Get it on Google Play
Download on the App Store

भीष्म आणि कृष्ण

दुसऱ्या दिवशीच्या युद्धांत सुरुवातीस दुपारपर्यंत भीमानें आपला पराक्रम गाजविला. त्यानंतर दुपारपासून युद्ध संपेपर्यंत अर्जुनाने आपले कौशल्य दाखविलें. आपलें सैन्य मेंढरां बकऱ्याप्रमाणे कापलें जात असल्याचे पाहून दुर्योधनाचे रक्त खवळले. त्याच्या म्हणण्यावरून कृप, अश्वत्थामा, शल्य वगैरे मिळून धृष्टद्युम्नावर धावून गेले. धृष्टद्युम्नानें अश्वत्थाम्याच्या रथाचे घोडे मारले. त्याबरोबर तो शल्याच्या रथावर चढला व युद्ध करूं लागला. अभिमन्यूनें हे पाहिले. तो त्याच्याशी युद्ध करूं लागला. अभिमन्यूला पाहतांच दुर्योधनाचा मुलगा लक्ष्मण अभिमन्यूला सामोरे गेला. या संधीचा फायदा घेऊन कौरव वीरांनी येऊन अभिमन्यूला चारी बाजूंनी घेरलें, अभिनन्यु एकटा होता तरी डगमगला नाही.

तो सर्वांना तोंड देत होता. आपल्या मुलाच्या मदतीला अर्जुन तेथे गेला व क्रोधाने भराभर बाणवृष्टि करूं लागला. दावाग्नी भडकून रान जसें बेचिराख होते त्याप्रमाणे कौरव दलाचा संहार होऊ लागला. अर्जुनाचे हे उम रूप पाहून कौरव सैन्यांतील सर्व वीरांचे धाबे दणाणले. अर्जुनाच्या समोर येण्याचे साहस कोणांतच उरले नाही. सर्व वीर सैरावैरा पळू लागले. भीष्म सुद्धा अर्जुनाचा पराक्रम पाहात उभा राहिला. 

तो द्रोणाचार्याला म्हणाला

"आज अर्जुनासमोर जाण्याची कोणाची छाती होत नाही आणि आपल्या सैन्याला मागे बोलावणेहि ठीक होणार नाही. म्हणून मला वाटते, आतां युद्ध थांबविणेच रास्त आहे. थोड्या वेळांत सूर्यास्तहि होणार आहे." त्यांची सूचना मान्य झाली.

पुन्हां युद्ध सुरू झाले. आज युद्धाचा तिसरा दिवस उजाडला होता. कौरवांनी आपली सेना गरुडव्यूहांत उभी केली व पांडवांनी अर्धचंद्र व्यूहांत. आज संतप्त वातावरणांतच युद्धाला प्रारंभ झाला. कालचा चेव अद्यापि हि कायम होता. आज अर्जुन, भीम, घटोत्कच, सात्यकी, उपपाण्डव वगैरे मोठ्या शौर्याने लढत होते. आजच्या युद्धांत घटोत्कचाचा पराक्रम भीमा- हून सुद्धा जास्त वरचढ होता. दुर्योधन सात हजार स्थदल घेऊन घटोत्कचावर थांबला. परंतु भीमानें दुर्योधनावर असा एक बाण सोडला की तो मूर्छित झाला. 

अर्थातच त्याच्या सारथ्याने रथ शिबिराच्या दिशेने वळविला. त्यामुळे कौरव सेनेचा धीर सुटला. सेना पळू लागली. भीमाला तेवढेच फावलें. तो बाण सोडीत शत्रूचा पाहून पाठलाग करूं लागला. याच वेळी अर्जुन व अभिमन्यु सात्यकीच्या सेनेचा संहार करण्यात रंगून गेले होते. भीष्म व द्रोणांना त्या हल्ल्यामुळे आपले सैन्य मार्ग घेणे सुद्धा शक्य होत नव्हते. दुर्योधनाला जेव्हां शुद्ध आली तेव्हा त्याने आपल्या सैनिकांना माघार घेतांना पाहिले. त्याने पुन्हां त्यांना रणांगणावर पाठविले.

तो भीष्माजबळ येऊन म्हणाला

"आजोबा..! तुम्ही जिवंत असतांना कौरव सेना माघार घेत असलेली पाहून मला लाज वाटते. हा अपमानच नव्हे का आपला ! मला तर असे वाटत होते की पांडव सेनेत तुमची, द्रोणाची व अश्वत्थाम्याची बरोबरी करणारा कोणी नाही. कां पांडवां- बद्दल वाटत असलेल्या प्रेमामुळे तुम्ही आपल्या सैनिकांची माघार तटस्थपणे पाहात आहात! मला असें मध्येच सोडून देण्याचा तुमचा विचार आहे काय? मला वाटते,

ह्यावेळी तरी तुम्ही आपली सर्व शक्ति एकवटून युद्ध केले पाहिजे. दुर्योधनाच्या या आरोपानें भीष्माला राग आला. ते म्हणाले–“मी तुला पहिल्यानेच सांगितले होते की पांडवांना जिंकणे सोपे नाही. आणि ते सत्य आहे. आणि मी तर म्हाताराच आहे. तरी पण मी आपली शिकस्त करण्याचा प्रयत्न करतो." 

भीष्माच्या क्रोधोक्तीने दुर्योधनाला बरे वाटले. त्याने शंख वाजवितांच त्याच्या सैन्यांतून रणभेरी वाजविल्या गेल्या. दुपारच्या युद्धांत भीष्माने खरोखरच शत्रुसैन्यावर जणु आग पाखडली होती. त्या आगीत पांडव सैन्य जळून भस्म होत होते. दुर्योधनाने भीष्माच्या मदती- साठी एक मोठी तुकडी पाठवून दिली.

पांडवांचे सैन्य जिकडे वाट फुटेल तिकडे घावू लागले. भीष्माच्या या क्रोधामुळे सर्व- कडे हाहाकार पसरला. कृष्ण अर्जुनाचा सारथी होता. 

त्याने अर्जुनाचा रथ एका बाजूस थांबवून त्याला म्हटलें

"अर्जुना, तूं मागे म्हणाला होतास की भीष्म द्रोणासह सर्व कौरव सैन्याचा नाश करून टाकीन म्हणून, आतां आठव तें वचन. ते पूर्ण करण्याची वेळ आली आहे. ते बघ तिकडे, तुझ्या सेनेला भीष्माचार्य पाठीमागे रेंटीत जात आहेत. भीष्माचे हे रुद्ररूप पहा आणि त्याला तोंड देऊन आपले शब्द पूर्ण करून दाखव."

“चल मग तिकडे. फिरव आपला रथ त्या बाजूला." अर्जुन म्हणाला.

त्या नंतर थोड्याच वेळांत भीष्म व अर्जुन यांचे युद्ध सुरू झाले. अर्जुनाला पुढे सरसावलेला पाहून पांडव सेना पुन्हा नव्या दमाने युद्धास पुढे निघाली. भीष्म निकराने लढत होता. आपल्या बाणाच्या ओघाने त्याने अर्जुनाला पुढे येऊ दिले नाही. परंतु अर्जुनाने आपल्या कौशल्याने दोनदा भीष्माच्या हातांतील याण तोडून टाकले. भीष्माला सुद्धा त्याचे कौतुक वाटले.

भीष्म म्हणाले “शाबास अर्जुना..! तुझ्यासारखा धुरंधर धनुर्धर तूच…! चाल दे. असेच पाहिजे." 

आणि त्याने जास्त त्वरेने बाण सोडण्यास आरंभ केला. इतकेच नव्हे तर त्याने कृष्ण सारथी असून सुद्धा त्याच्यावर बाण सोडण्यास सुरुवात केली. भीष्माचा आवेश पाहून कृष्णाला वाटले, आजोबांच्या पुढे म्हणून अर्जुन थोडे भीत भीत युद्ध करीत आहे आणि असेच जर चालू राहीले तर युधिष्ठिराचे सैन्य कीटक मुंग्याप्रमाणे नष्ट होईल. त्याला आठवण करून दिली पाहिजे की भीष्माला मारणे फार जरूरी आहे आणि ते काम अर्जुनालाच केले पाहिजे. त्याला प्रत्यक्ष दिसत होते की पांडव सेना हरणाच्या शिकारीप्रमाणे मारली जात आहे. सात्यकी त्यांना पळून न जाण्यासाठी सांगत आहे आणि त्यांना धीर देऊन मागे फिरवीत आहे. कृष्ण रागांत होताच.

तो म्हणाला "सात्यकी, जे भिऊन पळून जात आहेत त्यांना खुशाल जाऊं दे आणि ज्यांना पळून जाण्याची इच्छा आहे त्यांना हि जाऊ दे. सर्वजण गेले तरी चालेल, मी एकदा भीष्म व द्रोण यांना मारून युधिष्ठिराला विजयश्री मिळवून देईन आणि त्याचा राज्याभिषेक करून राजा, म्हणून घोषित करीन.”

असें सांगून कृष्णाने तावातावाने हातांतील घोड्यांचा लयाम सोडून दिला. आपलें सुरर्शन चक्र हातात घेऊन रथांतून उडी मारून भीष्माकडे जाऊ लागला. 

“कृष्णा, मार. तुझ्या हातून जर मला मरण आले तर माझें केवढे भाग्य असें मी समजेन. त्यामुळे माझा दुहेरी फायदा आहे म्हणजे, मला इह लोक तर मिळेलच, परलोकाची प्राप्ति देखील होईल. मी धन्य होईन.” भीष्म न भितां शांतपणे कृष्णाला म्हणाला.

कृष्णाचा राग शांत झालेला नव्हता. 

तो रागांतच म्हणाला "पितामह, तुझ्यामुळेच हे युद्ध होत आहे. आज दुर्योधनाचा तुला एवढा पुळका येत आहे, परंतु ज्या दिवशी दुर्योधनानें कपटाने पांडवांना यात हरवलेले तेव्हा त्याचा मंत्री असून सुद्धा तूं त्याला शब्दानें हि सांगितले नाहीस…! त्याला समजावण्याचा प्रयत्न केलास नाहीस…! आणि समज, त्याने तुझे म्हणणे ऐकले नसते तर तेव्हांच का नाही त्याला सोडून पांडवांकडे गेलास?"

"आश्रितांचा तो परमादर करीत आला आहे." भीष्माने उत्तर दिले. 

"यादवांचे म्हणणे न ऐकल्याने कंसाची काय गत झाली होती आठवत असेलच. अरे, जो राजा मार्गच्युत होतो त्याला शिक्षा देणे प्रजेचे कर्तव्यच आहे." कृष्णाने भीष्माला उत्तर दिले.

इतक्यांत अर्जुन रथावरून उतरून कृष्णाजवळ आला आणि त्याला जोराने आपल्या कडे ओढून घेतले. परंतु कृष्ण आवेशाने त्याला दहा पावले ओढीत घेऊन गेला. अर्जुनाने तसेच त्याला अडविलें. 

अर्जुन म्हणाला "शांत हो ! तुझ्याशिवाय आम्हां पांडवांना दुसरा कोणाचा आधार नाही…! मी आपल्याला माझ्या भावाची व मुलाची शपथ घेऊन सांगतो की मी माझे वचन पूर्ण करीन. कौरवांचा समूळ नाश करीन."

कृष्ण शांत झाला व आपल्या रथांत येऊन बसला. अर्जुनहि त्याच्या पाठोपाठ आला व रथांत चढून सर्व शक्ति एकवटून युद्ध करू लागला. त्याने इंद्रास्त्र सोडले. त्या योगे सारी कौरव सेना ढेकणांप्रमाणे पटापट मरून पडू लागली. भीष्म द्रोणादीना प्रलयकाळाची आठवण झाली. कौरव सैन्य हळू हळू रणांगणावरून पाय काढू लागले. संध्याकाळी युद्ध संपल्यावर सर्व आपापल्या शिबिरावडे वळले. परत जातांना सर्वजण आपापसांत अर्जुनाच्या शौर्याची स्तुति करीत चालले होते. त्या दिवशीच्या युद्धांत अर्जुनानें कौरवांचे दहा हजार रथ, सातशे हत्ती वगैरे नष्ट करून आपला पराक्रम दाखविला.

 

कुरुक्षेत्र

कथाकार
Chapters
भीष्म आणि कृष्ण