Get it on Google Play
Download on the App Store

४ बळीचा बकरा (भाग-३) (३-३) (अंतिम)

पुढील कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुणालाही साधर्म्य वाटल्यास तो योगायोग समजावा )        

रेकॉर्डरची माहिती ऐकून युवराजांना स्फुरण चढले. त्यांनी संदेशला ताबडतोब ऑफिसमध्ये बोलवून घेतले .शामरावांच्या मदतीने संदेशने ऑफिसमध्ये जावून तो रेकॉर्डर मिळवण्याचा प्लॅन आखला .पुराव्याच्या दृष्टीने त्या केबिनमध्ये जाऊन त्याचे फोटो घेणे आवश्यक आहे .असा बनाव करून त्या केबिनमध्ये जायचे फोटो तर काढायचेच परंतु रेकॉर्डरहि मिळवायचा असा तो प्लॅन होता .शामरावांनी त्यांचे वजन वापरून तशी परवानगी मिळविली.फोटोग्राफर म्हणून संदेश बरोबर आला .अँटी करप्शन ब्यूरोचा एक माणूसही सील उघडण्यासाठी व पुन्हा सील करण्यासाठी आला होता .फोटो घेत असताना ड्रॉवर उघडून संदेशने तो रेकॉर्डर आलेल्या माणसाच्या नकळत  आपल्या खिशात घातला.

रेकॉर्डर ऑफिसमध्ये आल्यावर शामराव, संदेश,व युवराज  रेकॉर्डिग्ज ऐकण्यासाठी बसले .त्यामध्ये मनोजची मिटिंगमधील भाषणे, मनोजकडे आलेल्या ऑफिसमधील व बाहेरील व्यक्तींची संभाषणे ही ऐकल्यानंतर  युवराजांना मनोजच्या बाजूने भक्कम पुरावे मिळाले.

युवराजांनी संदेशला ऑफिसमधील सर्व व्यक्तींची माहिती गोळा करण्यास सांगितली होती .त्या पुराव्यातूनही युवराजांना केस चालविण्यासाठी कल्पना मिळाल्या .

शेवटी केस कोर्टामध्ये सुरू झाली .सरकारी वकिलाने मनोज कसा पैसे खाणारा मनुष्य आहे. त्याने किती लोकांकडून माया गोळा केली .पैशासाठी तो व्यावसायिकांना कसा तंग करीत असे .वगेरे वगेरे पल्लेबाज आकर्षक भाषण ठोकले .

जज्जने मनोजला तुला गुन्हा मान्य आहे का म्हणून विचारले.मनोजने अर्थातच नाही म्हणून सांगितले .

यानंतर साक्षी पुरावे सुरू झाले.मनोजच्या ऑफिसमधील काही मंडळींच्या साक्षी झाल्या .त्यामध्ये मनोज प्रत्येकाला केस तयार करताना जे पैसे घेतले जातील त्यातील ठराविक हिस्सा आपल्याकडे आला पाहिजे असे सांगत असे ,असा आरोप करण्यात आला .

त्यावर युवराजांनी म्हणजे तुम्ही प्रत्येकांकडून पैसे म्हणजेच लाच घेत होता असे सिद्ध होते .असे सांगितले. त्यावर त्या साक्षीदारांनी आम्ही कुणाकडूनही आपणहून एकही पैसा घेत नसू.मनोज आम्हाला पैसे घेण्यासाठी भाग पाडीत असे  अशी साक्ष दिली .

मगनलालनेही आपण परवाना संदर्भात गेलो असताना मनोजने पैसे मागितले मग आपण लाच प्रतिबंधक खात्याकडे गेलो तक्रार केली त्यांनी आपल्याला  खुणा केलेल्या नोटा दिल्या त्याच आपण मनोजला दिल्या वगैरे हकीगत सांगितली .

युवराज या साक्षी चालू असताना प्रत्येक साक्षीदाराला नो क्रॉस म्हणून सांगत असत.मात्र क्रॉस घेण्याचा अधिकार राखून ठेवीत असत .

युवराजांसारखा नामांकित वकील उलटतपासणी घेत नाही. सर्व साक्षी शांतपणे ऐकतो.आता पुढे युवराज या केसला पलटणी कशी देणार ?सर्वांची अशी उत्सुकता टांगली गेली होती .

सर्व सरकारी साक्षीपुरावे झाल्यानंतर युवराज बोलण्यासाठी उभे राहिले .त्यांनी पुढील प्रमाणे छोटेसे भाषण दिले .

ही सर्व केस खोटे पुरावे तयार करून त्यावर आधारित आहे .मनोज अत्यंत प्रामाणिक व लाचलुचपतीच्या विरुद्ध असलेला मनुष्य आहे .मनोज येण्याअगोदर ऑफिसमध्ये खाबुगिरी बोकाळलेली होती.लायसेन्स देण्यासाठी,लायसन्सच्या मूल्याच्या पाच टक्के रक्कम आकारण्यात येत असे .ही रक्कम एकत्र करून सर्वजण वाटून घेत असत .ही गोष्ट पसंत नसलेलेही काही लोक ऑफिसमध्ये होते. परंतु आपण विरोध केल्यास आपल्यावरच बाजू शेकेल अशा भीतीने ते मूक होते.

मनोज प्रमुख म्हणून आल्यावर त्याला या टोळीच्या  प्रमुखाने  येथील पद्धत समजावून सांगितली . तुमचेही भले होईल. सर्वांचेच भले होईल. असे त्याने सांगितले.मनोजने हे सर्व ऐकून घेऊन दुसऱ्या दिवशी सर्व स्टाफची मिटींग घेतली .त्यामध्ये त्याने आतापर्यंत या ऑफिसमध्ये जे झाले ते झाले परंतु यापुढे असे काही होता कामा नये म्हणून सांगितले .कुणीही लाच घेऊ नये .जर माझ्या कानावर अशा गोष्टी आल्या तर मी त्या व्यक्तीविरुद्ध डिपार्टमेंटल अॅक्शन घेईन .कोणत्याही परवान्यासाठी चौकशी करताना ती सत्यावर आधारीत असावी. जिथे गरज असेल तिथे तेवढ्याच प्रमाणात लायसेन्सीस् देण्याची शिफारस करण्यात यावी .त्याने आपल्या भाषणात काम करण्याची तीन सूत्रे सांगितली .१) कुणीही कोणत्याही स्वरूपात लाच घेता कामा नये २)प्रत्येकाने आपले काम प्रामाणिकपणे व सचोटीने केले पाहिजे .३)दिरंगाई व वेळकाढूपणा होता कामा नये .

पुढे युवराजानी आपल्या भाषणात सांगितले.मनोजचा हा अत्यंत कठोर व अनपेक्षित असा स्टँड पाहून सर्वजण अचंबित झाले.सर्वांची खाबुगिरी एकदम बंद झाली.पैशाचा भक्कम ओघ थांबल्यामुळे बरेच जण अस्वस्थ झाले.पैशांचा सातत्यपूर्ण ओघ ,त्यामुळे लागलेली आरामाची चटक,थांबल्यामुळे सर्वजण अस्वस्थ झाले.त्यातून त्यांनी एक प्लॅन तयार केला .मनोजची इतरत्र बदली करणे त्यांना शक्य नव्हते .मनोजला लाच घेताना पकडून त्यावर खटला भरण्यात यावा त्यातून तो एक सस्पेंड होईल किंवा त्याची बदली होईल,काहीही झाले तरी आपली खादी व्यवस्थित चालू राहील .यासाठी मगनलाल याला तयार करण्यात आला .त्याने अँन्टी करप्शन ब्युरोमध्ये जाऊन मनोज काम करण्यासाठी लाच मागतो असे सांगितले .नेहमीप्रमाणे तेथून त्याला खुणा केलेल्या नोटांचे बंडल देण्यात आले.ते बंडल येनकेन प्रकारेण मनोजच्या हातात गेल्यावर त्याने खूण करायची असे  ठरविण्यात आले.ठरल्याप्रमाणे मगनलालने लाच देण्याचा प्रयत्न केला .शेवटी ड्राव्हर उघडून त्यात बंडल टाकले व खुणेची शीळ वाजवली .पुढील सर्व हकिगत कोर्टाला माहित आहेच.मनोजला जाणिवपूर्वक योजना आखून गुंतविण्यात आले आहे.तो निर्दोष आहे.

या भाषणावर कोर्ट  म्हणाले तुमचे हे सर्व जोरदार भाषण ऐकायला चांगले वाटते परंतु येथे  भक्कम पुराव्या शिवाय काही चालत नाही हे तुमच्या सारख्या नामांकित वकिलाला सांगण्याची आवश्यकता नाही . भाषणबाजी पुरे. पुरावे मांडा.

किंचित हसून युवराज पुढे म्हणाले मला पुराव्याशिवाय काहीही बोलता येत नाही.माझ्या प्रत्येक विधानाला मी भक्कम पुरावे देणार आहेच .प्रथम त्यांनी ती ऑफिसमधून आणलेला रेकॉर्डिंग असलेला रेकॉर्डर  कोर्टासमोर हजर केला .हा रेकॉर्डर मनोजच्या टेबलाच्या ड्रॉव्हरमध्ये असे.जेव्हा कुणीही मनोजकडे येत असे, मग ते वरचे र्ऑफिसर्स असोत, किंवा हाताखाली काम करणारा स्टाफ असो ,किंवा कामानिमित्त येणारे कुणीही नागरिक असोत ,त्या प्रत्येकाचे संभाषण, तारीखवार यांमध्ये रेकॉर्ड केलेले आहे .

नमुना म्हणून या स्टाफच्या प्रमुखाने येऊन मी वर सुरुवातीला सांगितलेली "आपण सर्वजण वाटून खाऊ" पद्धत मनोजला समजावून सांगितली ते ऐका.रेकॉर्डला लाऊड स्पीकर जोडून युवराजांनी ते रेकॉर्डिंग सुरू केले. स्टाफ प्रमुखांचा स्पष्ट आवाज ऐकू येऊ लागला .

नंतर युवराजांनी मगनलाल केबिनमध्ये गेल्यावर जे संभाषण झाले तो भाग वाजविला.

त्यानंतर  स्टाफ मीटिंगमध्ये मनोजने केलेल्या भाषणाचे रेकॉर्डिंग वाजवले.

मनोज इतका चाणाक्ष  असेल त्याच्या जवळ सर्व ऑडिओ रेकॉर्डिंग असेल असे कुणाच्याही मनात आले नव्हते .प्रत्येकाचा आवाज सुस्पष्ट येत होता .रेकॉर्डिंग क्वॉलिटी उत्कृष्ट होती.

सरकारी वकिलांनी हे रेकॉर्डिंग खोटे आहे असे सांगण्याचा प्रयत्न केला .स्टाफ प्रमुख, मगनलाल, मनोज, या प्रमुख व्यक्तींचे आवाजाचे नमुने घेण्यात आले .हे सर्व नमुने व रेकॉर्डिग प्रयोगशाळेत पाठवण्यात आले.

प्रयोगशाळेतून रिपोर्ट आल्यावर पुढे खटला चालू होईल असे कोर्टाने सांगितले .

चार दिवसांनी प्रयोगशाळेतून युवराजांच्या बाजूचा, म्हणजे रेकॉर्डिंग खरे असल्याचा रिपोर्ट आला.

त्यानंतर युवराजांनी स्टाफमधील दोन तीन व्यक्तींची साक्ष काढली .इतरांच्या दबावामुळे, आपल्याला कुठे तरी गुंतवतील यामुळे,आपण काहीही बोलत नव्हतो. युवराजांनी ऑफिसमधील सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे अशा स्वरूपाची साक्ष त्यांनी दिली .

सरकारी साक्षीदारांची उलटतपासणी करण्याचे कारणच पडले नाही.कोर्टाने युवराजांच्या बाजूचा निकाल दिला .मनोजची शंभर टक्के निर्दोष म्हणून मुक्तता करण्यात आली .कोर्टाने स्टाफ प्रमुखाला ताब्यात घेऊन पुरावे गोळा करावेत व योग्य त्या व्यक्तींवर खटला भरावा असा निकाल दिला .

संदेशजवळ मनोजला गुंतविण्याचा कट कुणी आखला याची माहिती व पुरावे होते परंतु त्याचा वापर करण्याची गरज पडली नाही .

मनोज उजळ माथ्याने त्याच ऑफिसमध्ये परत येईल असे सर्वांना वाटत होते .परंतु कुठे काय चक्रे फिरली माहीत नाही त्यांची बदली अत्यंत सोज्वळ निरागस अशा स्टॅटिस्टिक्स डिपार्टमेंटमध्ये करण्यात आली !!

२७/३/२०१९©प्रभाकर  पटवर्धन