बापूजींच्या गोड गोष्टी 39
४०
नागपूर प्रांतातील महात्माजींचा अस्पृश्यता-निवारणाचा दौरा सुरू होता. एकदा काय झाले, महात्माजींचा हात पुसण्याचा रुमाल कामाच्या गर्दीत धावपळीत कोठेतरी मागील मुक्कामी राहिला. वाळत घातलेला बहुधा राहिला. महात्माजींना रुमाल हवा होता. त्यांनी महादेवभाईंना विचारले. ते म्हणाले : ‘आणतो शोधून.’ महादेवभाईंनी सारे शोधले. रुमाल सापडेना. हरवला म्हणून बापूजींना जाऊन कोणी सांगायचे? शेवटी महादेवभाई येऊन म्हणाले :
‘बापू, रुमाल मागं राहिला. कुठं तरी हरवला बहुधा. मी दुसरा आणून देतो.’
थोडा वोळ बापू काही बोलले नाहीत. नंतर म्हणाले :
‘तो किती दिवस गेला असता?’
‘आणखी चार महिने जाता.’
‘तर मग चार महिने मी रुमालाशिवाय काढीन. चुकीचं प्रायश्चित्त. नंतर दुसरा रुमाल.’
महादेवभाई काय बोलणार?