सायलेन्स प्लीज प्रकरण १२
प्रकरण १२
पाणिनी त्याच्या केबिन मधे येरझाऱ्या घालत होता.ओजस ने पोलिसांकडून गुप्त पणे तपासाच्या प्रगती विषयी माहिती मिळवली होती.
“अत्ता पर्यंत तरी, त्याचं झोपेत चालणे हा तुझ्या बचावाचा एकमेव मुद्दा आहे असं दिसतंय.” ओजस म्हणाला.
“ चाकूच्या मुठीवर कोणाचेच ठसे नाही मिळाले.पण दुर्वास मात्र शपथेवर सांगतोय की त्याने विहंग खोपकर ला च पाहिलंय रात्री फिरताना.आणि चंद्राच्या उजेडात स्पष्टपणे.मला असं समजलंय की अगदी पहिल्यांदा दुर्वास ने केलेल्या वर्णना नुसार त्याने फक्त एक आकृती घरा बाहेर झोपेत फिरताना पाहिली होती. आता त्याचं म्हणणं आहे की ती आकृती म्हणजे विहंग च होता.” ओजस पुढे म्हणाला, “ आणि हे झोपेत चालणाऱ्या व्यक्तीचे काम आहे असा संशय त्याला यायचं एकमेव कारण म्हणजे ती आकृती त्याच्या म्हणण्याप्रमाणे गाऊन मधे होती ! ”
“ हे गाऊन चे प्रकरण खोटं वाटत, कनक.” पाणिनी म्हणाला “ रात्री झोपताना विहंग पायजमा किंवा ट्रॅक सुट म्हणजे ट्राउजर घालेल.बायकांसारख गाऊन कसा घालेल? ”
“ तसं नाही म्हणू शकत आपण पाणिनी . विहंग कडे एक जुना पुरुष घालतात तसा गाऊन आहे.”
“ मला वाटतंय सरकारी वकिलांनी तो गाऊन पुरावा म्हणून ताब्यात घेतलाय.” पाणिनी म्हणाला
“ हो खरं आहे हे.विहंग खोपकर च्या बेड जवळच तो पोलिसांना मिळाला.” ओजस म्हणाला.
“ त्यावर रक्ताचे डाग वगैरे? ” पाणिनी म्हणाला.
“ ते मला समजलं नाही अजून , पण मला नाही वाटत असतील म्हणून.”-ओजस
“ का नसतील ? ” पाणिनी म्हणाला.
“ सरकारी वकिलांची विचार सारणी अशी आहे की पांघरूणा वरूनच चाकू खुपसला गेला असल्याने पांघरुणामुळे रक्त बाहेर, म्हणजे खुन्याच्या अंगावर,कपड्यावर उडाले नाही,” –ओजस
“ बरोबर आहे अंदाज म्हणून.” पाणिनी म्हणाला “ खुनाच्या वेळे बद्दल काय? ”
“ तो एक मोठा प्रश्न आहे.सरकारी वकील या ना त्या कारणाने वेळ नक्की करण्याच्या विषयाचा बाऊ करताहेत.तरी त्यांनी पत्रकारांना दिलेल्या माहिती नुसार मध्यरात्री बारा ते पहाटे चार या अवधीत खून झाला असावा असं त्यांचं म्हणणं आहे.ते घरातल्या नोकरांकडे चौकशी करताहेत की रात्री तीन च्या सुमाराला त्यांना काही दिसलं का किंवा काही ऐकू आलं का. ”-ओजस
पाणिनी आपल्या दोन पायात बरेच अंतर ठेवून आणि हात कमरेवर ठेऊन उभा होता.त्याचे डोके पुढे कलले होते.चेहेरा चिडलेला वाटत होता.ओजस ने दिलेली माहिती त्याने डोळे मिटून ऐकून घेतली, पचवली.
“ मी पैज लावायला तयार आहे कनक, त्या दुर्वास ने आधी सांगितलेली माहिती बदलायला त्याला संधी मिळावी म्हणून ते मृत्यूच्या वेळेबाबत जाणून बुजून असा कंगवा करत आहेत. अजून तासाभरात ते वेळ नक्की करतील. पण दुर्वास तर म्हणतो की रात्री सव्वा बाराच्या सुमाराला त्याने विहंग ला हातात चाकू घेऊन फरसबंदी असलेल्या अंगणात पाहिलं म्हणून....... कनक , दुर्वास च्या खोलीत असलेल्या घड्याळात फ्लोरोसंट चे काटे होते का रे? ” पाणिनी म्हणाला.
“”मला नाही माहीत. का रे ? ओजस म्हणाला.
“ जर असतील तर, पोलीस दुर्वास ला असं पटवतील की, त्याला सव्वा बारा वाजले असे वाटले ,पण प्रत्यक्षात तेव्हा सव्वा तीन वाजले होते.थोडीशी कमी दृष्टी असलेला माणूस फ्लोरोसंट चे काटे बघताना नक्कीच अशी चूक करू शकतो.” पाणिनी म्हणाला
“ सर, दुर्वास ची चूक झाली असेल असं वाटतं तुम्हाला? ” सौम्या ने विचारलं.
“ नक्कीच करू शकेल .ते त्याला गोड बोलून म्हणतील, हे बघ दुर्वास, तू वकील आहेस, उलट तपासणीत तुला दुसऱ्या वकिलांनी वेळे बाबत सापळ्यात अडकवलेले बरोबर दिसणार नाही.परिस्थितीजन्य पुराव्यावरून असं दिसतंय की, खून पहाटे तीन च्या सुमारास झालेला असावा. लहान काटा आणि मोठा काटा या मध्ये तुमचा गोंधळ नाही ना उडाला? पुन्हा विचार करा एकदा.अर्थात आम्हाला के घडलेले नाही त्या बद्दल तुम्ही खोटे सांगा असे आमचे बिलकुल म्हणणे नाही पण तुमच्या सारख्या नावाजलेल्या वकिलांची उलट तपासणीत पंचाईत होऊ नये म्हणून तुम्हाला सांगितले. या मुद्द्यावर दुर्वास नक्कीच पुनर्विचार करेल आणि जेवढा जास्त विचार करेल तेवढे त्याला वाटत राहील की खरंच आपण घड्याळ बघताना काट्यांची गल्लत केली.दुर्वास सारखे लोक जे अहंकारी ,स्वतःच्या मताशी ठाम असणारे, हट्टी असतात ते स्वत:शी सुध्दा कबूल करणार नाहीत की ते स्वार्थासाठी खोटी माहिती देताहेत,खोटी साक्ष देत आहेत.कोणत्याही गोष्टीचे त्रयस्त आणि तटस्थ वृत्तीने निरीक्षण करणे त्यांना जमत नाही. ” पाणिनी म्हणाला
“ तुम्ही त्याला काहीतरी करून जाळ्यात नाही का पकडू शकत, जेणे करून न्यायाधीशांना ,तो काय लायकीचा माणूस आहे ते कळेल? ” सौम्या ने विचारलं.
“ पाणिनी बद्दल काळजी करू नकोस सौम्या, ” ओजस म्हणाला. “ तो काहीतरी युक्ती काढून दुर्वास ला खोटा पाडेलच ! अत्ता पर्यंतचा अनुभव पाहिलास तर एखाद्याने खोटी साक्ष दिली म्हणून पाणिनी च्या अशिलाला शिक्षा झाली असं घडलेलं नाही.”
“ दुर्वास वर तुझी माणसं नजर ठेऊन आहेत ना? ” पाणिनी म्हणाला.
“ केवळ दुर्वास वरच नाही तर त्या घरातून बाहेर पडणाऱ्या प्रत्येकावर.मला दार पंधरा मिनिटांनी फोन येतोय.”-ओजस
“ विशेषतः दुर्वास बाहेर पडल्यावर डोळ्यांच्या डॉक्टरांकडे किंवा चष्म्याच्या दुकानात कधी जातो हे मला हवंय.” पाणिनी म्हणाला
“ का? डोळ्यांच्या डॉक्टरांकडे का? ”-ओजस
“ आम्ही जेव्हा विहंग आणि मरुद्गण यांच्यामधील तडजोडीचा करार करत होतो ना तेव्हा दुर्वास ची एक विचित्र सवय माझ्या लक्षात आली.त्याचा चष्मा बाय फोकल आहे.तो त्याला सरावलेला नाही.त्याला काही वाचायचे असते तेव्हा तो चष्मा वर करून फ्रेम च्या खालच्या भागातून डोळे रोखून वाचतो आणि हातभर अंतरावर कागद धरल्या शिवाय त्याला दिसत नाही.आता मला सांग की साक्षीदाराच्या पिंजऱ्यात त्याची मी या मुद्द्यावर झाडा झडती घेईन आणि त्याला रात्री तीन वाजता चंद्राच्या उजेडात काय दिसलं त्याला त्याच्या अधू डोळ्यांना असा प्रश्न विचारेन तेव्हा त्याची काय अवस्था होईल? ” पाणिनी म्हणाला
“ पण तो चष्मा घालून थोडाच झोपला असेल? ” सौम्या ने शंका काढली.
“ मी त्याची उलट तपासणी घेईन ना तेव्हा तुला वाटेल की तो दुर्बिण लाऊन झोपला होता.! हे सरकारी वकील दुर्वास ला हा मुद्दा लक्षात आणून देतील आणि बाकीचे सर्व काम, म्हणजे डोळ्यांच्या डॉक्टर कडे जाणे, चष्मा बदलणे वगैरे दुर्वास स्वत: करेल.” पाणिनी म्हणाला “ सौम्या, सुकृत आला का गं ? ”
“ हो आलाय. शेफाली आणि मरुद्गण यांच्यातील संवाद हर्षद ने हळूच ऐकलेत.”सौम्या म्हणाली. “ तुम्हाला आणि कनक ला सुकृत कडून ते सर्व ऐकायचं असेल ना? ”
“ अर्थात. पाठव त्याला आत.”
“ विहंग चं विमान बिघाड झाल्यामुळे उशिरा पोचले हे खरं आहे ना सर ? ”
“ हो त्याची खात्री केली मी.” पाणिनी म्हणाला
“ म्हणजे याचा अर्थ विहंग आणि माईणकर यांचं लग्न नाही होऊ शकलं ? ” सौम्या ने विचारलं
“ नाही होऊ शकलं ” पाणिनी म्हणाला
“ म्हणजे सरकारी वकील विहंग विरुध्द साक्ष द्यायला लीना माईणकर ला बोलाऊ शकतात.” सौम्या म्हणाली.
“ तिला काहीच माहिती नाहीये यातलं. सौम्या, आत पाठव सुकृत ला. ” पाणिनी म्हणाला
ती बाहेर गेली तेव्हा ओजस हळू आवाजात पाणिनी ला म्हणाला, “ हवाईला लग्नाला जाताना विहंग स्वतंत्र विमान बुक करून गेला होता का? ”
“ हो.विहंग प्रचंड श्रीमंत आहे . त्याला विशिष्ट वेळेत हवाईला हजर राहणे आवश्यक होते लग्नासाठी.म्हणजे त्याला घटस्फोट मान्य झाल्याची बातमी मिळणे आणि लगेच लग्न करणे असे बरोब्बर साधायचे होते.त्यामुळे खास विमान केले तरच ते जमले असते.आणि त्याला ते परवडणारे होते. पण तू हे का विचारतो आहेस? ” पाणिनी म्हणाला.
“ जाताना विमानाने मार्ग बदलून मधेच दुसरी कडे नेले नसेल ना आणि असे भासवले नसेल ना तुला की विमानात बिघाड झाल्यामुळे उशीर झाला आणि संपर्क होऊ शकलं नाही मधल्या वेळात ” ओजस ने शंका व्यक्त घेतली.
“ मला कळायला काय मार्ग आहे कनक ? ” पाणिनी म्हणाला.
“ तुझं अशील आहे तो.” –ओजस
“ एवढा संशयी नको होऊस. त्याच्या वैमानिकाने पण मला विमानात बिघाड झाला असचं सांगितलं.” पाणिनी म्हणाला
“ सांगितलं असेल तुला दोघांनी, पण ते न्यायाधीशांना पटवणे अवघड आहे.” –ओजस
सुकृत आत आला.
“ काय काय घडलं थोडक्यात सांग.” पाणिनी म्हणाला
“ मी त्या डिक्री च्या मागे माझं नाव पत्ता फोन लिहून ठेवला होता. त्या आधारे मला खांडवा च्या कोर्टातल्या क्लार्क चा फोन आला होता अत्ता, तो म्हणाला की शेफाली खोपकर ने हटकर अॅंड हटकर या वकीलांच्या फर्म मार्फत, घटस्फोटाची ही संपूर्ण प्रक्रीया ही फ्रॉड असल्याचा आरोप करणारा दावा लावलाय.तिने या दाव्यात बरेच मुद्दे मांडलेत. ” १४४३८
“एक मुद्द असा की विहंग खोपकर नेच तिला घटस्फोटा साठी दावा लावण्यास प्रवृत्त केले.मरुद्गण बरोबरच्या धंद्यात भागीदारी आहे अथवा नाही या बद्दल खोटी माहिती दिली.तिने असाही मुद्दा मांडलाय की घटस्फोटाची अंतीम डिक्री हा फ्रॉड आहे.तिने एक प्रतिज्ञापत्र सदर करून त्यात म्हटलंय की तिने खांडवा मधील तिच्या वकीलांना काढून टाकले आहे आणि हटकर अॅंड हटकर या वकीलांच्या फर्म ची नियुक्ती केली आहे.तिचं म्हणणं आहे की पंधरा तारखेला घटस्फोटाच्या विषयावर फक्त अंतरीम आदेश निघाला असे तिला वाटले तसे तिने वकीलांना सांगितले.त्यामुळे त्यांना रात्रभर अभ्यास करायला लागला आणि घाई घाईत सकाळी दावा दाखल करावा लागला.”
“ खांडवा मधे कागदपत्रे कधी सदर झाली? ” पाणिनी म्हणाला.
“ अंतरीम आदेश बाजूला ठेवावा असा आपलं अर्ज साडे नऊ ला सदर झाला.त्यांना असं वाटलं असेल की अंतीम आदेश दहा वाजे पर्यंत दिला जाणार नाही.” सुकृत म्हणाला.
“ प्रतिज्ञापत्र कधी दाखल केलं त्यांनी? ” पाणिनी म्हणाला.
“ थोड्या वेळा पूर्वीच.ते कोर्टात गेल्यावर त्यांना कळलं अंतीम आदेश काढलाय कोर्टाने म्हणून.” सुकृत म्हणाला.
“ सौम्या, इथल्या कोर्टात कोणाला तरी पाठव आणि बघ की विहंग खोपकर ला अक्षम ठरवण्यासाठी त्यांनी याचिका दाखल केली नाहीये ना.आणि शेफाली ने पालनकर्ता म्हणून कोणाला नेमलेले नाही ना.” पाणिनी म्हणाला
“ तुला फोन वरून न सांगण्यासारखं काय होतं? ” पाणिनी ने सुकृत ला विचारलं.
“ काल रात्री तीन वाजता मरुद्गण ने शेफाली ला फोन केलं होता असं कळलं ” सुकृत म्हणाला.
“ रात्री तीन वाजता ! ” पाणिनी ने शिट्टी मारली.
“तुम्ही सूचना दिल्या नुसार मी शेफाली च्या घरावर नजर ठेऊन होतो.मध्यरात्री पर्यंत मी होतो तिथे पण काहीही हालचाल नव्हती.फक्त खालच्या मजल्यावर दिवे चालू होते.” सुकृत म्हणाला.
“ कोणाचीच हालचाल नव्हती? आत ,बाहेर? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही.”
“ मग,पुढे काय झालं? ” पाणिनी म्हणाला.
“ मध्यरात्री नंतर हर्षद आला मला तिथून सोडवायला म्हणून .त्याच्या गाडीतून प्रांजल आली होती म्हणून तिला घेऊन मी हॉटेल ला गेलो. हर्षद एकटाच त्याच्या गाडीत थांबला, नजर ठेवण्यासाठी. शेफाली ने उकाड्यामुळे तिच्या घराच्या खिडक्या उघडल्या होत्या.तिला तीन च्या सुमाराला एक फोन आल्याचा आवाज हर्षद ने ऐकला तेव्हा प्रथम त्याने ती वेळ आपल्या वहीत नोंदवून ठेवली.शिवाय ती काय बोलली हे सुध्दा त्याने वहीत टिपून ठेवले.”
“ त्याला ऐकू येत होतं ? ” पाणिनी म्हणाला.
“ रात्री तीन वाजले होते.नीरव शांतता होती.उघड्या खिडकी तून व्यवस्थित आवाज येत होता त्याला.” सुकृत ने आपल्या खिशातून छोटी डायरी काढली आणि तो पाणिनी ला वाचून दाखवू लागला.
तीन वेळा रिंग वाजली.नंतर झोपाळू आवाज कानावर आला, यस् मी मिसेस खोपकर बोलत्ये.....सांता बार्बरा वरून.... कोण आहात तुम्ही....मॅडोक्स ??.... या विचित्र वेळेला का केलंत फोन....?...का?... मला वाटलं की ते सगळ ठरवून झालंय.....तुमच्या वकिलाने मीटिंग ठरवल्ये...ठरल्या प्रमाणे मी येईन.....आणखी काय हवं असेल तर माझ्या हटकर या वकीलांना भेट.”
सुकृत ने पाणिनी कडे ती वही दिली. पाणिनी ने ती काळजी पूर्वक वाचली.
“सुकृत , त्यांनी जेव्हा साडे नऊ वाजता कागदपत्र दाखल केली तेव्हा त्यांना घटस्फोटाच्या डिक्री चा अंतीम आदेश मिळाला आहे हे माहीत नव्हते? ” पाणिनी म्हणाला.
“ नव्हते.” –सुकृत
“ त्यांनी अंतीम डिक्री चा आदेश बाजूला ठेवा असे कागदपत्र आणि प्रतिज्ञापत्र सादर केले,तर ते सादर करायची वेळ आणि डिक्री पास होण्याची वेळ या दरम्यान त्यांच्या वकिलांनी शेफाली ची सही कशी मिळवली? ती सही घेण्यासाठी वकिलांची माणसे शेफाली कडे गेली असतील किंवा ती त्यांच्या कडे गेली असेल तर कनक, तुझ्या माणसाना ते कसे कळले नाही ? ” पाणिनी चिडून म्हणाला.
“ काही वेगळे घडले तर मला फोन करा अशी माझी सूचना होती माझ्या माणसाना.शेवटचा फोन मला वीस मिनिटांपूर्वीच आलाय त्या नुसार शेफाली घर बाहेर पडलीच नाहीये. ”-ओजस
“ तिने तुझ्या माणसाना हूल दिली असेल आणि सटकली असेल ”
“ तसे करण्यासाठी तिला घराच्या मागील बाजूने बाहेर पडावे लागले असते परंतू मागील बाजूला जाण्यासाठी घराला मागचे दारच नाहीये, घराच्या पुढच्या दाराने बाहेर पडूनच बाजू बाजूने मागे जाणे हा एकच पर्याय आहे.आणि तसे झालेले नाही. ” –ओजस
ओजस चा फोन वाजला. “ खात्री आहे तुझी ? ” त्याने फोन वरील माणसाला विचारलं. आपल्या मागच्या खिशातून एक छोटी वही काढली.त्यावर काहीतरी खरडलं. “ तू, तसाच आहे तिथे थांब, मी आणखी दोन माणसं तुझ्या मदतीला पाठवतो. तू त्या जोडप्या बरोबरच रहा.जो पर्यंत ते वेगळे वेगळे होत नाहीत तोवर.ते वेगळे झाले तर तू दुर्वास च्या मागावर रहा.दुसऱ्याला मरुद्गण च्या मागावर राहू दे. ”
ओजस ने चिडून फोन बंद केला. “ पाणिनी , ती काहीतरी युक्ती करून त्या घराच्या बाहेर पडली. तुझा अंदाज बरोबर आहे.ती अत्ता इकडे आहे, तिच्या वकिलांबरोबर मीटिंग करत्ये.माझ्या माणसांनी दुर्वास आणि मरुद्गण चा माग काढला, ते हटकर अॅंड हटकर वकीलांच्या ऑफिस मधे आहेत.तिथ पर्यंत मग काढून माझी माणसे पुन्हा लिफ्ट कडे निघाली तेव्हा त्याला एक उत्तान कपड्यातील सुंदरी दिसली.त्याने त्याच्या रस्त्यावर असलेल्या सहकाऱ्याकडे चौकशी केली त्या सुंदरी बद्दल तेव्हा तो म्हणाला की त्या वर्णनाची तरुणी ८३९७ नंबरच्या गाडीतून आली होती.”
“ हा मोठा ब्रेक आहे होती आपल्यासाठी ! ” पाणिनी उद्गारला. “ शंभर माणसं कामाला लाव हवी तर कनक, आपल्याला साक्षीदार हवेत, दुर्वास, मरुद्गण आणि ती शेफाली त्या वकीलांच्या ऑफिस मधून बाहेर पडले हे बघणारे. त्यामुळे रात्री तीन वाजता शेफाली ला फोन आला होता या मुद्याला ते पूरक ठरेल.मी जर सिध्द केलं की दुर्वास आणि मरुद्गण रात्री तीन ला शेफाली ला फोन करत होते तर उलट तपासणीत मी दुर्वास ला उघडा नागडा करीन कारण आधी तो म्हणाला होता मध्यरात्री ला एका आकृतीला पाहिलं आणि आता ती वेळ रात्री तीन ची आहे असा जबाब त्याने फिरवला की मी आरोप करीन की रात्री तीन वाजता यांची फोना फोनी चालू होती असं.”
“ पण दुर्वास ला न उठवता मरुद्गण ने फोन केलं असेल तर? ”-ओजस
“ तर मी विचारीन की फोन वर शेफाली जे म्हणाली की माझ्या वकिलाने सर्व व्यवस्था केली आहे त्याचा अर्थ काय.” पाणिनी म्हणाला
“ ओके पाणिनी . मी लावतो कामाला माझ्या माणसांना ”
ओजस म्हणाला आणि बाहेर पडला.
(प्रकरण बारा समाप्त)