Get it on Google Play
Download on the App Store

७ ती कोण होती १-२

(ही कथा संपूर्णपणे काल्पनिक आहे कुठेही साम्य आढळल्यास तो योगायोग समजावा)

गोष्ट जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वीची कोकणातील आहे.मी त्या वेळी नाशिकला राहात होतो .माझे आईवडील कोकणात आपल्या गावी असत.माझी बहीण रत्नागिरीला होती.ती इंग्रजी शाळेत शिक्षिका होती .माझे मेहुणे बहिणीचे मिस्टर स्टेट बँकेत ऑफिसर होते.आम्ही दोनच भावंडे .मी दूर असल्यामुळे बहिणीचाच आईवडिलांना आधार होता.मी आईवडिलांना माझ्याकडे येऊन रहा म्हणून सांगत होतो .त्यांना वृद्धत्वामुळे खेडेगावातील  निरनिराळ्या अडचणींना पूर्वीसारखे तोंड देता येत नव्हते . परंतु घरची शेतीभाती कलमांची बाग  घरदार तिथले मोकळे वातावरण शुद्ध  हवा पाणी सोडून शहरात लहान जागेत येण्याला त्यांचे मन तयार होत नव्हते . 

भाट्याच्या(भाट्ये एका गावाचे नाव)  खाडीवर हल्ली पूल झालेला आहे.पूल होण्याअगोदरची ही गोष्ट आहे .त्या वेळी आमच्या गावाला रत्नागिरीहून जायचे असले तरीही फार  मोठे प्रयास असत.अंतर जेमतेम पंधरा सोळा किलोमीटर होते .परंतु ते पार करण्यासाठी सर्व काही बरोबर जुळून आले तर दोन तास सहज लागत.अन्यथा आणखी कितीही वेळ लागे.प्रथम भाट्याची खाडी ओलांडण्यासाठी रत्नागिरीचा एक भाग राजीवडा येथे जावे लागे. त्यावेळी तिथे जाण्यासाठी स्थानिक बस नव्हत्या. रिक्षा नव्हत्या. केवळ सारवटगाडी हेच वाहन होते.सारवट गाडी म्हणजे बैलांनी अोढली जाणारी परंतु झकपक ,बंदिस्त व आकर्षक रंग रूपाची गाडी होय .त्यात बसमध्ये जसे आपण पाय सोडून बसतो तसे बसता येत असे. त्या वेळी रत्नागिरीत एक दोनच अशा गाड्या होत्या. सर्वजण चालतच जात असत.विशेष कारणासाठी सारवट गाडी सांगितली जात असे.

चालत राजवाड्याला जायला रत्नागिरीच्या मध्यभागातून सुमारे अर्धा तास लागे.त्या वेळी रत्नागिरीचा विस्तार सडय़ावर झालेला नव्हता . विजय स्तंभ, लायब्ररी, गोगटे कॉलेज, मनोरुग्णालय, हीच सडय़ावरची रत्नागिरीची परिसीमा होती .सडय़ावरची वस्ती अत्यंत तुरळक स्वरूपाची होती.

राजिवड्यावर पोचल्यावर होडी करून नदी ओलांडून पलीकडे जावे लागे. तिथे बस मिळाल्यास बसने किंवा चालत जावे लागे.बसची वाट पाहात राहणे हा आणखी एक वेळखाऊ भाग  होता .बसच्या फेऱ्या फार कमी असत .

त्या वेळी गोळप व पावस (गावांची नावे )येथील ओढ्यांवर पूल झालेला नव्हता . भरपूर पाऊस पडत असताना या दोन्ही नद्या भरभरून वाहत असत .(बस अलीकडेच थांबत असे.)त्या ओलांडणे म्हणजे एक कसबच असे.कंबरेपर्यंत भिजण्याची तयारी ठेवावी लागे.

तर रत्नागिरीहून माझ्या गावाला जाण्यासाठी या तीन नद्या ओलांडाव्या लागत.भाट्याची खाडी तर नेहमीच होडीतून ओलांडावी लागे.उरलेल्या दोन नद्या पावसाळ्यात कमी जास्त पाण्यातून ओलांडाव्या लागत.पाणी कमी असेल तर मात्र बसमधून माझ्या गावापर्यंत जाता येत असे .

वरील भाग विस्ताराने सांगण्याचे कारण मी जी गोष्ट पुढे सांगणार आहे तिचे आकलन तुम्हाला व्यवस्थित व्हावे हा आहे .   

पावसाचे दिवस होते .माझे वडील आजारी पडले .घरच्या घरी औषध उपचार चालू होता .गावात वैद्य होते .त्यांच्या अौषधाने वडिलांना नेहमीच आराम पडत असे .तसे काळजीचे काही कारण नव्हते .वडिलांनी दोन पत्रे पाठवली .बहिणीला व मला.त्यात नेहमीप्रमाणे खुशाली व इतर मजकूर होता .त्यात एकच वाक्य होते माझी प्रकृती जराशी बरी नाही .काळजी करू नये.त्या काळी पत्र हेच संदेशवहनाचे एकमेव साधन होते .मोबाइल स्वप्नातही नव्हता फोन कुठे तरी कुणाकडे तरी केव्हातरी असे .पोस्टातून तार हे आणखी एक संदेश वहनाचे साधन होते .पोस्टअॉफिसही प्रत्येक गावात नव्हते. आठ दहा गावे मिळून एक पोस्टअॉफिस असे. हल्लीं सारखे उठल्या सुटल्या, तू कसा आहेस ,मी कसा आहे ,पोचलो ,निघालो ,अमुक अमुक ठिकाणी आहे, वगेरे कळविण्याचे  मोबाईल नेट वगैरे काहीही साधन नव्हते .

पुढील हकिकत मी माझ्या बहिणीच्याच शब्दात देतो .

मी आजारी आहे असे अण्णांचे पत्र आले .तू काळजी करू नकोस असे त्यात स्पष्ट लिहिलेले होते .अण्णांचा स्वभाव मला पूर्णपणे माहीत आहे .कितीही आजारी असले तरी ते मी ठीक आहे असेच नेहमी सांगतात .उगीच दुसऱ्याला काळजी कशाला असे त्यांचे म्हणणे असते .

अण्णांना मी बरेच महिन्यात भेटले नव्हते .तेही कांही कामानिमित्त रत्नागिरीला आले नव्हते .तेव्हा अण्णांना भेटण्यासाठी मी गावाला गेले.आठ दिवस गावालाच अण्णांजवळ राहावे आणि तेथूनच येऊन जाऊन नोकरी करावी असा विचार माझ्या मनात आला .मी रत्नागिरीला शाळेत आलेली असताना यांना भेटायला गेले .त्यांना माझा विचार सांगितला .तू इकडची काळजी करू नकोस मी सर्व व्यवस्थित सांभाळतो असे हे म्हणाले .

त्या वेळी चांगली उघाडी होती.  पाऊस गायब होता .लोक पावसाची वाट पाहात होते . नवरात्र दोन दिवसांवर आले होते .दोन्ही नद्या जवळजवळ  कोरडय़ा पडल्या होत्या.मी यांचा निरोप घेऊन गावाला आले .शाळा अकरा ते पाच अशी  होती.गावाहून एसटी सकाळी नऊ वाजता होती .पंचेचाळीस मिनिटे एसटी भाट्ये येथे पोचायला .दहा पंधरा मिनिटे नदी ओलांडायला .शाळेपर्यंत चालत जाण्याला अर्धा तास .असा एकूण हिशोब करून मी साडेदहाला शाळेत पोचेन असा विश्वास  मला होता .काही कारणाने एसटी गाडी मागे पुढे झाली तरी अकरा पर्यंत मी शाळेत नक्की पोचेन अशी मला खात्री होती. मुख्याध्यापिका बाईंनाही मी अप डाऊन काही काळ एक दोन आठवडे करणार आहे अशी कल्पना दिली.त्यांनी तू खुशाल गावाला जाऊन राहा असे सांगितले .काही कारणाने एखादवेळी उशीर झाला तरी हरकत नाही असेही त्या म्हणाल्या.

मी गावाहून अपडाऊन करण्याला सुरुवात केली.माहेरपण तर माहेरपण होईल.अण्णांना व आईला रात्रीची सोबत होईल .अशी माझी योजना होती . विशेष पाऊस नसल्यामुळे नद्या  भरून वाहू लागतील आणि येणे जाणे बिकट होईल अशी परिस्थिती मुळीच नव्हती .

चार पाच दिवस व्यवस्थित गेले.मी बरोबर दहा वीसला शाळेत पोचत होते.त्या वेळी शाळेत कुणीही आलेले नसे . फक्त प्यून मंडळी आलेली असत .शाळेची साफसफाई चाललेली असे .

त्या दिवशी शुक्रवार देवीचा वार होता.माझा शुक्रवारचा उपास असतो हे तुला माहीत आहेच .मी शाळेत पोहोचले तेव्हा चांगले ऊन पडलेले होते .नंतर भुरभुर पावसाला सुरुवात झाली .त्यामुळे उकाडा कमी होण्याला मदत झाली .घामाच्या वाहणाऱ्या धारा कमी झाल्या .हवा हवा असलेला पाऊस आला म्हणून सगळ्यांनाच बरे वाटले .दुपारी दोन नंतर पावसाने जरा बऱ्यापैकी जोर पकडला .तरीही काळजीचे कोणतेही कारण नव्हते .संध्याकाळी पाच वाजता शाळा सुटली .मी भाट्ये खाडीच्या पलीकडे येऊन सहाची एसटी पकडली. सात वाजता आरामशीर घरी पोचेन असा अंदाज होता.सहप्रवाशांशी बोलता बोलता पावसाला सुरुवात झाली म्हणून सर्वांनाच  समाधान वाटत होते.आता पावसाने आपली गती वाढविली होती . सरीवर सरी कोसळत होत्या .अशा धुवांधार पावसाची आम्हाला सवय होती .आम्हाला त्याचे विशेष काही वाटत नव्हते .मोटार वेळेवर सुटली .आज एकूणच पॅसेंजर कमी होते .नद्यांना (ओढ्यांना) अजून पूर आलेला नसेल आपण सात वाजेपर्यंत घरी नक्की पोचू असा विश्वास होता .अजून तरी काळजीचे काही कारण वाटत नव्हते .

एसटी सडय़ावर( घाटमाथ्यावरील सपाटी )आली आणि मध्येच कुठेतरी पंक्चर झाली .दाट काळोख सर्वत्र पसरलेला होता .डोळ्यात बोट घातले तरी शेजारचे माणूस दिसत नव्हते .विजा चमकत तेव्हाच एसटी व बाजूची माणसे दिसत असत .

पावसात टायर बदलणे कठीण होते .एसटीमध्ये स्टेपनी होती . पाऊस कमी होईल आणि बॅटरीच्या प्रकाशात टायर बदलता येईल म्हणून सगळेजण वाट पहात होते.

(क्रमशः)

३०/९/२०१९©प्रभाकर  पटवर्धन