुभव असले तरी लिहा. इतर चर्चां सुरु केल्या तर किस पाडून २०० प्रतिक्रिया येतात पण माझ्या मते असल्या साहित्याला जास्त प्रतिक्रिया आल्या पाहिजेत.
माझे गांवातील अनुभव ह्यांची शिदोरी बरीच मोठी आहे. त्यामुळे लोकांना आवडत असतील तर आणखीन खूप लिहीन.