बापूजींच्या गोड गोष्टी 44
४६
आज मी तुम्हांला जी गोष्ट सांगणार आहे, ती अगदी अलीकडील आहे. गांधीजी १९४२ च्या लढ्यात पुण्याला आगाखान पॅलेसमध्ये होते ना, तेव्हाची.
बापूजी तुरुंगातही आपला वेळ फुकट दवडीत नसत. वाचन, लेखन, सुतकताई, सर्व काही ठरल्याप्रमाणे चालायचे. त्यातच एखादी नवीन भाषा शिकणे, एखाद्या नवीन ग्रंथकाराची ओळख करून घेणे असे चाले. जवाहरलालजी, आझाद, राजेंद्रप्रसाद हे सर्व पुढारीसुद्धा तुरुंगवासाचा असाच फायदा करून घेत. जवाहरलालजींनी तर आपले सर्व मोठमोठे ग्रंथ तुरुंगातच लिहिले आहेत.
त्या दिवशी गांधीजींचा वाढदिवस होता. लढ्याच्या त्या दिवसांत बाहेर देशात सर्व जनता तो दिवस गंभीरपणे साजरा करीत होती. तिकडे सरोजिनीदेवी, डॉ, सुशीला नायर वगैरेंनी नवीनच टूम काढली. त्या म्हणाल्या : ‘बापू, आज सर्व काम बंद करायचं, फक्त दुपारी थोडा वेळ.’ ठरले. दुपारी गांधीजींच्या परिवारातील मंडळींनी नवीनच खेळ काढला.
असे ठरले की, जगातील थोर विचारवंतांची भाषणे व लेख काढायचे व आळीपाळीने प्रत्येकाने त्या विचारवंताचे नाव ओळखायचे. इतरांच्या पाळ्या झाल्या. गांधीजींची आली. त्यांना उतारे वाचून दाखविण्यात आले.
‘बापू, ओळखा पाहू, हे उतारे कोणाचे आहेत ते.’ सर्व ओरडलो.
बापूंनी थोडा वेळ विचार केला नि म्हणाले : ‘पहिला खोरोचा. दुसरा कोमां रोलाँ यांचा आणि तिसरा इमर्सनचा किंवा कार्लाईलचा.’
सर्वजण ओरडले : ‘चूक, एकदम चूक.’
आणि मग त्यांच्यापैकी एकजण म्हणाली : ‘बापू, हे सर्व उतारे एकाच व्यक्तीचे आहेत. त्या व्यक्तीचं नाव आहे मोहनदास करमचंद गांधी!’ बापू हसू लागले. सगळीच हसू लागली. नकळतपणे गांधीजींनी स्वत:ला थोर विचारवंतांच्या मालिकेत स्वत:च बसविले होते.
एरव्ही विनय आड आला असता. पण आज विनयानेच गांधीजींनी चकवले होते.