Get it on Google Play
Download on the App Store

४ सुधीर कुठे गेला १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे प्रत्यक्षात कथा किंवा पात्रे यांच्याशी साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा )

कमला आपल्या वन रूम  किचन ब्लॉकमध्ये सारखी येरझारा घालीत होती.त्या छोटय़ाशा ब्लॉकमध्ये फिरण्यासाठी जागाही नव्हती .येरझारा  घालता घालता मध्येच ती तिच्या छोट्याश्या बाल्कनीत जाऊन वाकून लांबवर सुधीर कुठे दिसतो का ते पहात होती. तिचा मुलगा केव्हांचा शाळेमध्ये मार्कलिस्ट आणण्यासाठी गेला होता.सकाळी अकरा वाजता शाळेत जाऊन मी निकाल घेऊन येतो म्हणून तो गेला होता.मुलगा न जेवता बाहेर पडला होता.एक वाजेपर्यंत तो येईल अशी कल्पना होती .ती त्याच्यासाठी न जेवता बरोबरच जेवू म्हणून थांबली होती.तिची भूक केव्हाच पळाली होती .नाही नाही ते विचार तिच्या मनात येत होते .सुधीर कुठे अपघातात तर सापडला नसेल ना ?अपघाताचा विचार तिच्या काळजाचे पाणी पाणी करीत होता.शेवटी तिला राहावेना .तिने घराला कुलूप लावले .शेजारी किल्ली दिली .सुधीर आला तर त्याला जेवून घे म्हणून सांगा असा शेजारी निरोप दिला.

विमलकाकूंनी कुठे जाता म्हणून विचारले .त्यावर सुधीर त्याचा दहावीचा निकाल आणायला शाळेत गेला आहे तो अजून आला नाही.त्याला बघून येते म्हणून सांगितले .आपला नवरा काळजी करील म्हणून तिने त्याला फोन करून काहीही कळविले नव्हते.

रस्त्याने चालता चालता तिला आपला भूतकाळ आठवत होता.औरंगाबादजवळील एका लहानश्या खेड्यात ती व तिचा नवरा लहानू रहात होते.ती मराठी सातवी पास झाली होती .तिचे लग्न लहानूशी झाले.तो फक्त चौथी पास होता . लागोपाठ तीन वर्षे सतत दुष्काळ पडल्यामुळे त्यांच्या जमिनीत काहीही पिकले नव्हते . गावात कुठे काही काम धंदाही मिळत नव्हता .जमीन सावकाराकडे गहाण टाकून त्यांनी कर्ज काढले होते .त्या पैशांवर,जवळ असलेले किडूक मिडूक विकून मिळालेल्या पैशांवर,आणि जो काही कामधंदा मिळत होता त्यातून मिळालेल्या पैशांवर ,आत्तापर्यंत कशी का होईना गुजराण होत होती .शेवटी त्यांनी शहरात जायचे ठरविले .

शहरात आल्यावर सुरुवातीला पुलाखाली नंतर लवकरच एका झोपडपट्टीत त्यांनी छोटीशी जागा भाड्याने मिळविली .ती लोकांची धुणीभांडी घरकाम करून पैसे मिळवीत असे .एके दिवशी जिथे ती काम करीत होती ती मालकीण खूप आजारी होती. तिने तिला सैपाक करायला सांगितला.तिच्या हाताला चव होती .तिच्या हातचे जेवण जेवून सर्वच खूष झाले .तेव्हापासून तिचे धुणीभांडी करण्याचे काम सुटले.ती दोन चार घरचा स्वयंपाक करून बऱ्यापैकी पैसे मिळवू लागली.

तिचा नवरा लहानू नेहमी श्रमतिठ्यावर जाऊन उभा राहात असे .त्या तिठ्यावर त्याच्यासारखे बरेच कामाची गरज असलेले येत असत .कसबी मजुरांना जास्त पैसे मिळत.लहानूच्या  अंगात कुठलेही विशेष कसब नसल्यामुळे त्याला अकुशल कामे मिळत.केव्हा काम मिळे केव्हा काम मिळत नसे.दिवस असेच चालले होते .शेवटी त्याला एका कारखान्यात हमालीचे काम मिळाले .

कमलाला पहिल्यापासून झोपडपट्टीत राहायचे नव्हते.तेथील मारामाऱ्या झगडे भांडणे यातील तिला काहीच पचनी पडत नव्हते .इतरांच्या संगतीने आपल्या नवऱ्याला दारूची सवय लागेल ही तिला मोठी भीती होती .येथे आल्यावर तिला मुलगा झाला होता . झोपडपट्टीत संगतीने मुलावर वाईट संस्कार होऊ नयेत असे तिला वाटत होते.अशिक्षित असूनही ती सुशिक्षित होती .ती मुळातच सुसंस्कारित होती .नवऱ्याला व मुलाला या  झोपडपट्टीपासून दूर कसे नेता येईल याची तिला चिंता होती.

नवऱ्याच्या मागे लागून तिने हा छोटासा ब्लॉक भाड्याने घेतला होता .झोपडपट्टीत अपरिहार्यपणे होणाऱ्या अनिष्ट संस्कारांपासून तिला दोघांनाही दूर ठेवायचे होते.त्यात ती यशस्वी झाली होती .तिच्या सर्व आशा आता मुलावर केंद्रित झालेल्या होत्या .वाटेल ते कष्ट करून मुलाला शिकवू तो मोठा होईल त्याला चांगली नोकरी मिळेल.सुशिक्षित सून घरात येईल.आपल्याला चांगले दिवस येतील या आशेवर ती जगत होती .

मुलगा दहावीचा निकाल आणायला गेला होता.तो अजून आला नव्हता .त्याला बघायला ती बाहेर पडली होती .विचारांच्या तंद्रीत ती शाळेत केव्हा आली ते तिला कळले नाही.ती सरळ शाळेच्या ऑफिसमध्ये गेली.तिने तिच्या मुलाची चौकशी केली .मुलाचे नाव सांगितल्यावर तो दहावीच्या वर्गातच नाही असे आढळून आले.असे कसे होईल म्हणून ती पुन्हा पुन्हा विचारत होती .रोज शाळेला जातो म्हणून तो वेळेवर बाहेर पडत असे .व संध्याकाळी वेळेवर घरी परत येत असे .ऑफिसला त्याचे नाव कुठच्याही तुकडीत आढळून आले नाही. दहावीच्या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या यादीमध्येही तो नव्हता . आणखी चौकशी करता तो दहावीच्याच काय आठवी नववीच्या वर्गातसुध्दा कधीही नव्हता असे आढळून आले . याचा अर्थ गेली तीन वर्षे सतत तो शाळेत जातो म्हणून बाहेर पडत होता आणि कुठे तरी जात होता .काय करीत होता? कुणाच्या वाईट संगतीला लागला होता का?काही कळत नव्हते ? तिचे डोके गरगरू लागले. तिने चिकाटीने तीन वर्षांपूर्वीचा सातवीचा हजेरीपट व निकाल पाहा आणि सांगा म्हणून विनंती केली .

ती ऑफिसमध्ये गेली तेव्हा  प्रथम तिच्याकडे कुणीच लक्ष देत नव्हते .तेवढ्यात ऑफिसमधे काहीतरी कामाने एक शिक्षक आले होते.त्यांनी ऑफिसमधील मंडळींना कामाला लावले होते .

*त्या शिक्षकांमुळेच तिला आपला मुलगा सतत तीन वर्षे  शाळेत येत नव्हता ही माहिती कळली.*

*शेवटी तिचा मुलगा सुधीर सातवीला नापास झालेला आढळून आला.*

*याचा अर्थ तेव्हापासून गेली तीन वर्षे तो शाळेत जाण्याचे केवळ नाटक करीत होता .*

(क्रमशः)

२७/६/२०१९©प्रभाकर  पटवर्धन