Get it on Google Play
Download on the App Store

५ याला बाप का म्हणावे १-२

(ही कथा काल्पनिक आहे साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

आज दहावीचा रिझल्ट लागला होता .मालती पहिल्या शंभर विद्यार्थिनींमध्ये आली होती .विद्यार्थिनीमध्ये तिचा नंबर पन्नासावा तर एकूण विद्यार्थी विद्यार्थिनींमध्ये सत्तरावा होता .वनिता मुक्ती आश्रमाच्या कमलाबाईंची परवानगी घेऊन ती आज युवराजांना भेटण्यासाठी चालली होती .शामरावानाही तिने फोन केला होता .शामराव युवराजांकडेच तिला भेटण्यासाठी येणार होते.विजया तेथे असणारच होती .मालती आज जी काही होती ती केवळ शामराव युवराज व विजया यांच्यामुळे होती.जर चार वर्षांपूर्वी तिला शामराव भेटले नसते तर तिच्या आयुष्याला कोणते वळण लागले असते ते सांगता येणे कठीण आहे.तिला चार वर्षांपूर्वीची ती रात्र आठवू लागली.

जून महिना होता. पावसाचे दिवस होते. ती दादर स्टेशनवर उतरल्यावर एका बाकड्यावर तिच्या बरोबरचे गाठोडे पोटाशी धरून पाय वरती घेऊन पायाला हातांची मिठी मारून बसली होती . स्टेशनवर लोकांची धावपळ चालली होती .काही टवाळ पोरे दूरवर उभे राहून तिच्याबद्दल चर्चा करीत होते .ती घरातून पळून आली होती खरी, परंतु आता तिला काय करावे ते कळत नव्हते .गाडीत बसावे आणि पुन्हा परत जावे असेही  तिला वाटत होते .पण परत गेल्यावर तिला त्याच किळसवाण्या गोष्टींना तोंड  द्यावे लागले असते. येथे तिच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे ते तिला माहीत नव्हते.कदाचित त्यापेक्षाही भयंकर प्रकराना तिला तोंड द्यावे लागले असते.त्याची त्या अजाण मुलीला काहीही कल्पना नव्हती .हल्लीच्या काळात पुरुष किंवा स्त्री कुणाचाही काहीही भरवसा देता येत नव्हता .

त्या लांब असलेल्या मुलांपैकी एक सतरा वर्षांचा मुलगा येऊन तिच्या शेजारी बाकावर बसला .तो तिला अगदी लगटून बसला होता .तिने आपले अंग चोरून घेतले .गाठोडे पोटाशी धरावे आणि तेथून धूम ठोकावी असे तिला वाटत होते .परंतु ती कुठे जाणार होती?

शामराव नेहमीप्रमाणे राउंडला बाहेर पडले होते.ते दादर स्टेशनमध्ये आत शिरले.हा विभाग जरी रेल्वे पोलिसांचा असला तरीही शामराव तिथे चक्कर मारीत असत .मध्य व पश्चिम रेल्वेच्या सर्वच स्टेशनवर अधूनमधून ते चक्कर मारीत असत .त्यांना बऱ्याच वेळा हवे असलेले गुन्हेगार तिथे आयते मिळाले होते.तर काही वेळा त्यांना निष्पाप लोकांना गुन्ह्याला बळी पडण्यापासून वाचवता आले होते . बऱ्याच वेळेला गुन्हेगार पोलिसांपासून पळण्यासाठी स्टेशनचा रेल्वेचा उपयोग करीत असतात .अश्या वेळी त्यांना पकडल्यानंतर रेल्वे पोलिसच्या संमतीने त्यांना अटक करून बाहेर नेता येत असे.

शामरावांना बघितल्याबरोबर तो मुलगा बाकावरून उठला आणि लगेच चालू लागला. शामरावांच्या नजरेतून त्या मुलाचे दचकणे सुटले नाही. त्यांना ती बाकावर गाठोडे करून बसलेली मुलगीही दिसली .सराईत नजरेने त्यांनी ती मुलगी मुंबईची नाही हे लगेच ओळखले .ती मुलगी घरातून पळून आलेली असावी आणि आता काय करावे म्हणून गोंधळलेली असावी हेही  त्यांनी ओळखले .

तिची चौकशी इथेच सुरू केली तर ती गांगरून जाईल . लगेच खूप बघेही जमतील.मुंबईमध्येच काय भारतात कुठेही बघ्या लोकांचा तुटवडा नाही.  पोलिस स्टेशनमध्ये तिला नेली तर तेथील वातावरण बघून ती आणखी घाबरून जाईल.तिला अशा एखाद्या ठिकाणी नेले पाहिजे की जिथे ती रिलॅक्स होईल .मानसिकरित्या मोकळी होईल. मानसिक दबावाखाली राहणार नाही.तिथेच त्यांना तिची खरी  हकिकत कळणार होती. त्यांना युवराजांचे नाव लगेच सुचले.तिला मोकळे वाटण्यासाठी,तिला बोलते करण्यासाठी , एखादी बाई पाहिजे हेही त्यांच्या लक्षात आले होते .विजया तिथे होतीच.तिला युवराजांकडे न्यावे .ती कुठून पळून आली कां पळून आली ते माहीत करून घ्यावे.तिचे समुपदेशन करून जग किती भयंकर आहे ते तिच्या लक्षात आणून देऊन तिला परत घरी सुखरूप पोचवावे असा त्यांचा हेतू होता .

त्यांनी तिला तू इथे बसू नकोस ते धोक्याचे आहे .तू माझ्याबरोबर पोलिस स्टेशनमध्ये चल .तिथे तू सुरक्षित राहशील. पुढे काय करायचे ते आपण नंतर ठरवू असे सांगून तिला घेऊन ते बाहेर जीपमध्ये येऊन बसले . पोलिसांना नाही म्हणणे तिला शक्य नव्हते. त्या मुलांची व इतरही अदृश्य भीती होतीच . ती मुकाटय़ाने त्यांच्याबरोबर निघाली .ती टवाळ पोरे त्यांचे आपसातील अश्लील बोलणे तो शेजारी येऊन बसलेला मुलगा त्याचा तो घाणेरडा स्पर्श यामुळे शामरावांचे काम सोपे झाले.आपण पोलीस स्टेशनमध्ये जास्त सुरक्षित राहू असे तिला वाटले .

शामरावांनी ड्रायव्हरला जीप सरळ युवराजांच्या घरी घेण्यास सांगितली.त्यांनी फोन करून युवराजांना सर्व हकीकत थोडक्यात सांगितली होती.युवराजांच्या ऑफिस कम घर येथे गेल्यावर विजयाने त्यांचे स्वागत केले .युवराजांनी विजयाला सर्व कल्पना दिली होतीच .विजया तिला घेऊन घरात गेली.प्रथम विजयाने तिला गरम पाण्याने स्नान  कर म्हणून सांगितले .तिला गरम पाणी काढून दिले .ती  स्वच्छ कपडे घालून बाथरूममधून बाहेर आली.  विजयाने  तिला गरम गरम पोहे खाण्यासाठी दिले.नंतर कडक कॉफी दिली .विजयाच्या प्रेमळ वागणुकीमुळे  मालती जास्त मोकळी झाली .तिने तिची सर्व हकीगत सांगण्याला सुरुवात केली .मालती बोलत असताना विजयाने मधूनमधून प्रश्न विचारून तिची सर्व माहिती सविस्तर जाणून घेतली . तिने घरून पळण्याचे कारण सांगितले.कोणत्याही परिस्थितीत मी घरी जाणार नाही असेही तिने ठामपणे सांगितले .तू आता इथे शांतपणे झोप. तुला घाबरण्याचे कारण नाही असे सांगून विजयाने तिला बेडरुममध्ये झोपविले.ती झोपल्यावर विजया बाहेर हॉलमध्ये आली .तोपर्यंत शामराव व युवराज गप्पा मारीत होते.टीव्हीवरील बातम्याही ते मधून मधून पाहात व ऐकत होते.  

विजया बाहेर हॉलमध्ये आल्यावर तिने मालती शांतपणे झोपली आहे.मी तिला आश्वस्त केले आहे .असे सांगून मालतीची सर्व माहिती त्या दोघांना सांगितली .

मालती व तिचा भाऊ अशी तिच्या आई वडिलांना दोन मुले.पुण्याला कृष्णनगर झोपडपट्टीमध्ये ती राहात होती .आई लोकांची धुणीभांडी करून  संसार चालवीत असे.आई सकाळी स्वयंपाक करून जी बाहेर पडे ती एकदम संध्याकाळीच घरी येई .तिचे वडील कुठल्या तरी कारखान्यात काम करीत होते .त्यांच्या कामाच्या वेळा दिवसा व रात्री अश्या बदलत असत.ती शाळेत जाऊन नुकतीच सहावी पास झाली होती.तिचा भाऊ पहिलीमध्ये होता .दिवसा भाऊ बाहेर इतर मुलांबरोबर खेळण्यात मग्न असे.त्याचे अभ्यासात एवढे लक्षही नसे.

शाळेतून आल्यावर मालती मात्र अभ्यास करीत बसे.तिचे वडील जेव्हा घरी असत तेव्हा ते तिला प्रेमाने आपल्या जवळ बसवत .

*लहान असताना तिला वडिलांनी केलेले लाड आवडत असत .*

* त्यांचे गालावरून हात फिरविणे मुका घेणे अंगावर चापट्या मारणे अंगाशी घट्ट धरणे वगैरे गोष्टींमध्ये तिला काही गैर वाटत नसे.*

*चौथीत गेल्यावर तिला वडिलांचे हे लाड थोडे विचित्र वाटू लागले .*

*पाचवीत गेल्यावर मात्र बाबा नको तिथे आपल्याला हात लावतात असे तिच्या लक्षात येऊ लागले.*

(क्रमशः)

२/७/२०१९©प्रभाकर  पटवर्धन