Get it on Google Play
Download on the App Store

सुभाषित माला पुष्प १७

प्रास्ताविक                                        

एक नवीन कल्पना घेऊन काही पोस्ट लिहिण्याचा विचार आहे .बऱ्याच वेळा अापण बोलताना म्हणींचा वापर करतो त्याच प्रमाणे संस्कृत सुभाषितांचाहि वापर करतो . संपूर्ण सुभाषित न वापरता  त्यातील एखाद्या तुकड्याचा वापर सामान्यत:केला जातो .सुभाषितामुळे अत्यंत कमी शब्दांमध्ये फार मोठा आशय आपल्याला सहज  मांडता येतो .ज्याला दोन ओळींमधील गुह्यार्थ असे म्हणता येईल असा भावहि या संस्कृत सुभाषिता मध्ये असतो .इंग्लिश माध्यमामुळे ,  व मराठी माध्यम असले तरी अनेक कारणांनी  वाचनसंस्कृतीचा मुलांमध्ये र्‍हास  झाल्यामुळे  बर्‍याच वेळा उच्चारलेल्या म्हणीचा किंवा संस्कृत सुभाषिताचा अर्थ मुलांना कळत नाही .  पालकांनी मुलांना या सुभाषितांची ओळख करून दिल्यास  या प्रयोगामुळे  संस्कृत सुभाषिते माहीत होतील  .बोलण्यामध्ये जास्त अर्थपूर्णता  लालित्य व सौंदर्य निर्माण होईल .जीभ लवचिक  भाषा कमनीय व सौष्ठवपूर्ण होईल

                   १
कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन |
मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोस्त्वकर्मणि ||

कर्तव्य बजावण्यावर तुझा अधिकार आहे पण फलप्राप्तीवर कधीच नाही. फळावर लक्ष ठेवून काम करू नकोस. आळशीपणा [कर्तव्य टाळण्याकडे] वर प्रेम करू नकोस.

हा गीते मधील अत्यंत सुप्रसिद्ध श्लोक आहे.फळावर लक्ष न ठेवता कधी कुणी काम करील का?--पास होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवू नको जास्त मार्क मिळवण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवू नको . अभ्यास करणे तुझे कर्तव्य आहे ते करीत राहा .--या प्रमाणे वागण्याचे ठरवले तर अभ्यास जोमाने होईल का ?--आपला पक्ष निवडणूक झाल्यावर सत्तेवर यावा या फळाची अपेक्षा धरू नको .फक्त निवडणूक लढत रहा .प्रचार करीत रहा .--असे करून निवडणूक जोमाने लढली जाईल का ?-- आपला धंदा जास्त जास्त चांगला व्हावा स्पर्धेमध्ये आपण वरतीवरती चढत जावे प्रत्यक्ष शिखर काबीज करावे . असे ध्येय डोळ्यासमोर ठेवू नको फक्त काम करीत रहा .-जीव तोडून व्यक्ती काम करील का ? -संशोधनातून अपेक्षित शोध लागावा हे ध्येय डोळ्यासमोर ठेवू नको फक्त प्रयोग करीत राहा .---संशोधक जोमाने संशोधन करील का? कर्मावर तुझा अधिकार आहे .कर्तव्यावर तुझा अधिकार आहे.फळावर नाही .आळशी पणा करू नकोस. कर्तव्यापासून ढळू नकोस . कर्तव्य करीत राहा --. प्रमोशन मिळावे यासाठी काम करू नकोस . फक्त काम करीत रहा .---व्यवहारात असे कधी शक्य आहे काय ?आळशीपणा करू नकोस.कर्तव्यच्युत होऊ नकोस . फळाची आशा धरू नकोस . फक्त कर्तव्य बजावीत राहा .आपण असे कधी वर्तन करतो का ?कोणी सांगितले म्हणून आपण असे वागू शकू का ?असे असेल आणि ते आहेच तर या गीतेतील श्लोकाचा खरा अर्थ काय असावा ?

कर्तव्य कोण ठरविणार धर्म , धर्म प्रमुख, समाज प्रमुख ,पंथ, पक्ष, नक्की कोण ?फळ कोण ठरविणार ?ध्येय कोण ठरविणार? वरील पैकी कोणी? की स्वतः ?कर्तव्य काय?फळ काय? आळशीपणा करायचा की नाही ?हे सर्व आपण स्वतःच ठरवीत असतो .असे असेल तर आळशीपणा करू नकोस .कर्म करीत राहा.फळाची आशा धरू नकोस . हे सर्व सांगणारे कोण ?मला याचा जो अर्थ जाणवत आहे तो पुढील प्रमाणे .कर्तव्य मी ठरवितो .मी म्हणजे बालपणापासून विविध मार्गाने जे संस्कार होतात त्याचा संग्रह म्हणजे मी .या संग्रहित संस्कारांबरोबर काही वांशिक संस्कार सुप्त रूपाने असतात .जर पुनर्जन्म मान्य केला तर प्रत्येकाचे संचित म्हणून काही सुप्त संस्कार असतात असे मानता येईल .हे संस्कार( म्हणजेच धारणा ) कर्तव्य निश्चिती करतात . त्याचप्रमाणे फळ व फळाची अपेक्षाही करतात.फळ मिळत नसेल तरीही तू कर्तव्यच्युत होऊ नको म्हणून हे संस्कारच सांगतात.हा जो मी चा खेळ चाललेला आहे तो मीने मीपासून अलग होऊन पाहावयाचा आहे . साक्षित्व(साक्षित्व म्हणजेच निवडशून्य जागृतता होय)असेल तर हे सर्व होऊ शकेल  .मनाची जर अशी बैठक असेल तर फल अपेक्षा न करता कर्तव्य- रत रहाणे शक्य होईल .कोणत्याही वाक्याचा अर्थ लावताना तो संदर्भ रहित लावता कामा नये .गीतेमध्ये दुसरीकडे सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ असेही म्हटलेले आहे .कृष्ण धनंजयाला सांगतो की पार्था तू उठ , आणि युद्धाला तयार हो या सगळ्यांना मी अगोदरच ठार मारलेले आहे.तू निमित्त मात्र आहेस .येथे मी म्हणजे नियती आहे.नियतीने प्रत्येकाचा एक जीवनपट आखलेला आहे .आणि तो अपरिहार्य आहे .हे सर्व संदर्भ लक्षात घेतले तर श्लोकाचा अर्थ स्पष्ट होतो .फळ-अपेक्षा व त्यासाठी कर्म स्वाभाविक आहे .फळ मिळेल किंवा न मिळेल कर्तव्यात कुचराई करता कामा नये .नियतीने आखलेल्या मार्गाने आपण जात आहोत .या सर्वामध्ये जर आपण साक्षीभूत असू तर कशाचाच आपल्याला दोष लागणार नाही .यश व अपयश यांचा स्वीकार समबुद्धीने केला जाईल .मी मी म्हणून आपण जे करतो त्याकडे मीने अलिप्तपणे पाहिले पाहिजे .

       स्मरणीय.
  १)कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन) 

१६/९/२०१८©प्रभाकर  पटवर्धन 
pvpdada@gmailcom