सायलेन्स प्लीज प्रकरण २१ आणि २२(शेवटचे)
प्रकरण एकवीस
“ कोर्टाचं कामकाज कालच्या पुढे आज सुरु करावं.” न्या.वज्रम म्हणाले. “ मला वाटतं दुर्वास याची उलट तपासणी चालू होती ; मिस्टर दुर्वास, असे पुढे या आणि तुम्हाला विचारले जातील त्या प्रश्नांची उत्तरे द्या.”
दुर्वास पिंजऱ्यात आला.आपल्या साक्षीला विलक्षण महत्व आहे याची जाणीव असल्याने तो जास्तीत जास्त भाव खात होता.
“ मला एखाद-दुसरा च प्रश्न विचारायचा आहे.” दुर्वास पिंजऱ्यात येताच पाणिनी म्हणाला.
“ मला वाटतंय की काल तुम्ही साक्ष देताना असं म्हणाला होतात की तुमचं अशील मरुद्गण याच्याशी तुम्ही रात्री अकरा वाजता बोललात आणि नंतर झोपायला गेलात. बरोबर ? ” पाणिनी म्हणाला.
“ हो साधारण अकराच्या दरम्यान.” -दुर्वास
“ याचा अर्थ असा की तुम्ही साधारण अकरा वाजे पर्यंत तुमच्या अशिलाच्या खोलीत होतात ? ”
“ हो.” -दुर्वास
“ आपली मीटिंग झाल्यावर, तुम्ही तुमच्या अशिलाच्या खोलीत गेला होतात ? ” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर.”
“ आणि रात्री साधारण अकरा पर्यंत तिथेच होतात ? ” पाणिनी म्हणाला.
“ होय.”
“ तुमची खात्री आहे १००% की तुम्ही बाहेर गेला नाहीत? ”
“ नाही... मी... म्हणजे..” दुर्वास बोलताना एकदम गप्प झाला.
“ बोला की , गप्प का बसलात? ”
“ काय फरक पडतोय ? ” दुर्वास चिडून म्हणाला आणि त्याने सरकारी वकिलांकडे नजर टाकली.
“ आमची हरकत आहे. ही उलट तपासणी बरोबर मार्गावर नाही चाललेली.संबंध नसलेले प्रश्न विचारले जात आहेत.” भोपटकरउठून उभा रहात म्हणाला.
न्यायाधीशांना मात्र उत्तर ऐकण्यात खूप रस निर्माण झाला होता . त्यांनी केवळ हाताने खूण करून भोपटकरला खाली बसायला सांगितले. प्रथेनुसार ओव्हर रुल्ड असा शब्द उच्चारायचे कष्ट सुध्दा त्यांनी घेतले नाहीत.
“ आता आठवायचा प्रयत्न केला तेव्हा आठवलं की थोडया वेळासाठी मी बाहेर गेलो होतो.” नाईलाजाने स्वतःला सावरत दुर्वास म्हणाला.
“मरुद्गण पण तुमच्या बरोबर बाहेर आला होता? ” पाणिनी म्हणाला.
“ हो. ” -दुर्वास
“ घर बाहेर म्हणजे कुठे गेलात तुम्ही? ”
“ कोपऱ्या वरच्या औषधांच्या दुकानात गेलो होतो.”
“ किती वेळ होतात तिथे? ”
“ दहा मिनिटं.” –दुर्वास
“ या दहा मिनिटाच्या काळात काय केलंत तुम्ही? ”
“ ऑब्जेक्शन! ” भोपटकर कडाडला. “ सर तपासणीमध्ये वेळेचं गणित निश्चित केलं गेलं आहे.तो झोपायला कधी गेला हे सुध्दा नक्की झालंय.ते करत असताना साक्षीदाराने सायंकाळी काय केलं हे सांगितलंच होतं.जेव्हा पटवर्धन हे दाखवून देत आहेत की साक्षीदार बाहेर गेला होता आणि साक्षीदार ही ते मान्य करतोय तेव्हा पुन्हा त्या दहा मिनिटात त्याने काय केलं हा प्रश्न गैर लागू आहे.”
“ मला सरकार पक्षाची हरकत बरोबर आहे असं वाटतंय.” वज्रम म्हणाले.
“ तुम्ही त्या वेळेमधे फोन लावलात का? ” पाणिनी म्हणाला.
“ तेच ऑब्जेक्शन ” -भोपटकर
“ तोच निर्णय ” वज्रम
“ बरोब्बर रात्री अकरा वाजता तुम्ही शेफाली खोपकर हिला तिच्या खांडवाच्या घरी फोन लावत होतात त्यामुळे तुम्ही त्या वेळी विहंग खोपकर च्या घरात असूच शकत नव्हतात.ही वस्तुस्थिती आहे की नाही.?” पाणिनी म्हणाला.
“ पुन्हा तेच ऑब्जेक्शन ” -भोपटकर
“ जर आरोपीच्या वकिलांनी प्रश्न बदलून असं विचारलं की त्या वेळी हा साक्षीदार दुसऱ्या कोणाला तरी ,परगावी फोन लावत नव्हता का? तर मी त्या प्रश्नाला परवानगी देईन परंतू कोणाला फोन लावला त्याच्या नावाचा प्रश्नात उल्लेख करायची गरज नाही.” -वज्रम
“ ठीक आहे, तर मग मिस्टर दुर्वास, त्या औषधाच्या दुकानात जाऊन बरोबर अकरा वाजता तुम्ही फोन केलात की नाही? ” पाणिनी म्हणाला.
“ अकराला पाच कमी असताना केला. अकरा वाजता पुन्हा घरात आलो होतो आम्ही.” -दुर्वास
पाणिनी खुष होऊन हसला. “ दॅट्स ऑल युवर ऑनर.”
भोपटकरआणि खांडेकर एकमेकांच्या कानात कुजबुजले.” आमचं झालंय. आमचा पुढचा साक्षीदार आहे आर्या केणी. ही आरोपीची भाची आहे. आणि पटवर्धन च्या अप्रत्यक्ष अशीलासारखी आहे.त्यामुळे आमच्या दृष्टीने ती विरोधातील साक्षीदारच आहे. त्यामुळे तिला थोडे आक्रमक पणे प्रश्न विचारावे लागतील. ” खांडेकर म्हणाले.
“ पूल जवळ आल्यावर कसा ओलांडायचा त्याचा विचार करू.तेव्हाचं तेव्हा बघू. आर्या केणी, या पुढे या पिंजऱ्यात आणि शपथ घ्या. ” वज्रम म्हणाले.
आर्या चा शपथ विधी पार पडल्यावर सरकारी वकिलांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली.
“ तुमचे नाव आर्या केणी आहे आणि तुम्ही आरोपी विहंग ची भाची आहात? ”
“ हो ”
“ तुम्ही विहंग खोपकर च्या लेक व्ह्यू टेरेस या घरात राहता? ”
“ हो.” आर्या म्हणाली
“ या महिन्याच्या तेरा तारखेच्या रात्री आणि चौदा च्या सकाळी त्याच घरी होतात?”
“ हो सर ”
“ किचन मधील टेबलाच्या ड्रॉवर मधे ठेवण्यात येत असलेल्या नेहेमीच्या चाकू शी तुम्ही परिचित आहात ना? ” भोपटकरने विचारलं
“ आहे.”
“ तेरा तारखेच्या सकाळी तुम्ही तो चाकू पहिला होता का? ”
तिची नजर आपोआप खाली झुकली, तिने आपल्या दातांनी खालचे ओठ चावले.उत्तर दिलं नाही.
“ प्रश्नाचं उत्तर द्या.” वज्रम ओरडले
“ त्या चाकू सारखा दिसणारा चाकू पहिला मी.” आर्या म्हणाली
“ कुठे होतं तो चाकू? ” –भोपटकर
“ ऑब्जेक्शन ! ” पाणिनी पटवर्धन उद्गारला.
“ आम्ही दाखवून देऊ इच्छितो की तो चाकू आरोपीच्या ताब्यात होता.” खांडेकर म्हणाले.
“ तसं असेल तर त्या आधारे मी पटवर्धन याची हरकत फेटाळून लावतो.” वज्रम म्हणाले
“ उत्तर द्या.” वज्रम म्हणाले.
“ नेहेमी किचन मधल्या टेबलाच्या ड्रॉवर मधे ठेवण्यात येत असलेल्या नेहेमीच्या चाकू शी साम्य असणारा चाकू मी मामाच्या उशीखाली पहिला.” आर्या ने सावध पणे उत्तर दिले.
“ तेरा तारखेच्या सकाळी? ”
“ हो.”
“ काय केलंस तू त्या चाकूचं ? ” -भोपटकर
“ मी तो टेबलाच्या ड्रॉवर मधे ठेवला.”
“ तुझ्या मामाला तू सांगितलस का चाकू तुला सापडल्याचं ? ”
“ नाही ”
“ तू टेबलाच्या ड्रॉवर मधे चाकू ठेवल्या नंतर तो पुन्हा मामाच्या म्हणजे आरोपी विहंग च्या ताब्यात जाणार नाही याची तू काही दक्षता घेतलीस का? ” –भोपटकर
“ तेरा तारखेला संध्याकाळी मी ड्रॉवर लॉक केला ”
“ त्या नंतर पुन्हा कधी दिसला तुला तो चाकू? ” –भोपटकर
“ मला माहिती नाही.” - आर्या
“ तुला माहिती नाही? ”
“ म्हणजे मला चाकू दिसला पण तो तोच होता याची मला खात्री नाही.” -आर्या
“ सरकार पक्षाच्या पुरावा क्र.दोन कडे बघ.चौदा तारखेच्या सकाळी तू तो चाकू पाहिलास का?” –भोपटकर
“ हो... मला वाटतंय तसं ...”
“ कुठे पाहिलास? ” -भोपटकर
“ मामाच्या उशीखाली ”
“ आणि तेव्हा तो अत्ता दिसतोय त्याच अवस्थेत होता? म्हणजे त्यावरचे डाग ? ” –भोपटकर
“ हो.” - आर्या
“ जेव्हा तू तेरा तारखेला सायंकाळी ड्रॉवर लॉक केलास, तेव्हा चाकू आत होता? ” –भोपटकर
“ मला माहीत नाही ” – आर्या
“ का नाही माहीत? ” -भोपटकर.
“ कारण ड्रॉवर लॉक करताना मी आत पाहिलं नाही.”
“ तेव्हा तुझ्या सोबत कोण होतं त्यावेळी.? ” –भोपटकर
“ ऑब्जेक्शन ! ” पाणिनी ओरडला.
“ ओव्हर रुल्ड ” वज्रम नी पाणिनी ला गप्प केलं
“ मिस्टर पाणिनी पटवर्धन होते,माझ्या सोबत.” –आर्या म्हणाली
“ पुरावा क्र.दोन म्हणून सादर झालेला चाकू हा, तेरा तारखेला सकाळी ड्रॉवर मधे ठेवलेल्या चाकू पेक्षा वेगळा आहे? ” -भोपटकर
“ मला नाही तसं वाटत. तसाच आहे.” आर्या
“ चौदा तारखेला सकाळी पोलिसांना दिलेल्या जबाबात तू सांगितलं आहेस की तो, तोच चाकू होतं म्हणून.बरोबर आहे ना ? ”
वज्रम यांनी पाणिनी कडे , तो हरकत घेईल या अपेक्षेने पाहिले पण तो शांतच होता.
“ हो , मला वाटतं मी तसाच जबाब दिला होता.” आर्या म्हणाली
“ आणि आता तुम्ही म्हणताय की पुरावा म्हणून सादर करून घेतलेला चाकू हा तुम्हाला चौदा तारखेला सकाळी मामाच्या उशी खाली सापडलेल्या आणि तुम्ही ड्रॉवर मधे ठेवलेल्या चाकू सारखा आहे, तोच आहे असे नाही. तुमच्या आत्ताच्या उत्तरात आणि पोलिसांना दिलेल्या उत्तरात फरक का आहे? ” -भोपटकर
“ माझ्या उत्तरात फरक पडायचं कारण असं की जेव्हा मी विचार केला, तेव्हा माझ्या लक्षात आलं की एका सारखे दिसणारे अनेक चाकू असू शकतात.” - आर्या
“ आणि तुम्हाला जी माहिती आहे , ज्ञान आहे, त्यानुसार पुरावा म्हणून सादर करून घेतलेला चाकू आणि चौदा तारखेला सकाळी मामाच्या उशी खाली सापडलेला आणि तुम्ही ड्रॉवर मधे ठेवलेला चाकू एकच आहेत ? ” –भोपटकर
“ सकृत दर्शनी दिसायला सारखेच आहेत.” –आर्या
“ उलट तपासणी घ्या पटवर्धन. ” आव्हान दिल्या सारखे खांडेकर गुरगुरले.
पाणिनी पटवर्धन सावकाश उठला आणि शांतपणे आणि हळुवार पणे प्रश्न विचारायला लागला.
“ तेरा तारखेला सकाळी तुला मामाच्या उशीखाली कसा काय सापडला चाकू? म्हणजे तो बघावा असं कारण काय घडलं? ” पाणिनी म्हणाला.
“ मी... म्हण.. मला काळजी वाटत होती त्याची.” आर्या चाचरत म्हणाली
“ म्हणजे आदल्या दिवशी तो झोपेत चालला असला पाहिजे असं वाटण्याचं कारण होत? ”
“ हो.” –आर्या
“ तुला त्याच्या झोपेत चालायच्या शक्यतेची खात्री असायचं कारण म्हणजे त्या रात्री पौर्णिमा होती?” पाणिनी म्हणाला.
“ हो.खरं आहे.”
“ पौर्णिमेच्या रात्री झोपेत चालायची सवय असणाऱ्या व्यक्ती या अधिक आक्रमक असतात हे तुला कसे माहिती? ” पाणिनी म्हणाला.
“ मी वाचलंय तसं , पुस्तकात.”
“ शास्त्रीय माहिती विषयीच्या पुस्तकात? ” पाणिनी म्हणाला.
“ हो ”
“ कुठे मिळालं तुला असं पुस्तक ? ”
“ मी मागवून घेतलं होत ते.” – आर्या
“ ड्रॉवर ला लॉक लावण्याची क्रिया तुझ्या हातून होण्यापूर्वी तू ते पुस्तक अभ्यासलं होतंस? ”
“ हो,सर.”
“ किती दिवस आधी? ” पाणिनी म्हणाला.
“ दीड ते दोन महिन्या पूर्वी.”
“ सरकार पक्षाने पुरावा म्हणून दाखल केलेला एक चाकू आहे आणि आम्ही बचाव पक्षाने पण पुरावा म्हणून एक चाकू दाखल केलं आहे. पुरावा क्र. ‘अ. तर त्या कडे लक्ष दे आणि मला सांग की पुरावा अ म्हणून दाखल केलेला चाकू तू आधी पहिला आहेस का? ” पाणिनी म्हणाला.
“ हो सर. पाहिलाय.” -आर्या
“ हा चाकू तू खुना नंतर त्याच ड्रॉवर मधे, माझ्या सुचणे नुसार ठेवला होतास का? ”
खांडेकर एकदम ऑब्जेक्शन घेण्यासाठी उठून उभे राहिले. पण आयत्या वेळी विचार बदलून सावकाश खाली बसले.
“ हो सर. ” -आर्या
“ मला आठवतंय मी तुम्हाला सांगितलं होतं ” सरकारी वकिलांकडे पाहून हसून पाणिनी म्हणाला, “ की त्या टेबलाच्या ड्रॉवर मधे हुबेहूब तसाच चाकू ठेवायचा आणि होळकर ला दुसऱ्या दिवशी तो सापडेल अशी व्यवस्था करायची ,अशी माझी योजना होती. चाकू ओळखण्यात एवढा गोंधळ करून ठेवायचा की नेमका कोणता चाकू टेबलाच्या ड्रॉवर मधे ठेवला गेलाय ते सरकारी वकीलांना साक्षीदाराकडून वदवून घेणे शक्यच होऊ नये. सांगितलं होतं की नाही मी? ” पाणिनी म्हणाला.
हे ऐकल्यावर खांडेकर यांनी डोळे फडफडवले.क्षणभर पाणिनी काय बोलला आणि खरंच बोलला होता का हे पचवण्याचा प्रयत्न केला. न्या.वज्रम एकदम पुढे सरसावले.पाणिनी पटवर्धन ला उद्देशून काहीतरी बोलणार होते पण थांबले, डोळे विस्फारून त्यांनी त्याच्याकडे पाहिले.
भोपटकरउठून उभा राहिला. “ या प्रश्नाचं उत्तर जर साक्षीदाराने होकारार्थी दिलं तर आरोपीच्या वकिलांवर योग्य ती कारवाई करायला आम्ही मागे पुढे बघणार नाही याची जाणीव कोर्टाने त्यांना करून दयावी....” खांडेकर नी भोपटकरचा कोट ओढून त्याला खाली बसवलं.
“ उत्तर दे आर्या.” पाणिनी म्हणाला
“ हो.” आर्या म्हणाली
“ आणि मी तुला जो चाकू दिला तो बचाव पक्षा तर्फे दाखल केलेला पुरावा क्र. अ आहे ? ” पाणिनी म्हणाला.
“ हो.मला तेच वाटतंय.”
“ आणि हाच चाकू, तू चाकू टेबलाच्या ड्रॉवर मधे ठेवलास, लॉक करून? ” पाणिनी म्हणाला.
“ हो सर.”
“ पण दुसऱ्या दिवशी सकाळी तू ड्रॉवर उघडलास तेव्हा तो नव्हता? ” पाणिनी म्हणाला.
“ नव्हता.” आर्या म्हणाली.
या नंतर अगदी सहज विचारल्या सारखं दाखवत पाणिनी म्हणाला, “ गेले दीड-दोन महिने तू स्वतः झोपेत चालते आहेस हे तुला माहीत होतं तर ! ”
खांडेकर ,भोपटकरच्या कानात कुजबुजत हो ते त्यांचे पाणिनी च्या प्रश्नाकडे लक्ष गेले नाही आणि पाणिनी ने भर कोर्टात डुप्लिकेट चाकू डॉवर मधे ठेवल्याचे सांगितले या गोष्टीचा तिच्या मनावर एवढा मोठा परिणाम झाला होतं की पाणिनी पटवर्धन ने नेमका काय प्रश्न विचारला हेच इच्या लक्षात आले नाही आणि ती तंद्रीतच म्हणाली
“ हो सर.”
वज्रम ना मात्र पाणिनी चा प्रश्न आणि उत्तर बरोबर समजले. ते पुढे कलले आणि म्हणाले, “ काय उत्तर दिलंत आर्या ,तुम्ही? ”
“ हो, सर, सॉरी सर, म्हणजे नाही सर....”
“ तुला काय म्हणायचंय आर्या? ” पाणिनी म्हणाला.
“ हे काय चाललंय? ” खांडेकर उठून म्हणाले. “ बरोबर नाही ही उलट तपासणी. स्वतःच्या साक्षीदाराला गोंधळून टाकायचा हा प्रयत्न आहे. ”
“ हा साक्षीदार तुमचा आहे.माझा नाही.” पाणिनी म्हणाला. “ आणि तिच्या झोपेत चालण्याच्या सवयी बद्दल चा प्रश्न विचारून झालाय आणि तिने उत्तर ही देऊन झालंय, आता मी तिला संधी देतोय खुलासा करण्याची की तिला नेमके काय म्हणायचे आहे.” पाणिनी म्हणाला
“ आणि माझं त्याला ऑब्जेक्शन आहे.” -खांडेकर
“ ठीक आहे मी प्रश्न मागे घेतो पण तिने त्याला दिलेलं उत्तर पुरेसं बोलकं आहे आणि स्पष्ट आहे.” पाणिनी म्हणाला
खांडेकर चिडले पण नाईलाजाने खाली बसले.
“ आर्या ,अंगणातल्या त्या टेबला च्या टॉप खालचा चोर कप्पा तू नेहेमीच वस्तू लपवण्यासाठी वापरतेस का? ” पाणिनी म्हणाला.
“ हो सर.”
“ त्यामुळेच, तेरा तारखेच्या सायंकाळी किचन मधल्या टेबलाच्या ड्रॉवर ला लॉक लावल्यानंतर तू जेव्हा झोपायला गेलीस तेव्हा तुझ्या मनात सारखा हाच विचार होता की तुझा मामा झोपेत चालत असताना ड्रॉवर मधला चाकू ताब्यात घेईल,या विचारातच तू रात्री सव्वा बाराच्या सुमारास , स्वतः लॉक केलेला ड्रॉवर खरंच लॉक झालाय की नाही याची खात्री न वाटल्यामुळे, झोपेत चालत जाऊन , पुन्हा ड्रॉवर उघडून चाकू ताब्यात घेतलास आणि अंगणातल्या टेबलाच्या खालच्या चोर कप्प्यात लपवलास . खरं की नाही? ” पाणिनी म्हणाला.
“ ऑब्जेक्शन युअर ऑनर.! ” कोणताही प्राथमिक आधार नसताना, अत्यंत चुकीच्या पद्धतीने उलट तपासणी चालू आहे ही. खांडेकर गुरगुरले.
“ अजिबात नाही ! ” पाणिनी म्हणाला. “किचन मधल्या टेबलाच्या ड्रॉवर ला लॉक लावल्याचं हिने साक्षीत सांगितलं आहे.तेरा तारखेला सकाळी चाकू पहिल्याचं सांगितलं आहे आणि त्या नंतर चौदा तारखेला सकाळी पुन्हा तो पहिल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे मला उलट तपासणीत हे दाखवायचा अधिकार आहे की तिने तो चाकू चौदा तारखेला सकाळी खूप लौकर पहिला असला पाहिजे , म्हणजे जेव्हा तिने स्वतःच तो ड्रॉवर मधून काढला. ” पाणिनी ने युक्तिवाद केला.
“ अहो, पण हे तिने झोपेत केले असेल तर तिला यातले काहीच कळणार नाही. ” खांडेकर म्हणाले.
“ तसं असेल तर तिने उत्तर द्यावे की मला माहीत नाही.” पाणिनी म्हणाला
न्या.वज्रम ना पाणिनीचा युक्तिवाद पटला.ते म्हणाले, “ खांडेकर, तुमचं ऑब्जेक्शन फेटाळत आहे मी.”
“ मला खरंच माहीत नाही.” आर्या थकलेल्या आवाजात म्हणाली.
“ दॅट्स ऑल ” पाणिनी म्हणाला.
खांडेकर आणि भोपटकरपुन्हा एकमेकात कुजबुजायला लागले.वज्रम यांनी शेवटी न राहवून विचारले,
“ तुम्हाला फेर तपासणी पुन्हा घ्यायची आहे? ” वज्रम नी विचारले.
भोपटकरआणि खांडेकर एकमेकांशी बोलत होते.वज्रम आपल्याला काहीतरी विचारत आहेत म्हंटल्यावर ते एकदम उठून उभे राहून म्हणाले, “ हा अचानकच नवीन मुद्दा उपटला मधेच.आम्हाला अपेक्षित नव्हता.जर कोर्टाने सहानुभूती पूर्वक विचार केला तर आम्हाला थोडी मुदत.....”
वज्रम नी नकारार्थी मान हलवली.
खांडेकर यांचा नाईलाज झाला. “ ठीक आहे, मी विचारतो प्रश्न.” ते म्हणाले.
“ मिस आर्या केणी, मला तुमच्या साक्षीवरून जो अर्थबोध झालाय,त्या नुसार,तुम्ही हे कबूल केलंय की तुम्ही पण झोपेत चालत होता? ”
“हो ” आर्या त्रोटक पणे म्हणाली
“ तुम्हाला कळले कधी ,की तुम्हाला झोपेत चालायची सवय जडल्ये ? ” -खांडेकर
“ साधारण दीड-दोन महिन्या पूर्वी.कदाचित त्याहून जास्त.”
“ हे लक्षात कसं आलं ? ” -खांडेकर
“ मामा ने त्याची काही महत्वाची कागदपत्रे घरातच हॉल मधे टेबलावर ठेवली होती.मी त्याला सांगत होते,एवढी महत्वाची कागदपत्रे अशी बाहेर उघड्यावर ,म्हणजे कुलूप न लावता ठेऊ नको.पण त्याने ऐकले नाही आणि तोच विचार मनात ठेऊन मी झोपले.सकाळी उठून बघितले तर ती कागदपत्रे माझ्या उशीखाली, सापडली मला.” -आर्या
खांडेकर चिडून भोपटकरला उद्देशून म्हणाले, “ मी सांगत होतो , ही मुलगी कशी आहे,सावध रहा.” भोपटकरकाही बोलला नाही.खांडेकर नी पुन्हा आर्या ला विचारलं, “ तू हे सगळं आम्हाला आधी सांगितलं का नाहीस? ”
“ मला विचारलं नाही कोणी.” आर्या म्हणाली
“ आणि हे लक्षात आल्यावर तू झोपेत चालायच्या सवयी बद्दल माहिती देणार पुस्तक खरेदी केलंस? ” –खांडेकर
“ मी मागवून घेतलं ते.”
“ काय हेतू होता? ” - खांडेकर
“ माझी इच्छा होती,की अभ्यास करून घरच्या घरी माझ्यावर इलाज करू शकेन.”
“ तू त्या नंतर अधून मधून झोपेत चाललीस? ”
“ हो.”
खांडेकर हताश पणे भोपटकरकडे वळले. पाणिनी ची धूर्त नजर त्या दोघांचा ठाव घेत होती.हलक्या आवाजात भोपटकरत्यांना काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न होता.पण त्याच्याकडे दुर्लक्ष करून खांडेकर म्हणाले,
“ दॅट्स ऑल.”
“ तुम्हाला परत काही विचारायचं आहे,पटवर्धन ? ” न्यायाधीशांनी विचारलं
“ नाही युअर ऑनर. तिने दिलेल्या साक्षी वर मी पूर्णपणे समाधानी आहे.” पाणिनी म्हणाला
“ ठीक आहे, मिस केणी , तुम्ही जाऊ शकता.खांडेकर तुमचा पुढचा साक्षीदार बोलवा.” वज्रम म्हणाले.
“हर्षद गोवंडे ” खांडेकर नी नाव पुकारले.
आर्या पिंजऱ्यातून बाहेर पडताना हर्षद पिंजऱ्यात शिरत होता, वाटेत त्याची प्रेयसी,आर्या आणि त्याची नजरा नजर झाली.ती म्लान पणे हसली.
“ तुमचं नाव हर्षद गोवंडे आहे आणि तुम्ही आरोपी विहंग ला ओळखता? ” खांडेकर नी विचारलं
“होय. ”
“ तेरा तारखेच्या सायंकाळी तुम्ही विहंग च्या घरात होता?” -खांडेकर
“ हो”
“ सरकार पक्षाने पुरावा क्र.दोन म्हणून दाखल केलेला चाकू तुम्हाला दाखवतो, तो पाहून सांगा तो चाकू तुम्ही आधी पहिला होता का? ”
“ अनेकदा.” -
“ कुठे? ” -खांडेकर
“ जेव्हा मी पाहुणा म्हणून विहंग खोपकर च्या घरी उतरलो होतो तेव्हा.नाश्त्याला केलेले पदार्थ कापण्यासाठी चाकू , चमचा काटा याचा सेट नेहेमी टेबल वर ठेवलेला असायचा.”
“ तो चाकू नेहेमी कुठे ठेवला जायचा? ”
“ किचन मधल्या टेबलाच्या ड्रॉवर मधे.” - हर्षद गोवंडे
“नेमका कुठला ड्रॉवर ? ”
“ अगदी वरचा.”
“ या महिन्याच्या तेरा तारखेच्या सायंकाळी त्या ड्रॉवर जवळ जायचा प्रसंग आला का ? ” – खांडेकर
“ आला.”
“ किती वाजता ? ”
“ रात्री ९.४० च्या सुमाराला.” हर्षद गोवंडे
“ तुम्ही तेव्हा काय करत होतात तिथे? ”
“ जेवणा पूर्वी आमची पार्टी चालली होती,तेव्हा काहीतरी घ्यायला मी गेलो होतो.”
“ काहीतरी घ्यायला तुम्ही तो सर्वात वरचा ड्रॉवर उघडलात? ” -खांडेकर
“ हो सर.मला चमचे, लोणी लावण्याची सुरी वगैरे घ्यायचं होतं. ते सगळं वरच्याच ड्रॉवर मधे असायचं ठेवलेलं.”
“ त्यावेळी तो धारदार चाकू तिथे होता?”
“ नव्हता.” - हर्षद गोवंडे
“ खात्री आहे तुम्हाला? ”
“ १००% खात्री आहे.”
“ त्यावेळी ड्रॉवर लॉक केलेला होता? ” - खांडेकर
“ नव्हता.उघडाच होता.”
“ गुन्हा घडला तेव्हा तुम्ही कुठे होता? ”
“ खांडवा मधे.” - हर्षद गोवंडे
“ तिकडे कोणी जायला सांगितलं ? ”
“ विहंग खोपकर यांनी.”
“ कोणाच्या सुचने वरून ? ” - खांडेकर
“ पाणिनी पटवर्धन यांच्या ”
“त्या सायंकाळी किंवा रात्री घरातील आचारी, बल्लव, हा त्या ड्रॉवर जवळ गेला होता की नाही या बदल माहिती आहे तुम्हाला? ” - खांडेकर
“ माझ्या माहिती प्रमाणे एका प्रसंगी तो तिथे गेला होता. ”
“ त्या ड्रॉवर मधे तो चाकू नाही हे तुम्हाला कळलं,त्या आधी बल्लव तिकडे गेला होता की नंतर ? ” –खांडेकर
“ या प्रश्नाचं उत्तर न देणं मी पसंत करीन.” - हर्षद गोवंडे
“ तुम्ही काय पसंत करता याला काही किंमत नाही.के कोर्ट आहे.तुम्ही शपथेवर साक्ष देताय.उत्तर द्यावेच लागेल.”
एकदम नाराजीने आणि दबक्या आवाजात तो उद्गारला, “ आधी.”
“ मोठ्याने बोला पुन्हा. कोर्टाला स्पष्ट ऐकू जायला हवे.”
“ मी म्हणालो की मी त्या ड्रॉवर पाशी जाण्यापूर्वी बल्लव गेला होता.” - हर्षद
“ तुला कसे माहीत ते? ”
“ मी बल्लव ला पाहिले स्वतः तिथे.”
“ काय करत होता तिथे? ” – खांडेकर
“ त्याने तो ड्रॉवर उघडून ठेवला होता.तो आत काही वस्तू ठेवत होता की काढत होता ते माहीत नाही. त्याच काम झाल्यावर त्याने ड्रॉवर बंद केला आणि तो निघून गेला.” – हर्षद
“ तुम्ही त्या ड्रॉवर पाशी जायच्या आधी किती वेळ बल्लव गेला होता तिथे? ”
“ पाच च मिनिटे आधी.”
खांडेकर हर्षद च्या साक्षीवर खुष झाले. पाणिनी कडे वळून आव्हान दिल्या सारखे म्हणाले, “ तुम्ही घेऊ शकता उलट तपासणी. मिस्टर पाणिनी पटवर्धन.”
पाणिनी पटवर्धन उठून उभा राहता राहता सहज गप्पा मारल्या सारख्या अविर्भावात म्हणाला. “हर्षद, तू आणि तुझ्या आधी इथे साक्ष देऊन गेलेली आर्या , यांनी गुप्त पणे लग्न केलंय ना रे ? ”
कोर्टात जमलेले सगळे लोक ,अगदी न्या.वज्रम सहित, जे खांडेकर यांनी घेतलेल्या फेर तपासणीने एक प्रकारच्या भारावलेल्या अवस्थेत होते, त्यांच्या फुग्याला पाणिनी पटवर्धन च्या पहिल्याच प्रश्नाने टाचणी टोचली गेली आणि एकदम हवा बाहेर आल्यावर येतो तश्या आवाजात कोर्टात खसखस पिकली.
हर्षद प्रथम भानावर येत म्हणाला, “ हो सर. आम्ही केलंय लग्न.”
“ कधी केलं तुम्ही लग्न? ” पाणिनी म्हणाला.
“ मागच्या महिन्याच्या दहा तारखेला.” - हर्षद
“ कुठे केलंत लग्न? ”
“ परदेशात जाऊन केलं. ”
“ आणि ते गुप्त ठेवलं ? ”
“ हो सर.” – हर्षद
“ आणि हे लग्न झाल्यावर आर्या ने तिच्या बेडरूम ला आतून स्पिंग चे लॅच बसवून घेतले ? ” पाणिनी म्हणाला.
“ बरोबर आहे सर ”
“ त्याची एक किल्ली तुझ्याकडे होती ? ” पाणिनी म्हणाला.
हर्षद ने अस्वस्थ पणे हालचाल केली.खांडेकर यांच्याकडे पाहिले.ते उठून उभे राहिले. “ या प्रश्नाला जोरदार हरकत आहे आमची.अयोग्य प्रकारे चालल्ये ही उलट तपासणी.”
“ मी रद्द करतो हा प्रश्न.” लबाड पणे हसत पाणिनी म्हणाला. “ आधी मी या साठी योग्य पार्श्वभूमी निर्माण करायची व्यवस्था करतो आणि नंतर पुन्हा हा प्रश्न विचारण्याचा अधिकार राखून ठेवतो.”
खांडेकर सावकाश खाली बसले ,अत्ता त्यांचा विजय झाला होता पण पाणिनी नेमकी काय चाल खेळलाय याचा साधारण अंदाज आल्यामुळे ते समाधानी नव्हते.
“ तर मग तू खुनाच्या रात्री सांता बार्बरा ला गेलास ” पाणिनी म्हणाला
“ हो.”
“ आणि ती माझी सूचना होती? ”
“ हो. तुमचीच होती.” - हर्षद
“ तुझ्या बरोबर कोण होतं ? ”
“ खोपकर यांची सेक्रेटरी प्रांजल वाकनीस ”
“ आणखी कोणी ? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही ”
“ नक्की नाही? खात्री आहे तुझी? ” पाणिनी म्हणाला.
“ खात्री आहे.”
“ मला वाटतं तू शेफाली खोपकर च्या घरी गेलास? ” पाणिनी म्हणाला.
“ हा अयोग्य प्रश्न आहे प्रसंगानुरूप नाही. तो खांडवाला गेल्यावर कोणाला भेटला.कुठे गेला या गोष्टीला काहीही अर्थ नाही.” -खांडेकर म्हणाले.
“ सरतपासणीत सरकारी वकिलानीच त्याच्या कडून वदवून घेतलं की तो माझ्या सुचने नुसार खांडवा ला गेला म्हणून. त्याला हे ही विचारलं गेलंय की खुनाच्या वेळी तो कुठे होता.त्यामुळे मला अधिकार आहे की त्याचीच अधिक तपशीलात माहिती घ्यायची ” पाणिनी म्हणाला
“ ऑब्जेक्शन ओव्हर रुल्ड ” वज्रम म्हणाले.
“ उत्तर दे हर्षद, तू शेफाली खोपकर च्या घरी गेलास? ” पाणिनी म्हणाला.
“ मी गेलो.”
“ खांडवाला पोचल्यावर तू काय केलंस? ” पाणिनी म्हणाला.
“ मी शेफाली खोपकर च्या घराकडे गेलो.पटवर्धन च्या ऑफिस मधला त्यांचा सहकारी सुकृत तिच्या घरावर नजर ठेऊन होता.रात्री दोन वाजे पर्यंत तो ते काम करायला तयार होता पण दुसऱ्या दिवशी त्याला कोर्टात काम असल्याने मीच त्याला सांगितलं की तू प्रांजल ला घेऊन हॉटेल वर जा आणि आराम करा.घरावर नजर ठेवायचं काम मी करीन.मग ते दोघे सुकृत च्या गाडीने गेले . मी माझी गाडी अशा ठिकाणी लावली की मला शेफाली च्या घरावर लक्ष ठेवता येईल.दुसऱ्या दिवशी सकाळी मला सोडवायला एक माणूस सकाळी आठ ते नऊ च्या सुमाराला आला तो पर्यंत मी घरावर नजर ठेऊन होतो.” - हर्षद
“ पहाटे ३ वाजता तू शेफाली च्या घराजवळ होतास? ”
“ हो सर.”
“ काय झालं तेव्हा? ” पाणिनी म्हणाला.
“ शेफाली ला एक फोन आला.त्यांच्या लॅंड लाईन वर.”
“लॅंड लाईन वरका? ” पाणिनीने विचारलं
“ बारा तारखेच्या सकाळ पासूनच मोबाईल रेंज नव्हती संपूर्ण मध्य प्रदेशात.मोठा प्रॉब्लेम होतं म्हणे.”
“ ती फोन वर काय बोलली ते तुला ऐकू आलं का? ”
“ हो.म्हणजे तिच्या कडून होणारा संवाद.पलीकडचा काय बोलतो ते अर्थात ऐकणे शक्य नव्हतं.”
“ काय बोलणं झालं? ” पाणिनी म्हणाला.
खांडेकर उठून उभे रहात म्हणाले,“ युअर ऑनर, ज्या पद्धतीने सूचक प्रश्न विचारले जात आहेत आणि साक्षीदार त्याची उत्तरं देतो आहे,त्यावरून असं लक्षात येतंय की हा जरी आमचा साक्षीदार असला तरी तो आमच्या विरोधात गेलेला आहे.म्हणजे होस्टाईल विटनेस झालाय.जी गोष्ट आम्ही आमच्या सरतपासणीत दाखवली नाही ती उलट तपासणीत पुढे आणायचं प्रयत्न आहे पटवर्धन यांचा. ”
“ पण युअर ऑनर,” पाणिनी म्हणाला “ खांडेकर यांनीच सरतपासणीत विचारलं की खुनाच्या रात्री साक्षीदार कुठे होता म्हणून.”
“ आणि याच मुद्द्यावर तुम्हाला साक्षीदाराची स्मृती किती जागरूक आहे ते तपासून पहायचंय ? ” वज्रम नी विचारलं.
“ बरोबर युअर ऑनर ” पाणिनी म्हणाला
“ तो कुठे गेला,त्याने काय केलं. आणि पाहिलं याची तुम्ही चाचपणी करू शकता.फारतर त्याने काय ऐकलं या बद्दल.पण दुसरा माणूस काय बोलला या बद्दल नाही.” वज्रम म्हणाले. “ माझ्या या आदेशानुसार विचारा प्रश्न मिस्टर पटवर्धन.” वज्रम म्हणाले.
“ मिस्टर हर्षद, जेव्हा फोन वर दोघांचे बोलणे चालू होते तेव्हा तू कुठे होतास? ”
“ शेफाली च्या घराच्या बाहेर च्या रस्त्यावर पण पलीकडच्या बाजूला.”
“ तू ओळखतोस का तिला वैयक्तिक ? ” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ तिने स्वत: फोन घेतला का? ”
“ ऑब्जेक्शन. आधीच्याच कारणास्तव. माझ्या साक्षीदाराला प्रश्न विचारून स्वत: ला हवी ती उत्तरं काढून घेऊ शकत नाहीत पटवर्धन.” खांडेकर म्हणाले.
“ मी नक्कीच विचारू शकतो प्रश्न, खांडेकर यानीच सर तपासणीत या बद्दल विचारून मला रस्ता मोकळाच करून दिलाय. ” पाणिनी म्हणाला
“ मी ओव्हर रुल करतो ऑब्जेक्शन ” वज्रम म्हणाले. “ पटवर्धन साक्षीदाराला काय आठवत आहे याची चाचपणी करू शकतात पण पटवर्धन, हे ही लक्षात ठेवा की फोन मधले संवाद काय झाले ते विचारू नका. ”
“ तिने फोन घेतला का? ” पाणिनी म्हणाला.
“ हो ”
“ तुला ती नीट दिसली ना? ”
“ हो ”
अचानक खांडेकर उठून म्हणाले, “ जर मेहेरबान कोर्ट तयार असेल तर मी विनंती करू इच्छितो की अजून अर्ध्या तासात दुपारची जेवणाची सुटी होणार आहे, ती अत्ताच घ्यावी, मला न्यायाधीश महाराजांशी अर्धा तास चेंबर मधे बोलायचं आहे.मी हमी देतो की मिस्टर पटवर्धन ची उलट तपासणी ही जेवणाच्या सुट्टी नंतर आहे तशीच चालू राहील.आणि चेंबर मधे पटवर्धन ही माझ्या सोबत असतील.त्यांच्या अपरोक्ष मला काहीच सांगायचं नाहीये.”
वज्रम नी पाणिनी कडे पाहिले.. पाणिनी ने खुणेनेच संमती दिली.
“ कोर्ट दहा मिनिटांची विश्रांती घेत आहे ”. एवढे बोलून वज्रम त्यांच्या चेंबर मधे गेले.
“ पटवर्धन, मला वाटत आपण दोघांनी न्यायाधीशांना त्यांच्या चेंबर मधे भेटून येऊ या.”
दोघे ही त्यांच्या चेंबर मधे गेले.त्यांच्या टेबल वर कायद्याची अनेक पुस्तकं होती.त्यातले एक पुस्तक वाचण्यात ते गढले होते.सकृत दर्शनी त्यांची जोडी आत आल्याचे त्यांना आवडलं नाही असं दिसलं कारण त्यांच्या वाचनात त्यांना व्यत्यय आला असं वाटलं. त्या मुळे त्यांनी वैतागून वर पाहिलं.
“ मला भर कोर्टात, सगळ्यांच्या समोर बोलणं बरोबर वाटलं नाही म्हणून मी आत आलोय.पण पटवर्धन यांचं वागणं हे कोर्टाचा अवमान करणारं आहे.” खांडेकर अचानक म्हणाले.
“ माझं? ” पाणिनी ने आश्चर्याने विचारलं.
“ हो.तुमचं वागणं ”
“ कोणत्या संदर्भात ? ” पाणिनी म्हणाला.
“ त्या टेबलाच्या ड्रॉवर मधे डुप्लिकेट चाकू ठेवून पोलिसांची दिशाभूल करणे.” खांडेकर म्हणाले.
“ पण त्या हेतूने मी चाकू ठेवलाच नव्हता तिथे.” पाणिनी म्हणाला
“ मला तुमचा आरोप ऐकून....” वज्रम काहीतरी बोलायला गेले पण पाणिनी च्या चेहेऱ्यावर त्यांना असे भाव दिसले की ते थांबले.
“ पटवर्धन, सज्जन पणाचा आव आणू नका . आर्या केणी ने शपथ पूर्वक सांगितलंय की चाकू ठेवायची सूचना तुमचीच होती.” – खांडेकर
“ पण तिला माझ्या हेतू बद्दल काहीच माहीत नाही. ती काही दुसऱ्याच्या मनातलं ओळखणारी तज्ज्ञ नाहीये,आणि तिने तशी तज्ज्ञ म्हणून साक्ष दिलेली नाही.”
“ पण तुमचा हेतू काय होता हे तिने साक्षीत सांगितलं आहे.” -खांडेकर
“ ते मीच तिला सांगितलं होतं.” पाणिनी म्हणाला
“ पटवर्धन, आता तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की तुम्ही तिला तुमच्या हेतू बद्दल खोटचं सांगितलं ? ” वज्रम नी विचारलं.
“ अर्थात ! ” पाणिनी बेफिकीर पणे म्हणाला.
“ अहो, काय बोलताय तुम्ही ? ” खांडेकर म्हणाले.
“ मला संशय आलाच होता की ती झोपेत चालत असली पाहिजे. खांडेकर, लक्षात घ्या, तिच्याकडे आणि फक्त तिचाच कडे त्या ड्रॉवर ची किल्ली होती आणि तरीही चाकू गायब झाला होता. हां, आता कदाचित विहंग खोपकर कडे डुप्लीकेट किल्ली असू शकेल अशी शक्यता गृहित धरून मुद्दामच विहंग तुरुंगात असताना मी आर्या ची परीक्षा पाहिली.माझं मत असं आहे की झोपेत चालायची सवय असणारे लोक जेव्हा एखादा काळजीचा विषय डोक्यात ठेऊन झोपायला जातात तेव्हा ते झोपेत उठून त्या विषयावर तोडगा काढायला जातात.आर्या ने हेच केलं.तिच्या मनाने घेतलं होतं की ड्रॉवर ही काही चाकू ठेवण्याची सुरक्षित जागा नाही .त्याच विचारत ती झोपली पण झोपेत चालत पुन्हा तिने ड्रॉवर मधला चाकू काढून अंगणात मांडलेल्या एका टेबलाच्या टॉप खाली असलेल्या चोर कप्प्यात लपवला असावा असं मला वाटलं म्हणून ते खरं आहे का याची चाचपणी करण्यासाठी मी मुद्दामच हुबेहूब तशीच परिस्थिती निर्माण करण्यासाठी तिलाच दुसरा चाकू ड्रॉवर मधे लपवायला सांगितला.पूर्वी सारखंच पुन्हा घडलं, म्हणजे ती पुन्हा चाकूचा विचार करतच झोपली.रात्री झोपेत चालत तिने पुन्हा मी ठेवायला दिलेला चाकू ड्रॉवर मधून बाहेर काढला आणि टेबलाच्या टॉप खाली असलेल्या चोर कप्प्यात लपवला. तो तिथे असेल असा मला अंदाज होता , कारण आर्या ने पूर्वी तिचा कप तिथे लपवला होतं हे मला माहीत होते,म्हणून मी कनक ओजस ला सांगितलं होतं की त्या चोर कप्प्यात चाकू सापडण्याची शक्यता आहे,तू बघ.आणि त्याने मला दिलेल्या माहिती नुसार खरोखर तो तिथे ठेवलेला होता.”
“ म्हणजे पटवर्धन ......” खांडेकर काहीतरी बोलणार होते पण पाणिनी ने त्यांना थांबवलं.
“ खांडेकर खटला जसजसा पुढे जिल् तसं मी दाखवून देईन की बचाव पक्षाने सादर केलेला पुरावा क्र अ. म्हणजेच मी आर्या ला ठेवायला दिलेला चाकू होता, जो टेबलाच्या चोर कप्प्यात ठेवलेला कनक ओजस च्या माणसांना सापडला.” पाणिनी म्हणाला
“ अरे , म्हणजे मिस्टर पटवर्धन, तुम्ही हे दाखवून देण्याचा प्रयत्न करताय की आर्या ने राजे ला मारलं? ” खांडेकर म्हणाले.
“ अजिबात नाही.माझा असा काहीही विचार नाहीये.” पाणिनी म्हणाला. “ माझी केस हळूहळू आपोआप पुढे जाईल आणि तुम्हाला उलगडा होत जाईल.मी अत्ता जे सांगितलं ते माझ्या विरुध्द तुम्ही केलेल्या कोर्टाच्या अवमान केल्याच्या आरोपाला मी दिलेलं स्पष्टीकरण होतं. मी केवळ आर्या ची परीक्षा घेत होतो, त्यासाठी तिथे डुप्लीकेट चाकू ठेवला. मला हे सर्व तुम्हाला सांगायच होतंच म्हणूनच मी खांडेकर बरोबर आत यायला तयार झालो.” पाणिनी म्हणाला आणि कोणाकडेही लक्ष न देता वज्रम च्या चेंबर मधून बाहेर पडला.
वज्रम , पाणिनी च्या बाहेर जाणाऱ्या आकृती कडे बघत राहिले, त्यांची नजर भडकलेल्या खांडेकर कडे गेली तेव्हा मोठया मुश्किलीने त्यांनी पुस्तकात डोके खुपसून फुटलेले हसू दडवले.
” कोर्ट पुन्हा चालू होताच त्यांनी पटवर्धन ला उद्देशून विचारलं. “ हर्षद ची उलट तपासणी चालू होती ” वज्रम म्हणाले.
“ हो ” पाणिनी म्हणाला
“ त्यांना पुढे येऊ दे , तपासणी चालू करा. ” वज्रम म्हणाले.
“ जर आपली हरकत नसेल तर मला हर्षद ची उलट तपासणी चालू असताना मधेच मरुद्गण ला केवळ एकच प्रश्न विचारण्यासाठी पुन्हा बोलवायच आहे.” पाणिनी म्हणाला, “ आणखी एक, मरुद्गण च्या साक्षीच्या वेळी हर्षद इथे नको.”
“ ठीक आहे तशी व्यवस्था करतो.बोलवा मरुद्गण ला. ” -वज्रम
मरुद्गण पिंजऱ्यात हजर झाला.
“ मला एकच सांग मरुद्गण, ” पाणिनी म्हणाला “ रात्री तू आणि दुर्वास थोडया वेळेसाठी खोपकर च्या घराच्या बाहेर पडलात आणि शेफाली ला फोन लावलात तेव्हा नक्की किती वाजले होते? रात्रीचे तीन? ”
“ या प्रश्नाचं उत्तरं दुर्वास यांनी आधीच दिलंय आणि शपथेवर दिलंय, पटवर्धन, रात्री अकराच्या सुमाराला फोन झाला, आणि आम्ही लगेच झोपायला घरात आलो.”
“ शेफाली ने जर साक्षीत सांगितलं की रात्री तीन वाजता फोन आला म्हणून तर ? ” पाणिनी म्हणाला.
“खोपकर च्या घरी मोबाईल ला रेंज नाही म्हणून आम्हाला बाहेर जाऊन २४ तास चालू असलेल्या हॉस्पिटल च्या आवारातील औषधांच्या दुकानातून फोन करावा लागला . तुम्ही दुकानात जाऊन विचारू शकता मिस्टर पटवर्धन, आम्ही किती वाजता फोन लावला ते. आम्ही ऐकलेल्या बातमी नुसार संपूर्ण मध्य प्रदेशात बारा तारखेपासून मोबाईल ला रेंज नाही.कुठल्याही कंपनीच्या.” मरुद्गण ठाम पणाने म्हणाला.
“ दॅट्स ऑल ” पाणिनी म्हणाला “ आता पुन्हा हर्षद ला बोलवा.”
हर्षद पुन्हा पिंजऱ्यात हजर झाला.
“हर्षद तुझी लिंक तुटू नये म्हणून मी तुला मगाशी विचारलेला शेवटचा प्रश्न आणि तुझं उत्तर तुला वाचून दाखवण्याची कोर्टाच्या क्लार्क ला सूचना करतो.” पाणिनी म्हणाला
क्लार्क ने त्यांचे प्रश्न उत्तरं वाचून दाखवलं.
“ तिने फोन घेतला का? ” पाणिनी म्हणाला.
“ हो ” हर्षद चं उत्तर
“ तुला ती नीट दिसली ना? ” पाणिनी म्हणाला.
“ हो ” हर्षद चं उत्तर
“ तर मग हर्षद ,आपण पुढे चालू करू. ” पाणिनी म्हणाला
“ यस् सर.” - हर्षद
“ आर्या ने तिला स्वत:ला झोपेत चालायची सवय आहे हे लग्न ठरण्या पूर्वी संगितलं होतं की लग्न झाल्यावर? ” पाणिनी म्हणाला.
“ आमचं लग्न अगदी नुकताच झालंय, मला वाटत लग्ना पूर्वीच गप्पा मरताना केव्हा तरी ती बोलली होती.... नाही,नाही, मला वाटत नंतरच बोलली. पण मला तिने त्या विषयीच्या पुस्तकांची माहिती खूप आधीच विचारली होती. ” – हर्षद
“ झोपेत चालताना हातात जवळ दिसेल ती वस्तू हातात घेऊन चालायची? ”
“ मी बघितलं नाही पण मला तिने संगितलं.” - हर्षद
“ काय करायची हातातल्या वस्तूंचं ? ”
“ युअर ऑनर, काय बालिश पणा आहे हा? फार भरकटत चालली आहे ही उलट तपा
सणी.” खांडेकर म्हणाले. “ आमचे याला ऑब्जेक्......” खांडेकर यांचे बोलणे अर्धवट राहिले. वज्रम यांनी त्यांना खूण करून खाली बसायला सांगितलं.
“ उत्तरं द्या पटवर्धन च्या प्रश्नाचं.”
“ अंगण्यात नाश्ता करण्यासाठी काही टेबल्स मांडलेली आहेत, त्या पैकी एका टेबलाचा टॉप निघतो. आत चोर कप्पा आहे.त्यात ती वस्तू ठेवायची. मला लग्ना पूर्वी लिहिलेल्या चिठ्या कोणाला कळू नयेत म्हणून ती तिथेच ठेवायची. ” हर्षद लाजल्या सारखा होत म्हणाला
“ लग्ना पूर्वी तुम्हाला ती झोपेत चालत असतानाच चिठ्या द्यायची? ” पाणिनी ने मिस्कील पणे विचारले आणि कोर्टात हशा झाला.वज्रम सुध्दा लोकांना गप्प करायच्या ऐवजी हसण्यात सहभागी झाले.
“ नाही..नाही.. तसं नाही, म्हणजे ... घरात कोणाला कळू नये म्हणून निरोप देणे घेणे या साठी चिठ्या ठेवायची आमची ती गुप्त जागा होती.” – हर्षद
“ आर्या ने तुला सांगितलं होतं की मी म्हणजे पाणिनी पटवर्धन ने तिला ड्रॉवर मधे डुप्लीकेट चाकू ठेवायला सांगितलं होतं ? ” पाणिनी म्हणाला.
हर्षद जरा अडखळला.
“ उत्तरं दे. तू नाही सांगितलस तर मी पुन्हा आर्या ला बोलावून शपथेवर सांगायला लाऊ शकतो.” पाणिनी म्हणाला
“ सांगितलं होतं तिने.” - हर्षद
“ आणि तिने हे ही सांगितलं असेल तुला की पटवर्धन यांची सूचना आहे की मी हे कोणालाही सांगायचे नाही.?” पाणिनी म्हणाला.
हर्षद अवघडल्या सारखा हसला. “ हो म्हणाली होती तसं.पण मी तेव्हा तिला सांगितलं की हे माझ्या पुरतेच गुप्त राहील. ” -हर्षद
“ तुम्ही गुप्त पणे लग्न केल्या नंतर आर्या ने तिच्या बेड रूम ला आतून वेगळे लॅच बसवून घेतले होते ? ”
“ हो. मला म्हणाली होती ती ”
“ ती म्हणाली म्हणून तुला कळलं ? ” पाणिनी म्हणाला.
“ अर्थात.”
“ म्हणजे दुसऱ्या कोणत्या प्रकारे तुला माहिती झाली नव्हती ही गोष्ट ? ” पाणिनी म्हणाला.
“ म्हणजे कशी ? ” हर्षद ने जरा वैतागून विचारले.
“ म्हणजे तुला तिने लॅच ची डुप्लिकेट किल्ली नव्हती दिली? तू तिच्या बेडरूम मधे ती किल्ली लाऊन कधी गेला नाहीस? ” पाणिनी म्हणाला.
“ ऑब्जेक्शन मिलोर्ड.” खांडेकर कडाडले. “ काय चाललंय हे? नवरा बायकोतील खाजगी व्यवहार पटवर्धन चव्हाटयावर आणताहेत. मी म्हणतो नवरा या नात्याने त्याच्या कडे किल्ली असणे यात गैर काय? ”
“ खांडेकर च ते मान्य करत आहेत तेव्हा मला साक्षीदाराकडून वेगळ उत्तर नको.” पाणिनी म्हणाला
“हर्षद, आर्या ने तुला सांगितलं होत का की विहंग त्याच्या मालमत्तेतील काही भाग त्याच्या सावत्र भावाला म्हणजे राजे ला देणार आहे, तसे मृत्यू पत्र विहंग ने केलंय किंवा करायच्या विचारत आहे? ” पाणिनी म्हणाला.
“ लग्न पूर्वी अनेक घरगुती विषयावर आमच्या गप्प व्हायच्या त्यात हा विषय आला असेल.” -हर्षद
“ खात्री नाही ? ” पाणिनी म्हणाला.
“ नक्की आठवत नाही.” - हर्षद
“ पण १००% हा विषय आलाच नाही तिच्या बोलण्यात याची खात्री देऊ शकतोस? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही, तशी खात्री नाही देता येणार.”
“ आर्या आणि तुझं लग्न झालं तर विहंग त्याच्या मृत्यू पत्रात त्याची कोणतीही मालमत्ता आर्या च्या नावाने करणार नाही याची कल्पना आर्या ने तुला दिली होती ? ” पाणिनी म्हणाला.
या प्रश्नावर हर्षद चा गमावलेला आत्म विश्वास त्याला पुन्हा आल्याचे चेहेऱ्यावर दिसले. “ मला हे आर्या ने नाही सांगितले, उलट पक्षी मीच आर्या करवी विहंग ला असं करायची सूचना दिली. ” - हर्षद
“ कारण काय? ” पाणिनी म्हणाला.
“ मी आर्या ला भविष्यात मिळणाऱ्या पैशावर डोळा ठेऊन लग्न करतोय अशी विहंग ची समजूत होवू नये म्हणून.” - हर्षद
“ ओह ! ” पटवर्धन उद्गारला. “ म्हणजे तुमचं लग्न झालं तर आर्या ला विहंग ची मालमत्ता मिळणार नव्हती पण लग्न होण्या पूर्वी विहंग ने तिच्या नावाने मोठा भाग ठेवला होता. ”
“ असेल, मला माहीत नाही.ठेवला असला तरी त्या मृत्युपत्रात बदल करून लग्ना नंतर आर्या ला मिळणार नाही अशी व्यवस्था करायला मी आर्या तर्फे विहंग ला कळवले होते. ”
“ तुला माहीत होत की आधी आर्या च्या नावाने किती रक्कम ठेवली होती? ” पाणिनी म्हणाला
“ नेमकी रक्कम माहीत नाही पण आर्या वारस होती त्याची.” – हर्षद
“ हर्षद, ” पटवर्धन च्या तोंडातून वेगळाच आवाज आला, हर्षद ने दचकून त्याच्याकडे पाहिलं.
“ तुम्ही दोघांनी गुप्त पणे लग्न करायचं हेच कारण होत? ” पटवर्धन कडाडला.
“ म्हणजे? ” – हर्षद
“ तुला आर्या ची संपत्ती हवी होती , विहंग ने तुझ्याच सुचने प्रमाणे मृत्युपत्रात बदल केला असता तर लग्ना नंतर ती मिळाली नसती म्हणून तुम्ही लग्न झाल्याचे कोणालाच कळवले नाही ? ”
“ धादांत खोटं बोलताय तुम्ही पटवर्धन.माझ्या डोक्यातही जे नव्हते ते भरवताय कोर्टाच्या मनात.” – हर्षद
“ खांडवाला तू माझ्या सांगण्यावरून गेलास ? ” पाणिनी म्हणाला.
“ हो.”
“ किती वेळ लागला पोचायला? ” पाणिनी म्हणाला.
“ दीड ते पावणे दोन तास साधारण.”
“ कशासाठी गेला होतास? ” पाणिनी म्हणाला.
“ तुम्हीच सांगितलं होतं शेफाली च्या घरावर नजर ठेवायला. ” – हर्षद
“ कधी पासून नजर ठेवली होतीस घरावर? ”
“ मी तिथे पोचल्या नंतर मध्यरात्री पर्यंत सुकृत नजर ठेऊन होता नंतर मी त्या कामाला लागलो.” – हर्षद
“ तुला सोडवायला ओजस चा माणूस येई पर्यंत तू सतत घरावर नजर ठेऊन होतास? एकदाही घर दृष्टीआड झालं नाही? ” पाणिनी म्हणाला.
“ नाही.”
“ या काळात ती अजिबात बाहेर पडली नाही? ”
“ नाही.” – हर्षद
“ रात्री तीन ला फोन आला ते बोलणे तुला स्पष्ट ऐकू येत होते? ” पाणिनी म्हणाला
“ शेफाली काय बोलत होती ते मी माझ्या वहीत लिहूनच घेतलंय.”
“ पलीकडून कोण बोलत होतं ? ” पाणिनी म्हणाला.
“ ते समजायला मार्ग नाही ”
“ पण शेफाली ने मरुद्गण चे नाव फोन वर घेतले? ”
“ हो.” – हर्षद
“ थोडया वेळे पूर्वी मरुद्गण इथे साक्ष देऊन गेला ,तू त्याची साक्ष ऐकायला नव्हतास.त्याने पुराव्यानिशी सांगितलंय की त्याने रात्री तीन वाजता फोन केला नाही शेफाली ला.टेलीफोन कंपनीचे रेकोर्ड सुध्दा दाखवतंय की इंदूरच्या मेडिकल शॉप मधून केला गेलेला फोन रात्री अकरा वाजता आहे.”
“ त्याने दुसरी कडून केला असेल रात्री तीन वाजता पुन्हा.” – हर्षद
“ रात्री तीन ला शेफाली ला आलेला फोन दुसरी कडूनच केला गेला होता हर्षद ” पाणिनी म्हणाला. “ शेफाली ला आलेल्या कॉल रेकॉर्ड वरून आम्ही ते तपासलंय. , तो इंदूर मधून केला गेला होता आणि तो तू केला होतास ! ”
“ धादांत खोटा आरोप करताय ” हर्षद ओरडला. लगेच खांडेकर त्याच्या मदतीला धावले. “ ही उलट तपासणी फार म्हणजे फारच भरकटत चालल्ये, युअर ऑनर. विहंग ला निर्दोष शाबित करता येत नाही म्हणून आमच्या साक्षीदाराला गोवण्याचा प्रयत्न चाललाय. ” खांडेकर म्हणाले.
“हर्षद, सुकृत रात्री बारा वाजे पर्यंत शेफाली च्या घरावर लक्ष ठेऊन होता.तो गेल्यावर तू एकटाच पहारा देत बसलास. प्रत्यक्षात तू तिथे असतास तर रात्री तीन वाजता तिला फोन आल्यावर तासाभराने म्हणजे पहाटे चार च्या सुमाराला ती घरातून बाहेर पडून इंदूरला यायला निघाली तेव्हा तुला ती का दिसली नाही? ” खांडेकरच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत पाणिनी म्हणाला. “ म्हणजे एकतर तुला ती बाहेर जाताना दिसली असूनही आम्हाला आणि या कोर्टाला तू खोटं सांगितलस की ती कुठेही बाहेर पडली नाही म्हणून किंवा दुसरी शक्यता ही आहे की ती बाहेर पडली तेव्हा तू तिच्या घराबाहेर नव्हतासच मुळी..” पाणिनी म्हणाला
“ कुठे होता मग हर्षद त्यावेळी ? ” खांडेकर नी विचारलं.
“ तो विहंग चा खून करण्यासाठी त्याच्या कार ने इंदूर ला आला होता ! ” पाणिनी म्हणाला
“सुकृत रात्री बारा वाजे पर्यंत शेफाली च्या घरावर लक्ष ठेऊन होता.तो गेल्यावर हर्षद पहारा देत बसणार होता.प्रत्यक्षात सुकृत गेल्यावर लगेच तो त्याच्या कार ने इंदूर ला आला, साधारण दोन-अडीच वाजे पर्यंत तो इंदूरला पोचला असावा.आर्या ने झोपेत चालत अंगणातल्या टेबला च्या चोर कप्प्यात ठेवलेला चाकू त्याने घेतला, राजे ला ठार केलं, आणि विहंग च्या खोलीत जाऊन त्याच्या उशीखाली तो ठेवला. लगेच तो आपली कार घेऊन बाहेर पडला .तो पर्यंत तीन वाजायला आले होते, शेफाली घरी आहे की बाहेर पडली याचं त्याला टेन्शन होतं.खात्री करण्यासाठी त्याने तिला तिच्या लॅँड लाईन वर तीन वाजता मरुद्गण बोलतोय असे सांगून फोन केला. तिने फोन घेतला तेव्हा त्याला खात्री पटली की ती अजून घरीच आहे, त्यामुळे मी रात्रभर पहारा देत होतो आणि ती घरीच होती असं तो बेधडक पणे सांगू लागला.”
“ त्यानेच फोन केल्यामुळे त्या दोघांत झालेले संवाद त्याला माहीतच होते. त्याने ते वहीत टिपून ठेवले आणि पहारा देत असताना मी ते संवाद ऐकले असं साक्षीत सांगितलं. आणि शेफाली ने सुध्दा ते बरोबर असल्याचे मान्य केले.” पाणिनी ने खुलासा केला.
“ फोन झाल्या झाल्या लगेच पुन्हा तो कार ने खांडवाला पोचला आणि पुन्हा शेफाली च्या घरावर पहारा द्यायचे नाटक करू लागला.परंतू त्याला हे माहिती नव्हते की तीन वाजता फोन झाल्या नंतर शेफाली चार च्या सुमाराला बाहेर पडून इंदूरला यायला निघाली होती, आणि त्याच वेळी हर्षद त्याच्या कारने इंदूर वरून खांडवाला निघाला होता. थोडक्यात खुनाच्या वेळी मी इंदूर मधे नव्हतोच, मी, खांडवाला होतो असे तो सिध्द करू शकत होता, त्याला अॅलीबी मिळाली होती.
“ आमचा साक्षीदार कशाला खून करेल राजे चा? ” खांडेकर नी विचारलं. पण त्यांच्या स्वरात ऑब्जेक्शन घेण्यापेक्षा उत्सुकता जास्त होती.पाणिनी चा तर्काच्या आधारे केलेला खुलासा त्यांना पटायला लागला होतं पण अहंकार त्यांना ते मान्य करू देत नव्हता.
“ राजे आणि आर्या हे दोनच कायदेशीर वारस होते विहंग च्या मालमत्तेचे.विहंग राजे ला काही हिस्सा देणार आहे हे त्याला माहीत होते. बाकीचा हिस्सा आर्या ला मिळणार होता.राजे च्या खुनामुळे हिश्यातला एक वाटेकरी कमी होणार होता.शिवाय आरोप विहंग वर आल्यामुळे विहंग ला मृत्युदंडाची शिक्षा झाल्यावर, आर्या म्हणजे पर्यायाने हर्षद च मालक होणार होता. कदाचित भविष्यात त्याने आर्या ला सुध्दा संपवले असते आणि एकटा मालक झाला असता.”
“ मिस्टर पटवर्धन , ” वज्रम म्हणाले, ते आता अत्यंत उत्सुकतेने पाणिनी पटवर्धन चा तार्किक दृष्टया अभेद्य असा युक्तिवाद ऐकत होते. “ टेबलाच्या चोर कप्प्यात चाकू असेलच हे त्याला कुठे माहीत होते? आणि तो चाकू तिथे नसता तर? ”
“ युअर ऑनर,” पाणिनी म्हणाला, “ आपण स्वत: ही मामा सारखेच झोपेत चालतो हे आर्या ने त्याला सांगितले होते.त्याने साक्ष देताना ते कबूल केलंय. तिने त्याला हे ही सांगितलं होतं की तिने झोपेत असताना चाकू काढून अनेकदा टेबलाच्या चोर कप्प्यात लपवला होता.तिच्या या सवयीचा लाभ घेऊन टेबलाच्या चोर कप्प्यात तिने लपवलेला चाकू त्याने एक दिवस विहंग च्या उशीखाली ठेऊन दिला होता.दुसऱ्या दिवशी विहंग सहित सगळ्यांनाच असं वाटलं होत की विहंग ने च ते केलंय झोपेत. तिची ही सवय घरात अन्य कोणाला माहीत नव्हती. सगळ्यांचा फक्त विहंग वरच संशय असायचा.याच गोष्टीचा फायदा घेण्याचे हर्षद ने ठरवलं.खुनाच्या रात्री आर्या झोपेत चालत ड्रॉवर मधील चाकू अंगणातल्या टेबलाच्या चोर कप्प्यात ठेवेल हा त्याचा अंदाज होता तो बरोबर निघाला. ”
“ पण त्याच रात्री आर्या तो चाकू तिथे ठेवेल हे त्याला कसे माहीत झाले? ” न्यायाधीशांनी विचारलं.
“ झोपेत चालण्याची सवय असलेला माणूस झोपण्यापूर्वी जे विचार आणि जी काळजी मनात ठेऊन झोपतो, त्या काळजीला दूर करणारी हालचाल त्याच्या नकळत झोपेत घडते. मी हर्षद ला शेफाली वर नजर ठेवण्यासाठी खांडवाला पाठवले तेव्हा त्याच्या मनात खुनाचा डाव शिजत असणार.आर्या ला त्याने ड्रॉवर मधील चाकू पासून विहंग ला धोका आहे,याच्या वर आरोप येऊ शकतो असे मनात भरवले.त्याचा परिणाम म्हणून तोच विचार आणि काळजी करत ती झोपली आणि त्याच्या अंदाजा नुसार बरोबर घडले. मामा विहंग च्या हातून काही गुन्हा घडू नये या काळजीने ती झोपली पण त्या काळजीवर उत्तरं शोधण्यासाठी झोपेतच आर्या ने ड्रॉवर उघडून आतला चाकू काढून अंगणातल्या टेबलाच्या चोर कप्प्यात सवयी प्रमाणे दडवून ठेवला, हेतू हा की विहंग च्या हाती तो लागू नये आणि त्याच्या हातून खून होवू नये.हर्षद ला तो बरोब्बर सापडला आणि त्याने राजे ला संपवला अर्थात त्या रात्री तिथे चाकू मिळाला नसता तर हर्षद ने दुसरी काहीतरी व्यवस्था केली असती पण त्याच रात्री त्याने राजे ला मारलं असतं हे नक्की कारण त्याच्या कडे अॅलिबी होती, आपण खांडवामधे होतो हे तो सिध्द करू शकत होता. ” पाणिनी म्हणाला
“ अत्यंत तर्क शुद्ध पण काल्पनिक कथा कथन ! ” खांडेकर ओरडले.
“ मी खात्री शिवाय कधीच तर्क करत नाही.” पाणिनी म्हणाला “ मी अत्ता शेफाली खोपकर ला पुन्हा पिंजऱ्यात बोलावण्याची विनंती करतो आणि त्या नंतर हर्षद ने रात्री तीन ला इंदूरमधील ज्या पब्लिक फोन मधून शेफाली खोपकर ला फोन लावला त्या दुकानदाराला समन्स काढण्याची विनंती करतो.तो आल्यावर रात्री तीन ला फोन करायला आलेली व्यक्ती म्हणजे हर्षद च होता हे ओळखेल.आणि शेफाली खोपकर साक्ष देईल की तिच्या घरावर नजर ठेवली जात आहे हे तिला माहीत होते. रात्री सव्वा बारा वाजे पर्यंत कोणीतरी कार मधे बसून होते त्या नंतर तिथे कोणीही नव्हते. ”
खांडेकर काहीतरी बोलायला उठले, पण हर्षद ने च त्यांना थांबवले.
“ कोणालाही बोलावण्याची गरज नाही.मी गुन्हेगार आहे. ” तो म्हणाला.
खांडेकर असहाय्य होऊन खाली बसले.
“ हे कोर्ट विहंग खोपकर यांची निर्दोष मुक्तता करत आहे. हर्षद विरुध्द पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करण्याचा आदेश हे कोर्ट देत आहे. ” वज्रम म्हणाले.
( प्रकरण २२ आणि कादंबरी समाप्त)