चिकनचा बेत
आमच्या घरी नॉन व्हेज म्हणजे मासे आणि अंडी प्रमुख अन्न होते. "नुस्ते" हा फक्त खाण्याचा प्रकार नसून चघळण्याचा विषय देखील होता. आज सुद्दा कोणीही दोन गौड सारस्वत लोक भेटले कि "हल्ली नुस्ते पहिल्या सारखे मिळत नाही" अशी खंत व्यक्त केली जाते. पण त्या काळी सुद्धा सकाळ झाली कि देवपूजा वगैरे करून वडील बाजारांत जायला सिद्ध व्हायचे त्यावेळी आईसाहेब आणि मी काय मासे त्यांनी आणावेत आणि आणू नयेत ह्यावर मत प्रदर्शन करायचो. ते मात्र "मिळाले तर पाहू" म्हणून निघून जात. शकू हि आमची नुस्तेकान्न जी दारांतून माश्यांची टोपली घेऊन जायची. मग घराजवळ पोचतांत मोठ्याने हाक द्यायची. आमच्या घरी एक पद्धत, महिलांनी मोठ्याने बोलायचे नाही. नेहमीच शांतपणे मत व्यक्त करायचे. त्याशिवाय दुसरा नियम म्हणजे कुणीही आवाज दिला तर उत्तर कधीही "ओ" म्हणून द्यायचे नाही. इतर काही तरी वाक्य बाहेर येऊन म्हणायचे. नुस्तेकान्न इथे अपवाद, आई स्वयंपाक घरातूनच मोठ्याने "आज काय आणले आहेस ?" असे ओरडून विचारायची. मग नुस्तेकान्न सुद्धा मोठ्याने "कर्ली आहे, सुंगटा" आहेत वगैरे ओरडायची.
हे मार्केटिंग झाल्यावर डील नेगोशिएट व्हायाचे. माझ्यासाठी हे सर्व खूपच मजेदार अनुभव असायचे. ती मग बांगडे १० रुपयांना पांच दिले, सदानंद मास्तरांनी १० बांगडे घेतले वगैरे सांगायची आणि आई तिच्याकडे मग भांडायची. मग सर्व सोपस्कार होऊन पैसे देताना "दोन मांजरीला घाल मगे" म्हणून तिला काही तारले नाही तर २ सुंगटा मांजरीला खायला द्यायला भाग पडायचे.
माश्यांचे प्रकार शेकडो. बांगडा ह्याच माश्याचे किमान १५ वीस प्रकार होते, तळलेला, केळीच्या पानात बेक केलेला, गवतांत रोस्ट केलेला, रेतीत पुरून स्लो कुक केलेला, भरलेला, रेषाद, बांगड्याचे हुमण, भेंडे घालून केलेले हुमण, बिमला घालून केलेले हुमण, बांगड्याचे सुके, बांगड्याची उड्डमेथी आणि खूप काही प्रकार असायचे. पण हा फक्त मध्यम आकाराचा बांगडा बरे का. छोटा असला तर त्याला बांगदुल्ली म्हणून त्याचे व्यंजन वेगळे. सुकवेलला खारा बांगडा वेगळा त्याचे किमान ५ पदार्थ बनवत असू. मग बांगड्याचे लोणचे वगैरे ते वेगळे. आणि मी फक्त बांगडा ह्याच एक विषयावर बोलत आहे. प्रत्येक माश्याची पद्धती वेगळी.
बरे हुमण हा प्रकार कालवण म्हणून वापरायचा तर तोंडी लावायला काही तळलेले पाहिजे म्हणून फ्राय. तर तळलेले तारले कचकचीत काट्यासकट खायचे. कर्ली असेल तर मग एक एक काटा साफ करत खायचे. पापलेट कळुंदर वगैरे असले तर त्याचे फिन चे काटे सांभाळून खावे लागत. मी सर्व प्रकारचे मासे इतक्या सफाईदार पणे खात असे कि सर्व मंडळी आश्चर्यचकित. मग हि मांजरीच आहे जणू असे आजी म्हणायची. सुंगटा म्हणजे कोळंबी तर आठवड्यातून ३ दिवस किमान असायचीच. आणि ती सुद्धा आकारा प्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जात असत. बेबी शार्क म्हणजे मोरीची शाकुती करायचे. त्याला मान मोठा. मग शार्क वाले चित्रपट पाहून समजले कि ह्या माश्याला इतका सन्मान का. जो प्राणी आपल्याला खाऊ शकतो त्याला खाताना थोडा आदर दिलाच पाहिजे. प्रत्येक घराचे आपले असे ब्लॅकलिस्टेड मासे असायचे. कुणी कर्ली खात नाही तरी कुणी हलवा. कुणी राणे खात नाही तर कुणी squid.
मग मासे विकत घेतले म्हणून होत नाही तरी ते जगाला सांगायचे आणि आपण सर्वांत स्वस्त आणले हे सिद्ध केल्याशिवाय बहुतेक ते पचत नसावेत आणि आणलेच विनायकाने स्वस्त तर मग मागाहून, त्याचे बांगडे तितके फ्रेश नव्हते असे म्हणून आपले समाधान करून घ्यायचे. कधी कधी सूर्यास्ताच्या वेळी आकाश लाल होते ते पाहिले आहे का ? त्यावेळी म्हणे समुद्रांत बांगडे जास्त मिळतात. खरे खोटे कोळी लोक जाणोत.
बहुतेक सारस्वत मंडळी मासे खात असली तरी आमच्या घरी हे नवीन होते. माझे आजोबा आणि त्याआधीची सर्व मंडळी शाकाहारी होती पण आपल्या हाताने मारलेल्या जनावरांना खायची त्यांना परवानगी होती. त्यामुळे रानडुक्कर, साळ, हरण, ससे, विविध प्रकारचे पक्षी ह्यांचे मास जास्त असायचे. पण बहुतेक असल्या शिकारी ह्या सामूहिक पद्धतीने केल्या जायच्या त्यामुळे त्याचे मांस वाटून जायचे.
चिकन हा प्रकार मात्र वेगळा होता. काही धार्मिक आणि इतर समजुतींच्या पोटी गावांत अलिखित नियम होता कि कोंबड्या कुणीही पाळायच्या नाहीत. आणि ज्या लोकांनी हा नियम मोडला त्यांच्या बहुतेकांच्या घरी काही न काही वाईट घडले त्यामुळे घाबरून पुन्हा कुणीही त्या धंद्याच्या नादी लागले नाहीत. कोंबडी खायची तर मग दुसऱ्या गांवातून आणावी लागायची.
वर्षाला आम्ही फार तर ४ दा घरी कोंबडी आणून शिजवत असू. बहुतेक लोकांचे हेच होते. आणि घरी कोंबडी आणणे हा एक गुप्ततेचा प्रकार होता. परंपरा अशी होती कि घरी कोंबडी केली तर जवळच्या मित्रांना बोलावलेच पाहिजे. मग त्या दिवशी घरीं कोण कोण येतात ह्यावरून वडिलांचा सध्या कुणाबरोबर जास्त घरोबा आहे हे आम्हाला कळायचे. कोंबडी आणण्याचे काम बहुतेक वेळा शानू गुराख्याचे होते. तो स्वतः शाकाहारी असल्याने त्याला हिस्सा देण्याची गरज नव्हती त्याला २० रुपये दिले कि बस.
मग आई आणि आजीची तयारी सुरु व्हायची. बहुतेक मसाले घरी उगवलेले आणि कुटलेले. चिकन आणले तर किमान ४ किलो आणले जात त्यामुळे ते सर्व करायला मेहनत बरीच होती. त्या दिवशी नोकरांना सुट्टी कारण त्यांना वास आला तर मग हि मंडळी गाव भर जाऊन "प्रभूंच्या घरी बेत आहे" हि बातमी पसरवतील. मग चिकन खाण्यासाठी घरी स्लाईस ब्रेड मागवला जायचा . हा ब्रेड घरी फक्त चिकन साठी मागवला जास्त असल्याने वेंकूच्या दुकानातून आणणे शक्य नव्हते कारण तो मग भर बाजारांत "काय प्रभू, चिकन चा बेत वाटतो ? " म्हणून विचारेल आणि ४ लोक ऐकतील मग काही लोकांना न आवडता सुद्धा बोलवावे लागेल हि भीती. त्यामुळे स्लाईस ब्रेड वडिलांचे किमान दोन मित्र एक एक करून आणत कारण दोन ब्रेड एकत्र एकाच माणसाने घेतले तर मग बिंग फुटायचे. ब्रेड शिवाय विपुल प्रमाणात पांढरा कांदा, लिंबू, कोशंबीर, चांगला भात, चपाती वगैरे असायच्या. मिळाली तर कोळंबी फ्राय सुद्धा. एखादा मित्र कोल्ड ड्रिंक वगैरे सुद्धा आणायचा. बहुतेक वेळा थम्स अप नाही तर सिट्रा.
मग साधारण ९ वाजता रात्री मंडळी घरी येत. माझ्यासाठी आई चांगले वाले पीस आधीच काढून वेगळे ठेवायची. मग कुणी VCR घेऊन येत असे आणि चांगला चित्रपट वगैरे घरी लावत असे. काहींना आपल्या लहान मुलांना घेऊन यायची सूट होती पण पत्नीला नाही, पण पत्नीला मग "बांधून" चिकन दिले जात असे. चित्रपट झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो तरी वडीलधारी मंडळी अंगणात खाट टाकून गप्पा मारत बसायची. दारू पिणे मात्र आमच्या घरी होत नसे. एकदा व्यक्ती सिगारेट वगैरे ओढायचा पण तो सुद्धा बाहेर दूर जाऊन.
कुणाला किती पिसेस मिळाले, कुठे चिकन जास्त चांगले मिळते. मी कुणालाही शंका येऊ न देता ब्रेड कसा आणला ह्यावर बरीच चर्चा व्हायची. सर्वच मंडळी तोंड भरून आजी आणि आईच्या चिकनची स्तुती करायची.
त्या गांवातील शांत वातावरणात तो चिकनचा सुगंध आणि वडीलधाऱ्यांच्या गप्पांचा रंग, का कुणास ठाऊक आज अजून आठवणीत आहे. सर्वेश भाऊंच्या सिगारेटचा गंध, गंध वाटतो, दुर्गंध नाही. विजय काका आपल्या रानडुकराची शिकारीची कथा अशी वारंवार सांगायचे जणू काही दौड मधील संजय दत्तच. फक्त ह्यांच्या क्लायमॅक्स मध्ये रानडुक्कर गंगाधराच्या पार्शवभागाला आपल्या सुळ्यांनी उचलून दूर फेकतो आणि विजय काका सिंगल स्लग वाल्या शॉटगनचा बार ओढतात आणि रान डुक्कर किंकाळी मारून पडतो. डुक्कराची किंकाळी कशी असते ह्याचे आम्हाला कुतूहल.
ह्या सर्वांत एक वयस्क व्यक्ती म्हणजे गोरे गुरुजी. ह्यांचे आडनाव गोरे नव्हते, ह्यांची त्वचा उजळलेली होती म्हणून त्याना गोरे म्हणायचे. ते जीवनात एकदाचं मुंबईला गेले होते. मग तेथील ट्रेन, ती गर्दी, मग कुठल्या तरी रोड वर ह्यांचे पाकीट मारले वगैरे कथा हे आपण मार्शियन मधील मॅट डेमॉन आहोत अश्या थाटांत सांगायचे.
तसे पहिल्यांस ह्या सर्व "गजालींत" सर्वच गजाली रिपीट टेलिकास्ट आणि त्यांत सुद्धा महाएपिसोड असल्या प्रमाणे होत्या पण त्यांत एक साधेपणा होता आणि आपलेपणा होता म्हणून हा सर्व प्रकार मनोरंजक असायचा. मग मध्य रात्रीनंतर अनेक तासांनी सर्व मंडळी हळू हळू घरी जायची. लहान मुलांना वडील एक तर उठवत, उचलून नेत नाहीतर काही जण आमच्याच वऱ्हांडावर झोपत. एकदा एक धूमकेतू आकाशांत दिसत होता तेंव्हा हा बेत होता हे आठवते.
दुसऱ्या दिवशी खरे तर चिकन चा स्वाद जास्त वाढायचा. मग वेगळे काढून ठेवलेले चांगले पीस मी हादडत असे. आमची कुत्री सुद्धा त्या ३-४ दिवसांत आपली पार्टी असल्याप्रमाणे अभिमानाने शेपूट वर करून फिरत असत. त्या दिवसांत कुत्री आपल्या सग्यासोयऱ्यांना ह्या दिशेने बिलकुल फिरकायला देत नसत.
एक दिवस केलेले चिकन मग आम्ही फ्रिज मध्ये ठेवून किमान आठवडाभर खात असू. आई काही चिकन वेगळे ठेवून मग त्यावर गृहशोभिकेतील रेसिपी ट्राय करून पाहत असे.
मग चिकनच्या रश्श्यातील चिकन संपले कि त्यांत अंडी टाकून मग त्याचा वॉल्युम वाढवला जायचा. मग तेही झाले कि शेवटचा रस्सा ऑम्लेट वर टाकून त्याची रस्सा आमलेट बनवली जायची. आजी ह्याला "घालीन लोटांगण" म्हणायची कारण आरतीत जशी ती शेवटी येते आणि त्यानंतर लोकांना कळते कि आरत्या संपायला आल्या त्याच प्रमाणे ताटांत रस्सा ऑम्लेट आली कि समजायचे कि चिकनचा अध्याय समाप्त.
बहुतेक जीवनातील सर्वांत मोठी खंत हि असते कि कुणाला तरी जे सांगायचे होते ते सांगू शकले नाही. काहीही पैसे श्रम न लागता जी गोष्ट आपण मिळवू शकत होतो ती आपण निव्वळ अश्यासाठी घालवली कि काहीतरी वेगळ्या गोष्टीमागे आपण धावत होतो. २०-३० वर्षांनी लक्षांत येते कि खरेतर आयुष्यभर ज्याला आपण इतके महत्व दिले त्याची खरेतर काहीच गरज नव्हती. ट्रेन मध्ये बसून पळती झाडे पाहायला मजा येत असली तरी कुठलीच फ्रेम १००% लक्षांत येत नाही, त्यासाठी ती ट्रेन थांबायला पाहिजे. मग ती कुठेही थांबली तरी काही क्षण न्याहाळून पहिले तर काही न काही इंटरेस्टिंग सापडतेच. पण ते थांबणे आवश्यक आहे.
आपण कोण आहो ह्याला महत्व नाही, आपल्या बँकेत किती पैसा आहे ह्याला महत्व नाही. महत्व ह्याला आहे कि आपण जे काही करतो त्यातून आपण काही प्रमाणात वेळ काढून आपण मेटफोरिकल "चिकनचा बेत" करतो कि नाही ? आमच्या चिकनच्या बेत मध्ये चिकन महाग होते असे नाही. पाहिजे तर बहुतेक लोक दररोज एक कोंबडी आणून उडवू शकले असते. प्रश्न पैश्यांचा नव्हता. काही कारणाने परंपरा बनली होती आणि लोकांनी ती ठेवली होती कारण त्यांत जो आनंद होता तो निव्वळ चिकन च्या स्वादांत नव्हता. कॉलेज मध्ये सर्वच मंडळी शिक्षणासाठी जातात पण, त्या कॉलेज जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी आपली क्रश असली पाहिजे, कधी बियर तर कधी सिगारेट ओढून पहिली पाहिजे. थोडीफार डेटिंग केले पाहिजे. प्रमाणात विविध गोष्टी करून जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे. पहिल्या बाकावर श्रावण बाळ प्रमाणे बसून फायदा नाही. चिट्स पास केल्या पाहिजेत. थोडीबहुत कॉपी मारली तरी चालते. पण कॉलेजच्या बाहेर आपला कंपू करून गप्पा मारल्याच पाहिजेत. थोडीफार नजरेस नजर भिडलीच पाहिजे.
आज काळ बदलला आहे त्याप्रमाणे अनुभव बदलला आहे. तरुण पिढीचे आपले "चिकनचे बेत" असतील पण आमच्या बालपणी ते वेगळे होते. आज कॉलेज म्हणजे घर आणि ट्युशन ह्यांच्या मध्यंतरी वेळ घालवण्याची जागा बनली आहे. क्रश म्हणजे २५ लोकांना राईट स्वाईप करून सुद्धा डोक्यांत राहतो तो. डेटिंग म्हणजे फक्त भेटणे आहे आणि चुंबन म्हणजे फक्त मेकिंग आऊट आहे. सिगारेट ची जागा कॅनाबिस ने घेतली आहे आणि बियर ह्या गोष्टीचे नावीन्य जाऊन आधार कार्डाच्या गरजेप्रमाणे ती ओम्नीप्रेझेंट बनली आहे. पण तरी सुद्धा प्रत्येकाचे आपले "चिकनचे बेत" असतीलच.