Get it on Google Play
Download on the App Store

कपालिनी

त्या खडकाळ जागी कपालिनी जवळ जवळ बेशुद्ध स्थितीत कण्हत पडलेली होती. तिला पाहून चंद्रवर्मा चकित झाला. त्याला अग्नीपक्ष्याचे गरुड पक्ष्यांशी झालेले बोलणे आठवलें. गरुड पक्ष्यांनीच हिला येथे आणून टाकले असावे, असे त्याला वाटले.

"कपालिनी तुला विशेष लागले तर नाहीं ना?? कांही बरें वाईट होण्यापूर्वीच सांग, मी काही तरी उपाय करीन. ते गरुड पक्षी कोणीकडे गेले?" चंद्रवर्मानें विचारलें.

कपालिनी त्याला जवळ बोलावून हळूच म्हणाली,

"हळू बोल, आपण वेळीच कोणत्या तरी गुहेत निघून जाणे बरें, तेथे गेल्यावर मी सर्व काही सांगेन. मला विशेष लागलेले नाही. तूं थोडा जवळ ये. मी हात धरून उठतें. नंतर आपण दोघे कोठे तरी निवाऱ्याच्या जागी जाऊं."

चंद्रवर्मा थोडा वाकला. त्याचा खांदा धरून कपालिनी उठून उभी राहिली. नंतर कपालिनी चंद्रवर्माचा हात धरून चाल लागली. म्हणाली-“चंद्रवर्मा! मला वाटते त्या झाडीच्या आड एक गुहा आहेसें मला आठवते. चल तिकडे जाऊं." खडकाळ वाटेने चढत उतरत ती दोघे डोंगराच्या पायथ्याजवळ येऊन पोचली. त्या गुहेचे तोंड तसे मोठे नव्हते. त्यावर गवत व काटेरी झाडे उगवली होती. आंतून गुहा पुष्कळ मोठी होती. वर छपराला भोकें होती म्हणून थोडा थोडा उजेड आंत येत होता.

कपालिनी आंत येऊन बसली. चंद्रवर्माने तिला विचारले

"तुला त्या गरुड पक्ष्यांनी येथे आणून टाकले आहे, हे त्या शंखाला कळलें असेल का?"

कपालिनीच्या तोंडावर चंद्रवर्माला स्मित दिसले. मरणाचे भय तिच्या चेहऱ्यावर नव्हतें. ती म्हणाली

“अरे! त्याला कळलें असतें की येथे येऊन पडले आहे तर त्याने मला या वेळेपर्यंत जिवंत सोडले असते का? मी काल सकाळपासून येथे पडून आहे. ज्या गरुड पक्ष्यांच्या हाती मी पडणार होते ते कालसर्पाच्या हाती सांपडून आपल्या प्राणास मुकले."

“असे असेल तर आपल्याला कसली हि भीति नाही. मी या काळोखांत जाऊन त्या शंखाचें तें पूजागृह कोठे आहे हे पाहून येतो." चंद्रवर्मा म्हणाला.

कपालिनीनें चंद्रवर्माला आठवण करून दिली आणि म्हणाली

“सावध हं..! वर्मा, त्या अग्निपक्ष्याची गोष्ट विसरू नकोस. रात्रीच्या वेळी त्याच्या हातून स्वतःला वांचविणे सोपं नाहीं बरें..! आणि दिवसां त्या शंखाची नजर चुकविली पाहिजे. आज रात्रीच्या आंत त्या अग्निपक्ष्याचा सोक्षमोक्ष झाला नाही तर आपला प्राण धोक्यांत आहे, समज. त्याचा समाचार घेण्यासाठी मी कालसर्पाला नेमलें आहे."

“म्हणजे, कालसर्प देखील येथे आला आहे म्हणावयाचा? तू हे तर सांगितलेच नाहीस?" चंद्रवर्मा म्हणाला.

चंद्रवर्माकडे पाहून कपालिनी थोडी हंसली. कपालिनी म्हणाली

"चंद्रवर्मा..! कालसर्पाचा माझ्यापेक्षा तुझ्यावर जास्त भरंवसा आहे हे मला कळले आहे. तूं एका एकी मला येथे दिसलास त्याचे मला थोडे देखील आश्चर्य वाटले नाही. तूं इतक्या लवकर येथे कसा पोचलास हे विचारले का मी तुला...! कारण कालसर्पाने मला तुझ्याविषयी सर्व काही सांगितले होते. तूं त्या विचित्र वृक्षाचे फळ खाले आहेस, हे जेव्हा मला कळले तेव्हा तूं येथे सुरक्षित पोचशील याची मला खात्री वाटली."

कपालिनी बोलतच होती की एका एकी वीज चमकल्यासारखा एकदम उजेड पडला. चंद्रवर्मा चकित होऊन गुहेच्या बाहेर येऊन पाहू लागला की काय भानगड आहे. तेव्हा त्याला कळले की झाडीच्या पलीकडे अग्निपक्षी उडत येत आहे. तो अगदी जमिनीजवळ उडत आला. त्याला पाहताच कालसर्प मापल्या फणा वर करून उभा राहिला. त्याला पाहूनच अग्निपक्षी खाली उतरला आणि कालसर्पाला तेच हवे होतें. तो त्याचीच वाट पहात होता.

"कपालिनी, अग्निपक्षी कालसर्पावर झडप मारायला आला आहे. मी जातो कालासर्पाच्या मदतीला त्याला एकटा सोडून भागणार नाही." चंद्रवर्मा म्हणाला.

"कांहीं जरूर नाहीं!" बाहेर गुहेच्या तोंडाजवळ येऊन कपालिनी म्हणाली.

"शंखाच्या त्या नोकराचा समाचार घ्यायला कालसर्प एकटा पुरे आहे. अजून तू कालसर्पाला पुरा ओळखला नाहीस. पण तो जर का मारू शकला नाही तर मात्र आपणां दोघांचा जीव धोक्यात आहे असे समज. अग्निपक्ष्याला हे कळलें असणार की गरुड मला घेऊन आले आहेत. ही गोष्ट तो आपल्या मालकाला सांगायला जाण्यापूर्वी त्याचा शेवट झाला पाहिजे."