Get it on Google Play
Download on the App Store

महामांत्रिक

चंदवर्माला झोपडीतून बाहेर आलेला पाहून सैनिक विचारांत पडले. सैनिक म्हाताऱ्याला ओळखत होते. पण म्हाताऱ्याच्या जागी एक तरुण त्यांना दिसला. त्यांना वाटत होते की आपण म्हाताऱ्याला बरोबर पकडलें, पण त्यांची निराशा झाली होती.

"तूं कोण? आणि या झोपडीत राहणारा तो म्हातारा कोठे आहे ?"

सैनिकांच्या सरदाराने चंद्रवर्माला दरडावून विचारले,

"कोणचा म्हातारा? मला नाही. कोणी माहीत आणि प्रथम तुम्ही कोण आहांत हे कळू दे, मग मी कोण हे मी सांगतो तुम्हांला."

चंद्रवर्मा तलवार हातांत घेऊन म्हणाला.

चंद्रवर्माला तलवार हातांत घेऊन निर्भयपणे बोलतांना पाहून सरदार थोडा चपापला. चंद्रवर्माने ते ओळखले. त्याच आवेशांत तो म्हणाला

"कोण आहे तुमचा राजा? तुम्ही सर्व मिळून माझ्या एकट्यावर हल्ला करणा...! तरी तुम्हांला एकेकट्यानेच लढावे लागेल. कारण माझ्या पाठीमागें झोपडी आहे आणि एकेकटे आलांत की मिळालीच गति म्हणून समजा."

चंद्रवर्माची ती अधिकारयुक्त वाणी ऐकून तो एक कसलेला लढवय्या आहे हे कळण्यास सरदाराला मुळीच वेळ लागला नाही. आणि चंद्रवर्माचे म्हणणे सुद्धां बरोबर आहे असेच सरदाराला वाटलें.

“आपण कोणी वीर पुरुष आहांत हे आपणांस पाहिल्याबरोबरच कळून येते. आपल्या सारख्यांशी विनाकारण युद्ध करण्याची आमची इच्छा नाही. आम्ही राजाच्या आज्ञेवरून फक्त या झोपडीत राहणा-या म्हाताऱ्याला पकडण्यासाठी आलों आहोत. अचानक तुम्ही आमच्या समोर आल्यामुळे आम्हांला हि आश्चर्यच वाटत आहे. जे झाले ते विसरून जा. बरें, येतो आता आम्ही."

असे म्हणत ते सर्व सैनिक मागे फिरले.

“पण तुम्ही आपल्या राजाचें नांव नाही सांगितलेत...?"

चंद्र वर्मा वरच्या आवाजांत म्हणाला.

“आपण सध्या ज्या राज्यांत रहात आहां त्या राजाचें नांव आपल्याला माहीत नाहीं? आश्चर्यच आहे मोठे." सरदार म्हणाला.

चंद्रवर्मा स्मित करून म्हणाला "राज्य व त्याच्या सीमा यांची ओळख ठेवणे मी केंव्हाच विसरून गेलो आहे. कारण माझ्या गुरुने मरणापूर्वी मला एका राजाची भेट घेण्यास सांगितले होते. आणि तो राजा म्हणजे शिव सिंह, तो कोणत्या देशाचा राजा आहे, हे देखील मला माहीत नाही. त्याची गांठ घेण्यासाठी मी पृथ्वीच्या पाठीवर या टोकापासून त्या टोकापर्यत भ्रमण करीत आहे. आणि म्हणूनच आपली भेट होऊ शकली."

चंद्रवर्माचे बोलणे ऐकून सरदार चकित होऊन त्याच्याकडे पाहूं लागला.

चंद्रवर्मा म्हणाला "तुम्ही ज्या शिवसिंहाविषयीं म्हणालांत तोच शिवसिंह ह्या देशाचा राजा आहे."

“फार छान! फार छान!! धन्य!!! धन्य आहे मी!! किती दिवसांनी ही शुभ वार्ता कानांवर पडत आहे. मला घेऊन चला तुम्ही आपल्या राजाकडे, मी त्याच्या भेटीची मोठ्या आशेने इतके दिवस वाट पाहात आहे.” चंद्रवर्मा म्हणाला.

नंतर सरदाराने एकदा साशंक नजरेनें त्याच्याकडे पाहुन विचारले. तो म्हणाला 

“आपल्या गुरूने इतक्या आग्रहाने आमच्या राजाची भेट कशासाठी घेण्यास सांगितली आहे?"

"तें एक फार मोठे गूढ आहे.” असे म्हणत चंद्रवर्माने आकाशाकडे दृष्टि वळविली आणि आनंदानें हंसत म्हणाला

"कांशाच्या किल्ला...! आतां तरी मिळवाल ना?"

कांशाच्या किल्लाचे नांव ऐकताच सर्व सैनिक चपापले. ते आश्चर्याने परस्परांकडे पाहूं लागले.

“तुम्हाला त्या किल्लाची माहिती कशी समजली!" सरदाराने विचारले,

“त्या संबंधी फक्त मला व माझ्या पूर्वजांनाच माहिती आहे. म्हणजे तुमच्या प्रश्नावरून असे वाटते आहे की तुम्हांला सुद्धा त्या संबंधी माहिती आहे. आश्चर्य आहे हे खरोखरच...!"

चंद्रवर्मा विस्मयाने म्हणाला.

"त्या किल्लाचे रहस्य समजून घेण्यासाठींच तर आम्ही या जगलांत हिंडून फिरून त्या म्हाताऱ्याला पकडण्याचा प्रयत्न करीत आहोत." सरदार म्हणाला.

चंदवर्माने आपल्या उजव्या हातावरील रेषा निरखून पाहिल्या आणि म्हणाला,

"आले लक्षांत. समजले सर्व काही, त्या म्हाताऱ्याजवळ त्या किल्लाला जाणाऱ्या वाटेचा नकाशा आहे असे वाटून तुमच्या राजाने त्याच्या देव नावाच्या मुलाला पकडले आहे. होय की नाही? भोळा बिचारा राजा."

सैनिकांच्या सरदाराने चंद्रवर्माचा हात न्याहाळून पाहिला. परंतु त्याला काहीच समजले नाही. तो म्हणाला

"तुम्ही सर्वज्ञ आहांत असे वाटते. नाहीतर हात पाहून तुम्ही कसें असें सांगू शकतो?"

"कसे सांगू शकाल...!" चंद्रवर्मा पुटपुटला.

नंतर रागानें सरदाराला म्हणाला

“तूं आत्तांच्या आतां येथून निघून जा. या टेकडीच्या पलीकडील मैदानांत माझी वाट पाहा. मी हा मागोमाग आलोच. मग तेथून आपण सर्वजण मिळून तुमच्या राजाकडे जाऊं."

चंद्रवर्मात काही तरी दिव्यशक्ति आहे. असेंच वाटले त्या सरदाराला. चंद्रवर्माचा हुकूम होतांच

“जी हुजूर" म्हणून आपल्या शिपायांना घेऊन तो सांगितलेल्या जागेकडे गेला.

ते सर्व सैनिक दृष्टिआड झाल्यावर चंद्रवर्मा झाडीत शिरला व

“सर्व काम अगदी बिनबोभाट झाले आहे. घाबरण्याचे काही कारण नाही. कोठे आहेस तूं जांबवान!" असे ओरडला.

चंद्रवर्माचा आवाज ऐकून तो म्हातारा त्याच्या जवळ आला आणि म्हणाला

"अरे, हा जांबवान नांवाचा कोण नवीन माणूस आहे कां?"

"तुम्हीच...! तुम्हांला “म्हातारे बुवा” असे हांक मारणे मला प्रशस्त वाटले नाही. म्हणून असे म्हटलें मी. बरें, मी शिवसिंह राजाकडे जात आहे. तुमच्या मुलाला तर कैदेतून सोडवीनच, कांशाच्या किल्लातील धनराशींचा कांहीं हिस्सा देखील देईन. तिकडील मार्ग दाखविणारा नकाशा कोठे आहे तें मात्र मला सांगा." चंद्रवर्माने धीर करून विचारले.

“मग काय तुझ्यावर विश्वास ठेवायचा म्हणतोस?" म्हातारा अर्धवट शंकित मनाने बोलला.

"विश्वास ठेवलात तर तुमचे व तुमच्या मुलाचे कल्याण आहे आणि नाही ठेवलात तरी तो किल्ला शोधणे आतां कांहीं एवढे कठीण नाही. पश्चिमेच्या बाजूनें समुद्र किनाऱ्याच्या किनाऱ्याने गेल्यास कोठे तरी तो मिळेलच. परंतु जर नकाशा बघायला मिळाला तर काम कमी वेळात व कमी कष्टांत होईल इतकेंच." चंद्रवर्मा बेफिकीरीने म्हणाला.

चंद्रवर्माच्या त्या सडेतोड उत्तराने म्हातारा निरुत्तर झाला. त्याच्या मनांतील शंकापण नाहीशी झाली. त्याने आपल्या सदऱ्याच्या आतल्या खिशांतील ताडपत्र काढले. ते पंख्यासारखे पसरून म्हणाला

“हा बघ तो नकाशा." चंद्रवर्मानें तो फार बारकाईने पाहिला.

त्यांत नदया, पर्वत, वाळवंटे, जंगलें वगैरे सर्व व्यवस्थित दाखविलें होते. जेथे समुद्राचे टोंक दाखविले होते. तेथे चारी बाजूंनी मिती असलेला एक किल्ला दाखविलेला होता. त्याच्या भिंतीवर पलीकडे धुरासारखे काही तरी दाखविलेलें होतें.

"हा आहे कांशाचा किल्ला.हे सर्व डोंगर, नद्या ओलांडून जंगल, रेती तुडवून त्या जागेपर्यंत पोहोचणे, ही मनुष्याला शक्य होणारी गोष्ट वाटत नाही. जर कोणी पोहोचला तर खरोखरच तो धन्य आहे म्हटले पाहिजे.”

चंद्रवर्मा आश्चर्याने म्हणाला. त्याला आतून थोडे भयहि वाटले.

“आमच्या एका पूर्वजानें पाहिला होता हा किल्ला. काय करू रे..! मी म्हातारा झालो आहे म्हणून. नाही तर मी एकटा सुद्धां जाऊन आलो असतो...!" म्हातारा म्हणाला.

यावर चंद्रवर्मा हसून म्हणाला "तर मग हा नकाशा मला था. मी स्वतः शोधून. शोधतों तो किल्ला. तुमच्या मुलाला सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जाईन. जातांना रुद्रपुरच्या शिवसिंह राजाची भेट घेऊन जाईन. तुमची सर्व व्यवस्था करून जाईन. काळजी करू नका. आम्ही दोघे परत येईपर्यंत तुम्ही ह्या झोपडीत सुखाने आणि आनंदाने रहा."

साशंक मनानेंच म्हाताऱ्यानें तो नकाशा चंद्रवर्माच्या हातांत दिला.

"तूं फंसवीत तर नाहीस ना?”

“म्हाताऱ्याना फसवणे पाप आहे. पापाचे प्रायश्चित्त मिळाल्याशिवाय राहणार नाही. मी तसा मनुष्य नाही. तुम्हांला किंवा तुमच्या मुलालाच काय, पण शिवसिंह राजाला हि, जर तो सरळ असेल तर, मी फंसवणार नाही. तो माझा धंदा नव्हे. समजा, मला माझ्या कामांत यश आले नाही तर मी......" चंद्रवर्मा बोलतच होता.

इतक्यांत त्याला घोड्याच्या खिंकाळण्याचा आवाज ऐकू आला. त्याने झाडीतून डोकावून पाहिले तर त्याला सैनिकांचा सरदार झोपडीच्या बाजूस येत असल्याचे दिसले. त्याला पाहून चंद्रवर्मा म्हाताऱ्याला म्हणाला

"मी या सैनिकांबरोबर रुद्रपुरच्या राजाकडे जात आहे. तेथून मी तुमच्याकडे निरोप पाठवितो. मग त्याप्रमाणे तुम्ही राजधानीत जाऊन निर्भयपणे व सुखाने रहा."

असे सांगत तो तेथून निघाला व सरदाराजवळ आला. चंद्रवर्माला पाहून सरदार घोड्यावरून उतरला. म्हणाला

"इतका वेळ तुमची वाट पाहिली. पण तुम्ही आला नाहीत म्हणून येथपर्यंत आलो. हा घ्या घोडा. आपल्या साठीच आणला आहे. आपल्या आगमनाची बातमी मी महाराजांकडे पाठवून दिली आहे."

“मी माझ्या काही शक्तींना आहान करण्यासाठी जंगलांत गेलो होतो. परंतु माझी फार निराशा झाली. कोणी हि तुमच्या राजाबद्दल चांगले शब्द काढले नाहीत. इतका का तो बाईट आहे?" चंद्रवर्माने विचारलें.

“राजा चांगला कां वाईट, हे त्याचा सैनिक काय सांगणार? ते त्याच्या प्रजेला विचारले पाहिजे. नाही तर आसपासच्या राजांचे मत विचारले पाहिजे. आम्हांला काय? जो महिन्याच्या महिन्याला आम्हांला वेळेवर पगार देतो तो राजा चांगला." सरदार म्हणाला.

सरदाराच्या बोलण्यावरून चंद्रवर्माने ताडले की, राजाशी बोलतांना आपल्याला खूप सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण कांशाच्या किल्लापर्यंत जाण्यासाठी त्या राजाकडून सर्व प्रकारची सहायता घ्यावयाची आहे.

एकट्याने तेथपर्यंत पोहोचणे अशक्यच आहे. त्याच बरोबर त्याने ठरविले की शिवसिंहाला सर्व गोष्टींचा पुरेपूर परिचय देता कामा नये. नाही तर तो मध्येच कांहीं तरी गडबड करील. या सैनिकाला जसा मंत्रविद्येचा प्रभाव दाखविला आहे तसाच त्यालाहि पण दाखविला पाहिजे. म्हणजे जमले तर जमेल थोडेसें तरी काम, आपण आतां राजधानीकडे जाऊं. सरदाराने असें म्हटल्याच्या बरोबर लगाम हातात घेऊन चंद्रवर्मा घोडयावर बसला.

थोडा वेळ डोंगर, रानमाळ, ओढे वगैरे ओलांडून गेल्यावर ते सर्व लोक रुद्रपुर नगराजवळ येऊन पोहोचले. राजाला अगोदरच वर्दी पोहोचली असल्याने त्याने वेशीवर तोरणे बांधून त्याच्या स्वागताची तयारी केली होती. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जमली होती चंद्रवर्माला पाहण्यासाठी. चंद्रवर्मान सैनिकांसह नगरांत प्रवेश केला. तो राज- मार्गावर येतांच लोकांनी टाळ्या वाजवून आणि रुमाल फडकवून त्याचे स्वागत केले.

“महा मांत्रिकाचा जयजयकार असो...!!" अशा घोषणाहि केल्या.

घोषणा ऐकून चंद्रवर्मा पेचांत पडला. हे लोक असें कां म्हणत आहेत...! तेवढयात त्याला आठवलें की आपण आपला हाल पाहूनच तर म्हाताऱ्या विषयीं, कांशाच्या किल्ल्या विषयी तेथे जाणाच्या मार्गाविषयी सरदाराला सांगितले होते. म्हणूनच त्याने आपण महामांत्रिक आहोत अशी वर्दी राजाला दिली असली पाहिजे. त्याचा हा परिणाम आहे. आणि म्हणूनच आपल्याला खूश करून वश करून घेण्याचा तो प्रयत्न करीत आहे.

ठीक आहे. एका प्रकारे हे चांगलेच झालें. आपण इतक्या संकटांत उडी टाकली. कपालिनीला किंवा महामांत्रिकाला देखील आपण भ्यालों नाही. आतां स्वतः महामांत्रिकाचे सोंग करावयाचे आहे...! असा विचार करीत, स्वागताचा स्वीकार करीत दैवावर भरंवसा ठेवून तो राजवाडयात पोहोचला.