Get it on Google Play
Download on the App Store

कर्णाची शेवटची परीक्षा

कर्ण नेहमीच दानशूर म्हणून ओळखला जायचा. कर्ण जेंव्हा महाभारतात मृत्युशैय्येवर होता तेंव्हाची हि घटना आहे. एका गरीब ब्राह्मण तिथे आला. तो कर्णाजवळ त्याची दानशूरता तपासण्यासाठी गेला. 

“कर्णा!! कर्णा!!”

 “आपण कोण ब्राह्मणदेव?” कर्णाने विचरले. 

“मी एक गरीब ब्राह्मण आहे. आपल्या दानशुरतेच्या  अख्यायिका ऐकल्या आहेत. मी आपणाला एक दान मागायला आलो आहे.” 

“आपल्याला दान देऊन मी पुण्यच कमावेन. बोला ब्राह्मणदेव मी आपणास काय देऊ ??” कर्णाने विचारले.

“माझी फार मागणी नाही , आपण मला थोडेसे सोने देऊ केलेत तर मी आपला ऋणी राहीन.” ब्राह्मण म्हणाला.

कर्णाने आपले तोंड उघडले. त्याच्या तोंडात एक सोन्याचा दात होता. “हे वामन आपण हा दात काढून घ्यावा.”

“कर्णा आपण मला हे सुचवत आहात कि मी मृत्युशैय्येवरील एका व्यक्तीच्या तोंडून दात हिसकावून घ्यावा.  काय हे अभद्र. मी जातो आपण मला सोने देण्यास असमर्थ आहात असे मी मानतो.” इतके बोलून ब्राह्मण वळला.

“थांबा ब्राह्मणदेव..!” असे म्हणून कर्णाने शेजारी पडलेला दगड हातात घेतला आणि जोरात आपल्या दातावर मारला त्याचा दात रक्ताळलेल्या तोंडातून बाहेर पडला. कर्णाने तो दात त्याला दान केला.

“कर्णा हे काय? असा रक्ताळलेला दात मी कसा घेऊ मी एक ब्राह्मण आहे. अापल्याकडुन हे स्विकारु शकत नाही.मला वाटते माझी ईच्छा अपुर्ण राहिल. मी निघतो." असे म्हणुन तो निघाला.

"कृपया थांबा स्वामी..!!" कर्ण वदला.

कर्ण रक्ताळलेल्या अवस्थेत होता. त्याला हलताही येत नव्हते. तरीहि त्याने आपल्या थरथरत्या हाताने धनुष्यबाण उचलला. अवकाशाकडे पहात त्याने बाण सोडला आणि क्षणार्धात पाऊस पडु लागला. त्या पावसाच्या स्वच्छ पाण्याने तो दात धुतला गेला. तो स्वच्छ दात त्याने दोन्ही हात जोडुन त्या ब्राह्मणाला दिला.

ब्राम्हणाचे रुप

कर्ण म्हणाला, "ब्राह्मणदेव, आपण कोण आहात..??"

ब्राम्हणाच्या भोवती एक प्रखर प्रकाश झाला. त्या ब्राह्मणाचे रुप आता देखणे दिसु लागले होते. कर्णाचे डोळे दिपले होते. त्याने डोळे उघाडले आणि नम्रतेने नतमस्तक झाला. तो ब्राह्मण श्रीकृष्ण होता.

"कर्णा, मी आहे कृष्ण. मी तुझ्या त्यागाच्या भावनेची कदर करतो. या अवस्थेत असताना ही तु आपले त्यागाचे कर्तव्य विसरला नाहीस. तुला जे हवे तो वर माग कर्णा." कृष्ण म्हणाला. 

कर्णाने नम्रतेने दोन्ही हात जोडले, "कृष्णा, मनुष्यप्राणी मृत्युशय्येवर असताना त्याला भगवंताचे रुप दिसणे हे फारच भाग्याचे समजले जाते. तुझे हे रुप पाहुन मी धन्य झालो आहे. मला अजुन कशाचीही अपेक्षा नाही. मी तुला नतमस्तक होतो." असे म्हणुन कर्णाने प्राण त्यागले

           कर्ण आधी पासुन उपेक्षीत होता. तो सर्व कौरव-पांडवां पेक्षा अधिक पात्र आणि शुर होता. त्याला नेहमी दुय्यम दर्जाची वागणुक मिळाली होती. कृष्णाने कर्णाची परीक्षा घेतली. ह्यामुळे सर्वांसमोर कर्णाची दानशूरता, पात्रता आणि श्रेष्ठत्व सिद्ध झाले.