Get it on Google Play
Download on the App Store

१ खून की आत्महत्या (भाग १ व २)

युवराजांकडे आज शामराव सकाळीच ब्रेकफास्टसाठी आले होते .बरेच दिवसात दोघांची भेट झाली नव्हती .त्यामुळे आज त्यांना मुद्दाम गप्पा मारण्यासाठी युवराजानी बोलाविले होते .निरनिराळ्या विषयांवर दोघांच्याही दिलखुलास गप्पा हास्यविनोद चालला होता .एवढ्यात शामरावांच्या मोबाइलची रिंग वाजली .त्यावर युवराज म्हणालेसुद्धा की आपल्याला निवांतपणे कुणी गप्पासुद्धा मारू देत नाही .

शाम रावांचा असिस्टेंट पोलिस चौकी मधून बोलत होता .आताच पोलिसचौकीमध्ये एक फोन आला होता .एका घरात फाशी दिलेल्या अवस्थेमध्ये एक प्रेत सापडले होते .तिथे ताबडतोब जाणे आवश्यक होते. शामरावाना असिस्टंटने पत्ता देऊन कुठे जात आहे ते सांगितले .आत्महत्या किंवा खून यांची केस म्हटल्यावर त्याच्याशी संबंधित सगळा स्टाफ फोटोग्राफर ठसे तज्ञ इत्यादि नेहमीप्रमाणे निघाला होता . शामरावानाही तिथे जाणे आवश्यक होते .शामरावानी युवराजाना काही तुम्हाला काम नसेल तर माझ्याबरोबर चला म्हणून विचारले.युवराजानाही काही विशेष अर्जंट काम नसल्यामुळे ते शामरावांबरोबर निघाले.

जीपमधून दोघेही घटनास्थळी पोहोचले .जिथे आत्महत्या झाली ती वस्ती उच्चभ्रूंची होती.प्रत्येक मजल्यावर चार चार बेडरुमचा एकच फ्लॅट अशी ती दहा मजली इमारत होती . पाचव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आत्महत्या झाली होती .युवराज व शामराव लिफ्टने पाचव्या मजल्यावर गेले.फ्लॅटवर पाटी सुनंदा मराठे व मकरंद मराठे अशी होती .उच्चभ्रूंची वस्ती असल्यामुळे गर्दी नव्हती .प्रेत एका बेडरुममध्ये पंख्याला लटकलेले होते.प्रेत हॉलमध्ये आणून ठेवलेले होते . वरकरणी तरी आत्महत्येची केस वाटत होती .सुनंदा बँकेमध्ये नोकरीला होती .तर मकरंदचा कुठल्या तरी कंपनीचा एजंट म्हणून फिरतीचा व्यवसाय होता.सुनंदाच्या हस्ताक्षरातील चिठ्ठी मिळाली होती . "मी दुर्धर आजाराने ग्रस्त असल्यामुळे जीवनाला कंटाळलेली आहे म्हणून  मी आत्महत्या करीत आहे माझ्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये "अशा स्वरूपाची ती चिठ्ठी होती .सुनंदाला डायरी लिहिण्याची सवय होती .डायरीतील हस्ताक्षर व हे हस्ताक्षर वरवर तरी जुळत होते .अर्थात हस्ताक्षर तज्ञच नक्की सांगू शकला असता .सुनंदाच्या हातावर पायावर वळ दिसत होते.ते वळ कसले तेही कळत नव्हते . अर्थातच पोस्टमार्टेम रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचे कारण व हॅण्ड राईटिंग एक्स्पर्टचा रिपोर्ट आल्यानंतर चिठ्ठी सुनंदाच्या हस्ताक्षरातील आहे की नाही ते नक्की कळणार होते .

मकरंद मराठे कुठे आहेत अशी चौकशी करता ते कामासाठी दिल्लीला गेलेले आहेत .त्यांना फोन केलेला आहे ते दुपारपर्यंत येतीलच असे कळले. आत्महत्या केली हे कसे कळले असे विचारता पुढील माहिती मिळाली . वरकाम कम सैपाक करणारी कुसूम नावाची एक मुलगी त्यांच्याकडे कामाला आहे .तिच्याकडे सोय म्हणून ब्लॉकची एक किल्ली दिलेली आहे .बाई बँकेत गेल्यावरही ती घरात काम करीत असते.व काम संपल्यावर ब्लॉक जबाबदारीने बंद करून निघून जाते .ती रोज सकाळी आठ वाजता येते.नेहमी प्रमाणे ती आज सकाळी आठ वाजता आली.ब्लॉक उघडून आत आल्यावर तिला बेडरुममध्ये सुनंदाबाई  पंख्याला टांगलेल्या अवस्थेत लोंबकळताना दिसल्या .तिने लगेच खालच्या मजल्यांवरील सोनावणे याना जाऊन  सर्व हकीगत सांगितली .त्यानंतर त्यानी पोलिसांना माहिती कळविली.घरात चोरी झाली किंवा नाही ते मकरंद आल्याशिवाय कळणार नव्हते.वरकरणी तरी कुठे चोरी झाल्यासारखे दिसत नव्हते. कुसुमचे जाबजबाब झाले. खालील ब्लॉकमधील सोनवणे यांचाही जबाब घेण्यात आला. पंचनामा होऊन प्रेत पोस्टमार्टेमसाठी पाठविण्यात आले .चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञाकडे पाठविण्यात आली.आता रिपोर्ट येईपर्यंत व मकरंद येऊन त्याचा जबाब होईपर्यंत काहीही काम करता येण्यासारखे शिल्लक राहिले नव्हते .एवढे सर्व होईपर्यंत साडेअकरा बारा वाजले होते .शामराव ऑफिसला जाण्यासाठी निघाले होते .त्यानी युवराजांना चला माझ्याबरोबर येता का जाताना मी तुम्हाला ऑफिसला सोडतो असे विचारले .त्यावर युवराज म्हणाले की तुम्ही तर ऑफिसला जाऊ नका पण मीही ऑफिसला जात नाही.बारा वाजले आहेत एवढ्यात मकरंद येईलच त्याचा जाब जबाब घेऊ त्याची रिअॅक्शन पाहू व नंतरच इथून जाऊ .तोपर्यंत मला ब्लॉकची नीट तपासणी करायची आहे.ठीक आहे अशा अर्थी श्यामरावांनी आपले खांदे  उडविले व ते सोफ्यांवर आरामशीर  बसले.तर युवराज सर्व ब्लॉकमध्ये त्यांच्या पद्धतीनुसार बारीक नजरेने  सर्व काही न्यहाळीत फिरत होते.  

युवराज काहीसे घाईने हॉलमध्ये आले आणि त्यांनी शामरावांना दिल्लीला फोन करून ज्या  हॉटेलमध्ये मकरंद उतरला होता ती रूम काहीही बदल न करता सील करण्यास सांगितली.रूम सील का करायची असे विचारता युवराज नंतर सांगतो असे त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने म्हणाले.प्रत्यक्षात दिल्लीहून फ्लाइट उशिरा होती. इकडून मकरंदला सुनंदाच्या मृत्यूची बातमी साडेदहा वाजता कळविण्यात आली .त्यामुळे त्याला अकराची फ्लाइट मिळणे शक्य नव्हते .नंतरची फ्लाइट एक वाजता होती .त्यामुळे त्याने हॉटेल एवढ्यात सोडले असावे.रूम अजून साफसूफ केली गेली नसावी असा युवराज यांचा एक अंदाज होता .युवराजांना इथे असा काही तरी क्लू मिळाला असावा की ज्यामुळे त्या खोलीची तपासणी करणे त्यांना गरजेचे वाटले असावे .  

त्यांनी लगेच संदेशला फोन लावला संदेशची डिटेक्टिव एजन्सी होती .त्यांनी संदेशला दिल्लीला मकरंद उतरला होता त्या हॉटेलात जाऊन कोणती चौकशी व तपास करायचा त्याच्या सूचना केल्या.त्यांनी काही आडाखे बांधले होते .जर दिल्लीचा रिपोर्ट अनुकूल येता तर सगळीच केस सुटणार होती .त्यांनी शामरावांना संदेशला दिल्लीचे हॉटेल तपासण्यासाठी योग्य त्या परवानग्या देण्यास सांगितले.

फ्लाइट उशिरा येणार असल्यामुळे मकरंदही साडेतीन चार वाजता चौकशीसाठी उपलब्ध झाला असता .आता इथे करता येण्यासारखे काहीच नव्हते त्यामुळे एक पोलिस तिथे ठेवून ही जोडगोळी आपापल्या ऑफिसमध्ये गेली .पोस्टमार्टेम व हस्ताक्षरतज्ञ यांचा रिपोर्ट आल्यावर व मकरंद चौकशीसाठी उपलब्ध झाल्यावर मला अवश्य बोलवा असे युवराजांनी शामरावांना सांगितले .

दुसऱया दिवशी युवराजांना सर्व रिपोर्ट हातात मिळाले .पोस्टमॉर्टेममध्ये श्वास कोंडून व फास लागून मृत्यू असे होते.तर हस्ताक्षर सुनंदाच्या हस्ताक्षरासारखे आहे परंतु ते तिचेच आहे की नाही हे नक्की सांगता येत नाही असा रिपोर्ट होता .त्यांचा असिस्टंट संदेश याने दिल्लीला जावून तिथे युवराजांनी सांगितल्याप्रमाणे तपास करून पंचनामा करून सोबत आणलेल्या वस्तू व त्यासोबत रिपोर्ट  युवराजांना दिला. युवराजांनी तो रिपोर्ट काळजीपूर्वक वाचला . त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले .त्यांनी समाधानाने तो रिपोर्ट ड्रावरमध्ये ठेवून दिला 

दुसर्‍या  दिवशी संध्याकाळी मकरंद चौकशीसाठी उपलब्ध झाला .सकाळी सुनंदाच्या और्ध्वदेहिक इत्यादी कार्यक्रमांमध्ये तो व्यस्त होता .सुनंदाच्या माहेरची मंडळी व इतर  नातेवाईकही जमले होते .

मकरंद पोलिस चौकीमध्ये शामरावांच्या रूममध्ये त्यांच्या प्रशस्त टेबलासमोर बसला होता .बाजूच्या खुर्चीवर युवराज बसले होते .मकरंदला वरवर तरी दुःख झालेले दिसत होते.  त्याच्यावर खुनाचा आरोप करणे जवळजवळ अशक्य होते .खुनाची वेळ रात्री एकच्या आसपास होती .त्यावेळी तो दिल्लीला शांतपणे झोपी गेलेला होता .एकाच वेळी दोन ठिकाणी हजर राहणे अर्थातच त्याला शक्य नव्हते . त्याची अॅलिबी पक्की होती. सुनंदाच्या नावावर तिच्या आजोबानी जवळजवळ पंचवीस लाखाची मालमत्ता ठेवली होती .तिच्या मृत्यूनंतर मकरंद त्याचा वारस होणार होता .याशिवाय खुनाचे कोणतेही कारण वरवर तरी दिसत नव्हते. चौकशी करता दोघांमध्ये भांडण झाल्याचे आठवत नव्हते .मोलकरीण कुसूम नातेवाईक शेजारी पाजारी  यांनी दोघेही गुण्या गोविंदाने नांदत होते असे सांगितले .त्याच्यावर आरोप कसा करावा या विचारात शामराव होते.

घरातील काही चोरीला गेले का अशा शामरावांच्या प्रश्नांवर मकरंदने काहीही नाही म्हणून सांगितले.शामराव फ्लॅटवर गेले होते त्या वेळी काहीही अस्ताव्यस्त झालेले दिसत नव्हते . सुनंदाला असा कुठला दुर्धर आजार होता की ती त्याला कंटाळून आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली .त्यावर मकरंदने तिला निद्रानाशाचा विकार होता . गोळ्या घेऊन सुद्धा तिला नीट झोप लागत नसे त्यामुळे ती कंटाळून गेली होती असे सांगितले. 

युवराजांना अशा काही गोष्टी सापडल्या होत्या, संदेश मार्फत अशी काही माहिती त्यांनी गोळा केली होती, त्यावरून त्यांनी असे काही अंदाज बांधले होते,की मकरंद खुनी आहे अशी त्यांची खात्री पटली होती .युवराजानी त्याला सरळसरळ प्रश्न टाकला.मृत्यूपूर्व सुनंदाने जी चिठ्ठी लिहिली असे सर्वांना वाटत आहे ती तूच लिहिलिस ना ?कुणाचेही हस्ताक्षर तू काढू शकतो हे बरोबर आहे ना ?.रात्री दहाच्या दिल्ली मुंबई फ्लाइटने तू मुंबईला येण्याचे कारण कोणते?ही प्रश्न विचारण्याची पद्धत कोणती म्हणून रागारागाने त्याने मी आलोच नाही म्हणून सांगितले.मी येणे कसे शक्य आहे आणि मी का येऊ आणि आलो तर परत कशाला जाऊ असेही त्यावर विचारले .ती चिठ्ठी मी कशाला लिहू असाही प्रश्न त्याने रागारागाने विचारला.नंतर त्यांनी  दुसरा प्रश्न टाकला . रात्री दोनच्या फ्लाइटने तू मुंबईहून दिल्लीला  गेलास ना?या दोन्ही प्रश्नांवर मकरंद भडकून उठला .तुम्ही माझ्यावर वाट्टेल ते आरोप करीत आहात .हे असेच चालणार असेल तर मी माझ्या वकिलाला बोलवून घेतो . माझ्या पत्नीला मला मारण्याचे कारणच काय ?माझे तिच्यावर निरतिशय प्रेम होते .मी तिला मारीनच कसा?अगोदरच मी माझ्या दुःखात आहे .आणि त्या दुःखावर तुम्ही डागण्या देत आहात .

त्यावर युवराज म्हणाले की आम्ही तुमच्यावर तुम्ही तिला मारली असा आरोप कुठे करीत आहोत?तुम्हीच तसे म्हणत आहात. त्यावर तो म्हणाला की तुमची बोलण्याची पद्धत नजर मला सर्व काही सांगून जात आहे .जरा थांबून युवराजानी एकदम ही रोझी कोण आहे असा एकदम प्रश्न टाकला. त्याबरोबर तो किंचित दचकला व त्याच्या चेहऱ्यावरील भावही बदलले .त्याचे किंचित दचकणे व चेहऱ्यावरील सूक्ष्म बदल दोघांच्याही नजरेतून सुटला नाही .युवराजांनी रोझीला बोलावून घेऊ का असे विचारले.आम्ही तिचा जबाब घेतला आहे.तिने सर्व काही कबूल केले आहे.असा अंधारात तीर युवराज यांनी मारला.तो दचकला असे पाहिल्यावर त्यानी आतल्या खोलीत रोझी बसली आहे तिला बोलावून घेऊ का असे विचारले .त्यावरही त्याने तुम्ही माझ्यावर बालंट  घेत आहात.मी दिल्लीला असताना सुनंदाचा खून कसा काय करू शकेन ?असा प्रतिप्रश्न विचारला.तुम्ही मी खून केला हे कोर्टात सिद्ध करू शकणार नाही असे आव्हान दिले .रोझीशी माझे संबंध असले तरी ते खुनाचे कारण होऊ शकत नाही.एवढ्या क्षुल्लक कारणासाठी मला खून करायचे कारण काय ?आणि जरी कारण असले तरी मी दिल्लीला असताना येथे खून कसा काय करू शकतो. सुनंदाच्या नावावर असलेले पंचवीस लाख रुपये तिच्या मृत्यूनंतर तुम्हालाच मिळणार आहेत ही अॅडिशनल कारण पुरेसे नाही काय असे युवराजानी विचारले.माझे सुनंदावर प्रेम होते ते पंचवीस लाख जर मला गरज असती तर तिने मला हसत हसत दिले असते असे त्यावर तो म्हणाला .जर मी खून केला असे तुमचे म्हणणेअसेल तर मी दिल्लीला असताना इथे मुंबईत  खून कसा काय  केला ते समजावून सांगा असेही तो उपहासाने व  उपरोधिकपणे म्हणाला .

यावर अाव्हान स्वीकारीत युवराजानी ठीक आहे तू कसा खून केलास ते मी तुला  समजावून सांगतो त्यावर तुझे काय म्हणणे आहे ते सांग असे युवराज म्हणाले व त्यांनी बोलण्यास सुरुवात केली .

(क्रमशः)

प्रभाकर  पटवर्धन 

खून की आत्महत्या(भाग)२ अंतिम 

मकरंद तुझे व रोझीचे संबंध होते .हे संबंध सुनंदाला कळले.तिने तुला घटस्फोटाची नोटीस देईन नाहीतर हे संबंध सोड म्हणून सांगितले.तिला घटस्फोट घेवून आपल्या आई वडिलांना दुःख द्यावयाचे नव्हते .त्यामुळे ती समझोत्याचा प्रयत्न करीत होती .रोझीने छुप्या कॅमेऱ्याने तुमची नको ती चित्रे व व्हिडिओ फिल्म घेतली होती जर तिच्या म्हणण्याप्रमाणे तू वागलास नाही तर ती तुझी बदनामी करणार होती.त्यांच्या कॉपीज सुनंदाला पाठविणार होती त्यामुळे घटस्फोट सहज शक्य झाला असता.तू एकीकडे सुनंदा व दुसरीकडे रोझी यांच्या कचाट्यात सापडला होतास.रोझी ते फोटो व फिल्म यासाठी मागत असलेली भली मोठी रक्कम तुझ्या जवळ नव्हती.अशा कामासाठी सुनंदा तुला पैसे देणे शक्य नव्हते .सुनंदा बँकेमध्ये नोकरी करीत असल्यामुळे तिने या ब्लॉकसाठी बँकेकडून लोन घेतले होते .ब्लॉक तिच्या नावावर होता. घटस्फोट होता तर तू रस्त्यावर आला असतास.  शिवाय वर बदनामी झाली असती ती वेगळीच .जर सुनंदाचे पैसे मिळाले तर रोझीचे तोंड फिल्म व फोटो विकत घेऊन  कायमचे बंद करता येईल.शिवाय ब्लॉक आपल्या नावावर होईल .नाहीतरी सुनंदा व तुझे एवढेसे पटत नव्हते. यासाठी तू विचारपूर्वक एक योजना आखली .

प्रथम तू दुसऱ्या नावाने तुझी एक वेगळी आयडेंटिटी निर्माण केली .त्या नावाने दिल्ली मुंबई व मुंबई दिल्ली अशी विमानाची तिकिटे काढली.तू ज्या हॉटेलात दिल्लीला कामानिमित्त गेल्यावर उतरत असस त्या हॉटेलात एक विशिष्ट रूम कायमची तुझ्या नावावर बुक करून ठेवली .दोन तीन महिने तुझे नियोजन चालले होते .तू साडेआठ वाजता दिल्लीच्या त्या हॉटेल मॅनेजरला मी खूप दमलो आहे मला  त्रास देऊ नका असे सांगून झोपण्यास गेलास.नऊ वाजता गुपचूप त्या रुममधून बाहेर पडून सर्व्हिस लिफ्टने खाली येऊन तू दहाची मुंबई फ्लाइट पकडली.तू त्यावेळी वेषांतर केले होते.विमान तिकीटही तू वेगळ्या नावाने काढले होते .हॉटेल विमानतळाजवळ असल्यामुळे तुला येणे जाणे सहज शक्य झाले.बारा वाजता मुंबईला आल्यावर तू टॅक्सीने आपल्या फ्लॅटवर पोहोचला .तू अकस्मात आलेला पाहून सुनंदा आश्चर्यचकित झाली .तू वेळ न दवडता तिचे हात पाय बांधून तोंडावर चिकटपट्टी लावून तिला फॅनवर लटकविले .सुनंदाला रात्री झोपताना झोपेची गोळी व एक पेग घेण्याची सवय असल्यामुळे तिने विशेष विरोध केला नाही. ती एकदा फासावर लटकल्यावर तू हातापायाचे दोर कापून घेतले व तोंडावरील  चिकटपट्टी काढून घेतली .या सर्व गोष्टी तू घाईघाईने आपल्या खिशात कोंबल्या . तुला दोनची दिल्लीला जाणारी फ्लाईट पकडण्याची घाई होती .टॅक्सीतून परत जाताना तू चिकटपट्टी व दोर कुठेतरी वाटेत फेकून दिले. तू घाईघाईने दिल्लीला जाऊन आपल्या रूममध्ये गुपचूप जाऊन झोपी गेलास.दुसर्‍या दिवशी जेव्हा फोनवर तुला सुनंदाने आत्महत्या केली म्हणून कळविण्यात आले तेव्हा आश्चर्याचे व दुःखाचे नाटक तू चांगल्या प्रकारे वठविले .

हे सर्व ऐकून मकरंदचा चेहरा पडला .तरीही उसने अवसान आणून तो म्हणाला की गोष्ट मोठी छान आहे. मनोरंजक आहे. रहस्य कथेमध्ये शोभून दिसेल .पण हे सर्व तुम्ही सिद्ध कसे काय करणार?

त्यावर युवराजांनी शामरावांजवळ बोलण्यास सुरुवात केली.मुंबई येथील बेडरूममध्ये एक विमानाचे तिकीट तुम्हाला कपाटाखाली सापडेल .त्या तिकीटावर मकरंदचे नाव नसून दुसरेच कुठचे तरी नाव आहे .जर तुम्ही विमानतळावर रात्रीच्या वेळी असणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरची चौकशी केली तर तुम्हाला मकरंदला येथे घेऊन येणारा व परत नेणारा ड्रायव्हर सापडेल.व ते मकरंदला ओळखतील.दिल्लीला जातांनचे तिकीट त्याने कुठेतरी नष्ट केले असले पाहिजे .तुम्ही रोझीची चौकशी करा ती तुम्हाला फोटो व फिल्म देईल .वर दम देताच ती साक्षीदार म्हणूनही काम करण्यास तयार होईल.अशी ब्लॅकमेलिंगची तिची पूर्वीचीही एखादी केस तुम्हाला सापडेल.जर तुम्ही सुनंदाच्या वकिलांकडे गेलात तर सुनंदा मकरंदशी डायव्होर्स घेण्याच्या तयारीत होती असेही तुम्हाला आढळून येईल.ब्लॉक सुनंदाच्या नावावर असणे व पैसे सुनंदाच्या नावावरच असणे याही गोष्टी तुम्हाला सहज शोधून सापडतील .

श्यामरावांनी विचारले की ही सर्व गोष्ट तुम्ही कशी काय तयार केलीत त्यावर युवराज म्हणाला मी सर्वत्र हिंडत असताना मला एका कपाटा खालून काहीतरी कागद डोकावताना दिसला .तो बाहेर काढला असता ते दिल्ली मुंबई विमानाचे तिकीट होते .मी तो कागद पुन्हा खाली सरकवून ठेवला .तो तुम्हाला तिथेच गेलेत तर सापडेल .सुनंदाला फाशी देण्याच्या गडबडीत ते तिकीट त्याच्या खिशातून पडले. ते तिकीट त्याने विमानतळाबाहेर आल्यावर फाडून नष्ट करावयाला हवे होते .त्याचप्रमाणे दिल्लीला डस्टबिनमध्ये लेडीज रुमाल व त्याला चिकटलेला एक चिकटपट्टीचा तुकडा मिळाला. त्याच्यावर कोपऱ्यात एस असे अक्षर विणलेले आहे तो रुमाल सुनंदाचा आहे आणि त्याला चिकटलेली चिकटपट्टी ही  येथील फ्लॅटमधील चिकटपट्टीचाच तुकडा आहे हे  फॉरेन्सिक तज्ञ सहज सिद्ध करू शकतील . तेथील डस्टबीनमधील कचऱ्याचा पंचनामा या पाकिटामध्ये आहे.रोझीचा जबाब तुम्ही केव्हाही घेऊ शकता.

हे सर्व ऐकून मकरंद निराश झाला.शामराव त्याला बेड्या घालण्यासाठी उठले .एवढ्यात त्याने चपळाईने खिशातून पिस्तूल काढले व ते आपल्या कानावर ठेवून ट्रिगर ओढला .क्षणार्धात मकरंद जमिनीवर कोसळला .

पुढील सर्व कायदेशीर गोष्टी करण्याचे काम शामरावांवर सोडून युवराज शामरावांशी हस्तांदोलन करून निघाले.

आणखी एक रहस्यमय केस सोडविल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर होते .

( समाप्त)

१०/१/२०१९©प्रभाकर  पटवर्धन 

जी केस वरवर पाहता साधी आत्महत्येची केस वाटते तो प्रत्यक्षात  अत्यंत हुशारीने काळजीपूर्वक केलेला खून असतो .