ओंजळ.....!!
"कराग्रे वसते लक्ष्मी" म्हणत दिवसाची गोड सुरुवात करताना दोन्ही हातांच्या मधे केलेल्या त्या ओंजळीत लक्ष्मी, सरस्वतीचे रूप बघत त्याच ओंजळीने आपले नकळत दिवसाचे गणित आपण ठरवत असतो. अशा ओंजळींची फुले रोज नव्याने साचवत आपल्याच हातात आपले भविष्य ह्याचीच जाणीव ही "ओंजळ "रोज देत असावी का ? ओंजळ दोन हातांची एक खोलगट जागा एवढा तात्विक विचार येऊन जातो, पण केवढा अर्थ सामावला असेल एका या शब्दात ओंजळ रितेपणाची भावना न येता भरभरून देण्याची एक मानवी संवेदना म्हणूयात का ?असा सहजच विचार आला .......
मनाच्या कप्प्यात साठवलेल्या अनंत आठवांची ओंजळ, तहानलेल्याला भरभरून दिलेल्या पाण्यासाठी केलेली ओंजळ, भक्तीच्या भावनेने परमेश्वरचरणी लीन झालेली भावफुलांची ओंजळ तर एखाद्या कवीच्या मनातील शब्दांचा सुगंध देणारी शब्दफुलांची ओंजळ, तर आपलेपणाच्या भावनेने बांधलेल्या एकमेकांतील दृढ नात्यांची ओळख दाखवणारी प्रेमाची आपुलकीची ओंजळ, स्वतःचे एक विश्व कल्पना सामावून घेणारी ओंजळ भरभरून घेणारी पण ओंजळभर घेऊन पुन्हा देण्याची भावना जपणारी एक सखी,.....!
जगण्याच्या प्रत्येक क्षण वेचत एक ओंजळीत सामावेल एवढे आयुष्य जगताना कुठे रिते करायची हे पण नकळत शिकवणारी ओंजळ....
"सारं काही तुला देऊन,
पुन्हा माझी ओंजळ भरलेली"
असा कृतज्ञता भाव जागृत करणारी ओंजळ "देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे. देता देता घेणाऱ्याचे हात घ्यावेत" ही उक्ती सार्थ करणारी दातृत्वाची महती वेगळ्या अर्थाने दाखवणारी *ओंजळ* एक केवळ शब्द , पण या एका शब्दात सामावलेला गूढ अर्थ प्रत्येकाला समृद्ध करतो.
विरहाच्या वेदनेने व्याकुळ झालेला प्रियकर आपल्या आठवणींची ओंजळ प्रेयसीच्या प्रेमाला साद घालायला भाग पाडतो. कधी कधी भावनाशून्य निरवाच्या ओठी निरवता साजे माझ्यातून तुझे मौन वाहे म्हणत मौनांची ही ओंजळ आपलं अस्तित्व दाखवत जातेच.
"ओंजळ" जीवन जगताना थोडं सुख तर थोडं दुःख सामावून घेणारी भूतकाळाच्या आठवणीने वर्तमानाला खुलवणारी भविष्यकाळ घडवणारी क्षणरूपी कळ्यांची ओंजळ, पाखरांच्या चोची भरत दुःखात मायेची सावली देणारी सुखाची ओंजळ, केवळ एक शब्द की बरंच काही......!
त्या दोन कुसुमाकरांत सामावलेल्या विश्वास, प्रेम, माया, सुख-दुःख, स्वप्न, आशा, निराशा, आनंद ह्या सगळ्यांची भावफुलांची ओंजळ जगण्याला नवी ओळख देते. मात्र, ओंजळीत मावेल एवढे जरूर घ्यावे पण सांडलेले इतरांना भरभरून देता यावे ही नकळत जाणीव देणारी ओंजळ म्हणजे रितेपणाची भावना नसून दातृत्वाची संवेदना शिकवणारी सामावून घेण्याची संकल्पना जपणारी ओंजळ.......! कन्यादानासारख्या पवित्र दानाची सार्थकता पटवणारी कधी रिती रिकामी नसतेच कारण ,
" सारं काही देऊनही माझी ओंजळ भरलेली
पाहिले, तर तू तुझी ओंजळ माझ्यात भरलेली"
अशीच काहीशी अवस्था ओठांवर आलेले शब्द तसेच सांडून जातील, डोळ्यातले भावही तसेच विरुन जातील मात्र आयुष्यभर देण्याची भावना जोपासणारी ही "आशिर्वादांची ओंजळ" जगण्यास नक्कीच बळ देत राहते असा ही एक भाव या "ओंजळ" एका शब्दात केवळ फुलांचीच "ओंजळ" नव्हे तर मानवी मनाच्या सर्व भावनांत एक प्रगल्भता आणणारी "संवेदनांची ओंजळ" जगण्याचा खरा अर्थ सांगत आयुष्य तरल बनवते, असाही एक विचार ...!
मात्र वळणा वळणाच्या या आयुष्यात प्रत्येक वळणावर माणुसकीची "ओंजळ" रिती करताना उपकाराच्या भावनेची परत अपेक्षा करणारी नसावी तर त्या त्या वळणावर साथ देणारी असावी...पुढचं वळण आपलंही असेल याची जाणीव दृढ करणारी असावी ........अशी माणुसकीची "ओंजळ " केवळ एक शब्द कि बरचं काही .......!!!
" ओंजळीला ओंजळीने झेलण्याचा भाव शिकवते "
© मधुरा धायगुडे