४ झपाटलेला वाडा
अमोल एक नामांकित चित्रकार होता .पोर्ट्रेट लँडस्केप दोन्ही प्रकारची चित्रे तो काढीत असे.त्याची अनेकदा प्रदर्शने भरत असत.त्याची चित्रे साधारण एक लाखांच्या पुढे विकली जात असत.लँडस्केपमध्ये त्याचे वैशिष्ट्य होते . त्यासाठी त्याला जिथे निसर्ग सौंदर्य आहे अशा ठिकाणी जावे लागत असे .कुठेही मनोहारी सृष्टीसौंदर्य आहे असे त्याला कळले की तो तिथे जाऊन प्रथम पाहणी करीत असे .तो लोकेशनच्या शोधात स्वतःही जीपने सर्वत्र भारतामध्ये हिंडत असे.चांगल्या लोकेशन पाहून तिथे तो आठ दहा दिवस मनाचे समाधान होईपर्यंत तंबू ठोकत असे .किंवा जवळच एखादी चांगली जागा पाहून तिथे तो राहात असे .
एक दिवस त्याला चांगली लोकेशन मालवण जवळ आहे म्हणून सांगितले .मालवण पासून पंचवीस मैलावर समुद्रकिनाऱ्याला दाट झाडी असलेले एक जंगल होते .याठिकाणी डोंगररचना अत्यंत मनोहारी होती .मोठा तलाव होता .जंगल संपल्यावर समुद्रकिनारा होता .समुद्र किनाऱ्यावर डोंगर रचनाही फार सुरेख होती .महिना दोन महिने राहून आठ दहा लँडस्केप काढता येतील असे त्या मित्राने सांगितले होते .म्हणून पाहणी करण्यासाठी अमोल निघाला होता.जीपने सर्वत्र हिंडल्यावर त्याचे पूर्ण समाधान झाले .आता प्रश्न राहण्याच्या जागेचा होता .त्यासाठी जवळच्या गावात त्याने आपली जीप एका हॉटेलसमोर उभी केली .नाष्टा करता करता त्याने हॉटेल मालकाला जवळ कुठे रहाण्याची सोय होईल का म्हणून विचारले .जंगलाजवळ एक वाडा आहे त्यामध्ये जर मालकाने परवानगी दिली तर तुमची राहण्याची सोय होईल म्हणून त्याने सांगितले .
हॉटेलमधून बाहेर पडून तो जीपमध्ये बसणार एवढ्यात एक जण हॉटेल बाहेर आला .त्याने साहेब म्हणून हाक मारली .अमोलने त्याच्याकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहिले .जवळ येऊन त्याने साहेब तो वाडा झपाटलेला आहे तिथे राहू नका म्हणून सांगितले .अमोलने असे तुम्ही का म्हणता असे विचारता त्याने पुढील प्रमाणे सांगितले.तिथे काय आहे माहित नाही परंतु तिथे राहणारा एक दोन दिवसातच आपले चंबूगबाळे आवरून पळ काढतो असा अनुभव आहे.किंवा त्याला थंडी भरून ताप येतो आणि अॅम्बुलन्समधून हलवावे लागते असेही सांगितले .एखादा चार आठ दिवस तसाच राहिला तर केव्हातरी तो बेशुद्ध सापडतो . जागा धोकादायक आहे असे त्याने सांगितले .सूचना दिल्याबद्दल धन्यवाद असे म्हणून अमोल त्या वाड्याच्या मालकाकडे गेला.
अमोल बारा गावाचे पाणी प्यायलेला होता .केव्हा केव्हा जंगलात त्याने रात्र रात्र एकट्याने काढली होती .मालकाने अल्प किमतीत त्याला वाडा दिला .त्यानेही अमोलला वाड्याबद्दल सतर्क केले .अमोल आपल्याबरोबर एक नोकर घेऊन येणार होता.तो नोकर हरकाम्या स्वरूपाचा होता .वाड्याची साफसफाई त्याने पाहिली असती .नाष्टा व दोन वेळच्या जेवणाचा डबा यांची व्यवस्था करणे आवश्यक होते .वाडय़ाच्या मालकाने ती जबाबदारी आपल्याकडे घेतली .फक्त संध्याकाळी सहाच्या आत तुमच्याकडे डबा पोचविला जाईल त्यानंतर कुणीही तिकडे येणार नाही कारण गावातले लोक तिकडे जायला घाबरतात असे तो म्हणाला .नाष्टा व जेवण दोन डबे एकदमच सकाळी नऊ वाजता द्यावे .रात्रीचा डबा सहाच्या अगोदर कडीला अडकवून ठेवावा .अशी योजना ठरली .कारण एकदा लँडस्केप काढण्यासाठी दूरवर गेल्यावर सहाच्या आत वाड्यावर परतण्याची शक्यता फार कमी होती.
चार दिवसांनी मी येथे राहायला येईन आणि पंधरा दिवस राहीन असे अमोलने सांगितले . चार दिवसांनी अमोल त्याचे नेहमीचे किट घेऊन वाड्यावर आला.त्याच्या बरोबर त्याचा नोकर बजाबा होता .अमोल जवळ रायफल होती .शिवाय पिस्तुलही होते .तो कराटेमध्ये प्रवीण होता.त्याला कसलीही भीती कधीही वाटत नसे.कोणत्याही संकटाला तोंड देण्यास तो तयार असे.
रोज सकाळी डबे घेऊन ते दोघेही जंगलात निरनिराळ्या साईटवर जात असत .एखाद्या ठिकाणी त्याला चित्र काढण्यास चार चार दिवस लागत.तर काही ठिकाणी तो एका दिवसातच आपला मुक्काम हलवत असे .रोज रात्री दोघेही जेवून झोपत असत.वाड्यावर वीज होती .जवळच विहीर होती. त्यावर पंप होता .पंप सुरू केल्यावर पाण्याच्या टाक्या भरत असत .नळ सर्वत्र फिरवलेले होते. एके काळी तो वाडा गजबजलेला होता .तिथे टुरिस्ट येऊन आनंदाने राहात असत .वर्षभरापूर्वी एकाएकी तिथे भुताटकीचा प्रादुर्भाव झाला .
एक वर्षापूर्वी आलेला टुरिस्ट सकाळी बेशुद्धावस्थेत सापडला .
त्यामागे काही अज्ञात अनाकलनीय अघोरी कारण असेल असे कुणालाही वाटले नाही .
नंतर आलेल्या एका टुरिस्टने दोन दिवसांतच तेथून घाबरून पलायन केले .रात्री चित्रविचित्र आवाज येतात भिंतीवर सावल्या दिसतात असे सांगून त्याने पलायन केले .
आणखी एका टुरिस्टला रात्री फार ताप भरला आणि त्याला शहरातून अॅम्बुलन्स बोलावून हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावे लागले .
तेव्हापासून तो वाडा बदनाम झाला .त्याची पूर्वीची रया गेली .तिथे राहण्यासाठी कुणीही येईना .नक्की काय झाले हे कुणालाही सांगता येईना.त्या वाड्यांमध्ये हडळ खवीस समंध चेटकीण इत्यादी राहतात अशी आवई उठली .तिथे कुणी टुरिस्ट येईना.गावातीलही कुणी तिकडे संध्याकाळनंतर फिरकत नसे.
आज जवळजवळ दीड वर्षानंतर एक टुरिस्ट सर्व हकिकत ऐकूनही तिथे राहण्यास तयार झाला होता .
अमोलचे पहिले आठ दिवस चांगले गेले .भूत वगैरे एक आवई आहे असे त्याला वाटू लागले.तिथल्या सृष्टीसौंदर्यात तो रममाण झाला होता. लँडस्केपसाठी इतक्या जागा त्याला मिळाल्या की इथे निदान एक महिना सहज राहावे लागेल असे त्याचे मत होते.सुरुवातीला पंधरा दिवसांसाठी घेतलेला वाडा निदान महिनाभर तरी पाहिजे म्हणून त्याने वाड्याच्या मालकाला सांगितले.नेहमी तो उशाखाली भरले पिस्तूल ठेवून झोपत असे.
नवव्या दिवशी रात्री झोपलेला असताना अमोलला आपल्या शेजारी गादीवर कुणीतरी बसलेले आहे असे वाटले .त्याने डोक्याजवळील स्विच दाबला तरी प्रकाश पडेना.लाइट गेलेले होते .तरीही एक किंचित तेजाळलेली बाईची आकृती आपल्या गादीवर शेजारी बसलेली आहे असे त्याला दिसले.काळोख असूनही ती बाई आपल्याला कशी दिसते याचे आश्चर्य अमोलला वाटले.बाई कसली ती तरुणीच होती.तिने नउवारी नेसलेली होती.अंबाडा घातलेला होता .अंबाडय़ावर तिने एक गुलाबाचे फूल खोचलेले होते.अमोलने हाताने तिला पकडण्याचा प्रयत्न केला .त्याचा हात हवेतून आरपार गेला कुणाचाही स्पर्श त्याला झाला नाही.तरीही ती सुंदरी त्याला तिथे बसलेली दिसत होती .ती तिथून उठली आणि एका भिंतीकडे चालू लागली .आणि भिंतीत अदृश्य झाली .तिची चाल डौलदार होती.तिच्या पायात पैंजण होते त्यांचा आवाज छुमछुम येत होता.एवढ्यात वीज आली व दिवा लागला .आपल्याला स्वप्न पडले की भास झाला .आपण जागे आहोत की अजूनही स्वप्नात आहोत ते अमोलला कळेना.
दुसऱ्या रात्री झोपलेला असताना पुन्हा त्याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली .फक्त भिंतीमध्ये अदृश्य होताना त्या बाईने मागे वळून पाहिले .त्याला आपल्याकडे बोलाविले .दुसरा एखादा असता तर तो गर्भगळीत होऊन दुसऱ्या दिवशी तिथून पळून गेला असता किंवा बेशुद्ध झाला असता किंवा तापाने फणफणला असता .कदाचित त्याच्या डोक्यावरही परिणाम झाला असता.परंतु अमोल कच्च्या गुरूचा चेला नव्हता. भिंतीजवळ जाऊन तिथे एखादा चोर दरवाजा आहे की काय याची त्याने कसून तपासणी केली .तिथे त्याला काहीही आढळून आले नाही .
एका रात्री तो जागा राहून निपचित पडून राहिला .कोण येते कुठून येते कसे येते ते त्याला पाहायचे होते . डोक्याजवळचा दिवा त्याने चालू ठेवला होता .रात्री बाराच्या ठोक्याला बरोबर लाईट गेले आणि त्या भिंतीतून किंचित प्रकाश येऊ लागला .त्यामधून ती बाई एकदम प्रगट झाली. पैंजणाचा आवाज करीत त्याच्या बेडपर्यंत आली.तो जागा आहे .तिची वाट पाहात आहे. हे तिच्या लक्षात आले होते. भिंतीकडे खुणा करून ती काही तरी त्याला सांगण्याचा प्रयत्न करीत होती . तिला नक्की काय सांगायचे आहे ते अमोलला समजत नव्हते .पुढे दोन तीन दिवस त्याचीच पुनरावृत्ती होत होती .ती मुलगी भिंतीजवळ उभी राहून भिंतीत सारखा हात दाखवीत असे .एक दिवस तिने हाताने खणण्याचा अभिनयही केला.
असे आणखी दोन तीन दिवस गेल्यावर एकाएकी अमोलच्या डोक्यात प्रकाश पडला.ती बाई तिथे खणण्यास सांगत होती .तिथे काही तरी पुरलेले आहे ते उकरून काढा असे ती सांगत होती.दुसऱया दिवशी अमोल वाड्याच्या मालकाला भेटण्यासाठी गेला . त्याने त्याला तिथे काय अनुभव आला ते सांगितले .ती भिंत पाडून आपण काय सापडते ते पाहूया असे तो म्हणला.मालक आपल्याला काहीतरी होईल म्हणून घाबरत होता .अमोलने त्याच्या जवळ फक्त परवानगी मागितली .बाकी सर्व मी व बजाबा बघून घेऊ म्हणून त्याने सांगितले .मालक तयार होत नाही असे पाहून त्याने वाडा खरेदी करण्याची तयारी दाखविली .एकदा बला जाऊदे म्हणून मालकाने अगदी स्वस्तात तो वाडा अमोलला विकला .नंतर भिंत पाडण्यासाठी तिथे खणण्यासाठी कुणीही मजूर उपलब्ध होईना .शेवटी अमोलने स्वतःच कंबर कसली .तो व बजाबा यांनी ती भिंत पाडली .
जुन्या वाड्यांची ती भिंत भरपूर जाड होती .भिंत पाडल्यावर त्यामध्ये काही हाडे मिळाली .हाडे जुळवली असताना एक मनुष्याकृती निर्माण झाली .डोक्याची कवटीही तिथे होती.अमोलने फोन करून त्याचा फॉरेन्सिक डिपार्टमेंट मधला मित्र बोलावून घेतला .त्याने शास्त्रशुद्ध पाहणी केल्यावर तो सांगाडा एका तरुण मुलीचा आहे असे सांगितले.त्या रात्री अमोलला स्वप्न पडले . ती तरुणी पुन्हा स्वप्नात आली .तिने मला मुक्ती द्या म्हणून सांगितले .अमोलला त्याचा अर्थ लक्षात आला .त्याने दुसऱया दिवशी गुरुजींना बोलावून शास्त्रशुद्ध पद्धतीने त्या सांगाड्यावर अग्निसंस्कार केला .
नंतर ती भिंत पुन्हा बांधून घेतली .या सर्व गडबडीमध्ये जवळजवळ एक पंधरवडा गेला .त्यानंतर अमोलने पुन्हा त्याचे लँडस्केप काढण्याचे काम सुरू केले .तिथे जवळजवळ तो दोन महिने नंतर होता .नंतर त्याला एकदाही ती बाई प्रत्यक्ष किंवा स्वप्नात दिसली नाही .
कुणीतरी त्या बाईला भिंतीत चिणले होते त्यामुळे ती येणाऱ्या प्रत्येकाला माझी सुटका करा म्हणून विनवीत असे .त्याचा अर्थ न कळल्यामुळे प्रत्येकाची घाबरगुंडी उडे.परिणामी ताप येणे बेशुद्ध होणे इत्यादी प्रकार होत .अगोदरच्या कालावधीत म्हणजे वर्षांपूर्वी तिथे असे प्रकार का होत नसत त्याचा उलगडा करता येणार नाही .कारण तज्ञांच्या मतानुसार तो सांगाडा दोनशे वर्षांपूर्वीचा होता .मध्यंतरी तो आत्मा काही कारणाने सुप्तावस्थेत होता .वर्ष दीड वर्षापूर्वी तो एकदम जागृतावस्थेत आला .आणि तेव्हापासून तिथे येणाऱ्या टूरिस्टना त्याने विनवण्या करण्यास सुरुवात केली .त्याचा अर्थ कुणालाही न कळल्यामुळे सगळे घाबरून गेले होते .आणि नंतर नाना प्रकारच्या अफवा त्या वाड्यासंबंधी उठल्या होत्या .
अमोलने नंतर तो वाडा संपूर्ण पाडून तिथे एक चांगल्यापैकी हॉटेल बांधले.तिथे त्याने एक विश्वासातील मॅनेजर नेमला आहे .तो सर्व कारभार पहातो .हॉटेल अगदी झोकात चालले आहे .
४/१/२०१९©प्रभाकर पटवर्धन