Get it on Google Play
Download on the App Store

सुभाषित माला पुष्प १

प्रास्ताविक 
                                       
एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक व भाषा कमनीय, सौष्ठवपूर्ण होईल   
                       
पुष्प१

साहित्यसंगीतकलाविहीनः साक्षात्पशुः पुच्छविषाणहीनः |
तृणं न खादन्नपि जीवमानस्तद्भागधेयं परमं पशूनाम् ||

ज्याला साहित्य, गाणं किंवा एखादी कला येत नाही, तो माणूस म्हणजे शेपूट आणि शिंग नसलेला पशूच होय. तो गवत न खाता जगतो हे पशूंच मोठंच भाग्य आहे.

हा श्लोक तुलनात्मक अतिशय सोपा आहे यातील पहिले दोन चरण सहज उच्चारता येण्याजोगे आहेत .जरी पहिला चरण नुसता उच्चारला (साहित्य संगीत कला विहीन:) तरीही आशय समजण्यासारखा आहे .जरी कला येणे असा शब्दप्रयोग असला तरी त्याचा अर्थ अक्षरश:न घेता त्यातील भाव लक्षात घ्यावयाचा आहे . साहित्य कला संगीत यामध्ये जरी रुची असली तरीही तो मनुष्य म्हणवून घेण्यास लायक आहे असे म्हणता येईल  .कला असंख्य आहेत वादन अभिनय वक्तृत्व संघटन व्यायाम शिक्षण  चित्रकला  इत्यादी यामध्ये कमी जास्त गती किंवा अावड असेल तरीही त्याला मनुष्य म्हणता येईल .सुभाषित म्हणी यामागील भावना लक्षात घ्यावयाची असते.शब्दश:अर्थ लक्षात घ्याव्यायाचा नसतो .कोणतेही वाक्य लिखित किंवा बोललेले  त्याचा कीस काढण्याची शब्दश:अर्थ घेण्याची प्रवृत्ती काही मुलांमध्ये असते .अशा प्रवृत्तीला आवर घातला पाहिजे असे मला व्यक्तीश: वाटते .ही प्रवृत्ती चुकीची आहे असे शांतपणे मुलांच्या लक्षात आणून दिले पाहिजे . 

१८/८/२०२१©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmail.com