Get it on Google Play
Download on the App Store

९ हत्त्या (युवराज कथा) ३-३

(ही गोष्ट काल्पनिक आहे जिवंत किंवा मृत व्यक्तीशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.)

सहाय्यकांकडून मिळालेली माहिती, त्याचप्रमाणे त्याने स्वतः गोळा केलेली माहिती, एकत्रित करून त्याने त्याचा युवराजांना पुढील प्रमाणे रिपोर्ट दिला                                            

जयरामचे एका मुलीबरोबर प्रेमप्रकरण जवळजवळ तीन वर्षे चालले होते.त्याच्या आई वडिलांना ही गोष्ट माहिती होती .पोलीस चौकशीमध्ये त्यांनी ती बहुधा मुद्दाम  किंवा कदाचित विसरतेपणी सांगितली नाही .ती मुलगी कुर्ल्याला राहत होती .तिचे आई वडिल अजूनही तिथेच राहतात .तिथे शेजाऱ्यांकडे जाऊन गप्पा मारून ओळख वाढवून मी अंतस्थ माहिती स्वतः काढली .गरज पडेल तिथे मी पैशांचाही प्रयोग केला .जयरामशी तुलना करता ती संपन्न घरातील असल्यामुळे तिच्या घरच्यांचा या लग्नाला विरोध होता.जयराम एका कारखान्यात काम करत असे.त्याच्या कामाचे स्वरूप बरेचसे हमालीसारखे होते .विशेष शिकलेला नाही,कायम  नोकरी नाही, म्हणून सुनंदाच्या घरच्यांचा त्यांच्या लग्नाला  विरोध होता.सुनंदा बारावीपर्यंत शिकलेली आहे .जयरामने आठवीमध्ये शाळा सोडली होती .

वर्षभरापूर्वी  सुनंदाचे लग्न  एका अकोल्याच्या व्यापाऱ्याशी झाले .तिथे ती सुखात आहे .जयराम मात्र अजूनही तिच्यासाठी वेडापिसा झालेला होता.सुनंदा जेव्हा जेव्हा माहेरी येई त्या त्या वेळी तो तिच्या माहेरी चकरा मारीत असे.तिला भेटून तू घटस्फोट घे आणि माझ्याशी लग्न कर असा त्याचा आग्रह असे.

सुनंदा या त्याच्या मागणीला अर्थातच होकार देऊ शकत नव्हती .जयराम मधूनमधून अकोल्यालाही चकरा मारीत असे .तिथे तो तिच्या घरी जाऊनही तिला भेटत असे .तिथे सुनंदा त्याला हा माझा लांबचा मामेभाऊ म्हणून ओळख करून देत असे .कामाच्या निमित्ताने   अकोल्याला आलो असे तो सांगत असे .तो तिच्या घरी न राहता एका हॉटेलात राहात असे .त्याच्या वारंवार चकरा होत असल्यामुळे तिच्या सासरच्यानाही संशय येऊ लागला होता.

मी स्वतः अकोल्याला  जाउन त्याच हॉटेलमध्ये उतरून तिथे  बरीच माहिती गोळा केली .कामाच्या मिषाने  मी तिच्या सासरीही जाऊन आलो.

सुनंदाच्या मित्रमैत्रिणींशीही मी ओळख काढली.त्यांच्या बोलण्यात असे आले की जरी पूर्वी सुनंदा जयरामसाठी वेडी झाली होती तरी आता ती तिच्या संसारात सुखी आहे .जयरामने तिला विसरून जावे असा तिचा आग्रह आहे.जयराम मात्र बदललेली परिस्थिती लक्षात घेत नव्हता .

तुम्ही केलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही जयरामच्या घराजवळ असणार्‍या  रिक्षा स्टँडवर चौकशी केली .मृत्यूच्या दिवशी ज्या रिक्षातून जयराम सुनंदाकडे गेला तो रिक्षावाला सापडला आहे.त्याचा रिक्षा नंबर मोबाईल नंबर व जबाब सोबत जोडला आहे.

सुनंदाच्या भावाच्या मित्रांचीही अाम्ही चौकशी केली .त्यातील एका मित्राचा टेम्पो आहे .तो गुंड प्रवृत्तीचा आहे. त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.तुमचा अंदाज खरा असेल तर त्या दिवशी त्या टेम्पोचा वापर केला गेला असणे शक्य आहे.त्या टेम्पोचा नंबर व टेम्पोच्या मालकाचा पत्ता सोबत जोडला आहे .

मोबाइलवरील संभाषण सर्व्हिस प्रोव्हायडरकडून मिळविण्याचा मी प्रयत्न केला .परंतु मला त्यात यश आले नाही .

मोबाइल तज्ञांकडून मोबाईलचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही .

नंतर मी जयरामचा  मोबाइल मिळवण्याचा प्रयत्न केला .जर जयरामचा मोबाइल सुनंदाच्या घरच्यांना मिळाला असेल तर ते तो नष्ट करण्याचा प्रयत्न करतील .मोबाइल त्यांच्या जवळ सापडणे धोक्याचे आहे .बहुश: ते तो कचऱ्यात फेकून देतील.असा विचार मनात येऊन मी कचरा गोळा करणार्‍यांकडे चौकशी केली.सुदैवाने मला लॉटरी लागली .त्या परिसरात कचरा गोळा करणाऱ्याला एक मोबाईल मिळाला होता .त्याने तो तसाच जवळ ठेवला होता .भरपूर पैसे देऊन मी तो  मिळविला.सुदैवाने त्यातील रेकॉर्डिंग मला उपलब्ध झाले .तो मोबाइल व रेकॉर्डिग सोबत जोडले आहे .फोनवर 

सुनंदा जयरामला तू माझा पाठलाग सोड. मला सुखाने जगू दे. माझ्यावर मेहरबानी कर.अशी विनवणी करताना आढळून येते .तर जयराम कोणत्याही परिस्थितीत तिचा पाठलाग सोडण्यास तयार नाही .जर अशीच स्थिती राहिली तर त्याचा सुनंदाच्या संसारावर गंभीर परिणाम होऊ शकतो .सुनंदाला तिचा हराभरा संसार अज्जिबात सोडायचा नाही असे दिसते.

*अश्या परिस्थितीत  ती व तिच्या माहेरचे कोणत्याही थराला जाऊ शकतात.*

मी स्वतः सुनंदाच्या घरी त्यांना भेटायला गेलो होतो .जयरामच्या आकस्मिक मृत्यूच्या संदर्भात आम्ही चौकशी करीत आहोत . असे त्यांना सांगून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला .त्यानी सुनंदा व जयराम यांची ओळख व प्रेमसंबंध नाकारले नाहीत.परंतु आता सुनंदाच्या लग्नानंतर आमचा जयरामशी काहीही संबंध उरलेला नाही असे सांगितले.तो सुनंदा आल्यावर किंवा एरवीही कदाचित एखादी चक्कर मारतो परंतू आता त्याने सुनंदाचा नाद सोडलेला आहे असे सांगितले .सुनंदा आलेली असताना तो वारंवार येतो वगैरे सर्व गोष्टी त्यांनी नाकारल्या.शेजाऱ्यांकडे चौकशी करता  त्यांनी जयराम सुनंदा आल्यावर तेथे वारंवार येतो म्हणून सांगितले  .जयराम तुमच्या घरी केव्हा आला होता असे विचारता त्यांनी गेल्या महिन्याभरात तो आमच्याकडे आलेला नाही,आम्ही  त्याला पाहिलेला नाही म्हणून सांगितले .

एवढे सर्व लिहून *सुनंदाच्या घरच्यांची जास्त सखोल चौकशी होणे आवश्यक आहे असा रिमार्क त्याने मारला होता .*

युवराजांनी संदेशने तपशीलवार दिलेला अहवाल वाचला व त्याने पाठविलेले रेकॉर्डिंग लक्षपूर्वक ऐकिले.

युवराजानी मनाशी काही अंदाज या केसच्या सुरुवातीलाच बांधला होता.तो अंदाज खरा ठरेल असे संदेशच्या अहवालावरून वाटत होते .जर तो अंदाज खरा ठरला तर ही केस सहज सुटणार होती .त्यानी शामरावांना फोन करून ऑफिसवर बोलवून घेतले.त्यांचा सर्व अंदाज शामरावाना सांगितला.असा अंदाज करण्यामागची तर्कसंगतीही सांगितली .

शामरावांनी प्रथम टेम्पोवाल्याला पोलीस पाठवून पोलीस चौकीमध्ये बोलवून घेतले.त्याची खास पोलिस चौकशी करता तो पोपटासारखा पटापट बोलू लागला .त्याने सांगितलेली हकीगत युवराजांच्या अंदाजाशी जुळत होती.साक्षीदारांसमोर त्याचा जबाब घेऊन त्याला सोडण्यात आले.   

नंतर शामराव काही पोलीस बरोबर घेऊन सुनंदाच्या माहेरी पोहोचले.पोलीसांची गाडी बघताच तिच्या घरातील सर्व मंडळी अस्वस्थ झाली होती.त्यांची अस्वस्थता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती.त्यावरून इथे पाणी मुरत आहे हे शामरावांनी ओळखले.पोलिसांची गाडी पाहून आसपासची  मंडळीही गोळा होऊ लागली होती.पोलिसांनी त्यांना पिटाळून लावले .

सुनंदाच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची स्वतंत्र चौकशी करण्यात आली.आई ,वडील ,भाऊ, बहीण ,भावाची बायको, सर्वांनी एकच जबाब दिला.

जयरामला आम्ही गेल्या महिन्याभरात पाहिलेले नाही. तो आमच्याकडे आलेला नाही.शेवटी त्यांनी ज्या रिक्षावाल्याने जयरामला त्यांच्या घरासमोर सोडले होते त्याला आम्ही शोधून काढले आहे. तो साक्ष देण्यास तयार आहे असे सांगितले.जयराम त्यांच्याशिवाय आणखी कुठेच जाण्याचा संभव नव्हता.हेही त्यांच्या लक्षात आणून दिले .

सुनंदाच्या भावाच्या मित्राचा टेम्पो आहे .त्या मित्राला आम्ही शोधून काढले आहे .त्याचा जबाबही आम्ही घेतला आहे .त्याने सर्व काही सविस्तर आम्हाला सांगितले आहे . असेही सांगितले.

कोपऱ्यावरील दारूच्या दुकानात चौकशी करता त्या दिवशी तुम्ही त्याच्याकडून दारू विकत घेतल्याचे आम्हाला कळले आहे.

त्याचप्रमाणे उंदराचे विष तुम्ही ज्याच्याकडून खरेदी केले त्यांचाही जबाब आमच्याकडे आहे . 

रिक्षावाला , टेंपोवाला,दारूचा दुकानदार ,उंदराचे विष विकणारा  या चौघांचा उल्लेख व त्यांचे जबाब आम्ही घेतले आहेत हे ऐकताना सर्वांच्या चेहऱ्यावरचे रंग पूर्णपणे उडाले.

जर तुम्ही खरा खरा जबाब दिला तर आम्ही तुम्हाला काहीही त्रास देणार नाही .तसे न केल्यास तुम्हा सर्वांना पोलीस कस्टडीत घेऊन आम्हाला पोलिस चौकशी करावी लागेल.पोलिस चौकशी म्हणजे काय ते तुम्हाला माहित आहेच.

*अशी समज दिल्यावर सुनंदा घरच्यांचा त्रास टाळण्यासाठी सर्व हकीगत सांगण्याला तयार झाली .*

*तिने पुढील प्रमाणे जबाब दिला .*

*जयराम त्या दिवशी आमच्याकडे पुन्हा आला होता .मी घटस्फोट घ्यावा व त्याच्याशी लग्न करावे असा त्याचा आग्रह चालला होता.मी पूर्वीचे सर्व काही विसरले आहे .मी माझ्या संसारात सुखी आहे . ही गोष्ट समजून घेण्याला तो तयारच नव्हता .तो काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता.याचा ससेमिरा याला धडा शिकविल्याशिवाय दूर होणार नाही हे आमच्या लक्षात आले.  शेवटी आम्ही त्याला आग्रहाने जेवण्यासाठी ठेवून घेतले.त्याला भरपूर दारू पाजली .नंतर जेवणामध्ये उंदीर मारण्याचे विष कालवून त्याला जेवू घातले .दारूच्या अंमलामुळे अन्नाची बदललेली चव त्याच्या लक्षात आली नाही.थोड्याच वेळात तो दारू व विष यामुळे ढेर झाला.नंतर त्याला टेम्पोमध्ये टाकून बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या परिसरात टाकून दिले.टेम्पोमध्ये चढवताना तो आमच्या हातातून निसटला.त्यामुळे त्याच्या डोक्याला व कमरेला मार लागला असावा.आमचा उद्देश त्याला ठार मारण्याचा नव्हता केवळ त्याला अद्दल घडावी व त्याने माझा पाठलाग सोडावा एवढाच होता.*

*शामरावांनी सर्वांना पोलिस कस्टडीत घेतले.त्यांच्यावर रीतसर खटला भरण्यात आला .वकील देऊन मंडळी जामिनावर सुटली.कोर्टात केस चालू आहे .यथावकाश त्यांना काही ना काही शिक्षा होतीलच .*

*सुनंदाने सर्व दोष जबाबदारी स्वत:वर घेतली आहे .घरातील इतरांना त्रास होऊ नये शिक्षा होऊ नये हा उद्देश त्यामागे आहे .*

*रिक्षावाला, टेम्पोवाला, फोनमधील रेकॉर्ड झालेले संभाषण ,परिस्थितीजन्य पुरावा , या सर्वामुळे केस एअरटाइट आहे .*

*कमी जास्त शिक्षा सर्वांना होतीलच.*

*अजून  निकाल लागलेला नाही * 

*दुर्दैवाने सुनंदाचा हे सर्व करण्यामागील मूळ हेतूच साध्य झाला नाही .*

*सासरच्यांनी तिला सोडून दिले आहे *

*सासरी सुखाने नांदण्याचे तिचे स्वप्न भंग पावले आहे*  

• ती व तिच्या घरच्यांकडून  जी पावले उचलली गेली ती त्यांना अपरिहार्यपणे विनाशाकडे घेऊन गेली .*

(समाप्त)

२८/८/२०१९©प्रभाकर  पटवर्धन