Get it on Google Play
Download on the App Store

१ भुताटकीग्रस्त जुना वाडा

               वाड्यामध्ये नवीन भाडेकरू आलेले पाहून लोकांना आश्चर्य वाटले .तो वाडा भुताटकीचा वाडा म्हणून प्रसिद्ध होता.तिकडे संध्याकाळ झाल्यानंतर कुणीही जाण्याला धजत नसे. गावात त्या वाड्याबद्दल कितीतरी अफवा पसरलेल्या होत्या .तिथे किती भुते आहेत यावर गावाचे एकमत नव्हते .कुणी एक म्हणे कुणी दोन म्हणे कुणी तीन म्हणे. संख्येबद्दल जरी मतभेद असले तरी भूत कि्वा भुते आहेत याबद्दल एकमत होते.कुणी प्रत्यक्ष भूत पाहिले आहे का म्हणून विचारले असता सर्व नन्नाचा पाढा म्हणत असत .जास्त खोलात जाऊन एखाद्याने चौकशी केली तर जा स्वतः पाहून या आणि आम्हाला सांगा असे तिरसट उत्तर दिले जाई.वाडा निदान शंभर  वर्षे तरी जुना असावा .बांधकाम अतिशय भक्कम होते .सर्वत्र सागवानी लाकूड वापरलेले होते.मधून मधून शिसवी लाकडांचाही वापर केलेला होता .भक्कम तुळया,मजबूत चिरेबंदी काम, मोठा प्रचंड दरवाजा, असे सर्व काही भक्कम काम होते .वाड्याला प्रशस्त अंगण चारी बाजूंनी होते. चारी बाजूला गर्द आमराई होती .फक्त दुपारचे तिथे सूर्यकिरण येत असत .एरवी आमराईतून जे काही सूर्यकिरण पडत तेवढेच वाडा पाहात .

               हा वाडा गावात जुना वाडा म्हणून ओळखला जाई.नवा वाडा गावाच्या दुसऱ्या टोकाला होता .तिथे इनामदार राहात असत .ही गोष्ट स्वातंत्र्यपूर्व काळातील आहे .ज्यांची इनामे किंवा संस्थाने होती त्यातील काही ब्रिटिश सरकारने खालसा केली तर काही चालू होती .चालू असलेल्या इनामांपैकी हे एक इनामदार होते.हल्लींचे इनामदार सुमारे साठ वर्षांचे होते .एकोणीसशे पंचवीस सालातील ही गोष्ट आहे. हल्लींच्या इनामदारांच्या आजोबांना दोन मुले .थोरले भवानराव तर धाकटे विश्वासराव .भवानरावांचा निर्वंश झाला .ब्रिटिश सरकारने सर्व जमीन विश्वासरावांच्या नावावर करण्या ऐवजी फक्त निम्मे जमीन म्हणजे पाचशे एकर विश्वासरावांच्या नावावर केली. विश्वासरावांचे चिरंजीव उत्तमराव हल्ली नव्या वाड्यात गावांच्या दुसऱ्या टोकाला राहात असत .उरलेली भवानरावांच्या मालकीची पाचशे एकर जमीन खालसा केली .स्वाभाविक वाडाही सरकारच्या मालकीचा झाला .सरकारने सरकारी खात्यातील जे लोक त्या गावात नोकरीवर येत त्यांना तो वाडा राहण्यासाठी देण्याचा  प्रयत्न केला परंतु गावापासून दूर तिथे कुणीही राहायला तयार नसे .मोठा प्रशस्त वाडा भोवताली चौफेर आमराई  एकांतवास हे सर्व पाहून कुणीही तिथे राहण्याला तयार नसे.गावात कुठे तरी बिर्‍हाड करून ते रहात असत.तो वाडा रिकामाच राही. त्या वाड्याबद्दल खऱ्या किंवा खोटय़ा अफवा पसरलेल्या होत्या .

               गावात नवीन तलाठी बदलून आले होते .सरकारने नेहमीप्रमाणे त्यांना तो वाडा राहण्यासाठी दिला .हे तलाठी धाडसी होते .त्यांचा भुताखेतांवर विश्वास नव्हता . गावात दोन तीन खोल्यांमध्ये दाटीवाटीने राहण्यापेक्षा या प्रशस्त वाडय़ात राहणे त्यांनी पसंत केले .पूर्वीच्या तलाठ्यांना ऑफिस म्हणून हा वाडा दिला जाई .परंतु या वाड्यात सर्व दप्तर ठेवणे रोज नियमितपणे येणे जाणे त्रासदायक असल्यामुळे सर्व तलाठी आपल्याच घरी ऑफिस सुरू करीत .नवीन तलाठी इथे आल्यानंतर त्याचे ऑफिसही जुन्या वाड्यात सुरू झाले .लोकांची तलाठ्याकडे नेहमीच काहीना काही जमिनीची कामे असतात .त्यासाठी आता नाईलाजाने लोकांना वाड्यावर येणे भाग पडले .गावातून वाड्यापर्यंत जो रस्ता होता तिथेआता लोकांच्या येण्याजाण्यामुळे व्यवस्थित पायवाट दिसू लागली.पूर्वी लोकांना तिकडे जाण्याची जी भीती वाटे तीही हळूहळू कमी होऊ लागली .

               तलाठ्याकडे येणारे लोक त्यांना खोदून खोदून विचारीत .इथे तुम्हाला काही वेगळे दिसते का ?दिसले का? काही निराळा अनुभव आला का ?त्यावर नवीन तलाठी छे: काहीही नाही तुम्ही उगीचच घाबरत होता असे सांगत असत.नवीन तलाठ्यांची पत्नीही त्यांच्यासारखीच धाडसी होती .तिला गावातील बायकांनी अनेक गोष्टी सांगितल्या तरी तिकडे तिने लक्ष दिले नाही .ती व दोन मुले तिथे आनंदाने राहात असत.असेच सहा महिने गेले .एके रात्री तलाठीच्या पत्नीला एक भयानक स्वप्न पडले .स्वप्नात त्यांचा नवरा धारदार वस्तरा घेऊन त्यांचा व त्याच्या मुलांचा गळा कापत आहे.जिकडे तिकडे रक्त उडाले आहे अशा स्वरूपाचे ते स्वप्न होते .तलाठी बाई घाबरून उठल्या .त्यांचे अंग घामाने ओले चिंब झाले होते .त्या थरथर कापत होत्या .त्यांनी शेजारी झोपलेल्या नवऱ्याकडे पाहिले .तलाठी साहेब गाढ झोपेमध्ये होते .त्यांनी त्याना हलवून उठविले.पत्नीची दयनीय कंपनीय अवस्था पाहून तलाठ्याने विचारले की असे कोणते भयानक स्वप्न तुला पडले .तिने नवऱ्याला भीत भीत त्यांना पडलेले स्वप्न सांगितले .

               त्यांचा नवरा वस्तऱ्याने दाढी करीत असे व.गावातील लोकांनी वाड्याबद्दल पिकविलेल्या अफवा, त्यामुळे त्यांना बहुधा तसे स्वप्न पडले असावे.तू त्या स्वप्नावर विशेष विचार करू नकोस झोप म्हणून तलाठ्याने त्यांना आश्वस्त केले .दोन तीन दिवस ते स्वप्न त्यांच्या मनात घोळत होते .त्यांना रात्री झोपताना थोडी भीती वाटत असे .नंतर तलाठीबाई ते स्वप्न विसरल्या .सर्व काही नेहमीप्रमाणे चालू झाले .नंतर पुन्हा त्यांना तसेच स्वप्न पडले .यावेळी त्या आपल्या नवऱ्याजवळ काहीही बोलल्या नाहीत .दर दोन तीन दिवसांनी तसेच स्वप्न पडू लागले .मग मात्र त्या घाबरल्या.आपण गावात राहायला जाऊ म्हणून त्यांनी नवर्‍याजवळ हट्ट धरला.

               तलाठ्याने त्यांची मन:स्थिती ओळखली.गावात जागा पहाण्याला सुरुवात केली .मनासारखी जागा मिळत नव्हती . त्यामुळे त्यांना त्या वाड्यात राहणे भाग होते .एक दिवस खुद्द तलाठ्याला तेच स्वप्न पडले .तोही आपल्या बायकोजवळ त्याबद्दल काही बोलला नाही.त्याने दुसऱ्या  दिवशी आजच्या आज येथून दुसरीकडे जायचे असे ठरविले . परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही .

               

               तलाठ्याकडे काही कामासाठी गावातील लोक दुसऱ्या दिवशी आले होते .त्याना सगळीकडे सामसूम दिसली .आत जाऊन पाहतात तो तलाठ्याची पत्नी व मुले यांचा गळा चिरलेला होता तर खुद्द तलाठ्याने सुरा खुपसून आत्महत्या केली होती .सर्व गाव हादरला .ताबडतोब जवळच्या पोलीस ठाण्याकडे एक माणूस पाठविण्यात आला .पोलीस आले. तपास सुरू झाला.तलाठ्याने वेडाच्या भरात बायकोचा व मुलांचा गळा कापून स्वतः आत्महत्या केली.असा रिपोर्ट तयार करण्यात आला व केस बंद करण्यात आली .

               त्या वाड्याबद्दल असलेली गूढता व भिती आणखी वाढली .तिकडे दिवसाचे सुद्धा कुणीही जात नसे.अशीच काही वर्षे गेली .हळूहळू ती घटना लोक विसरले .एक पिढी गेली.गाव वाढले.वस्ती वाढली. गावातच पोलीस ठाणे आले.सरकारने पोलीस ठाण्याला तोच वाडा दिला .वाड्यातच तीन चार भाग पाडून एक पोलिस ठाणे म्हणून तर उरलेले पोलिसांना राहण्यासाठी म्हणून दिले .थोड्याच दिवसात दक्षिणेकडील भागात राहणाऱया पोलीस कुटुंबाला तसे स्वप्न पडू लागले.

               पोलिस इन्स्पेक्टर हुषार होते .त्यांनी पूर्वीच्या फायली शोधून काढल्या .त्यात त्यांना पूर्वीच्या तलाठ्याची सर्व केस मिळाली.वाड्यातील विशिष्ट भागातील पोलीस दाम्पत्याला तशा प्रकारचे स्वप्न पडते असे त्यांना आढळून आले .त्यांनी ताबडतोब त्या भागातील पोलीस कुटुंबाला दुसरीकडे हलविले .तसेच काही महिने गेले .नंतर कुणालाही तसे स्वप्न पडले नाही .त्याअर्थी वाड्याच्या दक्षिण भागामध्ये काहीतरी गडबड असली पाहिजे असा तर्क त्यांनी केला .ते स्वतः धाडसी होते .रात्री त्या विभागात एकटेच झोपण्याचा त्यांनी निर्णय घेतला.दोन चार दिवस गेल्यावर त्यांना पुन्हा त्याच प्रकारचे स्वप्न पडले.वाड्याच्या या भागात काहीतरी रहस्य आहे ते शोधून काढण्यासाठी तांत्रिक शक्तीचा उपयोग केला पाहिजे असे त्यांच्या लक्षात आले . 

              त्यांच्या ओळखीचे एक तांत्रिक होते .त्या तांत्रिकाला त्यांनी आपल्या जबाबदारीवर बोलवून घेतले .वाड्याच्या इतर भागांमध्ये काहीही होत नाही. फक्त दक्षिणेकडच्या विशिष्ट भागामध्ये अशी स्वप्ने पडतात त्यावरून तिथे काहीतरी असले पाहिजे असे स्वाभाविक अनुमान इन्स्पेक्टरने काढले होते .तांत्रिकाने पाहणी केल्यावर तोच निष्कर्ष काढला. यासाठी वाड्याचा जुना इतिहास माहीत करून घेतला पाहिजे असे त्यांच्या लक्षात आले .जवळजवळ साठ सत्तर  वर्षांपूर्वी अठराशेसाठमध्ये काय घडले ते माहित असणारा कुणीतरी पाहिजे होता .आसपासच्या गावांमध्ये तपास करताना त्यांना एक नव्वद वर्षांचा म्हातारा मिळाला. त्याने पुढील हकीगत सांगितली .

              भवानराव उंचापुरा दणकट  माणूस होता .इनामदार म्हणून त्याचा   पंचक्रोशीत वचक होता .त्याच्या पहिल्या दोन बायकांना मूल नव्हते .त्या तशाच मूल न होता झिजून झिजून मेल्या.नंतर त्याने साठ वर्षांचा असताना  तिसरी बायको  केली .ती केवळ सोळा वर्षांची मुलगी होती .तिला दोन तीन वर्षांनी मुलगा झाला .भवानरावाना खूप आनंद झाला.एक दिवस त्यांना पोस्टमनने एक पाकीट आणून दिले .त्यात मुलगा तुमचा नाही असे एक वाक्य लिहिलेली चिठ्ठी होती. इनामदार नेहमी घोड्यावरून आपल्या वतनामध्ये फिरत असत .जिल्ह्याच्या गावी जातो दोन दिवसांनी कामे झाल्यावर येईन असे सांगून ते एक दिवस बाहेर पडले .त्याच रात्री गुपचूप ते वाड्यावर आले .वाड्यावर त्यांना आपली बायको घरच्या गड्याच्या मिठीमध्ये सापडली .रागाच्या भरात त्यांनी आपली बायको गडी व मुलगा यांचा गळा चिरला .ब्रिटिश सरकारचे राज्य नुकतेच आले होते.त्यांच्या राज्यात तीन तीन खून सहन होण्यासारखे नव्हते . त्यांचा दरारा निर्माण होणे गरजेचे होते .त्यानी भवानरावांना पकडण्यासाठी सैनिक पाठविले.सैनिक आपल्याला पकडण्यासाठी येत आहेत हे कळताच भवानराव परागंदा झाले .ते फरार झाले .त्यानंतर ते कुणालाच सापडले नाहीत .दिसलेही नाहीत . 

              म्हाताऱ्याकडून एवढी हकीगत कळल्यानंतरही पडणारी  स्वप्ने तलाठ्याचे झालेले खून याचा उलगडा होत नव्हता.आता इन्स्पेक्टरची खरोखरच कसोटी होती .ज्या अर्थी त्या भागात राहणाऱ्यांना विशिष्ट स्वप्ने पडतात ,आणि केव्हा तरी त्यातील पुरुषांकडून सर्वांचा गळा चिरला जातो, त्या अर्थी त्या विभागात कुठे तरी भवानरावांचा संचार असावा,असे अनुमान इन्स्पेक्टरने काढले .जरी एकदाचं गळा चिरल्याची घटना घडली असली तरी जर एखाद्याचे तिथे जास्त वास्तव्य झाले तर त्याची पुनरुक्ती होण्याचा संभव  होता .त्या भागात कुठे तरी भवानरावांचे अवशेष शिल्लक असले पाहिजेत .त्या दृष्टीने इन्स्पेक्टरनी त्या भागाची पाहणी सुरू केली .त्यांना तळघरात जाण्याचा एक छुपा भिंतीतील मार्ग सापडला.

              बरोबर एक दोन पोलीस घेऊन व पूर्ण काळजी घेऊन इन्स्पेक्टर त्या गुप्त मार्गाने तळघरात उतरले .तिथे त्याना एक माणसाचा सांगाडा सापडला .तो बहुधा भवानरावांचाच असावा . पकडण्यासाठी सैनिक आल्यावर भवानरावानी तळघरांमध्ये आश्रय घेतला असावा.तिथे भुकेने ,हार्टअॅटॅक येऊन ,किंवा अन्य काही कारणाने, त्यांचा मृत्यू झाला असावा .त्या भागात राहणाऱ्या व्यक्तीच्या स्वप्नात येऊन ते त्यांनी केलेल्या गोष्टींची पुनरुक्ती करीत असत .किंवा पुरुषाच्या अंगात येऊन ते घरातील सर्वांना ठार मारीत असत.असा निष्कर्ष  इन्स्पेक्टरने काढला.इन्स्पेक्टरने त्या सांगाडय़ाला रीतसर मंत्राग्नी दिला. त्यानंतर त्या भागात स्वतः इन्स्पेक्टर आपल्या कुटुंबासहित राहण्याला गेले.नंतर इन्स्पेक्टरना तश्या प्रकारचे कोणतेही स्वप्न पडले नाही .

              इन्स्पेक्टरची बदली झाली त्यानंतर अनेक इन्स्पेक्टर आले आणि गेले .नंतर अलीकडच्या काळात वाड्याचे रिनोव्हेशनही झाले.

              भवानरावांचा,पडणार्‍या स्वप्नांचा, वाड्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला.

१५/२/२०१९©प्रभाकर  पटवर्धन